फुलपाखरु भाग १

Story Of A Girl
फुलपाखरु भाग १

रुचिराने दारावरची बेल वाजवली. रुचिरा सतत बेल वाजवत होती. तीन ते चार बेल वाजवल्यावर तिच्या आजीने दार उघडले.

"अग रुचिरा, माझ्या पायाला चाकं बसवलेली आहेत का? हातातील काम बाजूला ठेऊन दरवाजा उघडायला यायचे म्हणजे वेळ लागतोच ना. इतक्या वेळा कोणी बेल वाजवतं का?" आजीने चिडून विचारले.

रुचिरा आजीकडे रागाचा कटाक्ष टाकून घरात गेली. रुचिराच्या चेहऱ्यावरुन तिचं काहीतरी बिनसलं असल्याचं आजीला जाणवलं होतं. रुचिरा सोप्यावर जाऊन बसली. 

"दीदी मी तुझी केव्हापासून वाट बघत होतो. मला एवढ्या चित्राला कलर करुन दे ना. उद्या सर चित्रकलेची वही चेक करणार आहेत." ऋतुज रुचिराच्या हातात वही देत म्हणाला.

रुचिराने रागाने ती वही घेऊन फेकून दिली व ती म्हणाली,
"मी आत्ताच शाळेतून आली आहे, हे तुला कळत कसं नाही? मला माझा अभ्यास खूप असतो. मी किती दिवस तुझ्या चित्रांना कलर देऊ. तुला तुझं करता येत नाही का?"

रुचिरा मोठ्याने आणि चिडून बोलल्याने ऋतुजच्या डोळयात पाणी आले होते. ऋतुजने वही उचलली व तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. 

"रुचिरा एवढं चिडायला काय झालंय? ऋतुज लहान आहे ना. त्याने तुझी थोडी मदत तर मागितली होती. एरवी तू काहीच तक्रार न करता त्याच्या चित्रांना कलर करते. ऋतुज हिरमुसून त्याच्या रुममध्ये निघून गेला. त्याला जाऊन समजावं." आजीने सांगितले.

यावर रुचिरा म्हणाली,
"ऋतुजचं नाराज होणे तुम्हाला लगेच दिसतं. मी नाराज झाले, तर कोणालाही फरक पडत नाही. मी त्याला जाऊन समजावणार नाहीये."

रुचिरा तणक्यात आपल्या रुममध्ये निघून गेली. रुमचा दरवाजा इतक्या जोरात ढकलला की, रुचिराच्या डोक्यात किती राग असेल? याचा अंदाज येत होता.

इतक्या वेळ बघ्याची भूमिका घेऊन बसलेले रुचिराचे आजोबा म्हणाले,
"रुचिराचा राग थोड्यावेळ शांत होऊदेत. लगेच तिला जेवण करण्यासाठी बोलवायला जाऊ नकोस. शाळेत कोणासोबत तरी तिचे भांडण झाले असेल, म्हणून वैतागलेली असेल. ऋतुजला जेवण करण्यासाठी बोलावून आण. जेवण झालं की, मी ऋतुजला चित्राला रंग कसा द्यायचा? ते शिकवतो."

यावर रुचिराची आजी म्हणाली,
"अहो ही पोरगी आत्ताशी नववीत आहे. आता एवढा राग असेल, तर पुढे जाऊन कसं होईल? मुलीच्या जातीला एवढा राग बरा नव्हे. बिचारी सुषमा ह्यांच्यासाठी बाहेर मरमर करत असते. आता संध्याकाळी घरी येऊन हे चित्र दिसल्यावर तिचा जीव काय म्हणेल?"

"सुषमा आल्यावर तिचं ती बघून घेईल. तू जास्त विचार करत बसू नकोस. तू ऋतुजला बोलावून आण." आजोबांनी सांगितले.

जेवण करुन आजोबा झोपल्यावर आजी रुचिराला जेवण करण्यासाठी बोलवायला गेली, पण रुचिराने जेवण करायला नकार दिला. 

"दीदी मी आता कधीच तुझ्याकडे चित्र रंगवून घेण्याचा हट्ट करणार नाही, पण तू जेवण करुन घे. माझा राग जेवणावर काढू नकोस." ऋतुज म्हणाला.

रुचिरा चिडून म्हणाली,
"मी एकदा सांगितलंय ना की, मला जेवण करायचं नाहीये. मला शांततेत तुम्ही लोकं बसू का देत नाहीयेत. प्लिज माझ्यासोबत कोणीही बोलायला येऊ नका." 

रुचिरा चिडल्याने आजी व ऋतुज तेथून निघून गेले. रुचिराला नेमकं काय झालंय? हे काही तिच्या आजीला कळत नव्हते. आजीने रुचिराला विचारुन सुद्धा तिने काहीच सांगितले नव्हते. 

शाळेतून येऊन तीन ते चार तास झाले होते, तरी रुचिरा रुमच्या बाहेर आली नव्हती. आजीला तिची जास्त काळजी वाटू लागली होती. शेवटी न राहवून आजीने सुषमाला फोन करुन रुचिराने स्वतःला रुममध्ये बंद करुन घेतल्याची बातमी सुषमाला सांगितली.

रुचिराने स्वतःला रुममध्ये का बंद करुन घेतले होते? ते बघूया पुढील भागात...
क्रमशः
©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all