अभयारण्याची सहल भाग २

वाघांशी झुंज तर झाली आता पुढे काय ? शलाका काय करते आहे ?

                                             भाग 2

भाग १ वरुन पुढे वाचा....

मेडिकल मधे, आता संदीप चे आई वडील पण आले होते. संदीपला स्पेशल रूम मध्ये ठेवलं होतं. संदीपला अजून शुद्ध आली नव्हती म्हणून सगळेच काळजीत होते. पण डॉक्टरांनी दिलासा दिला. रक्तस्त्राव बराच झाला आहे आणि अशक्त पणा पण त्यामुळे फार आहे. परत वाघाशी सरळ सामना झाल्यामुळे जबरदस्त शॉक पण बसला असण्याची शक्यता आहे. तेंव्हा काळजी करू नका थोडी वाट बघू.

शलाका सुरवातीपासून त्यांच्या बरोबरच होती. त्याला स्पेशल रूम मध्ये हलवल्यावर तिने सगळ्यांना सांगून टाकलं की तीच रूम मध्ये राहून त्याची काळजी घेणार. सगळ्यांनी तिला  बरंच समजावलं की आता त्यांचे आई वडील आले आहेत तेंव्हा ते लोक काळजी घेतील. संदीप ची आई म्हणाली की

मुलगा अॅडमिट असतांना मी घरी कशी राहू ? माझं चित्त थाऱ्यावर राहणार नाही.

पण शलाका नी  त्यांना पटवून दिलं की, तिच्या रक्षणासाठी त्यानी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली होती तेंव्हा आता त्याला जरूर असतांना ती इथून हलणं शक्यच नाही. तिच्या निर्धारा पुढे सगळ्यांनाच हार मानावी लागली. शशांक नी सुद्धा सांगून पाहिलं पण शेवटी त्याला सुद्धा तिचं म्हणण ऐकावं लागलं. आता संदीप चे  आई वडील सकाळी 10 वाजे पर्यन्त येऊन शलाका ला रीलीव करतील, आणि संध्याकाळी सहा सात वाजे पर्यन्त थांबतील आणि संध्याकाळी शलाका येईल आणि ती सकाळी दहा वाजे पर्यन्त थांबेल असं ठरलं. संदीप च्या आईला तिचं कौतुकच वाटलं. दोन तीन दिवसांत तिच्या बरोबर भरपूर गप्पा झाल्या होत्या, कारण शलाका संध्याकाळी चार पांच वाजे पर्यन्त येऊन जायची.  संदीपच्या आइनी तिला विचारलं सुद्धा की

एवढ्या लवकर कशाला येतेस, चांगली 2-3 तास झोप काढून यायचं,

तर शलाका म्हणाली की

घरी माझी फार घालमेल होते हो. मन थाऱ्यावर नसतं. इथे आल्यावर जरा शांत वाटतं. पेशंट आपल्या समोर असला की बरं वाटतं.

त्यावर संदीपच्या आईनी मान डोलावली. म्हणाली

खरं आहे ग बाई, घरी खरंच मन लागत नाही.

असंच बोलता बोलता शलाकांनी मधेच केंव्हा तरी संदीपच्या आईला विचारलं की बाकी सगळे आले पण संदीपची बायको कशी नाही आली ते.

अग त्याचं लग्न च झालेलं नाहीये अजून. वेळ आहे. पण ते जाऊ दे. तू घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार होतीस तेंव्हा नेमकं काय घडलं ते सविस्तर सांग, आम्हाला फार उत्सुकता आहे. अगदी सगळं सांग. – संदीप ची आई.

मग शलाका नी, तिला पाठीशी घालून संदीप नी एका हाती वाघाशी कसा लढा दिला याचं चक्षु:वैसत्यम म्हणजे आखों देखा हाल, रनिंग कॉमेंटरी असं इत्थंभूत वर्णन केलं. एक एक अगदी बारीक सारिक गोष्टींचं वर्णन केलं. संदीपच्या आई, बाबांचा उर अभिमानाने भरून आला. आणि हे सांगताना शलाका चे डोळे पण असे काही चमकत होते की त्याचा अर्थ सर्वांच्याच लक्षात यावा. पण हे पाहून शशांक मात्र थोडा अस्वस्थ झाला. तो घरी गेल्यावर नलिनीला म्हणाला सुद्धा

नले, तुझ्या काही लक्षात येतेय का ? शलाका बहुधा संदीप मध्ये गुंतत चालली आहे.

अहो, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तीच रक्षण केलेय त्यानी. कृतज्ञतेची भावना आहे. अजून काही नाही. तो बरा झाल्यावर सगळं पुन्हा नॉर्मल होईल. तुम्ही उगाच काळजी नका करू.

अग पण रात्री सुद्धा शलाका त्याच्या रूम मध्य राहतेय.

मग ? अहो हॉस्पिटल आहे ते. हॉटेल ची रूम नाही. उगाच काही शंका कुशंका काढू नका. अहो उपकाराची परतफेड नावाची काही चीज असते की नाही ? करू दे तिला तिच्या मनासारखे. तिचं समाधान होऊ दे. प्रत्यक्ष मृत्यूला सामोरी जाऊन परत आली आहे ती. तिच्या विचारात आमूलाग्र बदल झाला आहे.

तसं बरोबरच आहे तुझं. विचारात खरंच बदल जाणवतो आहे. ठीक आहे. चालू द्या.

पाचव्या दिवशी रात्री, संदीपला शुद्ध आली. त्यांनी डोळे उघडले. पण त्याला काहीच बोध होईना. त्याला शुद्ध आलेली पाहून शलाका बेड जवळ गेली. पण तो पर्यन्त संदीपनी थकून परत डोळे मिटले होते. शलाका नर्सेस डेस्क वर गेली आणि तिने मेट्रन ला माहिती दिली. ती लगबगीने आली आणि संदीपला तपासलं. पांच मिनिटं थांबली आणि शलाकाला म्हणाली की सर्व ठीक आहे लवकरच शुद्धीवर येतील. पुन्हा जाग  येईल तेंव्हा लगेच सांगा.

दोन एक तासांनी सांदीपला पुन्हा जाग आली. त्यांनी कुशी वर वळण्याचा प्रयत्न केला पण वेदना होत होत्या, मग त्याला सलाईन लावलेलं दिसलं. तो विचार करत होता मग त्याला हळू हळू आठवायला लागलं. त्यांच्या लक्षात आलं की तो हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून. तो पर्यन्त शलाका बेड जवळ पोचली होती.

कसं वाटतंय आता ?

संदीप तिच्याकडे बघून क्षीण हसला.

मी आलेच असं म्हणून शलाका मेट्र्न ला सांगायला गेली.

संदीप विचार करत होता, की हॉस्पिटल मध्ये सहसा केरळी नर्सेस असतात. मग मराठी नर्स कुठून आली ? आणि गंमत म्हणजे तिच्या अंगावर त्यांचा टिपिकल पोशाख पण नाहीये. काय भानगड आहे ? आणि एकदम गेली कुठे ? मला पाणी हवय पण ही गायब. खरं म्हणजे इथे आईने असायला हवं होतं. आई, बाबांना कुणी कळवलं नाही की काय ? पण असं कसं होईल सर्व मित्रांना त्याचं घर माहीत होतं. अरे, पण मित्रां पैकी  सुद्धा कोणी दिसत नाहीये. काय गौड बंगाल आहे कळत नाही.

तेवढ्यात शलाका आणि मेट्रन रूम मध्ये आल्या.

कैसा लग रहा है बेटा ? अच्छा हैं ना ? मेट्रन नी विचारपूस केली.

संदीप नुसताच हसला आणि मान हलवली.

BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून चालली गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका.

खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का ?

हो  देते ना. अरे बापरे थांबा, विचारून येते.

कोणाला ?

मेट्रन ला. आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली

चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं म्हणाली.

मग शलाका ने  त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं.

अहो असं चमच्याने का देता आहात ? भांडं द्या नं.

अहो तुम्हाला उठता येणार नाही. आणि झोपून भांड्याने पाणी पिता येणार नाही. ठसका लागला तर प्रॉब्लेम होईल.

संदीप ने थोडी हालचाल केली पण तेवढ्याने सुद्धा त्याला वेदना झाल्या.

मला काय झालय  ?

अहो तुम्हाला काही आठवत नाहीये का ?

आठवतंय. वाघाशी लढाई झाल्याचं आठवतंय. पण मला काही लागल्याचं आठवत नाहीये. मग या वेदना कसल्या ?

अहो वाघाच्या एका फटकार्‍याने तुम्हाला छातीला आणि दुसऱ्या फटकार्‍याने चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.

हं आता आठवलं. अरे, पण सिस्टर माझ्या मागे एक मुलगी होती तिला कुठलीही इजा होऊ नये म्हणून मी वाघाशी पंगा घेतला. ती कशी आहे ? सुखरूप आहे न ?

म्हणजे तुम्ही तिला ओळखत नाही ? – शलाका

नाही. मला तिचं नाव पण माहीत नाही. नावाचं सोडा मी तिला पाहीलं सुद्धा नाही. -संदीप

अहो पण ज्या मुलीला तुम्ही ओळखत नाही, तिला पाहीलं सुद्धा नाही, तिच्या साठी प्राणांची बाजी लावली तुम्ही ? कमाल आहे. नशीब तुमचं, वाचला तुम्ही. – शलाका

पण त्याचा काय संबंध आहे ? तिच्यावर वाघ चालून जात होता आणि मी तिथे जवळच होतो, मग माझं ते कर्तव्यच होतं. तिला काय वाघाच्या तोंडी द्यायला पाहिजे होतं का ? मग माझ्या पुरुष असण्याला काय अर्थ होता ?

अहो पण तुम्ही पळून जाऊ शकला असता, झाडावर पण चढू शकला असता. आपला जीव वाचवू शकला असता, तसं न करता एका अनोळखी मुली साठी आपला जीव धोक्यात घातला तुम्ही ?

कसं आहे ना सिस्टर, माझी सैन्यात जाण्याची खूप इच्छा होती. आपला जवान जेंव्हा प्राणांची बाजी लावतो तेंव्हा तो खास असं, कोणा साठी लढत नसतो. ती एक वृत्ती आहे. ज्याला क्षात्र वृत्ती म्हणतात, ती माझ्यात आहे. मी सैन्यात नाही जाऊ शकलो पण mindset तर तोच आहे ना.  

धन्य आहे तुमची. शलाका म्हणाली आणि तिने हात जोडले.

सिस्टर पण हे सांगा न, की ती मुलगी कशी आहे ? सुखरूप आहे नं  ? तुम्हाला काही माहीत आहे का ?

नुसतं माहितीच नाहीये, मी चांगली ओळखते तिला.

अहो मी तुमच्या ओळखी बद्दल नाही, तिच्या प्रकृती बद्दल विचारतो आहे. कशी आहे ती ? माझी शुद्ध हरपली, तो पर्यन्त ती माझ्या मागेच उभी होती त्यामुळे मला काही कळलंच नाही.

पण आता तर ती मुलगी तुमच्या समोर उभी आहे नं. हे बघा अगदी सुखरूप आहे ती. तुम्ही आला होता न, टारझन बनून, माझ्या रक्षणासाठी, साधं खरचटलं सुद्धा नाहीये, बघा, तिने एक गोल गिरकी घेतली. आणि  शलाका गोड हसली.

संदीप शलाका कडे बघतच राहिला. मग भानावर येत तो म्हणाला

टारझन ?

मग ? कसली जबरदस्त आरोळी ठोकली तुम्ही, कुठल्याशा सिनेमात मी पाहिलं होतं की टारझन असाच आरोळी ठोकतो ते. मी तर तुम्हालाच घाबरले. मीच काय तो वाघ पण घाबरला आणि दोन पावलं मागे हटला.

मी आरोळी ठोकली ? मला कसं आठवत नाही ?

जाऊ द्या. सध्या डोक्याला जास्त ताण देऊ नका. थोडं बरं वाटल्यावर, मी नंतर सांगेन तुम्हाला की कशी गर्जना केली होती तुम्ही.

तुम्ही तिथे कश्या होत्या ?

आम्ही पण वाघ बघायलाच आलो होतो.

तुम्ही इथल्या सिस्टर आहात नं ?

मी कुठे म्हंटलं असं ? मला तरी आठवत नाही.

म्हणजे तुम्ही नर्स नाही आहात ?

नाही.

संदीप चा गोंधळ उडाला. ही मुलगी जर नर्स नाहीये, तर इथे आपल्या रूम मध्ये कशी ?

मग तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करता आहात ?

अहो असं काय करता, हॉस्पिटल मध्ये पेशंट च्या जवळ जर कोणी असेल तर तो काय करतो ? पेशंट ची देखभाल, अजून काय ?

आता मात्र संदीपचं आधीच थकलेलं डोक गरगरायला लागलं. त्यांनी डोळे मिटले. त्याला काही संगती लावता येईना. ही मुलगी इथे कशी ? आणि आई कुठे आहे ? मित्र कुठे आहेत ? विचार करता करता त्याला केंव्हा झोप लागली हे कळलंच नाही. केंव्हा तरी  पहाटे त्याला पुन्हा जाग आली. खोलीत शांतता होती. मान वाळवून पाहिलं तर बाकावर शलाका. तिला झोप लागली होती. तिला पाहिल्यावर याच विचार चक्र पुन्हा सुरू झालं. ही मुलगी इथे आणि ते ही रात्रीच्या वेळेस का थांबली आहे ? थोड्या वेळाने त्याला पुन्हा झोप लागली. नंतर जेंव्हा जाग आली तेंव्हा शलाका उठली होती. झोप झाल्या मुळे एकदम फ्रेश दिसत होती. संदीप उठला असं बघून त्यांच्या कडे आले आणि म्हणाली

कसं वाटतंय आता ? चहा आलाय, देवू का ?

संदीप ने मान हलवून होकार दिला. त्याला भूक पण लागली होती.

थांबा जरा एक मिनिट, आणि तिने एक टर्किश टॉवेल पाण्यात भिजवून आणला, आणि बँडेज मधून शिल्लक असलेला संदीपचा चेहरा नीट पुसला. मग थोडा बेड वर उचलला. पाणी दिलं आणि चूळ  भरायला सांगितली. चमच्याने चहा पिता पिता संदीप म्हणाला-

आता मी ग्लास ने चहा पीवू शकतो. द्या माझ्या हातात ग्लास.

ग्लास देते पण हळू हळू, एक एक घोट प्या. ठसका लागायला नको नाही तर वेदना होतील.

चहा प्यायल्यावर संदीप ला थोडी तरतरी आली. म्हणाला

तुमचं नाव काय आहे ?

शलाका

माझ्या घरच्यांना काही माहीत नाहीये का, मी इथे आहे म्हणून ?

सगळ्यांना माहीत आहे. आता हळू हळू येतीलच सगळे तुमची तब्येत पाहायला.

आई, बाबा पण येतील ?

हो. रोजच येतात. आता ते आले की मी घरी जाईन आणि तुमच्यासाठी थोडा नाश्ता घेऊन चार पांच वाजे पर्यन्त येईन.

किती दिवस झालेत मला इथे ?

पांच दिवस.

बापरे इतके दिवस मला शुद्ध नव्हती ?

पण आता आली आहे न, मग आता त्या बद्दल फार विचार नका करू. बरं, नाश्ता करणार का ?

हो.

दहा वाजे पर्यन्त संदीपचे आई, बाबा आले. आणि शलाका घरी गेली.

संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असं आईला झालं पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ते दूर झालं होतं.

काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय ?

अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.

अग पण आपली ओळख नाही पाळख नाही, अशी कशी येतेय ? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत ? अग ती काल रात्री पण इथेच होती.

चांगली आहे मुलगी. मला म्हणाली की ज्या माणसांनी आपल्या जिवाची पर्वा न करता माझं रक्षण केलं त्यांची काळजी घेण्याचा माझा हक्क पहिला आहे. तेंव्हा आता ते बरे होई पर्यन्त मीच इथे थांबणार. आम्ही सगळेच आळी पाळीने थांबणार होतो पण तिने आमचं काही एक ऐकून घेतलं नाही. गेले पांच दिवस तीच इथे दिवस रात्रं थांबते आहे. कौतुकाची गोष्ट आहे. इतकी सेवा फक्त आणि फक्त बायकोच करू शकते. माझ्या तर खूपच मनात भरली आहे ती.

अग काय हे आई, कुठल्या कुठे पोचलीस तू ? मी तर तिला नर्स च समजलो होतो, तिलाच विचारलं की ती मुलगी सुखरूप आहे का म्हणून.

मग ?

तर म्हणाली की ही बघा तुमच्या समोरच उभी आहे, तेंव्हा मला कळलं की ती नर्स नसून तीच मुलगी आहे जिच्या साठी एवढं महाभारत घडलं. नाव सुद्धा मला कालच कळलं. आणि तू सुता वरून स्वर्ग गाठते  आहेस.

अरे जितके दिवस तिला पाहते आहे, तेवढ्यांवरून कळलं मला की तुला ती सुखातच ठेवेल म्हणून.

आई, काय बोलतेस तू ? हे दुखणं कीती दिवस घेईल हे माहीत नाही, प्रायवेट नोकरी आहे माझी, टिकेल की नाही हे ही माहीत नाही. वरतून जखमे मुळे चेहरा विद्रूप झालेला असणार, ती फक्त कर्तव्याच्या भावनेने इथे येतेय, ही उर्मी काही दिवसांतच ओसरेल. छे, उगाच काही कल्पना करत बसू नकोस. आहे ते ठीक आहे.

आई पुढे काही या विषयावर बोलली नाही. कदाचित संदीपच्या बोलण्यावर विचार करत असावी. मग जेवण झाल्यावर संदीपला सुद्धा झोप लागली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all