पितृपक्ष (मला न भावणारा )

मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने कावळ्याना जेऊ घालणे

पितृपक्ष (महाळ)

पाटलाची वंदना शाळेला जाता जाता ये जयश्री आज आमच्या घरी आज महा़ळ आहे सग़ळ्या शिक्षकलोकांनाही सांगीतलंय जेवायला या म्हणुन.
दुपारी ये जेवायला ..
बरं येते गं ,
महाळाला केली जाणारी ति जोडगव्हाची खीर व पिवळीधम्मक पाटवडी फार आवडते नक्कीच येईन गं.
पाटलाच्या वाड्यात पंगती उठायच्या या महाळ जेवणाला.
खीर खाऊन तृप्त होऊन घरी यायचे.
मग मामाच्या घरीही महाळ असे.मामी खीर पाटवडी करायच्या ..शाळेला जायच्या आधी मामा सगळे पदार्थ मांडलेले केळीचं पान घराच्या पत्र्यावर ठेवायचे.
मग मामी मामा व आज्जी हात जोडुन काय चुकलं माकलं असंल तर माफ करावं..व कावळ्यानं घास शिवला की अगदी पुण्य लागल्यागत मोठा उसासा सोडायचे तिघेही.
मी घरातुनच हे पहायचे मला तो बिचारा कावळा .व हि तिन माणसे केविलवाणी दिसत.
महाळ हे का करतात ,कशासाठी करतात हे कांहीच माहित नव्हतं..व याचा अर्थही कधी समजुन घेतला नव्हता.
फक्त जोडगव्हाची खीर व पाटवडी करण्यासाठी हा सणच असावा असं वाटायचं.
कालातंराने समजत गेलं..मग मी माझ्या आईला विचारलं अगं अण्णा(माझे वडिल) तर मी चार वर्षाची होते तेंव्हा वारले पण तु तर असं कावळ्याला कधी जेवु का घालत नाहीस.
ति उत्तरली..अगं जीवंतपणी खाऊ पिऊ घातलं होतं .
मग याची गरज काय.नाहीतर कावळा रोज पत्र्यावर आलं की तु देतेसच की भाकरी चपाती.
तरी मी गल्लीत कुणाच्या घरी महाळाचं आमंत्रण असलं की जेवायला जायचेच.
मी भोपळ्यात बी खुशाल होते..आंगोपांगी ,सारासार विचार करण्याची वृत्ती नव्हती.
मी बरीच घरे पाहिलीत त्यातली 75 वर्षाची आई जिच्या घरी सोन्याचा धुर निघत असे असं म्हटलं जायचं त्या डोळे जळजळत असतानाही स्वंयपाक करतात व सुना व नातवंड सुना पत्र्यावरच्या कावळ्याला पंचपक्वान्नाचं ताट देतात.
अन् हि म्हातारी आज्जी एका भाकरीसाठी परकी होते..
मग कशासाठी हवाय महाळ..जीवंतपणी यांची साथ नाही दोन अन्नाचे घास देणं होत नाही..घरोघरी फार वाईट स्थिती आहे.कांही अपवाद वगळता
खुप वाईट वाटतं पण बोलावं कुणाला.
मग पितृपक्ष साजरा करुन हो साजराच करुन पुण्य मिळेल का हो...पण पुण्य म्हणजे नेमकं काय? जीवंतपणीच खायला द्या काळजी घ्या .मग पुण्य मिळेल पहा नक्की.
मग हा पितृपक्ष उरणारच नाही.

मराठवाड्यात म्हणजे माझ्या गावी पितृपक्षाला महाळाचा महिना म्हणतात व इथे कोकणात भरण्या म्हणतात.

सौ.जयश्री दयानंद पोळ (Jश्री)
खोपोली