पिपरीचं पान

Story Based On Relation Of Father And Daughter..


थंडीचे दिवस होते. पहाटेच्या गारव्यात धुके पसरले होते. कोवळ्या सकाळीही मावळतीला जाणारा चंद्र पौर्णिमेच्या मुहूर्ताने खुलून दिसत होता. श्री वेंकटरामन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते .त्यांची गणना प्रतिष्ठित लोकांमध्ये होती; परंतु त्यांचे मन नेहमी उदासिन, असमाधानी असे. त्यांना एकुलती एक मुलगीच प्रियांजना...! तशी प्रियांजना बुद्धीने तल्लख अभ्यासात हुशार अन् एक चांगली सुगरण होती. वेंकटरामन यांना मुलाची अपेक्षा होती जो त्यांच्या घराचे नाव पुढे चालवेल. पण प्रियांजनानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत खालावली आणि त्यांना दुसरे अपत्य झालेच नाही.


नेहमीप्रमाणे ते morning walk साठी घराबाहेर निघाले होते. मुलगी प्रियांजना college ला जाण्याआधी ते घराबाहेर निघत व ती गेल्यावर तासभराने घरी येत. पण काॅलेजला निघण्याआधी प्रियांजना न चुकता वडिलांना फोन करत असे. फोनवरसुध्दा वेंकटरामन मुलीशी तुटकपणेच बोलत असत. त्यांच्या पत्नी आता फक्त अबोल झाल्या होत्या. हे नेहमीचे चक्र बनले होते .


बागेत एक senior citizens चा group होता.त्या group मध्ये श्री सावर्डे खूप प्रतिष्ठित होते .ग्रुपमधील इतर जण त्यांना जवळजवळ गुरु मानत. त्या ग्रुपमधील इतर जण घरी निघून गेले पण सावर्डे मात्र बागेत थांबले .श्री वेंकटरामन यांच्यापेक्षा ते वडील होते. ते हलकेच येऊन वेंकटरामन यांच्या शेजारी बसले .वेंकटरामन उदासिन असल्याने त्यांनी विचारले ,"मी आपणास नेहमी बघतो आपण नेहमी एकटे असता तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हायला आ वडेल?" "हो चालेल ,तसंही मला घरी तासाभराने जायचे असते ",वेंकटरामन उत्तरले.


थोडावेळ गप्पा मारून घरी परतले . असेच दिवस जात होते. वेंकटरामन आणि सावर्डे यांची चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या गोष्टी ते एकमेकांशी वाटून घेत. सावर्डे नेहमीप्रमाणे बागेत पिपरीची पाने तोडून त्याच्या पिपाणी बनवत आणि टाकून देत. न राहवून एक दिवस वेंकटरामन यांनी सावर्डेंना त्यांच्या ह्या सवयीबद्दल विचारलेच.


त्यावर काही न बोलता सावर्डे यांनी वेंकटरामन यांना बाकावर बसण्याचा इशारा केला. आपला आवंढा गिळून त्यांनी बोलायला सुरुवात केली, "माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, मुलगा व मुलगी असे चौकोनी कुटुंब होते. माझा मुलगा दिसायला राजबिंडा, हुशार असल्याने तो मला अतिशय जवळचा होता. कदाचित यामुळे मी मुलीचा तिरस्कार करू लागलो. मुलाला मी Software engineer केले पण मुलगी F.Y.B.Sc. असतानाच तिचे लग्न लावले. नंतर मुलाचे लग्न झाले, त्याला चांगली नोकरदार, भरपगारी बायको मिळाली अन् लगेच तो परदेशात स्थायिक झाला. इकडे जावईबापू चांगले म्हणून त्यांनी माझ्या मुलीला पुढे शिकवले. पंधरा वर्षे झाली लेकाने माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही; म्हणून माझ्या मुलीने हट्टाने तिच्या पगारातील काही रक्कम मला देण्यास सुरुवात केली. मागल्या वर्षी एका अपघातात ती गेली. जाण्याआधीच तिने आपल्या खात्यावरची सर्व रक्कम माझ्या नावे केली. तिची मुलगी म्हणजे माझी नात स्वरा हिच्यासाठी पण तिने काहीच तरतूद केली नाही. का तर म्हणे, तिचे वडील करतील तिचं सगळं. माझ्या लेकीला ह्या पिपरीच्या पानांची पिपाणी वाजवायला फार आवडे. बासरी काय सुंदर वाजेल इतकी सुंदर ती पिपाणी वाजवत असे. आमच्या घराच्या बागेत बसून ती अभ्यास करता करता वाजवत असायची. या पारिग्याच्या पानामध्ये मी तिला शोधत आहे. माझ्या मुलीला! ज्या मुलाला मी डोक्यावर धरले तोच परका झाला आणि मुलगी! मरेपर्यंत माझी साथ सोडली नाही तिने.. तुमच्या लेकीचा रोज फोन येतो ना तुम्हाला अप्पा मी काॅलेजला जातेय बाय.. म्हणून.. रोज फोनवर बाय बोलता. एक दिवस समोरासमोर उभे राहून बाय करा. उद्या सासरी गेली ना मनात रूखरूख राहील तुमच्या..!

हे ऐकून वेंकटरामन यांनी घराकडे धाव घेतली. प्रियांजना नेहमीप्रमाणे बाहेर निघताना बाबांना फोन करणार इतक्यात तिचे बाबा तिच्यासमोर उभे होते. बाबांना धापा टाकताना बघत ती बोलली, "अप्पा मी तुम्हालाच फोन करणार होते.. ते.." प्रियांजना काही बोलणार इतक्यात वेंकटरामन मुलीला उराशी कवटाळून ढसाढसा रडू लागले आणि लेकीची क्षमा मागितली. तेवढ्यात सौ. वेंकटरामन आल्या आणि या आनंदी क्षणाच्या मुक साक्षीदार झाल्या!!

~ऋचा निलिमा