पिंजरा

लघुकथा
पिंजरा

"कुठे हरवलीस प्रिया ? आज कामात लक्ष नाही तुझे? एवढा विचार करतांना मी तुला पहिल्यांदाच बघत आहे गं."

"अगं काही नाही. उद्या सासुबाई आणि सासरे येत आहे. पहिल्यांदाच ते येणार आणि माझी फुल्ल डेट आहे. माझे पिरेड्स आले तर काय करू? त्यांना चालते की नाही माहिती नाही. काय करावं सुचतच नाही ग."

"अगं, एवढा विचार करू नकोस. सरळ सरळ विचारून घे त्यांना. त्याही एक स्त्रीचं आहेत ना. एका स्त्रीचं मन निश्चितच त्यांना कळेल. "

रचनाचे बोलणे ऐकून प्रियाला जरासा धीर आला.

"हो बघते विचारून मी "प्रिया बोलली.

ठरल्याप्रमाणे संकेत त्यांना स्टेशनवर रिसीव्ह करायला गेला होता. संकेत त्यांना घेऊन घरी आला. एरवी थोडी उशीरा उठणारी प्रिया सकाळी लवकर उठून तयार झाली होती.

"या आई , बाबा बसा."

"नमस्कार करते हं."

दोघांनीही तिला भरपूर आशीर्वाद दिले.
लगेच प्रियाने सगळ्यांसाठी चहापाणी आणि नाश्ता केला आणि परत स्वयंपाकाला लागली. कारण, थोड्याच वेळात तिला ऑफीसला निघायचे होते.

प्रिया बोलली, "आई, मी स्वयंपाक करून ठेवला आहे. तुम्ही जेवून घ्या. काही लागलं तर मला फोन करा."

"बाबा तुम्ही आराम करा. आम्ही दोघेही संध्याकाळ पर्यंत येतो. " संकेतने त्यांना सांगितले.


कमलताई आणि राजाभाऊ दोघांचीही लगबग बघत होते. राजाभाऊंची एक खास शैली होती.\"रिटायर्ड कर्नल\" होऊन गेल्यामुळे आता स्वचंछदतेच जीवन जगत होते. पण, जेव्हापासून कमलताईंनी सगळ्या घराची जबाबदारी सांभाळली होती. नव्हे राजाभाऊंनी त्यांच्यावर टाकली होती. तेव्हापासून कमलताईंना गृहीत धरले गेले ते आजतागायत.


त्याचप्रमाणे प्रियाचे लग्न होताच तिच्यावरही जबाबदारी आली होती.

थोड्याच वेळात तिने स्वयंपाक करून संकेतचा आणि स्वतः चा डबा भरला आणि स्वतः तयार व्हायला गेली.
जिन्स आणि टाॅप घालून ती बाहेर आली.

"आई, मी निघाले ऑफीसला. स्वयंपाक करून ठेवला आहे. तुम्ही दोघांनी जेवण करून ठेवा. संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करेल. संकेत चल पटकन. मला ड्राप कर."


"प्रिया, हे असले कपडे का घातले. तू सलवार घालते इतपत ठीक , पण अगं , सासरे आहेत ना समोर. त्याच तरी भान ठेवायच ना."

"पण, आई मला असेच कपडे कम्फर्टेबल वाटतात ऑफीससाठी"...प्रिया बोलली.

राजाभाऊंची करडी नजर तिच्यावर भिरभिरत होती. पण, त्यांनी मुद्दामच दुर्लक्ष केले.

"अहो, आज तुम्ही काहीच बोलणार नाही का?"

"जाऊ दे. आता मी ठरवलंय की कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही."

संकेत आणि प्रिया निघून गेले.

"चला कमलबाई आपणही फेरफटका मारू यात. जरा आजूबाजूची माहिती करून घेऊ या."

कमलताईच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या. आता हे असे का वागत आहे. पण ठीक आहे. असे म्हणत त्या राजाभाऊंबरोबर निघाल्या.

पण, राजाभाऊंचा स्वभाव त्यांना माहीत होता. केव्हा आणि कधी , कसा अपमान करतील याचा भरवसा नसे.

दोन दिवसांतच प्रियाच्या लक्षात आले की राजाभाऊंसमोर कमलताईं खूपच घाबरून रहात असतं. कधीच मन मोकळेपणाने बोलत नसतं. पण, असं का बरं. ते जाणून घेण्यासाठी तिने संधी शोधली.

तिने आधी संकेतशी बोलायचे ठरवले.

"संकेत एक विचारू. बाबांचा स्वभाव थोडा रागीट आहे ना? आई खूपच दचकून राहतात त्यांना. पण,आईंना एवढं घाबरून कसं जमेल.‌ अरे, आयुष्य म्हणजे काय पोपटाचा पिंजरा आहे. वाटे्टल तेव्हा उघडणार आणि बंद करणार? "

"प्रिया काय बोलतेस तू? बाबा जरी कठोर वागत असले तरी ते खूप प्रेमळ आहे." तू नको विचार करुस."

संकेतने प्रिया समोर विषय टाळून दिला.

पण, सासुबाईंच्या मनात चाललेली घालमेल प्रियाला जाणवत होती.

एका संध्याकाळी राजाभाऊ पाय मोकळे करायला गेले. संकेतही बाहेर गेला होता. प्रियाने सासुबाईंना विश्वासात घेऊन बोलते करायचे ठरवले.

पण, नेमके राजाभाऊ मोबाईल घेण्यासाठी परत आले. पण, सासू सुनेच्या गप्पा चालू होत्या. त्यामुळे ते दाराबाहेर थांबून ऐकू लागले.

"आई, हे बघा तुमच्यासाठी काय आणले. प्रियाने दोन तीन सलवार कमीज समोर धरले."

"अगं, कशाला? मी साडी शिवाय इतर कोणतेही कपडे घालत नाही. तुला माहिती नाही का?"

"हो आई माहित आहे. पण, का नाही घालत? किती सुटसुटीत असतो आणि सोपाही. रोज नाही पण फिरायला जातांना वगैरे छान वाटते."


"अगं, जाऊ दे. असे म्हणत डोळ्यांतले अश्रू लपवत होत्या."

"आई ,बोला ना . मन मोकळं करा. तरच तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. नका अडकून पडू या पिंजऱ्यात."

"अगं, विसाव्या वर्षी माझे लग्न झाले. सासरी फार मोठा खटला. मी सगळ्यात लहान. घरात माझ्या आजे सासू . त्यांना सगळे बाई म्हणत असत. सासू सासरे, पाच जावा , त्यांची दहा बारा मुले. त्यामुळे सासऱ्यांनी सगळ्यांवर स्वतःचे काही नियम लावले. सुरवातीला माझे काही दिवस आनंदात गेले. पण, आमच्यात एक अंतर होते. वयाचे आणि विचारांचेही. त्यात मी खूपच बोलघेवडी. पण, सासरी सगळं काही शिस्तीत. माझ्या सासऱ्यांनी त्या घराला एक मर्यादा आखून दिली होती. अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एक शिस्तीचा , कामाचा टाइमटेबल आखला होता. अगदी चाकोरीबद्ध आयुष्य जगत होती. कोणी ,केव्हा आणि काय खाणार , आज स्वयंपाक काय बनणार? कोण कुठे झोपणार? काय आणि कधी खरेदी करणार?अगदी अथ पासून इति पर्यंत. फक्त मर्यादा मर्यादा आणि मर्यादा.

"बाप रे ! इतकं काटेकोर जीवन!"

"अगं, हो . आमचं लग्न झालं असुनही आमच्यात खूप दुरावा होता. हे फक्त माझ्या जवळ रात्री दोन तास यायचे‌ आणि तेही त्यांना शरीर सुखाचा आनंद मिळावा आणि कुटुंबाला वारस म्हणून. बाकी वेळ मात्र अबोला."

एक आवंढा गिळून त्या गप्प बसल्या.

"आई, नका रडू एवढं."

"प्रिया,आमचं घर खूप खूप मोठं, प्रत्येकाला स्वतःची अशी खोली होती. पण, स्पेस नव्हती. त्यात प्रत्येकाचा स्वभाव भिन्न. कोण कोणाशी जुळवून घेत आहे. हे समजतच नव्हतं. त्यात माझ वय कमी. परत कामाचा ताण एवढा की मी लगेच दमून जायचे. गाईचा गोठा साफ करण्यापासून ,सडा सारवण ,चूल पेटवणे अशी भरपुर कामं अंगावर पडली. माझ्या मोठ्या जावा फक्त नवऱ्यांबरोबर शेतावर जात होत्या. एक भासरे शिक्षक होते आणि यांना मिलिट्रीत जायचे होते. त्यामुळे हे सतत अभ्यास करत होते. त्यात घरातील सर्व मुलांना माझा लळा लागला होता. त्यामुळे मी घरीच असायचे. पण, सकाळी सहाला स्वयंपाकघरात घुसलेली मी पार रात्री अकरालाच बाहेर यायचे. मग कधी अंथरूणावर पडते आणि कधी नाही असे होऊन जायचे. पण, मग शरीर ओरबडण्यासाठी हे तयार असायचे. माझ्या मनाचा तर मलाच थांगपत्ता लागत नव्हता."

"मी सतत पडणाऱ्या ताणामुळे आजारी पडत होते. एखादा रत्नजडित हिरा बसविण्यासाठी अंगठीची जी घडण केली असते ना अशा प्रकारच्या पिंजऱ्यातच आम्ही रहात होतो."

"आमच्या घरचा सगळा कारभार सासूबाई आणि सासरे बघत. कधी बाजार माहिती नाही की खरेदी. जे काय आणायचं ते सासुबाईच बघत होत्या. कधीच घराचा उंबरठा ओलांडून काही आणायची आणि कोणाशी बोलायची हिंमत कधीच झाली नाही.‌"

पण, मला सतत होणारा त्रास आणि खराब होणारी तब्येत बघून मला शहरातील दवाखान्यात दाखविले. तर त्यांनी शरीरात रक्ताची कमी शिवाय लो बिपी चा त्रास आहे असे सांगितले. मग ट्रीटमेंटसाठी काही दिवस शहरातच रहावे लागणार म्हणून एक खोली भाड्याने घेतली. त्यामुळे मी घरातून बाहेर पडले. शिवाय अभ्यासासाठी हे अधूनमधून शहरात येतच होते. मी शहरात जाणार हे ऐकताच माझ्या मोठ्या जावांना तर फारच आनंद झाला. पण, मला त्यांच्या विषयी वाईट वाटत होते. पण, नाईलाज होता. तेव्हा पासून मी आणि हे आम्ही एकत्र राहू लागलो होतो. पण, संस्काराचे बाळकडू पिऊन हे इतके कठोर झाले होते की त्यांना माझी तब्येत बिघडली असे दिसत असुनही मी नाटक करते आहे असेच वाटायचे."

"पण, तरीही सतत सोबत राहिल्यामुळे आमच्यातला दुरावा थोडासा कमी झाला. त्यातच यांची नियुक्ती झाल्यामुळे आम्ही गावी परतलो. लगेच हे ड्युटीवर जाणार होते. माझ्या समोर आणखी एक आव्हान उभे राहिले. संकेतच्या येण्याची मला चाहूल लागली. हे नसल्यामुळे सगळेजण माझी काळजी घेऊ लागले. पण, तरीही माझ्या मनात धुसफुस चालूच होती."

