पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ९

“साहेब मी विभावरी. माझी एका आय टी कंपनीकडून वर्षभरासाठी अमेरिकेत नेमणूक झाली आहे. बँक मॅनेजर क??

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ९  

भाग ८  वरून पुढे वाचा  ....

“एक मिनिट, विभावरी, थोडं थांबतेस का? माझ्या काही ओळखी आहेत एयरलाइन्स मधे, मी बघतो तुला उद्याची फ्लाइट मिळते का?” – बॉस.

“थॅंक यू सर, खरंच फार मोठी मदत होईल मला. थांबते मी.” – विभावरी.

जवळ जवळ अर्धा तास बॉस फोन वर बोलत होता, मग विभावरीला म्हणाला. “तुझं काम झालं आहे. उद्याच्या फ्लाइट मधे तुला जागा मिळून जाईल. मी एक फोन नंबर देतो, त्यांना कॉनटॅक्ट कर ते तिकीटाची व्यवस्था करतील.” – बॉस.  

विभावरी दुसऱ्याच दिवशी विमानात बसली. विमान सुरू झाल्यावर विभावरीने एक समाधानाचा श्वास घेतला. ती आता भारताच्या वाटेवर होती. पण डोक्यात माधवीचेच विचार होते, या विचारांचा भुंगा, दरभंग्याला पोहोचे पर्यन्त तिची पाठ सोडणार नव्हता.

विभावरी दरभंग्याला पोहोचली, तेंव्हा दुपारचा एक वाजला होता. हॉटेल बूकिंग आधीच केलं असल्याने, हॉटेलची टॅक्सी तिला घ्यायला एयरपोर्ट वर आली होती. हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन, जेवण झाल्यावर ती हॉस्पिटलमधे चारच्या सुमारास पोचली.

“कोणाला भेटायचं आहे तुम्हाला?” – आत मधे जाण्यासाठी जिथे बिल्ला दिल्या जातो, त्या काऊंटर वरची मुलगी विचारात होती.

“ते, रॉबरी केस मधे जखमी झाले, त्या बँकेच्या मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे.” – विभावरी.

“आत्ता विजिटिंग अवर अजून दोन तासांनी, सहा वाजता सुरू होतील, तो पर्यन्त तुम्हाला थांबावं लागेल.” मुलगी.

“अहो, मी त्यांची बायको आहे, आणि आत्ता अमेरिकेतून येते आहे. मला लगेच त्यांना भेटायचं आहे.” – विभावरी.

“तुम्ही त्यांची बायको आहात? काय सांगताय काय? त्यांची बायको, माधवी ताई त्यांच्या रूम मधे साहेबांच्या बरोबर आहेत. साहेबांनी दोन लग्न केली आहेत का?” – त्या मुलीचा प्रश्न. ती बुचकळ्यात पडली आहे, हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिच्या आठवणीत तरी असं कधी घडलं नव्हतं.

“मी आत्ता अमेरिकेतून येते आहे, मला कसं कळणार की रूम मधे माझ्या नवऱ्या बरोबर कोण आहे ते?” – विभावरी.

त्या मुलीने मग सुपरवायजरला फोन करून बोलाऊन घेतलं. तो आल्यावर पुन्हा तीच प्रश्नोत्तरं झाल्यावर त्यांनी हॉस्पिटलच्या अॅडमीन ऑफिसरला फोन केला. त्यांनी सगळं ऐकून घेतल्यावर हॉस्पिटलच्या जनरल मॅनेजरला फोन करून सांगितलं. त्यांना पण समजेना की काय घोटाळा आहे ते. त्यांनी ऑफिसर ला सांगितलं की “त्या अमेरिकेतून आलेल्या बाईंना माझ्या कडे घेऊन या.”  मग चौथ्या मजल्यावरच्या  नर्सेस डेस्क वर फोन करून सांगितलं की “माधवी मॅडमला सांगा की मी लगेच बोलावलं आहे.”

विभावरी जनरल मॅनेजरच्या केबिन मधे पोचली, तेंव्हा ते फोनवर होते, त्यांनी हातानीच इशारा करून तिला बसायला सांगितलं. फोन झाल्यावर म्हणाले,

“हूं, बोला मॅडम काय म्हणताय?” – G. M. साहेब.

