Aug 05, 2021
Love

आनंदाचं रोपटं

Read Later
आनंदाचं रोपटं
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आनंदाचं रोपटं

विनित व आर्या दोघं सॉफ्टवेअर इंजिनिअर. 
भरभक्कम पगार होता दोघांना. दोघं एकाच कंपनीत कामाला. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतरण झालं.
दोघांच्या आईवडिलांना दोघांनीही प्रेमकहाणी सांगितली.
उणं काढण्यासारखं काही नव्हतचं मुळी. दोन्ही पार्टीकडून ग्रीन सिग्नल मिळाला. अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नात विहिणबाई छान पेशवाई नऊवारी नेसल्या. दोघींना नटण्यामुरडण्याची भारी हौस.

विनितचे आईबाबा थोडे दिवस त्यांच्यासोबत राहिले मग आपल्या कर्मभुमीत गेले. कोल्हापूरला देवीच्या देवळाजवळच त्यांच मोठं फुलांच दुकान होतं. जाताना मात्र या दोघांनाही एकमेकांना सांभाळून रहा म्हणून सांगून गेले.

पहिलं वर्ष अगदी काश्मिरच्या दऱ्याखोऱ्यांत विहार केल्यासारखं..तो हिंदी पिक्चरमधला शम्मी कपूर..याहू..चाहे कोई मुझे जंगली कहे,कहेने दो जी कहेता रहे..हम प्यार के तुफानो में गिरे हैं हम क्या करे..
तीपण तितकीच रोमँटिक. त्या दोघांमुळं ऑफिसमधलं वातावरणही अगदी गुलाबीगुलाबी..पाचपांडे साहेबांना तर ही दोघं त्यांच्या मुलांसारखी..त्यामुळे बरेचदा गुलाबी थंडीत दोघं ऑफिसला अंमळ उशिरा गेली तरी पाचपांडे साहेब रागवत नव्हते. अरे हम भी कभी जवां थे. हमको कारणं मत दो असं सांगून त्यांची मस्करी करायचे.

विनितचा दिवाळसणही सासूसासऱ्यांनी झोकात केला.
अंगठी,सुट,सगळं यथासांग. आर्यालाही तिच्या सासूने गुलबक्षी रंगाचा नाजूक नक्षीकाम केलेला लॉंग गाऊन भेट दिला.

दिवाळीची सुट्टी संपली अन् गुलाबी जोडी परत कामाला रुजू झाली. जसजसे दिवस सरू लागले तसतसं प्रेम थोडथोडं आटू लागलं. एकमेकातल्या उणिवा त्यांना जाणवू लागल्या.

विनितचं चहाचा कप जिथे बसेल तिथेच ठेवणं,अंथरुणाच्या घड्या न करणं,पेपरची घडी न करणं..असं बरचसं आत्ता आर्याला खटकू लागलं.

आर्याचं रात्री उशिरा झोपणं,सतत मोबाईलवर मैत्रिणींबरोबर बोलत बसणं,इथेतिथे चोहीकडे तिच्या नागमोड्या केसांचं नांदणं,कधी अनाहुतपणे त्याच्या भाजीत एन्ट्री मारणं तर  कधी चहा मिट्ट गोड होणं,कधी आमटी ठार खार होणं..या व अशा बऱ्याच गोष्टींवरुन दोघांत हमरीतुमरी होई. बरं आज भांडण झालं तर उद्या विसरतील ते कारपोरेटवाले कसले. तेंची भांडणं पण हाय प्रोफाइल.. वरच्या लेवलची..फुल ऑफ टोपलीभर इगो. आठ आठ दिवस अबोला..अगदीच हातघाईवर आलं की परत बोलू लागायचे.

