पोस्टाच्या योजना (Post Office Schemes In Marathi)

In This Article You'll Get Information About Post Office Schemes In Deatiled
पोस्टाच्या योजना आणि गुंतवणूक

© प्रतिक्षा माजगावकर

आपण काम करतो, पैसे कमावतो आणि त्याच बरोबर भविष्याचा विचार करून ते गुंतवतो. आपला कष्टाने कमावलेला पैसा नेहमीच सुरक्षित ठिकाणी गुंतवला जावा आणि त्याचा चांगला परतावा मिळावा अशी आपली इच्छा असते. या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या काही योजना बघणार आहोत. पोस्टात गुंतवणूक ही सगळ्यात सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने तुम्ही गुंतवलेले पैसे हमखास तुम्हाला परत मिळणारच याची हमी असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची माहिती बघूया.

पोस्टाचे व्याज दर हे दर तीन महिन्यांनी नवीन येतात. काही वेळा ते कमी होतात, काही वेळा तेच राहतात तर काही वेळा वाढलेले असतात. तुम्ही ज्यावेळी खातं काढलं असेल तोच रेट तुम्हाला तुमच्या खात्याच्या मॅच्युरिटीवेळी मिळतो त्यामुळे कधी व्याज दर कमी झाला तरी त्याची काळजी नसावी.

पोस्टात विविध प्रकारच्या योजना आहेत. जसे, आर.डी (रिकरिंग डिपॉझिट), टि.डी (टर्म डिपॉझिट), के.व्ही.पी (किसान विकास पत्र), एन.एस.सी. (नॅशनल सेविंग सर्टिफिकेट), एम.आय.एस. (मंथली इन्कम स्कीम). आता आपण कोणत्या योजनेचा काय फायदा असतो हे बघूया.

त्याआधी पोस्टात खातं काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात?, कोणाला कागदपत्रांची गरज असते? हे बघूया. या सर्व योजना या पोस्टाच्या एजंट कडे देखील तुम्ही चौकशी करून त्यांच्याकडून करून घेऊ शकता. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन तर करतीलच शिवाय चांगली सर्व्हिस देखील मिळेल. शक्य असल्यास तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस एजंट सोबत संपर्क साधून तुम्ही तुमचे खाते सुरू करू शकता. यासाठी पोस्ट एजंट तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारात नाही त्यांना केंद्र सरकार कमिशन देते. जर कोणता एजंट तुमच्याकडून सेवेसाठी शुल्क आकारत असेल तर त्वरित ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या. शक्यतो एजंटकडून खातं काढून घेतलेले चांगले असते ज्यामुळे फॉर्म भरण्यापासून ते पोस्टात तुमचं खातं उघडून तुम्हाला संबंधित खात्याची पुस्तकं आणून देणं हे काम एजंट करतो. यामुळे तुमचा तिथे जाण्याचा वेळ वाचतो. चला आता आपण बाकी माहिती बघू.

समजा तुम्ही पोस्टात पहिल्यांदा खातं काढणार असाल तर तुम्हाला फॉर्म सोबत दोन फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत्येकी एक झेरॉक्स (सेल्फ अटेस्टेड म्हणजेच त्यावर स्वतःची सही करणे) लागतील. जर तुम्हाला मायनर (१८ वर्षाखालील) मुलाच्या / मुलीच्या नावाने खातं काढायचे असेल तर त्यांचे बर्थ सर्टिफिकेट आणि आई किंवा वडिलांपैकी जे कोणी सही करणार असेल त्यांचे वरील कागदपत्र लागतील.

समजा तुमचे आधीच पोस्टात खाते सुरू असेल तर तुम्हाला यापैकी कोणतेच कागदपत्र लागणार नाहीत. तुमच्या चालू खात्याच्या पुस्तकावर एक "सी.आय.एफ." (CIF) नंबर असतो तो फॉर्म भरताना लिहिणं अनिर्वाय असेल. तो नंबर लिहिल्यावर तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही.

कोणत्याही योजनेत जर तुम्हाला जॉइंट खाते काढायचे असेल तर तेही शक्य आहे. फॉर्म भरताना त्यात दोन्ही व्यक्तींची माहिती भरावी आणि दोन्ही व्यक्तींच्या सह्या असाव्यात.

चला आता आपण पोस्टाच्या योजना आणि त्याबद्दल सखोल माहिती पाहूया.

१. आर.डी. :- रिकरींग डिपॉझिट म्हणजेच आर.डी.मध्ये गुंतवणूक करणे अगदी सर्व सामान्य लोकांना देखील फायदेशीर आहे. आपल्याला भविष्यात येणारे खर्च दिसत असतात आणि त्याची व्यवस्था करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या योजनेत आपण थेंबे थेंबे तळे साचवतो. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तीन वर्षाचा याचा लॉकिंग पिरियड असतो. म्हणजेच तुम्हाला खातं चालू केल्या तारखेपासून कमीतकमी तीन वर्ष तरी ते मध्येच तोडता येत नाही. यात महिन्याला ठराविक एक रक्कम भरावी लागते.
उदा. तुम्ही महिना ₹१०००/- चे खाते सुरू केले आहे तर दर महिन्याला तुम्हाला ₹१०००/- या खात्यात भरायचे असतात. पाच वर्षांनी म्हणजेच ६० महिन्यांनी तुमचे या खात्यात ₹६००००/- जमा होतात आणि मॅच्युरिटीच्या वेळेला तुम्हाला यात व्याज मिळवून चांगली भरघोस रक्कम मिळते. तुम्ही ज्यावेळेला खातं काढलं आहे त्यानुसार व्याज ठरलेले असते त्यामुळे इथे व्याजाचे गणित देत नाहीये. ही रक्कम तुम्ही एकतर चेक स्वरूपात मिळवू शकता किंवा पोस्टात एस.बी. (Saving Bank Account) काढून त्यात ट्रान्स्फर करून घेऊ शकता.

तुम्हाला जर या योजने अंतर्गत खातं काढायचं असेल तर फॉर्म भरून आणि किती रुपयांचे खाते काढायचे आहे ते रुपये तुम्हाला पोस्टात जमा करायचे असतात. हेच तुम्ही पोस्टाच्या एजंटकडून करून घेणार असाल तर फक्त पैसे आणि फॉर्मवर सह्या (जर आधी खातं नसेल तर वरील कागदपत्रे) देऊन तुमचं काम होईल.

एकदा हे खाते सुरू झाले की दर महिन्याला ती रक्कम पोस्टात भरावी लागते. समजा तुमचे खाते १५ तारखेच्या आधी काढलेले असेल तर पैसे भरताना १५ तारखेच्या आधीच भरले जातील याची काळजी घ्यावी अन्यथा लेट फी भरावी लागते.
एखाद महिना जर तुम्हाला पैसे भरता आले नाहीत तर पुढच्या महिन्यात तुम्ही लेट फी भरून एकत्र पैसे भरू शकता.
₹१००/- ला ₹१/- रू. लेट फी असा दर आहे.

त्यामुळे जर तुम्ही स्वतः पोस्टात जाऊन खाते काढले असेल तर याची खबरदारी नक्की घ्यावी. जर एजंटकडे खाते काढले असेल तर तुमचा एजंट वेळोवेळी तुम्हाला आठवण करून देऊन तुमचे पैसे मुदती दरम्यानच भरेल आणि लेट फी लागणार नाही.

तसेच जर तुम्ही एकदम पैसे (कालावधी सहा महिने ते चोवीस महिने) भरणार असाल तर तुम्हाला रिबेट देखील मिळतो. ₹१०००/- ला सहा महिन्यांचा रीबेट ₹१००/- मिळतो. म्हणजेच तुम्ही विचार केलाय की माझे खाते दरमहा ₹१०००/- चे आहे. मी या महिन्यात एकदम सहा महिन्याचे ₹६०००/- भरणार आहे तर तुम्हाला यावर ₹१००/- रिबेट मिळेल. म्हणजेच तुम्हाला सहा महिन्यांचे ₹६०००/- न भरता फक्त ₹५९००/- भरायचे आहेत.

आता बघूया तुम्ही हे खातं किती रकमेचे काढू शकता व त्याला काही मर्यादा आहेत का?
तुम्ही हे खाते अगदी ₹१००/- पासून ते कितीही रुपयापर्यंत काढू शकता परंतु आर.डी. काढताना आपल्याला हे पैसे पाच वर्षांनी मिळणार आहेत आणि त्यावेळी कितपत महागाई असेल किंवा आपण कोणत्या प्रसंगासाठी ते साठवत आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या रकमेचे खाते सुरू करावे जेणेकरून पाच वर्षांनी मिळणारा हा परतावा चांगला असेल. शक्यतो ₹१०००/- पासून सुरुवात करावी जेणेकरून चांगली रक्कम आपल्या हातात येईल.

२. टी.डी. (TD):- ही योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष अश्या चार विभागांमध्ये उपलब्ध आहे. यात तुम्हाला एक फिक्स रक्कम ठेवावी लागते. समजा तुम्ही ₹५००००/- एक वर्षासाठी यात गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याप्रमाणे फॉर्म आणि चेक दिल्यावर तुमचे हे खाते सुरू होईल. अगदी तसेच दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षाच्या योजनेसाठी आहे. दर वर्षाला येणारे व्याज तुम्ही तुमच्या पोस्टात असलेल्या सेवींग अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करून घेऊ शकता किंवा मॅच्युरिटीवेळी मुद्दल + व्याज असा एकत्र चेक घेऊ शकता.

