फुलपाखरु भाग ४ (अंतिम)
मागील भागाचा सारांश: सुषमाने रुचिरा व यशमध्ये नेमकं काय नातं होतं? हे हळुवारपणे रुचिराकडून समजावून घेतले. सुषमाने फुलपाखरुचे उदाहरण देऊन रुचिराला आयुष्याच्या या फेजबद्दल समजावून सांगितले.
आता बघूया पुढे…..
रुचिराला सुषमाचे बोलणे समजले होते, पण चेहऱ्यावरुन तरी ती अजूनही नाराज वाटत होती. रुचिराला सुषमाने सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणायला थोडा वेळ लागणार होता. सुषमाने रुचिराला वेळ देण्याचे ठरवले होते.
सुषमा रुचिरासोबत पुन्हा कधीच त्या विषयावर बोलली नाही. रुचिराच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी स्माईल यावी, हीच सुषमाची इच्छा होती. रुचिराच्या अफेअर व ब्रेकअपबद्दल सुषमाने घरात कोणालाच सांगितले नव्हते.
एके दिवशी सुषमा नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आली. आपल्या रुममध्ये ती फ्रेश होण्यासाठी गेली, तर तिच्या नजरेस बेडवर एक गुलाबाचे फुल आणि हॅन्डमेड ग्रीटिंग कार्ड ठेवलेले होते. सुषमाला ग्रीटिंग कार्ड बघून आश्चर्य वाटले. तिने ग्रीटिंग कार्ड हातात घेऊन वाचायला सुरुवात केली,
"तू जगातील बेस्ट आई आहेस. तू माझी पहिली बेस्ट फ्रेंड आहेस. इथून पुढे मी तुझ्यापासून काहीच म्हणजे काहीच लपवणार नाही. सॉरी अँड थँक् यू."
सुषमा दरवाजाकडे बघून म्हणाली,
"रुचिरा लपून बघू नकोस. आता ये."
रुचिराने आतमध्ये येऊन सुषमाला मिठी मारली व ती म्हणाली,
"आई तुला कसं कळलं की, मी दाराच्या मागे लपून तुला बघत आहे म्हणून."
"बाळा मी तुझी आई आहे आणि आईला सगळं कळतं. बरं आज हे ग्रीटिंग कशासाठी?" सुषमाने विचारले.
रुचिरा म्हणाली,
"आई मी त्या दिवशी शाळेत गेले आणि श्रद्धा, श्वेता व समीरला सॉरी म्हणाले. त्या तिघांनी खोटं खोटं रुसण्याचं नाटक केलं, पण नंतर ते तिघेही माझ्यासोबत नॉर्मल बोलू लागले होते. आता आम्ही चौघेजण पहिल्यासारखे फ्रेंड्स झालो. यश रस्त्याने दिसला तरी मी दुसऱ्या साईडने निघून जात होते. मी यशकडे मुद्दाम बघतचं नव्हते. मी त्याला इग्नोर करत आहे, हे त्याच्या लक्षात आले होते.
आज मी श्रद्धासोबत शाळेतून निघतच होते, तेव्हा यश माझ्याजवळ येऊन म्हणाला,
"रुचिरा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. जरा बाजूला येतेस का?"
"तुला जे बोलायचं असेल ते इथेच बोल." असं मी स्पष्टपणे सांगून टाकले.
मग तो म्हणाला,
"रुचिरा आय एम सॉरी. मी तुझ्यासोबत फ्रेंडशीप तोडायला नको होती. माझं चुकलं. आपण दोघे पुन्हा फ्रेंड्स होऊयात. मला अंजलीने तुझ्याविरोधात भडकवले होते."
आई तो हात जोडून माझी माफी मागत होता. मी त्याच्याकडे बघून मिश्किल हसले व म्हणाले,
"यश मला फुलपाखरु बनून सगळ्या फुलांमधून मध गोळा करायचे आहे. भुंग्याप्रमाणे एकाच फुलात अडकून तेच माझे विश्व मानायचे नाहीये. फुलपाखराप्रमाणे मी स्वच्छंदी आयुष्य जगायचे आहे. माझे आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगायचे आहे. मी कोणाशी बोलेल, नाही बोलणार हे मला ठरवायचं आहे."
मी एवढं बोलून तेथून निघून गेले. आई मी काय बोलले? हे त्याला कळलेच नव्हते, असं त्याच्या चेहऱ्यावरुन तरी वाटत होतं. आई मला खूप बरं वाटलं. इतके दिवस मनात साचलेलं बोलल्यामुळे खूप छान वाटलं."
सुषमा रुचिराच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली,
"माझ्या फुलपाखरा तुझे चेहऱ्यावर जे हसू आत्ता आहे, हे कायम असंच असूदेत आणि आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत हे कायम लक्षात ठेव."
आपल्या मुलीला बॉयफ्रेंड आहे, हे कळल्यावर सुषमा जर चिडली,रागावली असती, तर रुचिरा एवढ्या सहजासहजी या सगळ्यातून बाहेर पडली नसती. सुषमाने तिला व्यवस्थितपणे समजावून सांगितल्याने रुचिराचा आपल्या आईवरील विश्वास अधिक दृढ झाला.
आजच्या काळात यंग जनरेशनमध्ये गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे एखाद्या ट्रेंडप्रमाणे सुरु झाले आहेत. आधीच्या जनरेशनला या गोष्टी पटत जरी नसल्या तरी हे आपण थांबवू शकत नाही. आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या, तर ते सगळं काही आपल्याशी बोलू शकतील. जेणेकरुन आपण आपल्या मुलांना संकटांपासून दूर ठेवू शकू.
सुषमा जशी संयमाने तिच्या मुलीसोबत वागली, अगदी तसंच सगळ्या आयांनी आपल्या मुलीसोबत वागायला, बोलायला पाहिजे.
तुम्हाला माझी ही छोटीशी कथा कशी वाटली? हे कमेंट करुन नक्की कळवा.
समाप्त.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा