
इरावासी आज आपण पाहणार आहोत एक पिक्चर
त्या पिक्चरचे नाव आहे पालक मका पुलाव द वन मिल डीश .
पिक्चरच्या हीरोइन आहेत.
मिस्टर पालेभाजी परिवाराचे एक जुडी हिरवी पालक आणि मका परिवारातील पिवळे दाणे जर आपणास गोरे मका दाणे मिळाले तर उत्तम. प्रमाण एक वाटी
हिरो अर्थातच बासमती किंवा आंबेमोहोर तांदुळ .
कॅरॅक्टर आर्टीस्ट :दोन कांदे, चार पाकळ्या लसुण,बोटभर आल्याची पेर.दोन टोमॅटोची प्युरी.
म्युजिक: एक चमचा गरम मसाला,एक चमचा गोडा मसाला
लोकेशन: पुलाव कढ़ाई किंवा नॉनस्टिक हांडी
स्टोरीलाइन :साजुक तुप किंवा तेल,
हीरोचे मित्र :पाणी आणि मीठ
साइड आर्टीस्ट: दोन ते तीन अख्खी मीरी तसेच लवंग व एक तमालपत्र व थोडीशी दालचिनी
पालक हिरोइनच्या मैत्रिणी:दोन मिरची, थोडी कोथींबीर
डायरेक्टर:तुमच्या हाताची चव.
कारण जस ७० एम एम च्या स्क्रिनची मजा ओटीटीला नाही तसच साधा तांदुळ पुलाव स्पेशल नाही बनवु शकत.
हा पिक्चर बनविण्यासाठी आपल्याला दिड वाटी तांदुळ लागेल .त्याला आधी स्वैपाकाच्या नळरूपी झऱ्याखाली साबणाच्या एडच्या हीरोइन सारख दोनदा धुवुन घ्यावं.
मग चाळणीत पाणी निथळून बिचवरच्या हिरोइन जशी सनबाथ घेते तसच त्याला अर्धा तास सुकवावं.
बाजुलाच तीन वाटी पाणी एका टोपात घेउन त्यात चवीपुरत मीठ घालव.मग ते गॅसच्या चुलीवरती ठेवावे.
कांदा आणि लसुण हे कॅरॅक्टर आर्टीस्ट आहेत. नेहमी असतातच त्यांच्याशिवाय पिक्चर बनत नाही पण त्यांना कुणी विचारतही नाही.आणि टॉमेटो हा सगळ्यांना बांधणारा अजुन फॅमिली फ्रेन्ड आहे.तो कधी असतो तर कधी नसतो.
जस जुन्या जमनातील पिक्चरचा डॉक्टर अंकल.
आधी तपेली नावाच लोकशन घ्याव .मग त्यात साजुक तुप किंवा तेल ही स्टोरी एक डाव तापवावी.
मग लवंग ,मीरी,तमालपत्र मैत्रिणी आधी फोडणीला टाकाव्या म्हणजेच साइड कैरेक्टरची एन्ट्री आधी करावी, मग बारीक चिरलेला कांदा,आले लसुण पेस्ट ह्या कॅरॅक्टर आर्टीस्टचा रोल प्ले करावा.
कांदा आधी आपल्या एक्टिंग ने तुमचे डोळे ओले करेल म्हणुनच चिरताना सावध असावे.मग आल लसुणाच्या पेस्टच गांण कराव. आणि त्याला एक चमचा गरम मसाल्याच्या वाद्याची साथ द्यावी
एकदा गाण झाल की मग कांदा तेल/तुप सोडु लागतो.मग
तांदुळ हिरोला आणाव आणि पाच मिनिटे तरी तुपात/तेलात भाजाव.जस पिक्चरमध्ये परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेल्या हिरोची सिचुएशन असते.
हे भाजत असताना पाणी अँग्री हिरोसारख कडकडीत तापवावं.कल्पना करावी की आई बहिणीला होणाऱे त्रास बघुन हीरोचा मित्र जसा तडकेल तसेच गरम पाण्याला बुडबुडे आणावे.मग ते पाणी तांदळावर ओतावे.जसे हिरोचा मित्र संकटात धावुन येतो व स्वत:ला संपवतो पण हिरोला वाचवतो. ह्या गरम पाण्यात एक चमचा किंवा चवीनुसार मीठही घालवं..जसे एकदम मैत्रीने भारलेले मित्र एकत्र येऊन हिरोसाठी काही करू शकतात.
मग जसा पिक्चरमध्ये मेलोड्रामा होता तसाच पाणी पडल्यावर चर्र असा भाजलेल्या तांदळाचा आवाज येइल .
हा आवाज आला म्हणजे समजावं जसा पिक्चर रीलीज होण्याआधी जर पिक्चरची गाणी हीट झाली तर पिक्चरही हीट होतोच ,तसाच तुमचा पुलावाचा भात मोकळा होणार ह्याची गँरटी असतो हा आवाज.बॅकग्राऊंड मुझ्यीकच जणु
इकडे दुसरी मेन हीरोइन पालक आणि तिच्या परिवारातील जीवलग कोथींबीर आणि दोन मिरची ह्या मैत्रिणीबरोबर बरोबर एकत्रच वाटावी नि प्युरी बनवावी.
म्हणजेच तिचा मेकप करून तिची एन्ट्री करावी
मग हंडीत टॉमेटो प्युरी आणि एक वाटी मक्याचे दाणे ह्या दुसऱ्या हीरोइनलाही लगेच घालावे. मेन पिक्चरची जान जशी कॉमेडी आहे तसाच ह्या पिक्चरची जान आहे गोडा मसाला .तो एकच चमचा घालावा.
तांदुळ हिरो आणि पालक व मका हिरोइन या सर्वांच मिलन होण्यासाठी एकदा कलथा हंडीत फिरवावा आणि गॅस मोठा करून झाकण ठेवाव. पाच मिनिट आतमधुन हीरोचे फाइट झाल्यासारखे आवाज येतील. जस पिक्चरचे एक्शन सिन असतात.
मग बघावं जर त्यात पाणी कमी होउन धरणीकंपासारखी भोक बनली असतील तेव्हाच एकाट्या पडलेल्या हिरोला मजबुत कऱण्यासाठीही जसा उपदेशाचा डोस देतात तसेच इकडेही तुपाचा डोस द्यावा म्हणजेच भाताच्या शिताला फुलवण्यासाठी एक चमचा तुप घालव आणि मंद आचेवर पाच ते सात मिनीटे ठेवुन गॅस बंद करावा.
तसाच पाच मिनिटे झाकण न काढता वाफेवर अजुन थोडा शिजवावा..आणि मग दोन हीरोइन आणि एक हिरो असलेला झटपट होणारा पालक मका पुलाव सगळ्यांना वाढावा.
हा पिक्चर शरीरास अत्यंत पौष्टिक आहे म्हणुन नेहमी करून बघावा असा माझा प्रेमाचा सल्ला.
पालक मका पुलाव हा आगळा
कधी कधी खुपच येतो कंटाळा
काय करू नि काय नको हा प्रश्नच मोठा
मग अश्यावेळी पाहावा करून हा पुलाव सोपा
टीप:हे माप साधरण दोन माणसांन साठी आहे .जास्त माणस असतील तर जास्त मापात करावे.