ऑफिसकारण

It Happens When Political Issues Enters At Workplace


मंजिरी, श्रेया, मधुरा, पल्लवी, नैना आणि अंजली असा सहा समवयीन सोबत काम करणाऱ्या एका सरकारी कार्यालयातील सहकाऱ्यांचा एक ग्रुप. सकाळी 09:30 ला ऑफिस सुरु झालं कि यांना वाट असे दुपारी एक वाजता होणाऱ्या लंच ब्रेकची. एकमेकींना बघताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित पसरायचं इतका त्यांच्यात आपलेपणा. त्यातील एक जरी अनुपस्थित असेल तर काय झालं असेल, का नसेल आली? काही मदत तर हवी नसेल ना? म्हणून फोन करून बघा. अशी एकमेकांची काळजी वाहणारी ही मंडळी. तो अर्धा एक तास त्यांचा सकाळ पासून आलेला सर्व क्षीण काढून घेई आणि त्या परत जोमाने आपल्या कामाला लागत. अधी मधी सिनेमा बघणं, हॉटेलिंग आणि पिकनिकलाही जात. त्यांच्या घरच्यांनाही त्यांची सवय झालेली त्यामुळे कोणी हरकतही घेत नसे. वेळोवेळी एकमेकींना मदत करणं, घरी काही बिनसलं असेल तर धीर देणं, कामात चूक झाली असेल तर त्याची सारवा सारव करणं, चिडलेल्या बॉस समोर एकमेकींची बाजू घेणं. त्यांच्यातला हा जिव्हाळा बघून ऑफिसच्या कितीतरी लोकांना हेवा वाटे. पुरुष सहकारी तर आश्चर्यचकित व्हायची कि या सहा बायकांचं इतकं पटतं तरी कसं? आता व्यक्ती तितक्या प्रकृती आणि म्हणून विचारही वेगवेगळे आलेच. पण तरीही सर्व एकमेकींना सांभाळून घेत. रुसवे फुगवे झालेच तर बोलून किंवा काही काळ शांत बसून ते दूर करत.

अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात आलं. लोकसभेच्या निवडनुका जवळ आल्या. विविध राजकारणी पार्ट्या जोर शोरात आपापल्या प्रचाराला लागल्या. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया साईट वर वेगवेगळे व्हिडीओ, बातम्या वायरल होऊ लागल्या.

परिणामी राजकारण विषय लंच ब्रेकमधे निघू लागला. कोणी आता सत्तेत असलेल्या पार्टीच्या बाजूने बोलायचं तर कोणी विरोधात. काहीजण गंभीर व्हायचे तर काही हसण्यावर न्यायचे.

हळूहळू रोजच हा विषय निघू लागला. श्रेया, पल्लवी, मंजिरी आणि नैना गंभीर आरोप प्रत्यारोप सत्तेत असलेल्या पार्टीवर करत. अंजली आणि मधुराला पटत नसे पण मैत्रिणीत वाद नको म्हणून त्या ऐकूनही न ऐकल्या सारखं करायच्या. बरं इथवर ठीक होतं. पण एका दुपारी त्यांनी पंतप्रधान विषयी एकेरी भाषेत बोलणं सुरु केलं तेव्हा अंजली आणि मधुराला वाईट वाटलं.

"यार मला वाटतं माणसाची नको पण तो असलेल्या पदावर, त्या पदाची गरिमा लक्षात घेऊन त्याचा उद्गार करावा." अंजली

तशी श्रेया बोलली, "आ गये .... अपनी भक्ती दिखाने|"


अंजली यावर काहीच बोलली नाही. तिला हा वाद पुढे वाढवावा वाटला नाही. कारण सरकारी ऑफिस एक अशी जागा आहे जी कितीही मनात आलं तरीही सोडता येत नाही. कारण इतके कष्ट घेऊन, अभ्यास करून, परीक्षा - मुलाखत पास होऊन मिळालेली नौकरी फक्त काही लोकांसाठी सोडून आपण आपल्या पोटावर लाथ मारणं, आपल्या भविष्याची नासाडी करणं, यात कुठली समजदारी?

"मला वाटतं आपण तसेच ऑफिसच्या कामाने बेजार झालेले असतो. डोक्यावर ताण असतो. तेव्हा राजकारणा बद्दल जेवतांना बोलून कशाला आणखी ताण घ्यायचा. यापुढे या विषयावर जेवतांना किंवा ऑफिस मधे न बोललेलंच बरं." मधुरा शांततेत म्हणाली. पण तरीही श्रेया, मंजिरी, पल्लवी आणि नैनाने विषय चघळणं काही सोडलं नाही. शेवटी ग्रुप तुटला.

