फरपट

The story about a farmer who had committed suicide because of that people who wants to grab his agricultural land forcefully. But at the end we knew that there was no suicide. That was a bloody murder and it was happening cause of our social justice

       घामाघूम झालेला शिरपती मोठ्याने धापा टाकीत घरात शिरला अन त्याने त्याचं घाईगडबडीत दाराला आतून कडी घातली. मोठंमोठाले श्वास घेत तो दारापासून बाजूला सरला आणि कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहत मागे जाऊन भिंतीला टेकला. दरवाजा एवढ्या जोरात कुणी आपटला म्हणून वैतागलेली बायजा बाहेर आली अन तेवढ्यात तिची नजर शिरपतीकडे गेली. 
          आपल्या नवऱ्याला घाबरून धापा टाकीत भिंतीला टेकलेलं बघून तिच्या अंगातलं अवसानचं गळालं. ती पटकन पुढं सरसावली अन आपल्या धन्याचा हात हातात धरून त्याला विचारू लागली, “ आवं धनी... काय...काय झालं ?...
आं...आवं बोला की कायतरी...असं का बसलाय...बोला कायतरी...आवं सांगा की ? ”
         आपल्या नवऱ्याची अशी अवस्था बघून तिला देखील मोठा धक्का बसला होता पण ती स्वतःला सावरुन घेत शिरपतीला यातून सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तेवढ्यात शिरपती भानावर आला अन त्यानं रडत रडत बायजेच्या कुशीत त्याचं डोकं खुपसलं अन पुना मोठ्याने रडू लागला. बायजेला तर काय करावं काहीचं उमजनां. ती मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. नकळत तिच्याही डोळ्यांत पाणी तरळलं. शिरपती याआधी कधीचं असा विचित्र वागला नव्हता. मग बायजाने त्याला धीर दिला अन काय झालंय ते विचारू लागली.
            मग शिरपती थोडा शांत झाला अन बायजाला काय घडलं ते सांगू लागला. तो म्हणाला, “ संपलं गं सगळं माझे बाय...आता संपलं सगळं."
           " आवं पर असं झालं तरी काय ? ” बायजा म्हणाली. 
मग शिरपती तिला सगळं रामायण सांगू लागला,
           “अगं आमदार साहेबांचा जावायं नवी कंपनी काढतुयं. त्यासाठी त्याला जमीन पायजे आपल्या गावात. म्हणून त्यानं सर्जेरावाला हाताला धरलंय. अन त्या समद्याचा डोळा आपल्या जमिनीवर हाय. कारण आपली जमीन एकतर रस्त्याच्या कडंला पडती आन वरनं त्यो रस्ता बी तालुक्याला जायाला सोपा हाय. त्यांच्या वाहनांस्नी यला जायाला बरं पडंल म्हणून त्यांच्या डोक्यात आपली जमीन बळकावायचा इचार चालू हाय. इचार कसला त्यांनी पक्का निर्णवचं केलाय तसा.”
             “त्यो सर्जेराव कसला राक्षस हाय माहिते ना तुला. त्यो आपली जमीन घेतल्या बगर आपल्याला या गावात नीट जगून दिलं का ? हे समदं मला कळलं म्हणून इचारायला म्या परवा गेलतो त्याच्या वाड्यावं तर मलाचं कायबाय सांगू लागला. गपगुमान ही जमीन आम्हांला दे न्हाईतर तुझा मुडदा पाडीन आन घिन ही जमीन असा दम बी भरला मला त्यानं.”
             “ म्हणूनशान हे समदं सांगायला म्या काल पोलिस स्टेशनात गेलतो. तर तिथला सायब बी त्या आमदाराचाचं कुत्रा निघाला. मला वरड वरड वरडला अन हाकलून दिलं तिथनं. आन म्या तिथून गेलो की लगोलग फोन करून त्येनं ही गोष्ट सर्जेरावाला सांगितली.” शिरपती आता हे सगळं बायजेला सांगत होता.
           “ मंग वो ? ” बायजा त्याला कुतूहलाने म्हणाली. मग शिरपती पुढे तिला सांगू लागला, 
           “मंग काय ? कालपास्नं त्या सर्जेरावाची कुतरी माझ्या मागावं हायती. काल काय म्या गावलो नाय त्यानला पर आज त्यांनी मला एकट्याला गाठलं आनं मला मारायचा प्रत्न केला. पण म्या कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटलो अन पळत पळत इथवर आलो. मला ताणत त्ये इथवर आले व्हते पर गावात समद्या लोकांसमोर काय करता येणार न्हाई म्हणून त्ये माघारी फिरले. निदान बायजे... आज तुझं कुकु काय जिवंत राह्यलं नसतं बघ."
          हे ऐकून बायजेच्या काळजात चर्र झालं. तिचं हातपाय तिच्या अंगाचा भाग नसल्यागतं तिला जाणवू लागलं. ती मटकन खाली बसली अन तिनं डोक्याला हात लावला. कारण सर्जेराव काय लायकीचा माणूस आहे हे तिला लग्न करून या गावात आल्याच्या दुसऱ्या दिवशीच कळलं होतं. जनावर हा शब्द पण अपुरा पडेल अशी सर्जेरावाची ख्याती होती गावात. अन आता त्याचं हैवानाची नजर आपल्या संसाराला लागली या विचाराने क्षणभर तिच्या काळजाचा ठोका चुकला.

         ‘आता काय करावं ?’ हा एवढा एकंच यक्षप्रश्न त्या दोघांना समोर दिसू लागला होता. कसेतरी दोन दिवस निघून गेले अन तिसऱ्या दिवशी सकाळी- सकाळीचं रामा गावात बातमी घेऊन आला की शिरपतीनं त्याच्या चावरातल्या वावरात वडाला फास लावून घेतला म्हणून. 
          झालं...शेवटी व्हायचं तेचं झालं. वैऱ्यानं डाव साधला होता. बरोबर दहा दिवसांनी आमदारांच्या जावयांनी थाटामाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिरपतीच्या जमिनीवर कंपनीच्या जागेचा नारळ वाढवला. सर्जेराव आमदारांच्या कृपेमुळे जिल्ह्याच्या “शेतकरी संघटनेचा” अध्यक्ष म्हणून निवडून आला. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी. इन्स्पेक्टर जाधव पंचनामा करून गेले अन कर्जापायीचं शिरपतीनं आत्महत्या केली असा जबाब गावातल्या लोकांकडून वदवून घेतला. आणि महत्वाचं म्हणजे उभ्या आयुष्यात शिरपतीने कधीचं कुणाकडून पाच पैशाचं कर्ज घेतलं नसताना ही.
         गावानं बी शिरपती कमीतला असल्यानं तीन दिवस सुतक पाळलं अन नंतर समदे लोक पारावर, चौकात, टपरीवर चहा बिडीसोबत निवांत गप्पा रंगवू लागले. दोन चार जाणती माणसं मात्र हळहळत होती अधूनमधून की शिरपतीच्या संसाराची पार फरपट झाली म्हणून. पण बायजा मात्र बिनधास्त हिंडत असते गावात. तिला कशाचीचं फिकीर नसते. कधी कधी सर्जेरावांच्या नावानं शिव्या पण देते. विचित्रचं हसते अधूनमधून. लहान लहान पोरांना चिडून दगडं मारते. गाववाले म्हणतात तिला वेड लागलंय म्हणून. पण खरं काय ते आता “देवालाचं” माहीत. न्याय नाहीतर नाही किमान तो तरी असावा जगात हल्ली ही एकमेव आशा असते तिला.
 
-----विशाल घाडगे ©™