एकदा असंच शुल्लकशा कारणावरुन दोघांत जुंपलं..आर्याला लागेल असं विनित बोलला..आर्याने आपली बेग भरली व आईकडे रवाना झाली.रिक्षात पण रडत होती. त्या भाऊंनी विचारलंसुद्धा. घरी गेल्यावर आईच्या गळ्यात पडून रडू लागली..आईलाही फार वाईट वाटलं. दुपारी तिनं आर्याच्या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या.तिला खरं हसू येत होतं,पण तिने ते जाणवू दिलं नाही.

इकडे विनितही त्याच्या आईबाबांकडे रजेला गेला. आईने खूप खोदून खोदून विचारल्यावर विनितने आईला त्यांच्या भांडणाबद्दल सांगितलं. त्याला जेवणात कांदा खायला आवडायचा व आर्याला तो उग्र वास अजिबात आवडत नव्हता. तिने नको म्हणतानाही त्याने हट्टाने तिच्यासमोर बुक्की मारुन चार कांदे हाणले..झालं आर्याचा पापड मोडला..तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली व ती मायकेको रवाना हुई. विनितच्या आईलाही या भांडणाची गंमत वाटली..पण तिने हसू दाबलं नी विनितच्या बाबांकडे बघून हलकेच डोळा मारला. तेही इतका वेळ लेकाचं भांडण ऐकून आपला भुतकाळ आठवून पेपराआडून हसत होते.

ऑफिसातही ते दोघे अनोळख्यासारखं वागत होते. आत्ता दोघंही पुर्वीसारखं आपल्या मनाप्रमाणे जगायला स्वतंत्र होते. आर्या बराच वेळ मोबाईलवर घालवू लागली होती 
तर इकडे विनित हवं तसं घर ठेवत होता. मस्तपैकी मेसमध्ये जाऊन जेवत होता. अंथरुणं बेडवर सदा उताणी पडलेली..बुट इकडेतिकडे,,सगळाच गलिच्छ कारभार पण आत्ता जाब विचारणारं कोणी नव्हतं.

आर्याची आई आत्ता पुर्वीसारखं साऱ्या गोष्टी आर्याला विचारुन करत नव्हती. होताहोईतो आर्याच्या बाबांशी अगदी गोडगोड वागून आर्याला खिजवण्याचा एकही चान्स सोडत नव्हती. आर्याचा भाऊ,वहिनी अमेरिकेतून आले.तेही मातोश्रींच्या मार्गदर्शनानुसार आर्यासमोर नाच,गाणी याद्वारे आपापसातलं प्रेम व्यक्त करीत होते.

आर्यालाही तिच्या घराची..विनितची आठवण येत होती.
मोबाईलमधला इंटरेस्ट हळूहळू कमी होऊ लागला होता.
विनितलाही त्याच्या आळसाचा त्रास होऊ लागला होता. घरात स्वच्छता न ठेवल्याने सारीकडे झुरळे होऊ लागली होती. कोळ्यांनीही आपलं साम्राज्य घरभर विणलं होतं. एके दिवशी त्याने घराला पेस्ट कंट्रोल करुन घेतलं. सारं घर चकाचक केलं.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी विनित मित्राकडे जेवायला गेला .त्या मित्राच्या,परागच्या बायकोच्या हाताला प्लास्टर असल्याने घरातली सारी कामं,पराग तिच्या सूचनेनुसार करत होता. परागने त्याच्या पत्नीची छान वेणी घातली. त्या वेणीत बागेतल्या अनंताचं फुल खोवलं. तिला पावडर लावली,कुंकू लावलं. हे सारं पराग विनितशी गप्पा मारता मारता अगदी सहज करत होता. विनितला म्हणालाही,"अरे,ही सई तर माझ्या घराचं इंजिन आहे. आत्ता जरा महिनाभर मला हिची सेवा करू मिळतेय.

लादी पुसताना घसरली तर हातावर पडली त्यामुळे हाताला फ्रेक्चर झालंय."सईही विनितशी छान गप्पा मारत होती.त्यांची छोटी चिऊ एका कोपऱ्यात भातुकली खेळत बसली होती.मधेच येऊन साऱ्यांना खोटूखोटूचा चहा,नाश्ता देऊन जात होती. पराग अगदी सामान्य कारकून तरीही त्याच्या तुटपुंज्या पगारातही ते कुटुंब समाधानी,आनंदी होतं. परागने त्याच्या बागेत आनंदाचं झाडच लावलं होतं जणू. विनित त्या कुटुंबासोबत भरपूर जेवला. येताना त्यांच्या बागेतल्या आनंदाच्या झाडाची फांदी आणून त्याने आपल्या कुंडीत लावली व संध्याकाळी आर्याच्या घरी तिची आवडती मँगो मस्तानी  चॉकलेट पेस्ट्री घेऊन गेला.

आर्याचे आईबाबा दोघं नाटक बघायला गेले होते. तिला साधं येतेस का म्हणून विचारलंही नव्हतं. आर्या उदास बसली होती. दारावरची बेल वाजताच आर्याने दार उघडलं तर दारात विनित उभा. तिने त्याला आत बोलावलं,पाणी दिलं. विनितने तिचा हात हातात धरुन सॉरी म्हंटलं. त्या एका शब्दाने आर्याच्या डोळ्यांत बांधलेलं धरण फुटलं व विनितला मिठी मारून रडू लागली. बराच वेळ विनितच्या कुशीतच होती. अबोलपणे भावना व्यक्त होत होत्या.दोन्ही मनं ,शरीरं एकमेकांची माफी मागत होती.

मग विनितला मस्तानीची आठवण झाली. त्याने सासूसासऱ्यांसाठी आणलेले पेक फ्रीजमध्ये ठेवलं व दोघात एक मँगो मस्तानी एकमेकांना भरवत संपवली. आर्याचा रागोबा कुठच्याकुठे पळून गेला.तिने आईबाबांना फोन करून विनित आलाय व ती तिच्या घरी जात आहे असं सांगितलं. आईबाबाही खूश झाले.थोडे दिवस ते मुद्दामहून तिच्याशी परक्यासारखंच वागत होते.कारण एकच..तिला तिच्या घराची आठवण यावी म्हणून. सासरचा पाहूणचार घेऊन व आर्याला सोबत घेऊन विनित बाहेर पडला.

घरी येताच आर्याने पाहिलं..घर अगदी चकाचक दिसत होत़ं.चपला त्यांच्या जागेवर,कपडे त्यांच्या जागेवर..बेडरुममध्ये बेड व्यवस्थित केलेला..बाजूला फुलदाणीत तिच्या आवडीचा मंद सुगंधाचा निशिगंधा दरवळत होता. विनितने आर्याला मिठीत घेतलं. आर्या रात्रभर विनितच्या मिठीत विरघळत होती. निशिगंधाचा मंद सुगंध त्यांच्या प्रेमात बहार आणत होता. खूपशा पडलेल्या गाठी दोघं  सोडवत होती.

दुसऱ्या दिवशी पाडवा होता. अंमळ उशिरच झाला उठायला. आर्याने उटणं लावून विनितला न्हाऊ घातलं.विनीतनेही ही संधी सोडली नाही मग सासूने दिलेला पैठणीचा लाँग ड्रेस घालून आर्याने विनितला औक्षण केलं. गोड शिरा भरवला. विनितनेही तिला तनमणी भेट दिला,डाळींबी खड्यांचा.त्याने स्वतः तो तिच्या गळ्यात घातला. त्या डाळींबी खड्यांची गुलाबी लाली आर्याच्या गालावर पसरली. दोघांनी एकमेकांना अबोला न धरण्याचं प्रॉमिस केलं. या दिवाळीच्या पाडव्याने पुनश्च विनितआर्याच्या संसाराची सुरुवात झाली. कुंडीत आनंदाचं रोपटं बहरु लागलं..

-------------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now