"अगं, एका स्त्रीचं आयुष्य म्हणजे पुरुषांच्या स्वार्थासाठी बळी जाणारी एक बाहुलीच जणु. मी सप्तपदी चालले . पण, आयुष्याची दोरी दुसऱ्या कोणाच्या तरी हाती. एक माफक अपेक्षा होती प्रेमाची. दोन शब्द गोड बोलण्याची . पण, कधी उसंतच नाही मिळाली. आजे सासुबाई गेल्यानंतर काही वर्षांत वयोमानानुसार सासऱ्यांची आणि सासुबाईंची तब्येत खराब झाली. ते अंथरुणाला खिळले. त्यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला आणि मग आम्ही सगळ्याजणी देखील मोकळा श्वास घेऊ लागलो. आता सगळ्यांची पोरंही मोठी झाली होती. पण, तरीही यांचा स्वभाव मात्र काही बदलला नाही. सतत टोमणे, सततचा होणारा अपमान, मनात बोचणारी सल ती आजही कायम आहे. फक्त बदल एवढाच झाला की संकेतने स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि तो त्या घरातून बाहेर पडला. घर कसलं कोंडवाडा होता तो स्त्रियांसाठी. आज आम्ही जावा एकत्र असुनही आनंदी आहोत. मुलांमुळे आमच्यातही आम्ही बदल करायचा प्रयत्न करीत आहोत."

"आई, रडू नका ना. होईल सगळं नीट."

"अगं , आयुष्याची पाने उलटून भुतकाळात डोकावलं तर प्रत्येक पानांवर दुःखाच्याच वाकड्या तिकडच्या रेषा दिसतील."

"आई, जे झालं ते तर बदलवता येणार नाही. पण, येणारा उद्या हा वेगळाच अनुभव असेल तुमच्यासाठी."

तेवढ्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली.

राजाभाऊ आणि संकेत दोघेही आत आले. कमलताईंनी डोळे पुसले आणि लगेच पाणी आणायला उठणारच की राजाभाऊंनी त्यांना थांबवले.

"कमल थांब, मला माफी मागायची आहे."

"अहो, काय हे? माफी आणि ती कशासाठी?"

"अगं, आज खऱ्या अर्थाने तू माझे डोळे उघडले. तुझ्या मनातल्या वेदना मला कधी कळल्याच नाही. नव्हे मी कधी प्रयत्न केलाच नाही. पुरूषी अहंकाराच ओझं स्त्रीच्या मनावर लादतांना आम्ही फक्त आमचाच विचार केला."
"आता पर्यंत जे घरात डोळ्यांनी बघीतले तेच योग्य. आम्हांला वाटत होतं की स्त्रीची जागा आमच्या पायाशी आहे. पुरुषी अहंकाराची पट्टी डोळ्यांवर बांधून मी आजवर चालत होतो. प्रेम , दुःख , आधार, विश्वास हे शब्द मी विसरूनच गेलो होतो. एका स्त्रिलाही मन असतं हे लक्षातच आले नाही कधी."

"पण, आज तू प्रियाशी जे बोलली , मन मोकळे केले. ते बरेच झालं. आज पर्यंत मी किती चुका केल्या ते तरी माझ्या लक्षात आले. कळत नकळतपणे मी तुझ्या मनावर खूप आघात केले. खरोखरच माफ कर मला गं. आजपासून तू पिंजऱ्यातून मोकळी होऊन नव्याने आयुष्य जग. मी आहे तुझ्यासोबत."


"अहो, मी कधीच तुमचा राग केला नाही. पण, वाईट मात्र नक्की वाटत होते. पण, आज माझ्या दारी सुखाचे क्षण आले आणि ते वेचतांना मी स्वतः ला भाग्यवान करते."

राजाभाऊंनी कमलताईंचे डोळे पुसत त्यांना जवळ घेतले.

चला शेवट गोड करू या. संकेतने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणले आहे. त्याचा आनंद घेऊ या.

कमलताईं प्रियाकडे बघून डोळ्यांतील अश्रुंनी तिला धन्यवाद देत होत्या.

©® अश्विनी सुहास मिश्रीकोटकर