“साहेब मी विभावरी. माझी एका आय टी कंपनीकडून वर्षभरासाठी अमेरिकेत नेमणूक झाली आहे. बँक मॅनेजर किशोर, माझे पती आहेत. मला बातमी मिळाल्यावर मी लगेच परत येण्यासाठी हालचाल सुरू केली, पण तरी सुद्धा चार पांच दिवस मधे गेलेच. आज इथे आल्यावर कळलं की कोणी माधवी नावाच्या बाईंचं नाव किशोरची पत्नी म्हणून दर्ज झालं आहे.”

“खरं आहे तुमचं म्हणण. माधवी मॅडमला पण मी इथे बोलावलं आहे, पण तुम्ही किशोरची पत्नी कशावरून?” - G. M. साहेब.

विभावरीने मग तिच्या मोबाइल मधे असलेले फोटो दाखवले, आधार कार्ड दाखवलं, पासपोर्ट दाखवला. G.M. साहेबांचं समाधान झालेलं दिसलं. म्हणाले “सर्व गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत, आता माधवी मॅडम आल्यावरच खुलासा होईल. त्या येतच असतील.

माधवी आली. आपल्याला G.M. साहेबांनी कशा करता बोलावलं असेल यांचा विचार करतच ती आली. तिला वाटलं की किशोरच्या प्रकृती संबंधांत काही अपडेट असतील.

“बसा माधवी मॅडम. ह्या विभावरी, बँक मॅनेजर किशोरची पत्नी. अमेरिकेत असतात. बातमी मिळाल्यावर धावतच त्या इथे आल्या आहेत. आणि विभावरी मॅडम या  माधवी. याच सध्या किशोर साहेबांची काळजी घेत आहेत.”

माधवी एकदम उठून उभी राहिली, विभावरीचे हात पकडून म्हणाली “तुम्ही किशोर सरांच्या पत्नी आहात?”

विभावरीला काही समजेना, पण तरीही तिने मान डोलावली. माधवीच्या डोळ्यात पाणी जमा झालं म्हणाली “बरं झालं तुम्ही आलात, आता माझी सुटका होईल. इतके दिवस मी सांगून सांगून थकले की मी किशोर सरांची बायको नाही म्हणून, पण कोणी ऐकायलाच तयार नाही. या साहेबांना सुद्धा सांगितलं होतं पण त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. आता तुम्ही आल्या आहात, माझी चिंता मिटली.”

विभावरी स्तंभित झाली. ज्या एकाच गोष्टीची तिला चिंता वाटत होती, तसं काहीच नव्हतं. सगळा गैरसमजाचा खेळ होता. तिला एकदम हायसं वाटलं. ती म्हणाली “पण मग तुमच्या बद्दल असं का पसरवल्या गेलं?”

“काहीच कल्पना नाही. मी सांगून सुद्धा कोणी त्यांची दाखल घेतली नाही. विभावरी मॅडम, मी माधवी मिश्रा. माझे पती मेजर रणवीर मिश्रा, त्यांचा काश्मीर मधे अतिरेक्यांशी लढतांना मृत्यू झाला. वीरमरण आलं त्यांना. मी किशोर सरांच्याच बँकेत काम करते. दरोडेखोरांना जेंव्हा कळलं की कॅश चोरणं शक्य नाही, तेंव्हा त्यांनी मला विकण्याचा प्लॅन बनवला, आणि मला खेचून नेत असतांना, किशोर सरांनी जिवाची पर्वा न करता त्यांच्या पकडीतून मला सोडवलं. या हाणामारीत त्यांना दोन गोळ्या लागल्या. विभावरी मॅडम, मी वीरपत्नी आहे, ज्यांनी माझ्या साठी जिवावर उदार होऊन लढत दिली, त्या किशोर सरांसारख्या शूर पुरुषांची सेवा करणं हे माझं कर्तव्य होतं आणि सुरवातीपासून मी तेच करत होते, लोकांनी चुकीचा अर्थ लावला. पण त्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला असेल, मी तुमची माफी मागते.”