३. के.व्ही.पी.:- किसान विकास पत्र या योजनेत देखील एकदम पैसे गुंतवावे लागतात. या योजनेत गुंतवलेले पैसे मॅच्युरिटी मिळताना डबल मिळतात. म्हणजेच जर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे डबल (दुप्पट) करायचे असतील तर ही योजना चांगली आहे. या योजनेचा कालावधी व्याज दरावर अवलंबून असतो. जास्त व्याज दर कमी कालावधी, कमी व्याज दर जास्त कालावधी. त्यामुळे योजनेचा कालावधी बघून त्यावेळी मिळणाऱ्या रकमेला किती किंमत असेल याचा अंदाज घेऊन पैसे गुंतवणे श्रेयस्कर ठरेल.

४. एन.एस.सी.:- ही योजना पाच वर्षांसाठी आहे शिवाय याचा व्याजदर देखील चांगला आहे. जर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तुम्ही जर यात पैसे गुंतवले तर याचा फायदा तुम्हाला टॅक्स रीबेट मधून मिळतो. तुमची ही बचत तुम्हाला जर कधी अचानक कर्जाची गरज पडली तर तारण ठेवून तुम्ही यावर कर्ज मिळवू शकता. मात्र हे अकाउंट तुम्ही मध्येच तोडू शकत नाही.

५. एम.आय.एस.:- मंथली इन्कम स्कीम या नावावरून तुम्ही ओळखलं असेल यात तुम्हाला महिन्याला काहीतरी इन्कम आहे. तर काय आहे यात इन्कम? ही योजना देखील पाच वर्षांसाठी आहे. यात तुम्ही सिंगल अकाउंट किंवा जॉइंट काढू शकता. जर तुम्ही सिंगल अकाउंट काढणार असाल तर जास्तीत जास्त नऊ लाख रुपये तुम्ही यात गुंतवू शकता. तसेच जॉइंट अकाउंट साठी ही लिमिट पंधरा लाख रुपये ही आहे. (w.e.f. 01/04/2023) पूर्वी ही लिमिट अनुक्रमे साडे चार लाख आणि नऊ लाख अशी होती.

तर आता येऊया मेन मुद्द्यावर! यात तुम्ही जी रक्कम गुंतवली असेल त्यावर महिन्याचे जे व्याज असेल ते तुमच्या पोस्टाच्या सेविंग अकाउंट मध्ये जमा होते. पाच वर्षांनी जेव्हा हे खातं पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला तुमची मुद्दल परत मिळते. (आता दर महिन्याला व्याज घेतले असल्याने तेव्हा व्याज मिळत नाही हे लक्षात असू द्या.)

जर तुम्हाला काही कारणास्तव हे खातं मध्येच तोडायचे झाले तर तुमच्या मुद्दल मधून काही रक्कम वजा होते आणि मग तुम्हाला उरलेली रक्कम मिळते.

या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही दुहेरी फायदा करून घेऊ शकता तो म्हणजे हे दरमहा येणारे व्याज तुम्ही आर.डी. अकाउंट सुरू करून त्यात भरू शकता जेणेकरून तुम्हाला व्याजवरच व्याज मिळते.

या शिवाय अजून काही खास महत्त्वाच्या टीप्स:-
१. पोस्टाचे व्याज दर आणि किती परतावा मिळणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस इंटरेस्ट कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड करू शकता.

२. तुम्हाला तुमच्या आर.डी. तसेच इतर खात्यांविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी त्याच ॲपचे प्रो व्हर्जन घेऊन त्यात तुमच्या खात्यांचे अकाउंट नंबर घालून तुम्ही त्याचा फॉलोअप घेऊ शकता.

३. पोस्टाचे आय.पी.पी.बी. अकाउंट सुरू करून तुम्ही तुमच्या पोस्टातील एस.बी. अकाउंटचे ऑनलाईन व्यवहार करू शकता. (यासाठी तुम्हाला स्वतः पोस्टात जाऊन हे सुरू करुन घ्यावे लागेल.)

४. जर तुम्ही पोस्टात खातं काढण्यासाठी एजंटची निवड केलीत तर तुमचे काम अजूनच सोपे होईल.

५. तुमच्या अकाउंट मॅच्युरिटीवेळी तुम्हाला पोस्टात स्वतःला हजर राहावे लागते तेव्हा आठवणीने पॅन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स (सेल्फ अटेस्टेड) घेऊन जा.

अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस एजंटला संपर्क करू शकता अथवा जवळच्या पोस्टात जाऊन चौकशी करू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा.