पिंजरा सोन्याचा भाग ५

कथा पिंजर्‍यात अडकलेल्या तिची

पिंजरा सोन्याचा भाग ५



मागील भागात आपण पाहिले की पियुच्या बारशाला आलेल्या वहिनी निमिषाला बाहुली बनून राहू नकोस, असा सल्ला देतात. काय असेल या मागचे कारण? बघू या भागात..



" अखिल???? काय बोलतो आहेस हे तू? ऑफिसला जायलाच हवे का? तर उत्तर आहे हो.. मी नाही घरी राहू शकत. माझे छान करिअर चालू आहे. आई पियुला सांभाळायला तयार आहे. मी तिच्या मदतीसाठी बाई पण बघून ठेवल्या आहेत आणि तू विचारतो आहेस कामाला गेलेच पाहिजे का?" निमिषा खूप चिडली होती.

" अग हो.. किती चिडते आहेस? मला फक्त एवढेच म्हणायचे होते की हे आपले एकच बाळ असणार आहे मग तुला जर ही लिव्ह अजून वाढवता आली तर बघ. असे म्हणायचे होते मला.. तू कामाला जाऊ नकोस असे कसं म्हणेन मी?" अखिल सावरत म्हणाला..

" तसं बोलायचा प्रयत्नही करू नकोस." निमिषा चिडून आत गेली. अखिल स्वतःशीच विचार करत बसला. थोड्या वेळाने तो आत गेला. निमिषा फुरंगटून बसली होती. 

" मी लहान होतो ना, तेव्हा माझी आई कामाला जायची. मला आणि दादाला सांभाळायला बाई ठेवली होती. ती बाई मला चिमटे काढायची. आमच्यासाठी ठेवलेले दूध स्वतःच पिऊन टाकायची. अशावेळेस मला नेहमी वाटायचे की अशी वेळ माझ्या मुलांवर येऊ नये. म्हणून मी सुचवले. मी जर पियुला दूध पाजू शकलो असतो ना तर मी ही घरी राहिलो असतो नोकरी सोडून. तुला वाईट वाटले असेल तर सॉरी.." अखिल निमिषासमोर हात जोडत म्हणाला.

" पण तुझी आई तर गावी राहते ना? मग त्या कधी नोकरी करत होत्या?" निमिषाने अविश्वासाने विचारले.

" मी लहान असताना आईबाबा शहरात रहात होते. तेव्हा आई नोकरी करायची. हवे तर विचारून घे.."

" नको.. तेवढा विश्वास आहे तुझ्यावर. पण आई असणार आहे पियुसोबत लक्ष ठेवायला."

" हो.. आता त्यांचेही वय होत आले आहे. आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ द्यायचा का?" अखिलने विचारले. निमिषा विचार करू लागली. अखिल गप्प बसून पियुला खेळवायला लागला. नंतर कितीतरी दिवस हेच चालू राहिले. अखिलने परत ऑफिसला जाऊ नको असे निमिषाला सांगितले नाही पण त्याच्या वागण्या बोलण्यातून तो सतत तिला जाणीव करून द्यायचा. तरिही ती ऑफिसला गेलीच. पियु जरी तिला खूप प्रिय असली तरी तिला कामही करायचे होते. आईला सोडून पहिल्यांदाच राहिल्यामुळे घरी पियुने रडून गोंधळ घातला. आईचा तसा फोन येताच निमिषाला रहावेना. अखिलही तिच्यासोबत निघाला. घरी येईपर्यंत दोघेही एक शब्दही बोलले नाहीत. रडून रडून पियुला तापही चढला होता. काहीच न बोलता अखिल तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्टया ठेवू लागला. त्याचे न बोलणे निमिषाला जास्त लागत होते. तो भांडला असता तरिही चालले असते असे तिला वाटू लागले. दोघेही पियुला घेऊन घरी आले. ती आता निमिषाला सोडायला तयार नव्हती. अखिलने ते बघून स्वतःच खिचडी टाकली. पियुसाठी फळांचा रस काढला. पियुचे कपडे मशीनमध्ये धुवायला टाकले. सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या. निमिषा पाणावलेल्या डोळ्यांनी हे सगळे बघत होती.. 

" अखिल, बोल ना माझ्याशी."

" बोलतो तर आहे.."

" असे नाही.. नीट बोल.."

" बोलतोच आहे ना.."

" नको ना चिडूस माझ्यावर.."

" निमिषा मी तुझ्यावर कधीच चिडू शकत नाही.. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो ग.. प्लीज समजून घे.." अखिलच्या डोळ्यात निमिषाला खरे प्रेम दिसत होते.

" अखिल, मी नोकरी सोडायला तयार आहे. आपल्यासाठी आपले बाळ जास्त महत्वाचे आहे.. बरोबर ना.."

" तुला कुठे कायमची नोकरी सोडायची आहे. अजून दोनतीन वर्षांनी तू परत नोकरी करू शकतेस ना? आता आपण दोघेही आपला वेळ आपल्या बाळाला देऊया." अखिल निमिषाला मिठीत घेत म्हणाला..



वहिनी ज्या पिंजऱ्याबद्दल बोलत होत्या, त्या पिंजऱ्यात निमिषा अडकते आहे का? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all