“विभावरीच्या आता भावना अनावर झाल्या. माधवी बद्दल तिला अपार आदर  वाटला. तिचे डोळे पाणावले. तिने माधवीचे हात हातात घेतले, म्हणाली, “माधवी  ताई, माझा फार मोठा गैरसमज झाला होता, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही सुद्धा विनाकारण हा मनस्ताप सहन करून माझ्या नवऱ्याची सेवा केलीत, मी तुमचे उपकार कसे फेडू?” विभावरीला यापुढे बोलणं अशक्य झालं.

“ताई, आता विसरा ते सर्व. चला आपण रूम मधे जाऊ, किशोर सर तुमच्या वाटे कडे डोळे लाऊन बसले आहेत.” माधवी म्हणाली आणि मग  दोघी जणी  रूम मधे जायला निघाल्या. विभावरीच्या डोक्यांवरचं ओझं आता पूर्ण उतरलं होतं आणि केंव्हा एकदा किशोरला भेटते असं तिला झालं होतं.

***

पोलिसांची शोध मोहीम आता सुरू  झाली होती. रस्त्यावरच्या दुकांनाचे CCTV फुटेज पाहिल्यावर बाइक वरुन  पळून जातांना चौथा बदमाश आणि त्याचा बाइक वरचा साथीदार दिसले. चेहरे झाकलेले असल्याने, ओळख तर पटली नाही, पण बाइक चा नंबर मिळाला. पोलिसांनी पुढच्या चौकातले आणि रस्त्यावरचे फुटेज पाहायला सुरवात केली. पोलिसांनी बाइकचा पण शोध घ्यायला सुरवात केली. RTO मधून मालका चा पत्ता काढून त्यांच्या घरी पोलिस पोचले. त्या माणसाच्या घरी जाऊन फारसं काही साधलं नाही, त्याने त्यांची मोटर सायकल चोरीला गेल्याची FIR पोलिसांना दाखवली. पण शोध घेता घेता, पोलिसांना ती मोटर सायकल दरभंगा एयरपोर्ट नंतर एका बस स्टॉप जवळ टाकून दिलेली दिसली. पोलिसांनी आता परिवहन कार्यालया कडे मोर्चा वळवला.

आता पर्यंत घटना घडून आठ दहा दिवस उलटून गेले होते, तरी पण घटना बँक रॉबरी असल्याने लोकांच्या लक्षात राहिली होती, इतकंच काय, त्याची चर्चा पण होत होती. कंट्रोलर कडे थोडी चौकशी केल्यावर त्याने ड्यूटि चार्ट काढला. चार्ट बघून त्याने दोघा जणांना बोलावलं आणि रामसहाय  कंडक्टरला शोधून आणायला सांगितलं. रामसहाय  आल्यावर पोलिसांनी त्याला विचारलं, “बँक रॉबरी झाली त्या दिवशी एयरपोर्ट च्या नंतर जो बस स्टॉप आहे, तिथे साधारण साडे अकरा वाजता तुमची बस पोचली होती का?”

“हो साहेब.” – रामसहाय.

“कोण कोण चढलं त्या स्टॉप वर?” – पोलिस.

“दोघं जण चढले, मला जरा विचित्र वाटलं कारण त्यांनी चेहरा पूर्ण झाकला होता. रसुलपूरची टिकीट काढली होती त्यांनी साहेब.” – रामसहाय.

“एवढं खात्री पूर्वक कसं सांगू शकतोस तू?” - पोलिस.

“त्यांनी चेहरा झाकला होता आणि सारखे सारखे मागे वळून पाहत होते, म्हणून लक्षात राहिलं. नंतर त्यांनी चेहऱ्यावरचा गमछा उतरतांना काढून टाकला, आणि रसुलपूरच्या शेवटच्या स्टॉप वर उतरले.” – रामसहाय.

“त्यांचं चित्र काढायला मदत कर, ते दोघे बँक रॉबरी मधे सामील आहेत.” – पोलिस.

पोलिसांनी मग रामसहायला पोलिस स्टेशन वर नेऊन दोघा बदमाशांची चित्रं  काढली. ही चित्र सर्व पोलिस स्टेशन मधे पाठवण्यात आली आणि एक टीम रसूलपुर ला त्यांचा शोध घेण्या करता गेली.

क्रमश:.......  

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all