प्राजक्त

मैत्रीची एक गोष्ट

*प्राजक्त*
गाडी ने एक झोकदार वळण घेतलं आणि डोंगर ओलांडून निसर्गरम्य परिसर दिसू लागला.मुलं आणि बायको खुश झाली."वा,किती सुंदर परिसर आहे ,वसंत तू लेखक झालास यात काही नवल नाही".केतकी सहज बोलून गेली.वसंत मात्र मनाने कधीच वीस वर्षे मागे पोहचला होता.वडिलांची बदलीची नोकरी म्हणून वसंत आजी आजोबा जवळ वाढत होता. गावातलं ते सगळं बालपण झरझर डोळ्यासमोरून जात होत.आठवणींच्या हिंदोळ्यात गाडी घरापुढे थांबली.आजी आजही तशीच होती,गोरापान रंग,कपाळावर मोठं कुंकू आणि ठसठशीत नथ. फक्त वय झालं होतं आता ."वश्या ,आजोबांचा भारदस्त आवाज थोडा कातर झाला होता.ते बाहेर आले आणि सर्वांना आजीने घरात घेतलं.मुलांना तर घर प्रचंड आवडलं होत.केतकीचा हट्ट पूर्ण झाला होता.सगळे गप्पा मारत होते.वसंत उठला,"आजी मी जरा फिरून येतो ग".त्याने सरळ सागर च्या मळ्याचा रस्ता धरला.लांबूनच दोस्ताने ओळखलं.वीस वर्षांनी दोघं भेटले...फक्त डोळे बोलत होते.मग गप्पांचा फडच जमला.वसंत रात्री उशिरा घरी आला.बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागली.सकाळी उठून पाहतोय तर मुलं आधीच उठलेली.मुलगी मुग्धा ओरडत होती,"बाबा लवकर बाहेर ये,अरे हे बघ".वसंत घाबरून परसदारी धावला."बाबा ,बघ ना हा प्राजक्त कसा फुलालाय ,तुझ्या कथांमध्ये असणारा प्राजक्त हाच का रे?.वसंत काहीच बोलू शकला नाही.त्याने लवकर आवरलं आणि निघाला केतकी बरोबर होतीच.वसंत ने गाडी वेशीबाहेर वळवली आणि त्याची नजर एका भव्य हॉस्पिटल वर खिळली.डॉक्टर गौरी देशमुख.पण तो सरळ गावाबाहेरच्या शेतातील पाटलांच्या मळ्यात थांबला.तिथे चाफा तसाच उभा होता.आता मात्र वसंत झाडाजवळ आला.केतकीला काहीच कळेना?एवढ्यात श्रीपती पाटील पुढे आले,"कोण रे?.वसंत पुढे होत म्हणाला,"ओळखलं नाहीत का?मी वसंत! ".पाटील एकदम गप्प झाले.वसंत कसंबसं म्हणाला,"गौरी कुठेय? पाटील गप्प पाहून शेजारचा गडी म्हणाला," अक्का आता दवाखान्यात अस्त्याल".वसंत ने तशीच गाडी वळवली.हॉस्पिटल समोर गाडी थांबली.डॉक्टर देशमुख यांच्या केबिनमध्ये प्रवेश झाला...गौरी! वसंत ???गौरीला धक्का बसला होता.एवढ्यात तीच लक्ष केतकी कडे गेलं.केतकीने हसून ओळख करून दिली.गौरीने सगळ्या भेटी रद्द केल्या आणि त्या दोघांबरोबर बाहेर पडली.वसंत वीस वर्षांनी भेटलास रे,खूप शोधलं तुला मी आणि.....एवढ्यात केतकी कडे पाहून ती गप्प झाली.केतकी म्हणाली,"बोल,मला माहित आहे".वसंत ,मी आणि विनया तिघे खूप छान मित्र.अगदी शेंबूड पुसायचा वयापासून बर. शाळेत जायला लागल्यावर सागर सुद्धा आला.वय वाढत गेली आणि मैत्री घट्ट होत गेली.केतकी त्या वयात सुद्धा वसंत लेखक होणार,मी डॉक्टर आणि विनया   वकील हे ठरलं होतं आमचं.विनया नावाप्रमाणेच नम्र विनायशील व देखणी अशी आमची मैत्रीण.ते 10 वी च वर्ष झपाटून कष्ट घेत होतो.खूप भाबड होत ग आमचं जग.असे दिवस चालले होते आणि......मग वसंत पुढे बोलू लागला,"गावातील काळू आणि काही टुकार पोर विनयाला त्रास देऊ लागली.सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं.मग ते तिला माझ्या नावाने चिडवू लागले.गावात भरपूर बदनामी झाली.आमची मैत्री....संपवली त्या दुष्टांनी. खूप वादळ उठले, भांडण झाली.आम्ही घाबरून एकत्र जायचं बंद केलं.तो दिवस 10 वी चा सेंड ऑफ होता .या नंतर आम्ही भेटू की नाही माहित नव्हतं म्हणून मी चार  रोप आणली होती एक प्राजक्त मला,दुसरा चाफा गौरीला तिसरा प्राजक्त विनया कडे आणि पुन्हा चाफा सागर कडे आमच्या खऱ्या खुऱ्या मैत्रीसाठी.विनयाला गौरी ने रोप दिलं आम्ही जड पावलांनी बाहेर पडत असताना अचानक जोराची किंकाळी ऐकू आली.तसेच आत धावलो तर काळु आणि त्याचे मित्र पळून जात होते.विनया जमिनीवर लोळत होती आणि बाजूला ऍसिड...बाटली.पुढे भयानक घटना घडल्या.काळूच्या बापाने पैसे देऊन सगळं संपवल. मला आणि गौरीला आजीने शपथ घालून गप्प केलं.वसंत रडत होता.केतकी म्हणाली,"म्हणून तू गावी येत नव्हता तर.गौरी पुढे येत म्हणाली ,"आम्ही अपराधी होतो ग! आमच्या निष्पाप मैत्रिणींचे.तिने सोसलेल्या दुःखाचे .गावातील लोकांच्या या बदनामी मूळ आमची विनया.....आम्ही  मित्र म्हणून खूप लहान होतो. सगळे ऐकून केतकी सुन्न झाली होती.अचानक ती काहीशा निर्धाराने म्हणाली,"तेव्हा लहान होतात आता नाही ना!आजही अनेक विनया आहेत ज्यांना आधाराची गरज आहे".एवढ्यात सागर सुद्धा आला."वहिनी बरोबर बोलत आहे.
आणि आज एक महिन्यांनी सागरच्या जमिनीवर, डॉक्टर गौरी च्या नेतृत्वात व वसंत च्या पुढाकाराने विनया सदन हि अशा पीडित मुलीं करिता उभारलेली संस्था उभी राहिली होती.उदघाटन झाले.केतकी ने एक प्राजक्ताचे रोप समोरच लावले. आता हा मैत्रीचा प्राजक्त असाच बहरत जाणार होता..असंख्य मैत्रिणींना सावरणार होता.या पानाआडून जणू विनया त्यांच्या सोबत होती ....मैत्रीचा प्राजक्त नव्याने फुलणार होता....