फुलपाखरु भाग ३
मागील भागाचा सारांश: रुचिराचे ब्रेकअप झाल्यामुळे तिची चिडचिड सुरु होती, हे सुषमाला समजले होते.
आता बघूया पुढे….
"यश तुझा बॉयफ्रेंड आहे, याबद्दल तू काहीच बोलली नाहीस. मला श्वेता, समीर आणि श्रद्धा हे तिघेजण माहीत आहेत." सुषमाने विचारले.
रुचिरा म्हणाली,
"अग आई यश दुसऱ्या डिव्हिजन मधील आहे. यशची आणि माझी ओळख जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या वेळी झाली होती. यश हँडसम आणि हुशार आहे. यशला भेटल्यावर कोणी त्याच्या प्रेमात पडेल असा तो आहे. आमच्यात बोलणं सुरु झाल्यावर एके दिवशी त्याने मला प्रपोज केलं. मला यश आवडत होताच तर मीही त्याला लगेच होकार दिला. मी त्याच्याबद्दल तुला सांगणार होतेच, पण यश म्हणाला की, "आईला सांगू नकोस. आईला आपली मैत्री आवडणार नाही, ती आपली मैत्री तोडेल."
म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. आमचं सगळं व्यवस्थित सुरु होतं. मागच्या आठवड्यात अंजली त्याच्याकडे एका प्रोजेक्टसाठी मदत मागायला आली होती. प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांच्या गप्पा होत होत्या. कालपासून तो मला इग्नोर करत होता, म्हणून आज मी त्याला विचारले. यशने मला सरळ सांगितलं की,
"मला तू अजिबात आवडत नाही. तू दिसायला चांगली नाहीयेस. तुझ्यापेक्षा अंजली खूप चांगली आहे." तो अजून खूप काही बोलला.
आई जो मुलगा इतक्या दिवस माझं गुणगान गात होता. अचानक त्याच्यासाठी मी नावडती झाले. आई आता मी शाळेत कशी जाऊ? सगळ्यांना आमच्या ब्रेकअपबद्दल समजले असेल. आता मला बॉयफ्रेंड नाही, म्हणून सगळेजण माझ्यावर हसतील."
सुषमाला कळून चुकले होते की, हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाहीये. रुचिराला व्यवस्थितरित्या समजावून सांगावे लागेल. आपल्या मुलीला या वयात बॉयफ्रेंड होता, हे ऐकून सुषमाला खरंतर खूप टेन्शन आले होते आणि रागही आला होता. पण ही वेळ चिडून बोलण्याची नव्हती, तर शांतपणे बोलण्याची होती.
"मला एक सांगा बाळा, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणजे नेमकं काय असतं? आमच्या वेळी असं काही नव्हतं, म्हणून विचारतेय." सुषमाने विचारले.
रुचिरा म्हणाली,
"अग आई हे बघ श्रद्धा, समीर व श्वेता हे माझे फक्त फ्रेंड्स आहेत. यश माझा बॉयफ्रेंड होता, म्हणजे शाळेच्या गेटवर आम्ही एकमेकांची वाट बघायचो. एकमेकांना गुड मॉर्निंग विश करुन आपापल्या वर्गात जाऊन बसायचो. जेवणाच्या सुट्टीत गप्पा मारत डबा खायचो. शाळा सुटली की, जरावेळ गप्पा मारुन घरी निघून यायचो. घरी आल्यावर जर अभ्यासात मला काही अडचण आली, तर मी त्याला फोन करुन त्याबद्दल विचारायचे. कधी कधी तोही मला फोन करायचा. मागे एक क्राफ्टचा प्रोजेक्ट होता, त्यात त्याने माझी खूप हेल्प केली होती. आई हल्ली जवळपास सर्व मुलींना बॉयफ्रेंड असतात. बॉयफ्रेंड म्हणजे स्पेशल फ्रेंड."
रुचिराच्या तोंडून हे सर्व ऐकल्यावर सुषमाने सुटकेचा श्वास घेतला. आपल्या मुलीने अजून काही चुकीचं केलं नाही, याचं तिला बरं वाटलं. सुषमा थोडा विचार करुन म्हणाली,
"रुचिरा तुला फुलपाखरु आवडते ना. तर आता मी तुला फुलपाखराचे उदाहरण देऊन समजावते.
फुलपाखरु सर्व फुलांमधून मध गोळा करते आणि भुंगा मात्र कमळात म्हणजे एकाच फुलात अडकून राहतो,त्यामुळे भुंग्याला इतर फुलांचा विसर पडतो. तुझ्या वयातील मुलं म्हणजे फुलपाखरु, तुमचे मित्र मैत्रिणी म्हणजे फुलं. मध म्हणजे मित्र मैत्रिणींमधील चांगल्या गोष्टी. तुमचं हे वय तुमच्या मित्र मैत्रिणींकडून मध गोळा करण्याचे असते. तुम्ही मुलं मात्र भुंग्याप्रमाणे एकाच फुलात म्हणजे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मध्ये अडकून राहतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या चांगल्या मित्र मैत्रिणींचा विसर पडतो. आता तुला ठरवायचं आहे, तुला भुंगा बनायचं आहे की फुलपाखरु." सुषमाने रुचिराला पटेल अशा भाषेत सांगितले.
रुचिरा म्हणाली,
"आई मी यशच्या नादात माझ्या मित्र मैत्रिणींना दुखावले आहे. यशला ते तिघेजण आवडत नव्हते, म्हणून मीही त्यांच्यासोबत गेले काही दिवस बोललेचं नाहीये. आता मी काय करु?"
"तुझे फ्रेंड्स आहेत, त्यांचा राग कसा घालवायचा? हे तुला चांगलंच माहीत असेल." सुषमाने उत्तर दिले.
रुचिराला सुषमाचे बोलणे पटले होते, पण ती त्याची अंमलबजावणी करेल का? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा