पिंजरा.. सोन्याचा

पिंजऱ्यात अडकलेल्या तिची कथा..


पिंजरा.. सोन्याचा..


" अखिल, आपल्या सोसायटीत ना एक नवीन ताई आल्या आहेत. त्या स्कूटी चालवायला शिकवतात. त्यांची फी पण जास्त नाहीये. मी जाऊ का शिकायला?"
" निमिषा, तुला किती वेळा सांगितले तू कोणाकडेही गाडी शिकायला जाणे मला आवडत नाही. तो कोणीतरी पाठी बसणार. तुझ्या अंगाला स्पर्श करणार. मला तर कल्पनाच सहन होत नाही."
" अरे मी ताई म्हणाले ना.. तो नाही, त्या आहेत.." निमिषा समजवायचा प्रयत्न करत होती.
" तुला काय वाटले मला माहित नाही का? आता मुली दाखवतील नंतर मुले येतात. आणि तू थोडे दिवस थांब ना. मला सुट्टी मिळाली की मीच शिकवतो तुला."
" हे तू गेले तीन वर्ष बोलतो आहेस. कधी तुझी मॅच, कधी मित्र तर कधी अजून काय काय.. तुला वेळच नसतो मला गाडी शिकवायला.."
" मी खोटे बोलतो का? आणि मला एक गोष्ट सांग तुला जिथे हवे तिथे मी तुला घेऊन जातो की नाही. मग शिकायची कशाला गाडी?"
" तू जेव्हा ऑफिसला जातोस ना त्यानंतर कधीतरी मला भाजी आणायची असते. कधी पियुला शाळेत सोडायचे असते. कधी पार्थला घेऊन बागेत जायचे असते. आपल्या इथे रिक्षा किती असतात तुला माहित आहे, बाहेर पडायचे म्हटले की पंधरा पंधरा मिनिटे आधी रिक्षाची वाट बघा. त्यापेक्षा गाडी असेल तर मी पटकन गाडीवर येजा तरी करीन." निमिषा जीव तोडून सांगत होती. तोच पार्थचा रडण्याचा आवाज आला. निमिषा त्याला घ्यायला आत गेली. त्याला शांत करून बाहेर येईपर्यंत अखिल न सांगताच ऑफिसला निघून गेला होता. ती एका बाजूला पार्थचे आवरताना स्वतःशीच विचार करत होती. " काय ठरवले होते आणि काय झाले आहे आयुष्याचे?"
निमिषा आणि अखिल.. एकाच ऑफिसमध्ये काम करत असताना झालेली मैत्री. मैत्रीतून प्रेमात आणि प्रेमातून लग्नाच्या बंधनात ते कधी जखडले गेले त्यांचे त्यांनाच समजले नाही. अखिलचे आईबाबा आणि मोठा भाऊ गावी असायचे. निमिषाचे आईबाबा आणि लहान भाऊ जवळच रहायचे. दोघांच्याही घरून परवानगी मिळाली. आटोपशीर पण व्यवस्थित लग्न लागले आणि नवीन दांपत्याचे वैवाहिक जीवन सुरू झाले.
निमिषा अतिशय बोलकी, मनमिळाऊ. त्याउलट अखिल, एकदम अबोल कोणामध्येही जास्त न मिसळणारा. पण निमिषावर मनापासून प्रेम करणारा. तिला सतत जपणारा. त्याचा हाच स्वभाव निमिषाला जास्त भावला होता. तिला कुठेही एकटीला जाऊ न देणे. ऑफिसमधलेसुद्धा जेवढे तिचे काम संपवता येईल तेवढे संपवणे. लग्नानंतर सुद्धा निमिषा कामाला जात होती. पण आता ती मनमोकळेपणाने कोणाशी बोलायला गेलेली अखिलला आवडत नव्हते. त्यातही तिच्या मैत्रिणींना तो चालवून घ्यायचा. पण पुरूष सहकारी जरा काही बोलला की त्याच्या कपाळाला सतराशे साठ आठ्या पडायच्या. अशावेळेस मग तो मुद्दाम काही ना काही काम काढून निमिषाच्या टेबलपाशी जायचा. तो तिथे गेला की तो सहकारी नवरा बायकोमध्ये लुडबुड नको म्हणून निघून जायचा. सुरूवातीला योगायोग असावा असे समजून निमिषाने सोडून दिले. पण जेव्हा नेहमीच असे होऊ लागले त्यानंतर मात्र तिला रहावले नाही.
" अखिल मी पुरूषांशी बोललेले तुला आवडत नाही?"
" का ग?" खोटे आश्चर्य दाखवत अखिलने विचारले..
" नाही.. असे मला वाटते आहे. म्हणजे बघ मी जेव्हा एकटी असते तेव्हा तुझे माझ्याकडे काहीच काम नसते. पण जेव्हा जेव्हा रिषभ किंवा सुजय माझ्याशी बोलायला येतात तेव्हाच बरी तुला संध्याकाळच्या स्वयंपाकाची किंवा अजून कशाची आठवण येते."
" असे काही नाही. आता आठवले की बोलणार ना? तेव्हा नेमके ते तुझ्या आसपास असतात त्याला मी तरी काय करू?" अखिल खांदे उडवत म्हणाला. त्या दिवशी निमिषाचा मूड थोडा ऑफच होता. घरी गेल्यावर अखिलने बिल्डिंगखाली गाडी थांबवली आणि निमिषाला घरी जायला सांगितले. प्रवासात वाद झाल्यामुळे तिच्याकडे परत वाद घालण्यासाठी त्राणही नव्हते.


कुठे गेला असेल अखिल? काय आहे त्याच्या मनात पाहू पुढील भागात..
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all