अभयारण्याची सहल भाग ३ ( अंतिम )

अजूनही संदीपच्या मनाची तयारी होत नव्हती. काय होईल पुढे ?

                                                              भाग ३ ( अंतिम )

भाग २  वरुन पुढे वाचा....

संदीपला जाग आली तेंव्हा सहा वाजले होत आणि शलाका आली होती आणि आई तिच्याशी गप्पा मारत होती. बाबा कुठे दिसत नव्हते, बहुधा बाहेर गेले असावे,

त्याला उठलेला पाहून शलाका जवळ आली म्हणाली

उपमा आणला आहे, थोडा खाऊन घेता का ?. पण आता थंड झाला असेल. चालेल ?

नको. आता भूक नाहीये. जेवूच एकदम.

ठीक आहे. चहा हवा का ?

चालेल.

घेऊन येते. आणि ती कॅंटीन कडे निघाली.

आई, ही पुन्हा आली ?

अरे माघाशीच नाही का सांगून गेली की चार वाजे पर्यन्त येते म्हणून, तशी ती आली. तुलाच झोप लागली होती.

अग पण आता ही रात्री पण थांबणार आहे ?

हो.

बाबांना थांबू दे ना. तिला कशाला त्रास द्यायचा.

तूच बोल बाबा. आमचं काही ती ऐकत नाही या बाबतीत.

आई, मी कसं बोलणार, तूच बोलायला पाहिजे. ती माझ्या साठी कष्ट करतेय आणि मीच नको म्हणायचं हे बरोबर दिसत नाही. तूच सांग की इथे तूच थांबणार आहे म्हणून. अग परक्या माणसाकडून कशी सेवा करून घ्यायची ? संकोच वाटतो फार.

शलाका रूम मध्ये आली होती. म्हणाली

चहा आणलाय. आणि तिने बेड ची डोक्याची बाजू वर उचलली आणि चहाचा

ग्लास संदीपच्या हातात दिला. संदीप ने एक घोट घेतल्यावर म्हणाली

कसला संकोच वाटतो ?

काही नाही, असंच. संदीप ने जरा बिचकतच उत्तर दिलं.

संदीप ची आईच म्हणाली की

अग त्याला तुझा संकोच वाटतोय. तू चहा आणतेस, धाव पळ करतेस त्याचा संकोच वाटतोय. मला म्हणतोय की परक्या माणसाकडून अशी अपेक्षा कशी करायची ? पहा बाई आता तूच.

काळजी करू नका. मी देते त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. निश्चिंत पणे घरी जा. आता मी आलेय.

मग थोड्या वेळाने आई आणि बाबा निघाले.

बाबा, आज तुम्ही थांबा न. रात्रीची वेळ आहे, या मुलीला जाऊ द्या घरी.

अरे माझी  काही हरकत नाहीये पण ही मुलगी तयार होईल तर ना. तिने तर आम्हाला साफ सांगितलं की तीच इथे थांबणार म्हणून. आणि दोघा जणांना थांबू देत नाहीत. असं करतो, उद्या मी हिच्या भावाशी बोलतो मग ठरवू. मग तर झालं ?

मग आठ वाजता जेवण आलं. डॉक्टर आणि डाएटिशन चा राऊंड झाला, औषधं देवून झाली, मग त्याचं अंथरूण, पांघरूण व्यवस्थित करून शलाका म्हणाली की

आता दहा वाजले आहेत. झोपायची वेळ झाली आहे, शांत झोपा. जितका आराम कराल तेवढी लवकर रिकव्हरी होईल.

जबरदस्ती आहे झोपायची ?

हो, आणि तुमच्याच भल्या साठी आहे.

तुम्ही का थांबलात इथे, चांगलं बाबांना म्हणत होतो की तुम्ही थांबा म्हणून, तुम्ही का एवढा त्रास घेता आहात ?

माझा हक्क आहे इथे थांबण्याचा आणि हे त्यांना पण पटलं आहे.

अहो, तुमची आणि माझी साधी ओळख पण नाही, आणि तुम्ही हक्क कसला दाखवता आहात ?

हे बघा, पेशंट नी वाद नसतो घालायचा. जे सांगितल्या जाईल ते शांत पणे ऐकायचं असतं. झोपा आता. नाही तर वाघ येईल मग काय कराल ?

