अतिथी कोण आहे

कालच अमावस्या झाली. सोशल मीडियावर मी या अमावस्येच्या पूजेचे टाकलेले फोटो पाहून बऱ्याच जणांनी "ही कसली पूजा?" असे विचारले. मग ठरवले आज पिठोरीबद्दल लिहायचे.
कालच अमावस्या झाली. सोशल मीडियावर मी या अमावस्येच्या पूजेचे टाकलेले फोटो पाहून बऱ्याच जणांनी "ही कसली पूजा?" असे विचारले. मग ठरवले आज पिठोरीबद्दल लिहायचे.

श्रावणी अमावस्या! ही सोमवारी आली, म्हणून सोमवती अमावस्या! महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. पण आगरी कोळी समाजात या श्रावणी अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात म्हणून या अमावस्येला "पिठोरी अमावस्या" असे म्हणतात. तसेच या दिवसाचे मातृदिन म्हणून देखील महत्त्व आहे. पुत्रवती आईने आपल्या मुलांचे आयुष्य वाढवण्यासाठी केलेल्या उपवासाचा हा सण म्हणून मातृदिन! हा दिवस म्हणजे गौरीगणपतीच्या आगमनाची देखील चाहूल!

वंशवृद्धी तसेच मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरीचे व्रत केले जाते. या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेक घरांत विविध रानभाज्या, रानपाला यांची आरास मांडून विविध प्रकारचे नैवेद्य देऊन पिठोरी मातेची पुजा केली जाते. नैवेद्याला मिश्र भाजी, तांदळाची खीर, उकडीचे मोदक, पुर्‍या, साटोरी आणि पिठापासून चिंच, बोरे तयार करण्यात येतात. तेरडा, रान पानं , फुलांनी चौरंगावर पिठोरी भरून तिची ओटी भरली जाते. पिठोरी च्या चौरंगा समोर केळीच्या पानावर मिठाई, जिबुळ, तवुस(काकडी),केळी इ. फळांचा व गोडाचे नैवेद्य पिठोरी देवीला दाखविला जातो. बेदाणे घातलेली भाताची खीर हा खास नैवेद्य असतो. पूजा मांडून "अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र" यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचे जेवण करतात. पूजा करुन झाल्यावर पिठोरीची आरती करतात. खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात, किंवा पत्रीच्या द्रोणात खीर भरली जाते आणि नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या डोक्यावर घेत विचारते, "आतीत कोण हाय?" (अतिथी कोण आहे?) तेव्हा घरातील मुले "मी आहे" असे म्हणतात. अशा प्रकारे पाच वेळा नैवेद्य दाखवून मग तो नैवेद्य मुलांना जातो. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात. स्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही पिठोरी अमावास्या आहे.

आजच्या दिवशी माहेरवाशीण आपल्या माहेरी येते. पिठोरी समोर विड्याची पानं ठेवून त्यावर केळी, कमळ ठेवून उपवास सोडला जातो. रात्रभर जागरण केले जाते. पिठोरी भोवती फेऱ्यांची गाणी बोलुन घागऱ्या नाच करतात. कोळीवाडा मध्ये आख्यायिका ऐकायला मिळते कि,आजचे दिवशी आपली लाडकी माहेरकरीण गौराई नंदी वर बैसुन तिच्या सासरहुन आपल्या माहेरी प्रस्थान करुन अंगणात उभी असते. मग सात दिवसानंतर गौरी आगमनाच्या वेळी वाजत-गाजत आपण आपल्या घरात तिचं आगमन करतो. कोळी समाजात ज्यांच्या घरात गणपती आणि गौराईचे आगमन होते, त्या घरात पिठोरीचे पण पुजन करावे लागते अशी प्रथा आहे.

श्रावण वद्य अमावास्येलाच ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात. ज्या स्त्रियांचे मूल जगत नाही, किंवा ज्यांना मूल होत नाही, त्या आवर्जून हे व्रत करतात.

आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे, तिचा मोठा गौरव केला आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. आई ह्या दोन अक्षरी शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य व त्यागाची मूर्ती म्हणजे आई! आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनच तिला ‘माऊली’ असे आदराने म्हणले जाते.

समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज, रक्षाबंधनाप्रमाणे मातृदिन साजरा झालाच पाहिजे. जी माता आपल्या मायेने, त्यागाने, ममत्वाने मुलांची आणि घरादाराची सेवा करते, तिच्याविषयी योग्य ती जाणीव ठेवून तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे.

जर आपण नागपंचमी थाटात साजरी करू शकतो, तर "आपल्याला जन्म देणाऱ्या जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, औदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पूया" हाच मातृदिनाचा खरा संदेश आहे. आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्यासाठी सक्षम करते. या चौसष्ट कला ज्यांमुळे उपजिवीका होते, त्यांची पूजा आपली आई करते ते पण आपल्याच दीर्घायुष्य व आरोग्यासाठी, म्हणून तर या दिवशी "मातृदिन" साजरा केला जातो. मातृदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!


फोटो : माझ्या घरातील पिठोरी पूजेचा आहे.