Jan 19, 2022
नारीवादी

पोरीचा बाप

Read Later
पोरीचा बाप

सावी आणि श्रीधर. लग्नाला जवळ जवळ पाच वर्ष झालेली त्यांच्या. सावी तिच्या सासरी सुखाने संसार करत होती. सासू सासरे पण अत्यंत प्रेमळ. मुलगीच म्हणायचे ते तिला. श्रीधर तर सावी वर जीव ओवाळून टाकायचा. सावीला अगदी आदर्श, स्वप्नी पाहावं तसं घर मिळालं होतं. पण कितीही झालं तरी माहेर ते माहेर. माहेरची ओढ प्रत्येक सासुरवाशिणीला, मग लग्नाला कितीही वर्ष झाली तरी असतेच. श्रीधरला मात्र हे नेहमीच खटकायचे. त्याचे म्हणणे नेहमी हे, जवळ तर आहे तुझ्या आई बाबांचं घर मग तुला राहायला का जायला पाहिजे. सावी, श्रीधरचे आई बाबा सर्वांनी आतापर्यंत त्याला याबाबत समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला सावीच्या या भावना कधी समजल्याच नाहीत. दरवेळी ती माहेरी जायला निघाली की हा आतल्या आत रागवायचा. विरोध नाही केला त्याने कधी पण त्याचा चेहरा पाहून सावीला कळायचे की आपण चाललोय हे काही नवरोबाला रुचलेले नाही. पण ती तिला तिच्या सासूने सांगितल्याप्रमाने या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष करे.

लग्नाच्या पाच वर्षांनंतर सावी आणि श्रीधरकडे तो गोड क्षण आला. सावी आई होणार होती. सगळं घर आनंदाने न्हाऊन निघालं होतं. सावीची जो तो आपापल्या परीने खूप जास्त काळजी घेत होता. तिला काय हवं नको ते बघत होता. आता श्रीधरने तिला पूर्णच मोकळीक दिली होती. सावी तिला हवं तेव्हा तिच्या आईकडे जायची. आता तिला माहेरपणाचा खराखुरा आनंद मिळत होता. श्रीधर पण त्याचा हिरमुसलेपणा ती माहेरी गेल्यावर तिला दाखवत नव्हता. सावीला कधी कधी असं वाटे की मी आत्ता गरोदर आहे म्हणून श्रीधरला माझ्या माहेरी येण्याबद्दल राग नाही पण उद्या बाळ झाल्यावर सुद्धा मला मिळेल का यायला एवढ्याच वेळा. सावीला श्रीधरच्या या स्वभावाची खंत कायमच भेडसावत होती. आत्ताचा प्रत्येक क्षण अन क्षण तिला सोनेरी वाटत होता आणि हे मोरपंखी दिवस कधी संपूच नयेत असं वाटे. पण दुसरीकडेच आपल्या गर्भात आपलं जे बाळ वाढतंय ते कसं असेल? मुलगा असेल की मुलगी? दिसायला कुणासारखं असेल? इवल्याशा त्या बाळाला पहिल्यांदा पाहताना मला कसं वाटेल? काय असतील माझ्या भावना या विचारांनी असं वाटे, भरभर भरभर दिवास सरावेत आणि मी माझ्या बाळाला पाहावे. पुढे जे होईल ते बघू नंतर.


अखेर तो दिवस आला. सावीला आई बाबा हॉस्पिटल मधे घेऊन आले. त्यांनी सावीच्या सासरी हॉस्पिटल मधे या म्हणून कळवले. सावीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. तिची अवस्था पाहून श्रीधरला भरून येत होते. अखेर बारा तास कळा सोसल्यावर सावीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या इवल्याशा परीला प्रथमच पाहताना आसवं गालावर येऊन कधी थबकली श्रीधरला कळलंच नाही. आज तो बाबा झालेला, एका इवल्याशा परीचा बाबा. आई बाबा सासू सासरे सगळे अभिनंदनाचा वर्षाव करत होते पण आता तो आतूर झालेला सावीला भेटायला.

काही तासांनंतर सावीला दुसर्‍या रूम मधे शिफ्ट केले. श्रीधर सावीला भेटला. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तीन दिवसांनंतर सावीला हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला. आता सावी आणि बाळ सावीच्या माहेरी होते. बाबाच्या, आजी आजोबांच्या सावीच्या घरच्या फेर्‍या आपसूकच वाढल्या होत्या. बारसं झालं. आपल्या बाळाच्या लीला पाहता पाहता तीन महिने कसे भुर्रकन उडून गेले सावीला कळलेच नाही. आता मात्र सावीची पावले जड होत होती. सासरी जायचं पण होतं पण पुन्हा असं माहेरी यायला मिळेल का ही भीती तिला कुठेतरी सतावत होती. आईने तिला नेमकं हेरलं होतं. समज दिली होती, अगं आपण जवळ तर राहतो आम्ही येऊ, तू ये अधनं मधनं. पण सावी तिची खंत आईलाही सांगू शकत नव्हती. आज तो दिवस आला. श्रीधर सावीला आणि आपल्या बाळाला घ्यायला आला. सावीला अश्रू अनावर होत होते. कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी आसवं गळतंच होती. एका बाजूला श्रीधर आणि दुसर्‍या बाजूला आई बाबा! भावना संमिश्र होत्या पण तिला सासरी जाण्यावाचून पर्याय नव्हता.

श्रीधर सावीला आणि बाळाला घेऊन घरी आला. बाळाचे घरी एकदम दणक्यात स्वागत झाले. श्रीधरने बाळासाठी घर छान सजवले होते. सजावट आणि सासरी सार्‍यांचा उत्साह पाहून सावी भारावून गेली. सगळं काही छान चालू होतं. दिवस कधी उगवायचा आणि कधी मावळायचा घरी कुणाला कळतंच नव्हतं. दिवस भराभरा सरत होते. बाळाचं सगळं करण्यात सावी तर एवढी मग्न झालेली की तिला बाळ नऊ महिन्याचं कधी झालं कळलंच नाही. बरेच महिने आपली लेक राहायला आली नाही म्हणून सावीच्या बाबांनी न राहवून विषय छेडला, बाळा कधी येते पुन्हा? ये दोन दिवसांसाठी. आणि पुन्हा एकदा सावीला आधीसारखंच टेन्शन आलं. आता पुन्हा श्रीधर हिेमुसेल का की पाठवेल मला खुशी खुशी माहेरी?

सावीने विषय छेडला माहेरी जाण्याचा पण आज मात्र श्रीधरचं उत्तर ऐकून सावी अवाक् झाली. श्रीधर म्हणाला,

" सावी मला माफ कर. मी चुकत होतो एवढी वर्ष. एवढी वर्ष तुम्ही मला समजावत होते पण मला तुझ्या माहेरी जायच्या भावना कधी समजल्याच नाहीत. नऊ महिन्यात मला माझ्या बाळाचा एवढा लळा लागलाय की मी तिला एक क्षणही माझ्यापासून लांब ठेवू शकत नाही. तू तर पंचवीस वर्ष ज्या घरात वाढलीस त्यांना सोडून आज आपल्या या घरात राहतेस. काय वाट त असेल तुझ्या बाबांना याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. आत्तापर्यंत मी फक्त वाचलेलं की मुलांना एका पोरीचा बाप झाल्यावरच बायकोच्या भावना कदाचित जास्त चांगल्या समजू शकतात. आज मी हे अनुभवतोय. मी पुन्हा अशी चूक नाही करणार "

आज सावीला खूप मोकळं वाटत होतं. आई झाल्याचं सुख तिला चांगलंच मानवलं होतं.

वाचकहो कथा काल्पनिक जरी असली तरी आज बर्‍याच मुलींना या परिस्थितीला सामोरे जावे लागते. कथेतील काल्पनिक प्रसंग हा मुद्दा मांडण्यासाठी घेतलेलं एक निव्वळ उदाहरण आहे. असे बरेच प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात. एक मुलगी ज्या आई बाबांच्या सानिध्यात लहानाची मोठी होते ती समाजाने आखलेल्या नियमांप्रमाणे सासरी नांदते तिला तिच्या आई बाबांपासून लांब ठेवण्याचा हक्क कुणालाही नाही.

आपल्याला लेख कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपला अभिप्राय महत्वाचा. आणि हो! माझं इतरही साहित्य आवडल्यास मला नक्की फॉलो करा. माझं साहित्य माझ्या नावासकटंच शेयर करा. धन्यवाद ????????


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarti Shirodkar

Business Analyst

साहित्य माझा आवडीचा विषय. असंच काही साहित्य, माझ्या मानातलं, माझ्या लेखणीतून.