प्रभावी लेखणी एक अस्त्रच!

Importance of writing

स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय लेखणी एक अस्त्र
शीर्षक - प्रभावी लेखणी एक अस्त्रच!

पत्रकारिता विषयाला अनुसरून लेखणी हे प्रभावी अस्त्र असा विषय आहे तेव्हा लेखणीला अस्त्र का म्हटलय हे समजून घेवूयात. विशेषतः लेखकांना हे समजावण्याची गरज नसावी पण जर खर्‍या अर्थाने या ओळीचा अर्थ समजला तर लेखन हे नक्कीच प्रभावी ठरेल या अर्थाने समजून घेवूयात.

शस्त्र व अस्त्र यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बर्‍याच लोकांना दोन्ही सारखेच वाटतात कारण खूपदा शस्त्रास्त्र असा सुद्धा शब्द वापरला जातो.म्हणजे काय तर युद्ध करण्याची साधनं . . . किंवा लढण्यासाठीची हत्यारं म्हणूयात हवं तर!

मग दोन्हीत फरक काय आहे ? तर शस्त्र हे हातात धरून लढलं जातं म्हणजे तलवार, गदा, वगैरे . तर हे शस्त्र वापरण्यासाठी काय हवं की शत्रु तुमच्यापासून किती अंतरावर आहे यावर त्या शस्त्राचा वापर ठरतो.
आता अस्त्र आहेत ते जे लांबच्या शत्रुवर वापरतात म्हणजे ते हातात धरून लढायचं नाही तर ते फेकून मारायचे किंवा शत्रुवर सोडायचं!
पूर्वी तर योग साधनेने प्राप्त झालेले ब्रम्हास्त्र , पाशुपतास्त्र वगैरे बरेच अस्त्र होते. एका जागी स्थिर राहून ते वापरले जायचे. ते वापरण्यासाठी सिद्ध मंत्रांची आवश्यकता असायची. शस्त्र कुणीही वापरू शकतं पण अस्त्र मात्र ठराविक लोकांकडेच असायचं.

आता या पार्श्वभूमीवर मी इतकंच सांगू इ्च्छिते की पत्रकारितेने जगात व आपल्या देशातही कमालीचे परिवर्तन घडवले म्हणूनच त्या लिखित सामग्रीला किंवा लेखणीला अस्त्राची उपमा दिली गेली. अस्त्र जास्त संहारक असतं म्हणूनच ते प्रभावी पण असतं. मग या लेखणीने विनाश घडवायचा की विकास हे त्या लेखनकर्त्याच्या हातात असतं.

आपल्या भारतात लेखणीचा पत्रकारीतेत उपयोग झाला तोबपहिल्या वृत्तपत्रामुळे ! "बंगाल गॅजेट" नावाने पहिलं वर्तमानपत्र जेम्स आगस्टस हिक्की यांनी सुरू केलं होतं जे इंग्रजी भाषेत होतं व साप्ताहिक होतं. हे जेम्स आगस्टस स्वतः ईस्ट इंडिया कंपनी चे एक कर्मचारी होते.
"उदन्त मार्तंड" हे हिन्दीतील पहिलं वर्तमानपत्र जे बंगालमधेच सुरू झालं होतं.

महाराष्ट्रात " दर्पण" हे पहिले मराठी वृत्तपत्र होते. ६ जानेवारी १८३२ रोजी \"दर्पण\" आणि \"दिग्दर्शन\" नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली होती. पुढे लोकमान्य देखील केसरीमुळे या क्षेत्रात आले व त्यांच्या लेखणीने ब्रिटीश साम्राज्याचं सिंहासन हलले होते. भारतात व महाराष्ट्रात असे कितीतरी विद्वान व महान लोक होवून गेलेत ज्यांनी केवळ लेखणीच्या आधारावर क्रांती घडवली , अंधश्रद्धा व अशिक्षित पणा याविरूद्ध लढा दिला.

सामाजिक सुधारणा करण्यात व व अनावश्यक चालीरीतींचं निर्मुलन करण्यात लेखणीचा मोठा वाटा आहे मग ते साहित्यातून असो की वर्तमानपत्रातून असो.

शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असं नेहमी वाणी बद्दल बोललं जातं आणि लेखणी हे अस्त्र आहे तर ते परिणामकारकरीत्या वापरा असं सांगणं होतं.

आपण पत्रकार नसलो तरीही लेखक आहोत आणि हे सिद्ध केलेलं अस्त्र आपल्याला मिळालंय तर चला याचा प्रभावी पणे समाजात काहीतरी योग्य बदल घडविण्यासाठी याचा वापर करूयात.

नमन.


©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक १५ .०१ .२०२३