Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मनाची सकारात्मकता...

Read Later
मनाची सकारात्मकता...

सकारात्मकता.

        अचानक वाऱ्याची गती वाढत चाललेली होती. खिडक्यांमधून झरझर आवाज येत होता. अनपेक्षित ढग दाटून आले . काही वेळ आधी आकाश अगदी शुभ्र होतं. मंद सूर्यप्रकाश होता. हलका हलका वारा सुरू होता. भर दुपारी 12 च्या सुमारास काळोख दाटला. कडाडून वीज चमकू लागली. अगदी बाजूच्या शेतात गतीने वीज पडली आणि आमचं घर हादरून उठलं. विजेचा आवाज इतका कर्कश आणि वेगवान होता की आमच्या कानठळ्या पुरत्या बंद पडल्या .
        लगेच लाईट गेले. बाहेर ही काळोख आणि आतही. क्षणभर घाबरा घाबर झाली आमची. चिमुकली राणी आजीला घट्ट पकडून बसली होती. सासरे बुआ लागलीच देवघरातून जप करता करता बाहेर पळत आलेत. वीज पडल्याचा आवाज अतिशयच भयावह होता. पावसाच्या सरीही वेगाने कोसळू लागल्या होत्या. लाईट लगेच परत यायची काही शक्यता नव्हती . आता काय करावं... 
           आज गुरु पौर्णिमेचा दिवस . सणवार म्हटलं की सकाळपासून ची धावपळ. कुळाचाराचा स्वयंपाक आणि त्यात मुलांची शाळा. मुलांचं सकाळ वकाळ आटवून परत स्वयंपाकाला लागायची प्रत्येक गृहिणीची धडपड. त्यातली मी एक. किती कठीण होऊन बसतं ना सगळं.. त्यातल्या त्यात जर अर्ध्या स्वयंपाकात लाईट गेली तर. वेळेवर फजिती. 
        बाहेर गारवा होता आणि माझ्या डोक्यात वड्याची न वाटलेली डाळ. माझा स्वयंपाक वड्यावरच अडकला होता. तसं सगळं तयार होतं फक्त्त वड्याची डाळ आता मी मिक्सर मधून काढणार तेवढ्यातच विजेच्या प्रवाहाने रामराम ठोकला. मी आपली उदासली हिरमसून राणीला कुशीत घेऊन बसली होती..

 तेवढ्यात,

"अगं नैना नैवेद्याचे ताट बनवं ना . उशीर झालाय खूप. विजेचा भरोवसा नाही आता कधी परत येईल. पाऊस वाढत चाललेला आहे. पटकण नैवेद्य करून आरती आटपून घेऊ ", सासरेबुवा म्हणालेत.

    नैनाच्या कंठात शब्द आटले होते. वर्षाचा पहिला सण आणि आपली अशी बोम. करायच तरी काय. ती काहीही उत्तर न देताच सासूबाईंकडे गेली.

"आई सगळं तयार आहे नैवेद्यासाठी पण वडे मात्र तेवढे राहून गेलेत,"

   सासूबाईंनी चटकण तिला मान वर करून बघितलं. ती आणखीनच घाबरली.
"काय ग? प्रत्येक वेळी तुझा स्वयंपाक वेळेच्या आधी होतो. मग आज काय झालंय?"
"आई सगळं तयार होतं आता मी मिक्सर फिरवणार तेवढ्यातच लाईट गेले."
"अरे देवा आता काय करायच. आमच्या वेळेला कुठे हे मिक्सर वगैरे होते.  आम्ही पायल्या पायल्याची डाळ पाट्यावर वाटायचो. पहाटे पहाटे उठून कुलचाराचा स्वयंपाक बनवायचो. पुरणा पासून सगळं असायचं जेवणात. त्यात खाणारे इतके की दोन दीर, चार नंदा, आम्ही तीन जावा, सगळ्यांची मुलं, सासु - सासरे. केवढा व्याप होता. ये बाई तू वाईट नको मानून घेऊ मी सांगते आहे तुला फक्त्त.आपल्यावर नको घेऊ ग बाई तू."

       सासूबाईंचा वाढलेला आवाज सासऱ्यांच्या कानांपर्यंत पोहोचला होता. त्यांनी तिला मारलेला टोला त्यांना चांगलाच कळला होता. ते लागलीच बाहेर आलेत. बेसिन च्या खालच्या लाकडी कपाटात दिवाळीत वापरलेले मातीचे दिवे ठेवलेले होते. जवळपास दोन डझन असतील. लगेच स्वयंपाक खोलीतून  मोठे ताट आणलं त्यात दिवे ठेवले. प्रत्येक दिव्यात त्यांनी वात घातली आणि तेल ओतून घरभर दिवे लावले. भर कळोखात घर दिव्याच्या मंद तेवणाऱ्या ज्योती मुळे लखलखित झालं होतं.
      त्यांनी पटकण दिवाण मधून त्यांनी काही तरी काढलं. नैना बघतच राहिली . तिला वाटलं रागावतील ते पण त्यांनी स्मित हास्य गालावर आणत म्हटलं, " नैना बाळा काळजी करू नकोस. याला पाटावरवंटा म्हणतात. तुझी सासुबाई पूर्वीच्या तिच्या गोष्टी सांगत होते ना. किती कशी पायल्या पायल्या डाळ पाट्या वरवंट्या वर वाटायची. हाच तो पाटा - वरवंटा. माझ्या आईच्या काळातलं मी अजूनही सांभाळून ठेवलाय. बघ आता तू याची कमाल. आपण मिळून काम करून या. तू डाळ आण मी तोपर्यंत याला स्वच्छ करतो. "

    नैना च्या हिसमुसल्या चेहऱ्यावर अगदी तेज आलं. ती धावतं स्वयंपाक खोलीत गेली आणि डाळ आणली.
    सासूबाई मात्र जागेवरून हलल्या नाही. दुरूनच त्यांची मज्जा बघतं होत्या.
"आजच्या पिढीनी कदाचित असा पाटा आणि वरवंटा कधीच बघितला नसेल. वापरला तर अजिबात नसेल. मी सांगतो तुला कसा वापरायचा ते. आधी डाळ टाकायची मग वरवंट्याने हळूहळू वाटायला सुरुवात करायची."
    नैना मोठ्या नवलाने बघतं होती. तिकडन सासूबाईंचा आवाज आला.
"काय हो माझी तर एवढ्या आंगवणीने कधीच मदत केली नाही तुम्ही."

"बघ लागलीच खुपलं तिच्या नजरेत ", सासरे नैनाला हायफाय करत म्हणाले. दोघेही गालातल्या गालात हसले.

"बाबा आता मी करून बघू काय?", नैना म्हणाली.

"अगं हो मग काय. घे हा वरवंटा."

"अंग बाई किती जड", नैना हातात वरवंटा घेताच म्हणाली.

"जड नाही तर काय आधीच्या बायका पहेलवान असायच्या ना तुझ्या सासु सारख्या."
        परत सासूबाईंची मस्करी करत सासरे म्हणाले.

"करा करा आणखीन मस्करी करा माझी".

      नैना मात्र आज खूप आनंदी होती. काही तरी नवीन बघायला मिळालं होतं. काही तरी नवीन शिकायला मिळालं होतं. तीच लहानपण अमेरिकतलं तिला कुठे या जुन्या पद्धती माहिती असणार. पण तिने पटपट डाळ वाटली आणि गरमा गरम वडे बनविले.
     पंच पकवानांचा नैवेद्य काढला . अन्नपूर्णेला, वास्तूला, देवाला, तुळशीला नैवेद्य फिरवला. लाईट अजून आलेली नव्हती. तिने
 सासऱ्यांनी घरभर लावलेल्या दिव्यात आणखीन थोडं तेल घातलं.  सासु सासरे दोघांच्या पाया पडून आरती केली आणि सर्वांना जेवायला वाढला. सासऱ्यांसमोर ताट ठेवून ती त्यांना खूप खूप थँक्स म्हणाली त्यावर ते म्हणाले, 
   "बघ नैना तुझ्या सासूने तुला टोला मारला नसता तर मला पाटा-वरवंट्याची आयडिया सुचली नसती. म्हणून पहिल्या थँक्स तिला म्हण".

"काहीही बोलता काय हो मी कशाला टोला मारू तिला."

 आई तरीही खूप खूप थँक्स. दोघांनाही खूप खूप थँक्स.

सासरे म्हणाले ", बघ नैना आपलं आयुष्य इतकं सहज आहे ना की रोज आपण काही ना काही शिकत असतो. रोज नवीन नवीन अनुभव आपल्याला येतात. काही वाईट असतात तर काही चांगले. पण शिकायला मात्र खूप मिळतं. कोण आपल्या आयुष्यात पुरता गुरु म्हणून येईल काही सांगता येतं नाही. पण आपण मात्र प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधायची. मार्ग आपल्याला आपोआपच मिळतो."

"खरंच ना बाबा आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दोघांनी मला नवीन आणि काही तरी विशेष शिकविल. तुम्ही नसते तर मी आपली लाईट परत यायची वाट बघतं बसले असते. मला फार आवडली ही कल्पना. बघा ना तुम्ही लावलेल्या या दिव्यांच्या प्रकाशात घरात किती सकारात्मकता वाटते आहे. खरंच आजचा दिवस खूप खास आहे."


धन्यवाद!
सौ. अश्विनी रोशन दुरगकर. 

 

     

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashvini Roshan Duragkar

Housewife

मला जिवंत अनुभव मांडायला आवडतात...

//