Login

फुलपाखरु भाग २

Story Of A Girl

फुलपाखरु भाग २


मागील भागाचा सारांश: शाळेतून असल्यावर रुचिरा घरातील सर्वांवर चिडत होती, त्यानंतर रुममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेतले होते, ती बाहेर यायला तयार होत नव्हती.


आता बघूया पुढे…


रुचिराने स्वतःला रुममध्ये बंद करुन घेतल्याचे समजल्यावर सुषमाला खूप टेन्शन आले होते.


"शीतल घरी जरा प्रॉब्लेम झाला आहे. मला निघावं लागेल." सुषमाने तिच्या कलीग शीतलला सांगितले.


"ऋतुज कुठे धडपडला का? सासू सासऱ्यांची तब्येत बरी आहे ना?" शीतलने काळजीने विचारले.


सुषमा म्हणाली,

"यातील काही झालं नाहीये. रुचिराने शाळेतून आल्यापासून रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले आहे. रुचिरा कोणाचंच ऐकत नाहीये."


"ह्या मुली वयात आल्या की, असंच विचित्र वागतात. माझ्या पुतणीने रागाच्या भरात हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला होता. तिचे वडील वेळेत तिच्यापर्यंत गेले, म्हणून पुढील संकट टळले. शुल्लक गोष्टीवरुन तिची आई तिला ओरडली होती. सुषमा रुचिरासोबत शांतपणे बोल. घरी गेल्यावर रागावू नकोस. तू तिच्याशी शांततेत बोलली, तरचं ती सगळं खरं सांगेल." शीतलने सांगितले.


सुषमाने मान हलवून होकार दर्शवला आणि ती आपली पर्स घेऊन ऑफिस मधून बाहेर पडली. सुषमाला घरी पोहोचायला अजून एक तास तरी लागणार होता. ट्रॅफिक असेल तर अजून उशीर होणार होता. सुषमा बसस्टॉपवर जाऊन बसची वाट बघत होती. बस लवकर यावी म्हणून देवाचा धावा करत होती. पुढील दहा मिनिटांनी बस आली. सुषमा घाईने बसमध्ये चढली. खिडकीच्या कडेला जागा मिळाल्यावर सुषमाचे विचारचक्र सुरु झाले.


सुषमाचा नवरा अविनाश आर्मीमध्ये होता. सुषमाला रुचिरा व ऋतुज ही दोन मुले होती. रुचिरा नववीत, तर ऋतुज चौथीत होता. ऋतुज पहिलीत असताना अविनाश शहीद झाला. सुषमा त्यावेळी खूप खचली होती, पण मुलांकडे आणि सासू सासऱ्यांकडे बघून तिला उभे रहावे लागले होते. आपल्या मुलांना उच्च शिक्षित करायचे असेल, तर तिला घराबाहेर पडणे आवश्यक होते. रुचिराच्या सासू सासऱ्यांनी मुलांना सांभाळून घेतल्यामुळे तिला घराबाहेर पडून नोकरी करता येत होती. सुषमा सकाळी लवकर घरातून बाहेर पडायची तर संध्याकाळी सातच्या आसपास घरी परतायची. घर ते ऑफिस जवळपास दीड तासांचे अंतर होते. दररोज सुषमा बसने ये-जा करायची.


बघायला गेलं तर रुचिरा व ऋतूज हे दोघेही शहाणी मुलं होती. सुषमाला ते दोघेही कधीच त्रास देत नव्हते. आज रुचिराचे वर्तन समजल्यावर म्हणूनच सुषमाला तिची काळजी वाटू लागली होती.


सुषमा घरात गेल्याबरोबर तिची सासूबाई म्हणाली,

"सुषमा रुचिराने अजून दार उघडले नाहीये. पोरीनी काही खाल्ले सुद्धा नाहीये. मला तर तिची खूप काळजी वाटत आहे."


सुषमा म्हणाली,

"आई मी तिच्यासोबत बोलते. तुम्ही कोणीच तिच्या रुममध्ये येऊ नका."


सुषमा रुचिराच्या रुमच्या दरवाजा जवळ जाऊन म्हणाली,

"रुचिरा बाळा दार उघड बरं. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? आपण दोघी बेस्ट फ्रेंड आहोत ना, मग चल पटकन दार उघड."


पुढील पाच मिनिटाने रुचिराने दरवाजा उघडला. सुषमा रुममध्ये गेली, तर बॅग खाली फेकून दिलेली होती. उश्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. बेडशीट आणि चादर गोळा करुन एका कोपऱ्यात फेकलेले होते. वह्या पुस्तके सगळीकडे पसरलेले होते. सुषमा पसाऱ्याकडे बघून म्हणाली,


"तुला किती राग आला आहे, हे मला रुमची दुर्दशा बघून समजले आहेच. मला एक सांग बाळा, तू एवढी कशाने दुखावली गेली आहेस?"


सुषमाने रुचिराच्या डोक्यावरुन हात फिरवल्यावर ती सुषमाच्या कुशीत घुसून रडायला लागली. सुषमाने तिला शांत केले. डोळ्यातील पाणी बाहेर पडल्यामुळे रुचिराला जरा हलके वाटू लागले होते. सुषमा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असल्याने ती म्हणाली,


"आई त्याने मला झिडकारलं. त्याला मी आवडत नाही. तो मला खूप वाईट बोलला. आई त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलंय. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, म्हणून त्याने माझ्यासोबत ब्रेकअप केलं."


"तो म्हणजे कोण?" सुषमाने विचारले.


"यश माझा बॉयफ्रेंड." रुचिराने उत्तर दिले.


रुचिराचे ब्रेकअप झाल्यामुळे ती दुखावली गेली होती. रुचिराच्या त्रागा करण्यामागील खरे कारण तिचे ब्रेकअप हे होते. आता यावर सुषमाची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all