फोन पे, गुगल पे आणि आजीचा बटवा..

फोन पे मुळे झालेले फजिती
*५)सहज सुचलं म्हणून.....*

*?फोन पे,गुगल पे आणि आजीचा बटवा?*


आजकाल फोन पे, गुगल पे,ऑनलाईन ट्रॅन्जेक्शन हे शब्द अगदी परवलीचे झालेले आहेत. ऑनलाईन पेमेंट द्वारे सगळे काही व्यवहार होत आहेत. असे ऑनलाईन पेमेंट करणारी मंडळी पाहिली कि, नकळत मला थोडा *कॉम्प्लेक्स* येत होता. आणि उगीचच आपण किती मागास आहोत हा विचार मनाला स्पर्शून जात असे.त्यात कोरोनाने तर ऑनलाईन पेमेंट करणे *आरोग्यासाठी* किती फायदेशीर आहे ते पुराव्यानिशी दाखवून दिले.

मग मी ही मनाशी ठरवले कि आपणही आता मागे राहून चालणार नाही. काळाची पाऊले ओळखून त्यासोबत चालायला हवं..

झालं..
मी घरात एक दिवस फर्मान सोडलं ," मलाही ऑनलाइन पेमेंट अँप हवं आहे. मी काही या *हाय स्पीड* जमान्यात मागे राहायची नाही.

स्त्री हट्ट आणि बाल हट्ट ..बोलायची काही सोयच नाही. यजमानांनी माझ्या *स्मार्ट फोन* वर फोन पे नावाचे अँप्लिकेशन घेऊन दिले.

मला तर एकदम *आभाळाला हात टेकल्यासारखे झाले.*
"मेरी मुठ्ठी में हैं आज सारा जहाँ" असं वाटून गेलं. चिल्लर, नोटा, बाहेर जाताना पर्स बघणं म्हणजे अगदी *ओल्ड स्टाईल* वाटायला लागले. आता आपणही हाय स्पीड जमान्याचा हिस्सा आहोत या विचारानेच अभिमानाने उर भरून आला.

मग मी हि जागेपणीच सर्वाना ऑनलाईन पेमेंट केल्याचे स्वप्न पाहू लागले.

पण माझा हा आनंद त्या अँप लाच बघवला नाही. आणि त्याने असहकार पुकारला! ऑनलाईन बँकिंग असल्याशिवाय माझ्या *स्मार्टफोन* सोबत काम करण्यास त्याने नकार दिला. मी बिचारी मूग गिळून गप्प बसले. ऑनलाईन बँकिंग मधील संभाव्य धोक्यांची जाणीव नवरोबांनी करून दिल्यावर मी सर्वांना या अँप बद्दल तोटे सांगू लागले. काहीही झालं तरी *कोल्ह्याला द्राक्ष आंबट!!*

मध्यंतरी ऑनलाईन च भूत माझ्या डोक्यातून गेले होते. सर्व काही सुरळीत चालू होते. आणि अचानक एक दिवस मैत्रिणीसोबत खरेदी करताना या *ऑनलाईन पेमेंट* ने परत एकदा उचल खाल्ली. *"अगं कॅश काय देतेस?? बघ आता सुट्या पैशांसाठी आपला किती वेळ वाया गेला..शिका जरा काकूबाई आतातरी..."*

मैत्रिणीने माझी खिल्लीच उडवली. त्या तिरिमिरीतच घरी आले. तावातावाने प्रणच घेतला , *"जोपर्यंत फोन पे चालू होणार नाही, तोपर्यंत मी घरात स्वयंपाक करणार नाही..*

माझ्या या *भीष्मप्रतिज्ञेमुळे* मुलांची मज्जा तर नवरोबाची परेशानी झाली. रात्री कसेतरी पार्सल वर जेवण मागवून झाले. आणि सकाळ उजडताच नवरोबांनी बँकेत जाऊन माझ्या खात्यावर *ऑनलाईन बँकिंग सुविधा* सुरु केली! मग काय अवघ्या काही मिनिटांतच फोन पे सुरु झाले.
*आज मैं ऊपर, आसमान नीचे* अशी काहीशी माझी अवस्था झाली. नवरोबांनी मात्र \"खात्यावरील रकमेचे आता काही खरे नाही\" या विचाराने कपाळावर हात मारून घेतला.
आता मात्र भाजी, दूध ,किराणा सबकुछ *ऑनलाईन पे* . माझ्या या अँप ची आगगाडी एकदम जोरात धावायला लागली आणि मी पर्समध्ये पैसे किती आहेत किंवा ते आहेत का हे विसरायला लागले.

काल मात्र वेगळेच घडले. मुलाच्या शाळेत एक परीक्षा फीस भरण्याच्या निमित्ताने मला जावे लागले. नव्या सवयीप्रमाणे मी काही पर्स बघीतली नाही. तशी गरजही राहिली नव्हती न मला. *अपने पास ऑनलाईन अँप है ना...* याचा मला जास्तच *गर्व* झाला होता.

पण शाळेत गेल्या गेल्याच सरांनी *गुगली* टाकली कि, फीस कॅशच भरावी लागेल , *गुगल पे,फोन पे* चालणार नाही.... आणि एका सेकंदात मी धाडकन जमिनीवर आले.

प्रवेशासाठी शेवटचा अर्धा तास, फीस भरण्यासाठी माझ्याकडे *कॅश* नाही. कसेतरी सरांना विनंती केली कि, "मी तुम्हाला ऑनलाइन पे करते बदल्यात तुम्ही कॅश द्या, म्हणजे मुलाची फीस भरता येईन." पण सरांकडे *गुगल पे* तर माझ्याकडे *फोन पे* दैवानेच आज माझी फजिती करण्याचा चंग बांधला होता बहुतेक.

*हार मानेन ती मी कसली??* मी हि शक्कल लढवली . नवरोबाला सांगितले कि सरांना रक्कम *गुगल पे* करा. पण छे!! नशीबच आज माझी मज्जा बघत होते. शाळेत नाव नेटवर्क येत नव्हते. ही खिडकी, दार, मोकळे मैदान सगळीकडे आमच्या *स्मार्टफोन ची* वरात काढली पण काय आजचा दिवसच माझी मजा बघायला आला होता ना......

वेळ संपायला फक्त 15 मिनीटे राहिली आणि मी हतबल झाले. मनातून हार मानली आज माझ्यामुळे माझ्या मुलाचा प्रवेश होऊ शकणार नव्हता.
पण देवाला माझी दया आली. इतक्या वेळेपासून माझी फजिती बघणाऱ्या नऊवारी नेसलेल्या आज्जी माझ्याजवळ आल्या नि म्हणाल्या ,"पोरी, होईल मुलाचा प्रवेश, तू नको काळजी करू," असे म्हणून *आजीबाईंनी कमरेचा बटवा काढला* आणि त्यातील 500 रु ची नोट माझ्या हातात दिली. धावत जाऊन मी मुलाची फीस भरली खरी पण मला मात्र माझ्या *स्मार्टफोन आणि फोन पे* च्या जागी *आज्जीबाईचा बटवा आणि त्यातील नोटा* दिसू लागल्या.......


*गितांजली सचिन*