फोटोमागच्या कथा (अलक)

फोटोच्या मागची थरारक कथा.. अलक रूपात

बारा वर्षांपूर्वी यूरोप टूर करून आलेल्या वैष्णवीने आज टूरचे फोटो पुन्हा एकदा बघायला घेतले.

पॅरिस, स्वित्झर्लंड अन् ऍमस्टरडॅमचे फोटो अन् व्हिडिओ बघून ती चकित झाली. "इतक्या सुंदर ठिकाणी मी जाऊन आले?" तिला खरंच वाटेना!! "हो! ही मीच आहे!!" तिनं पुन्हा एकदा खात्री करून घेतली.

अन् मग तिच्या लक्षात आलं.. "फोटो, सेल्फी अन् व्हिडिओ काढण्याच्या नादात तिचं यूरोप \"बघणं\" राहूनच गेलं!

*****

अदितीच्या नऊ वर्षांच्या मुलीने दिवाणातून जुने अल्बम बाहेर काढले अन् ती एकेक फोटो निरखून बघू लागली.

अदिती देखील अल्बम मध्ये डोकावली.. तर तिचा अन् अभयचा एक हसरा फोटो.. त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी काढलेला!! अदितीने किती विश्वासाने अभयच्या खांद्यावर मान टेकवली होती!!

गोष्टी कशा अन् कुठे बिनसत गेल्या अन् घटस्फोटाची पाळी आली.. हेच अदितीला आता आठवेनासं झालं.

*****

केतकीच्या लग्नाच्या रूखवतावर तिचा ती चार वर्षांची असतानाचा सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह काढलेला फोटो होता.

ही अभिनेत्री त्या काळची प्रथितयश अन् लोकप्रिय होती. तिनं गोंडस केतकीला अगदी जवळ घेऊन तिच्या गळ्यात हात टाकून पापी घेताना पोझ दिलेली!!

पण आज तोच फोटो तिच्या भावंडांच्या अन् सासरच्या मंडळींच्या थट्टेचं कारण झाला..

कारण त्या फोटोत रूसून अन् फुरंगटून.. केसांच्या झिपऱ्या सोडून बसलेली रडकी केतकी होती!!

केतकीला आजही पश्र्चाताप होतोय.. एवढा सुवर्णक्षण हसरेपणाने साजरा करता आला असता तर ???

*****