संदीपला हसायला आलं.

हसताय कशाला ?

लहान मुलाला दाखवतात तसा धाक घालताय मला तुम्ही.

मग शलाकाला ती काय बोलली हे आठवलं आणि तिला पण हसू आलं. आणि तिला हसतांना पाहून संदीपला पण हसायला आलं.

अहो शलाका मॅडम, हे सगळं तुम्ही का करताय ?

सांगितलं ना की माझा हक्कच आहे म्हणून.

तो कसा काय हे जरा सांगाल का ?

आपली कुठलीही ओळख नसतांना तुम्ही माझ्या साठी जिवाची बाजी लावलीत ते कुठल्या हक्कानी ?

हक्क कसला, ते कर्तव्यच होतं माझं आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे.

तुम्ही आणखीही म्हणाला होता की जवान लढतात ते कर्तव्य म्हणून बरोबर ?

हो.

कर्तव्य का असतं ? कारण त्यांचा देशावर हक्क असतो म्हणून. मग याच न्यायाने मी कर्तव्य करते आहे ते माझा तुमच्या वर हक्क आहे म्हणूनच. कळलं का ?

यावर मी काय बोलणार आता ?

नकाचं बोलू. शांत पणे झोपा. आणि काही लागलं तर संकोच न करता मला सांगा. मी आहे इथे.

सारखं झोपा झोपा असं नका म्हणू. मला तुमच्याशी बोलायचं आहे.

सकाळी बोलू की आपण.

नको आत्ताच. पेशंट चं मन मोडायचं नसतं. माहीत आहे ना. आणि तसंही सकाळी गोंधळ असतो, बोलणं जमणार नाही.

शलाकानी खुर्ची बेड जवळ सरकवली.

मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जागरण होऊ नये म्हणून मी म्हणत होते. काय बोलायचं आहे तुम्हाला, इतकं महत्वाचं आहे का ते ? मुद्दाम जागून बोलण्या सारखं ?

हो, माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्ही प्लीज आढे वेढे घेऊ नका.

ओके. आता तुम्ही इतका पिच्छाच करता आहात तर ऐकतेय मी. बोला.

हे पहा मॅडम, तुम्ही हे जे काही करता आहात ते बरोबर नाहीये. तुम्हालाच पश्चात्ताप होईल.

पहिली गोष्ट मला मॅडम म्हणू नका. माझं नाव शलाका आहे. आणि पश्चात्तापाचा प्रश्न येतोच कुठे.

आता कसं सांगू तुम्हाला ? आई तुमच्या वर खूपच खुश झाली आहे. आणि तेच मला खटकतंय.

मला अहो, जाहो करू नका. प्लीज. आणि तुमची आई माझ्यावर खुश आहे त्यात तुम्हाला राग येण्या सारखं काय आहे ?

संदीप विचारात पडला. कसं सांगायचं हिला, शेवटी सगळं धैर्य गोळा करून म्हणाला.

हे बघा, आईनी तुमची आणि ..

शालाकानी मधेच टोकलं.

अहो जाहो करू नका हो. मला फार अवघडल्या सारखं होतं.

संदीप नी आवंढा गिळला आणि एका दमात म्हणाला

ओके. तू म्हणतेस तसं. आपण एकमेकांना धड ओळखतही नाही आणि आईनी आत्ताच तुझी आणि माझी जोडी लावून पण टाकली आहे. म्हणाली की ही पोरगी तुला सुखात ठेवेल.

हे ऐकून, शलाका प्रसन्न हसली. ती हसतांना संदीपला इतकी आकर्षक दिसली की तो तिच्याकडे पहातच राहिला. भुरळच पडली त्याला तिची. काय बोलायचं ते विसरूनच गेला.

शलाका सुद्धा त्याच्या कडे पहात होती, क्षणभर थांबली. आणि म्हणाली की

काय हो, मी इतकी वाईट आहे का ? की आईंनी जोडी लावली म्हंटल्यांवर राग आला ?

अग नाही. उलट तू सुंदरच आहेस. म्हणूनच मला हे नको आहे. तुला खूप स्मार्ट मुलगा मिळेल.

तुम्ही म्हणता ते कदाचित बरोबर ही असेल. पण मी तुलना कशा साठी करू. मला आईंनी लावलेली जोडी मान्य आहे.

पण मला मान्य नाहीये.

ते कळलं हो. तुम्ही मला जर पटवून दिलं की मी तुमच्या साठी योग्य नाहीये, तर मी हट्ट धरणार नाही. सांगा, एक तरी कारण सांगा.

तू सुंदर आहेस हेच कारण आहे.

अहो काही तरीच काय ? सर्वांना गोरी, आणि सुंदर मुलगी हवी असते बायको म्हणून. आणि तुम्ही म्हणता की म्हणूनच नको, हे काय कारण झालं ? अहो लोकं हसतील तुमच्या वर. आणि वरतून शलाका पण हसली.

ती हसतांना इतकी मोहक दिसली की क्षण भर संदीप विसरूनच गेला की त्याला काय बोलायचं आहे ते. पण लवकरच त्यांनी स्वत:ला सावरलं. म्हणाला

हे बघ, जरा हा विषय गंभीर पणे घे. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी काय सांगतो ते ऐक. आणि मग बोल.

ठीक आहे. सांगा.

शलाका असं गंभीर पणे म्हणाली खरं, पण सांदीपला वाटलं की ती अजूनही सगळं गंमतीतच घेते आहे. म्हणून तो जरा जास्तच गंभीर झाला आणि म्हणाला.

हे बघ, उताविळपणा करू नकोस, आणि lightely तर मुळीच घेऊ नकोस.

माझ्या पूर्ण अंग भर जखमा झाल्या आहेत. जंगली प्राण्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. कीती दिवस या जखमा बाळगाव्या लागतील हे माहीत नाही. माझ्या चेहऱ्यावर दोनदा पंजा मारला वाघाने, किती ठिकाणी कापलं असेल ते सध्या तरी माहीत नाही. जवळ जवळ पूर्ण चेहऱ्यावर बॅंडेज बांधलं आहे. काढल्यावर संपूर्ण चेहरा जखमांच्या खुणां मुळे विद्रूप झाला असेल. चेहरा आणि अंगभर scars असतील. जर खूप दिवस घरी राहावं लागलं तर नोकरी पण जाण्याची शक्यता आहे. अशा विपरीत परिस्थितीत मी कसं तुला हो म्हणू आणि तुझं आयुष्य खराब करू. शक्य नाही ते.

शलाकाने उठून खुर्ची त्याच्या आणखी जवळ सरकवली. त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली

तुम्ही नका ना असा विचार करू, माझ्यावर जेंव्हा संकट आलं तेंव्हाही असाच मागचा पुढचा विचार न करता वाघाला सामोरे गेलात. वाघाशी कुठलंही शस्त्र हातात नसतांना दोन हात करायची हिम्मत दाखवलीत. कोणा साठी ? माझ्या साठीच ना ? माझ्या भावाची तर कार मधून खाली उतरायची सुद्धा हिम्मत झाली नाही. मदत तर फार दूर ची गोष्ट होती. आणि तुम्ही आत्ताही फक्त माझाच विचार करता आहात. आता माझं ऐका, कुठलीही गोष्ट घडते ना तेंव्हा त्या मागे काही तरी ईश्वरी योजना असतेच अशी माझी ठाम धारणा आहे. त्या योजने नुसारच तुमची आणि माझी गांठ आधीच बांधल्या गेली आहे.  

थांब, थांब, हे बघ आता तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना प्रबळ आहे. पण वर्षभरातच ती ओसरून जाईल आणि हे सगळं खटकायला लागेल. तू खूप सुंदर आहेस, आणि माझ्या अंगावर, चेहऱ्यावर या जखमांचे व्रण आणि त्यामुळे कुरूप झालेला चेहरा, चार लोकं जेंव्हा बोलायला लागतील तेंव्हा तुला तुझी चूक कळून येईल. पण तेंव्हा फार उशीर झाला असेल. म्हणून म्हणतो. आताच सावध पणे पावलं उचल. नको या भानगडीत पडू. मी पुन्हा पूर्ववत होणं शक्य नाही.

तुमचं बोलून झालं का ?

हो. आणि माझी विनंती आहे की आजची आपली ही भेट शेवटची समज आणि पुन्हा इथे येऊ नकोस.

आता मी काय सांगते आहे ते ऐका.

जेंव्हा तुम्ही माझ्या आणि वाघाच्या मध्ये येऊन उभे राहिलात, त्याच्या आधीच परमेश्वराने आपली गाठ बांधली होती. नाही तर तुम्हाला तशी बुद्धी झालीच नसती, माझ्या भावा प्रमाणे तुम्ही पण पळून गेला असता. तो तर माझा सख्खा भाऊ होता, तुम्ही तर कोणीच नव्हता, आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. त्यावेळी तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही पळून गेला असता तर कोणी दोषही दिला नसता. तुम्ही आला नसता तर मी ही, या जगात राहिले नसते. वाघाने केंव्हाच माझा फडशा पाडला असता. आणि तुम्ही म्हणता तशी कृतज्ञतेची भावना वगैरे माझ्या मनात नाहीये. बायको साठी जिवाची बाजी लावणारा शूर वीर नवरा कोणच्या स्त्री ला आवडणार नाही ? तुम्ही पण आता हे अॅक्सेप्ट करून टाका.

अग अंगभर scar असणार आहेत माझ्या आयुष्यं भर, विचार कर. विद्रूप नवऱ्या बरोबर आयुष्य काढायचं म्हणजे भारी पडेल.

अहो, हे उलटच होतेय, मुलगाच नकार देतोय. का तर मुलगी दिसायला चांगली आहे म्हणून. नवलच आहे.

शलाका चेष्टा नको. परिस्थिती काय आहे, तू काय बोलते आहेस ! मी काय सांगतोय त्यावर seriously विचार कर.

मी एक विचारू ? खरं खरं उत्तर द्याल ?

देईन.

मी खरंच तुम्हाला आवडत नाही का ?

आवडीचा प्रश्न नाहीये. परिस्थितीचा प्रश्न आहे.

एक वेळ, फक्त एक वेळ, परिस्थिती नजरे आड करा आणि खरं उत्तर द्या.

अग तू दिसायला सुंदर तर आहेसच पण त्याच बरोबर माझी किती काळजी करतेस. अशी बायको फक्त नशीबवान लोकांनाच लाभते.

खरं सांगताय ? माझी शप्पथ ?

हो. तुझी शप्पथ.

शलाका हसली. हसतांना ती किती लोभस दिसते हाच  विचार संदीप करत होता. पण हंसता, हंसता शालाकाच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहायला लागल्या होत्या. संदीप कन्फ्युज झाला. त्याने अभावितपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

आता तुझ्या मना सारखं झालं ना मग रडते कशाला ?

नाही रडणार आता. असं म्हणून तिने डोळे पुसले.

संदीप नी टोटल शरणागती पत्करली होती. आता वादाचा कोणताच मुद्दा राहिला नव्हता.

शलाका त्याला काही हवंय का असं विचारून झोपायला गेली आणि दिवसभराचे श्रम आणि दिवस अखेर संदीपने दिलेला रुकार याने तिला लवकरच गाढ झोप लागली.

संदीप मात्र जागाच होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न उठले होते त्या प्रश्नांची उकल होणे त्याच्या दृष्टीने जरुरीचे होते. तो मनातल्या मनात review घेत होता.

आपण वाघांशी लढण्याचा निर्णय घेतला तो कशा साठी ? प्रसिद्धी आणि कीर्ती साठी ?

नाही नक्कीच नाही.

वाघांशी लढण्यातलं थ्रिल अनुभवण्यासाठी ?

अरे बापरे, मुळीच नाही. शलाका नसती तर आपण पळूनच गेलो असतो. वाघांशी लढण्याचा मूर्खपणा कोण करेल ?

मग शलाका सारखी  सुंदर मुलगी पटवण्या साठी ?

छे छे, तिला तर आपण पाहीलं सुद्धा नव्हतं. तिचं नावही माहीत नव्हतं.

वाघांशी लढतांना आपला जीव जाऊ शकतो हे माहीत नव्हतं का ?

पूर्ण कल्पना होती आपल्याला.

समजून उमजून, जीवावरची कामगिरी सैनिक घेतात आपण का घेतली ?

शालाकाचा जीव वाचवायला. आपण तिथे जीवंत असतांना तिला इजा व्हावी असं आपल्याला वाटत नव्हतं म्हणून.

म्हणजे जे काही केलं ते स्वत:च्या समाधानासाठी केल. करेक्ट ?

करेक्ट.

म्हणजे तू काही उपकार केला नाहीस.

नाही. पण शलाकाला तसं वाटतंय. आणि ती परतफेड करायच्या मागे आहे.

पण आपण उपकार केलाच नाही तर परतफेडीची अपेक्षा तरी का धरावी ?

बरोबर आहे. तिचं आयुष्य बरबाद करण्याचा आपल्याला काहीच हक्क नाही. या बाबतीत काहीतरी करणं आवश्यक आहे. तिच्या भावाशी बोलावं का सविस्तर ? यस. तिचा भाऊ येईलच आज उद्या कडे त्याच्याशीच बोलून मार्ग काढू. असा विचार पक्का केल्यावर, मग त्याला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शलाका बरोबर शशांक आणि नलिनी पण आले. इतक्या लोकांना खोलीत गर्दी करायला परवानगी नसल्याने, सांदीपचे आई, बाबा आणि शलाका बाहेर कॉरिडॉर मधे थांबले. संदीपला शलाका बाहेर गेली हे बघून आनंदच झाला. त्यांनी लगेच विषयाला हात घातला. शशांक आणि नलिनीला सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि म्हणाला

आता तुम्हीच समजवा तुमच्या बहिणीला. ती जो हट्ट धरून बसली आहे तो कसा चुकीचा आहे हे तुम्हीच पटवून द्या. आणि मला हा अपराध करण्या पासून वाचवा.

शशांक म्हणाला

मला पटतेय तुमचं म्हणणं. मी प्रयत्न करतो. तिला...

पण त्याला पुढे बोलू न देता नलिनीनेच बोलायला सुरवात केली.

अहो, काहीतरीच काय बोलता आहात. संदीप भाऊजी तुम्ही हा विचार करूच नका. अहो तुम्ही जी शलाकाचं सौन्दर्य आणि तुमचा कुरूप झालेला चेहरा यांची जी सांगड घालता आहात तीच चुकीची आहे. अहो तुमच्या चेहऱ्यावर ज्या खुणा असणार आहेत त्या वाघा बरोबर ज्या हिमतीने तुम्ही लढा दिलात त्याच्या आहेत. त्याचा शलाकेलाच काय, कोणत्याही स्त्री ला अभिमान वाटेल अशाच आहेत. अहो सौन्दर्य जस स्त्रीला शोभून दिसतं तसंच शौर्य, आणि कर्तबगार पणा हा पुरुष माणसांनाच शोभून दिसतो. मर्दानगी म्हणतात त्याला. पुरूषार्थ म्हणतात. कुठल्याही स्त्रीला आपला नवरा असा आहे याचा अभिमानच वाटेल. तेच पुरुषी सौन्दर्य आहे आणि तसंच ते  शलाकाला वाटते आहे. स्त्री आणि पुरुष दोघांचाही point of view म्हणजे दृष्टिकोण वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जी भीती वाटते आहे की काही वर्षानंतर शलाकाला पश्चात्ताप होईल, तर तसं काहीही होणार नाहीये. तुम्ही निर्धास्त रहा.

शलाका जरी कॉरिडॉर मध्ये होती तरी तिचे कान हे लोकं काय बोलतात या कडेच होते. ती आतमधे आली. नलिनीला मिठी मारली आणि म्हणाली

वहिनी किती नेमक्या शब्दांत तू माझ्या मनातलं बोललीस ग. आणि मग संदीप कडे वळून कमरेवर हात ठेवून म्हणाली

काय म्हणण आहे तुमचं आता. ?

सगळे तिच्या आविर्भावा कडे बघतच राहिले. लग्न होऊन वर्ष दोन वर्ष झाल्यावर बायको जशी नवऱ्याशी बोलेल तसा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. कोणाला काही मत प्रदर्शन करण्याचा काहीच चान्स नव्हता. सगळं काही फायनल झालं होतं.

समाप्त

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all