रोज जेवतांना तेच तेच नकारात्मक ऐकून मधुरा आणि अंजलीला स्वतःचं मानसिक खच्चीकरण होतेय असं वाटू लागलं. अनामिक भीती आणि ताण त्यांना छळू लागला. पण इतक्या वर्षांची मैत्री अशी सहज तोडता येणं कठीण. एकदम दूर झालं तर ऑफिसच्या सर्व मंडळीच्या ते डोळ्यात येणार आणि मग त्या चर्चेचा विषय बनतील. इतकंच नाही तर काही लोकं यावर आपल्या भाकरीही शेकतील. म्हणून मधुरा आणि अंजलीने काहीच न बोलता त्यांच्या पासून दूर राहणं स्वीकारलं. त्यांनी या ना त्या कारणाने श्रेया, मंजिरी, पल्लवी आणि नैना यांच्या सोबत पिकनिक, सिनेमा आणि हॉटेलिंगला जाणं टाळणे सुरु केले, जेवायला बसलं आणि राजकारण विषय निघाला कि मधुरा आणि अंजली आपल्या नवऱ्याला किंवा एखाद्या मित्र/मैत्रिणीला किंवा घरी फोन करून बोलू लागल्या. ते नाही जमलं तर त्या फॅशन, मेकअप असे विषय काढून आपलं लक्ष दुसरीकडे वळवत. जमेल तेव्हा त्या स्वतःला आपल्याच विश्वात गुंग असल्याचे सोंग घेऊ लागल्या आणि मग त्या दोघीनीं आपापल्या जागेवर बसूनच जेवणे सुरु केले.

एक खूप छान ग्रुप तुटला. का? कारण राजकारण ऑफिसात घुसलं आणि ऑफिसकारण सुरु झालं. त्यांनी एकमेकींना मदत करणं सोडून दिलं. मंजिरी आणि नैनाला अंजलीची मतं आधीच खटकत होती. ग्रुप तुटल्याने तर त्यांना संधीच मिळाली. त्यांनी अंजलीला त्रास होईल असं वागणं वाढवलं, तिच्या चुगल्या बॉस कडे करू लागल्या. ज्याचा फायदा इतर अधिकारीही घेऊ लागले आणि कधीतरी घनिष्ठ मैत्री असलेल्या या सहकारी कट्टर शत्रू झाल्या.

जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपलं ऑफिस किंवा काम शिरू द्यायचं नसतं तसं आपली वैयक्तिक मतंही आपल्या ऑफिस किंवा कामात घुसू द्यायची नसतात. ही साधी गोष्ट या बायका समजू शकल्या नाही आणि आपलंच नुकसान करून बसल्या.

माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो मला राजकारणातलं काहीच समजत नाही आणि इच्छाही नाही. पण मी एक हे सगळं अनुभवत आहे. मला एकच वाटतं कि आपण अशा चर्चा आपल्या समान मतं असलेल्या ग्रुपमधे, लोकांमधे किंवा घरी कराव्या, कामाच्या ठिकाणी नाही. कारण मी आधीच सांगितल्या प्रमाणे कितीही झालं तरीही नोकरी करायचीय मग सर्वांनी मिळून, हसत खेळत का नाही? का उगाच असले विषय घेऊन बसायचं ज्या बद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान तर नाहीच पण आपण वैयक्तिक पातळीवर ज्या व्यक्तीलाही ओळखत नाही त्याच्याबद्दल अद्वातद्वा बोलत बसायचं?
त्यापेक्षा इतर खूप विषय आहेत चघळायला ज्यांनी आपली प्रगती होऊ शकते.


त्यात आपल्याला कोणी काही द्यायलाही येत नाही उलट आपण आपल्या नेहमी मदतीला धावून येणाऱ्या, सुख दुःखात सहभागी होणाऱ्या लोकांना गमवून बसतो त्यांच्यासाठी, जे सकाळी टीव्ही चॅनेल वर भांडताना दिसत असतील आणि संध्याकाळी सोबत पार्टी करत असतील. उदाहरण द्यायची गरजच नाही कारण सर्वांना सर्व माहित आहे.


तळटीप : हे माझं मत बहुतेकांना पटलं नसेल म्हणून प्लीज काहीही अशीतशी कमेंट करत बसू नये.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार