परफेक्ट टाईम

नियतीने निशासाठी परफेक्ट टाईम साधला नव्हता.
आज रविवार असल्याने सिद्धांत बिछान्यावर लोळत पडलेला. तोच निशाचा फोन खणाणला. " हॅलो, सिद् ऐक ना ! आज मला माझी शाळेतली मैत्रीण आहे ना रश्मी तिच्याकडे दुपारी वरळीला जायचं आहे. तिचा वाढदिवस आहे ना. तिच्या आईने आम्हा मैत्रिणींना घरी बोलावलंय जेवायला . संध्याकाळी तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर साजरा करायचाय वाढदिवस. लग्नानंतर ती चेन्नईला जाते आहे. तिच्या नवऱ्याचा जॉब आहे तिथे. तिच्या आईच्या हातचं जेवण आम्हा सगळ्या मैत्रिणींना आवडायचं म्हणून आज तिच्या आईने आम्हाला बोलावलं. आणि तशीही मी वरळीत असणार आहे तर आपण भेटूया का संध्याकाळी मरीन ड्राईव्हला. तसंही आपल्याला साखरपुड्याचं ठरवायचंच आहे. कुठे करायचा, कपडे कुठले घ्यायचे सगळं काही ठरवायचंय. येशील ना बरोबर सहा वाजता ?"
     " अग किती तुझी बडबड. मॅडम तुम्ही सांगितलं आणि मी येणार नाही असं होईल का कधी ? बरं एक काम कर. बाईक नको काढू तुझी. कॅबने जा. तुला पिक अप आणि ड्रॉप करेन."
      " नको मला वाटेत मेधाला पिकअप करायचंय. त्यापेक्षा तूच ये कॅबने. मस्त बाईकवरून फिरू. आणि तुला तर माहिती आहे तसंही मला संध्याकाळी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत सूर्य मावळताना बघायला खूप आवडतं. मी परफेक्ट टाईमला पहिली तिथे पोहचेन नेहमीप्रमाणे." खळखळून हसत निशा बोलली.
      " ओके डिअर, भेटूया. बाईक नीट चालवं. मैत्रिणीकडे पोहचलीस की फोन कर आणि तिथून निघाल्यावर. "
      " हो रे बाबा. चल ठेवते फोन. तयारी करायची आहे."
      निशाने फोन ठेवला पण तिच्या बडबड्या स्वभावाचं हसू येऊन सिद्धांतचं मन भूतकाळात शिरलं. कॉलेजचे रमणीय दिवस होते ते. असंच एके दिवशी सिद्धांत आणि निशा वेगवेगळ्या गेटने बाईकवरून येत असताना सिद्धांतची बाईक निशाच्या बाईकला थडकली. तो निशाला बघून ब्रेक मारायचा विसरला. गोरीपान, देखणी, जवळजवळ 5 / 5 उंचीची, सोनेरी रंगाचे मोकळे सोडलेले लांबसडक वाऱ्यावर उडणारे केस, फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता तिच्या रुपात भर टाकत होता. कुठल्याच मुलीला त्याने इतकं लक्षपूर्वक कधीच पाहिलं नव्हतं. पाहताक्षणी प्रेमातंच पडला तिच्या.
      " ए ! काय रे ब्रेक नाही मारता आला तुला ? माझ्या गाडीला काय झालं तर बघ. तुझी खैर नाही." गाडी आणि हेल्मेट सावरत निशा बडबड करत होती. निशाच्या बडबडीने सिद्धांत भानावर आला.
       निशाची बाईक चेक करत सिद्धांत बोलला, " थँक् गॉड ! काही झालं नाही तुझ्या बाईकला. नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं."
       सिद्धांतच्या बोलण्याने निशाला हसू आलं. निशा सिद्धांतला निरखून बघू लागली. उंच, गव्हाळ रंगाचा, सभ्य वाटणारा. सिद्धांतने निशाला शेकहँड साठी आपला हात पुढे केला. " हाय, मी सिद्धांत चव्हाण. SYBSC ला आहे. आणि तू ?"
      " मी निशा देशमुख, FYBA ला आहे." असं सांगून निशाने तिची बाईक स्टार्ट केली आणि भुर्रकन गेली सुध्दा. तिची बाईक दिसेनाशी होईपर्यंत सिद्धांत बघतंच राहिला.
       कॉलेजमध्ये रोज निशा कुठे दिसते का पाहण्याचा जणू छंदच लागला सिद्धांतला. तो मित्रांच्या घोळक्यात तर असायचा पण भिरभिरत्या नजरेने निशाला शोधत असायचा. जवळपास पंधरा दिवसांनी त्याला कॅन्टीनमध्ये निशा दिसली. लाल रंगाचा डिझायनर गाऊन तिने घातलेला. अतिशय सुंदर दिसत होती ती. तिच्या समोर सुंदरसा केक होता. \" Happy Birthday Nisha \" मैत्रिणींच्या गलक्यात निशाने केक कापला. सगळ्या तिला विश करून गिफ्ट देत होत्या. \"ओह हिचा वाढदिवस आहे तर \" सिद्धांत मनाशी पुटपुटला. तिच्या टेबलजवळ जात त्याने निशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक हलकंस स्माईल देत तिने त्याला केक दिला.
        " एन्जॉय कर तुझी पार्टी." असं म्हणत निशाच्या कानाजवळ जाऊन पुटपुटला " उद्या भेटूया." आणि त्याचं visiting कार्ड तिच्या हातात सरकवलं.
         घरी पोहचल्यावर निशाने त्याचं कार्ड पाहिलं.     \"चव्हाण मसाले \"  म्हणजे हा प्रख्यात \" चव्हाण मसाले \" चा ओनर आहे तर. तिला खरं तर त्याचा खूप राग आलेला. हा समजतो काय स्वतःला ? मी का म्हणून ह्याला फोन करून भेटायला जाऊ ? निशाचा पुर्ण दिवस नातेवाईकांचे - मित्रमैत्रिणींचे फोन, संध्याकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यात गेला. एकुलती एक मुलगी असल्याने निशाचा वाढदिवस खूप छान साजरा होत असे. बारावीत उच्चश्रेणीत पास झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला बाईक घेऊन दिलेली. तिची बाईक म्हणजे तिचा जीव की प्राण होता. बाईकवर स्वार होऊन  फिरायला तिला खूप आवडत होते.
        रात्री झोपण्याच्या आधी तिला सिद्धांतने दिलेलं कार्ड आठवलं. त्याला फोन करायचा की नाही ह्या द्विधा मनःस्थितीत तिने त्याला फोन लावला. " हॅलो " निशाचा आवाज ऐकताक्षणी निशाला काही बोलू न देता सिद्धांतने बोलायला सुरुवात केली.  " हॅलो निशा, once again happy birthday. आणि खूप आभार तू मला फोन केल्याबद्दल. मी तुझ्या फोनची खूप वाट पाहत होतो. तू नक्कीच माझ्यावर रागवली असशील. कदाचित मी  माझं कार्ड दिलं हे तुला पटलं नसेल. पण काय करू ?  तुझ्या मैत्रिणींसमोर तुझा फोन नंबर कसा मागू ? तुझ्याशी कॉन्टॅक्ट साधण्यासाठी मला असं वागावं लागलं त्याबद्दल extremely sorry. Please मला माफ कर. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याशी मी मैत्री करू इच्छितो म्हणून उद्या भेटूया असं बोललो मी. उद्या संध्याकाळी सहा वाजता जमेल का शिवाजीपार्कला यायला. आलीस तर खूप बरं वाटेल मला. तुला यायचं नसेल तरी कुठलीही जबरदस्ती नाही."
       " Ok बघते." इतकंच तुटक बोलून निशाने फोन ठेऊन दिला. काय आगाऊ मुलगा आहे हा. एकदाच ओझरते भेटून हा माणूस मला भेटायला बोलावतो. त्याला उद्या भेटून चांगलंच खडसावते. चांगली मुलगी दिसली की लागतात शायनिंग मारायला. उद्या त्याला चांगलं फैलावर घेऊ असं मनाशी ठरवत निशा झोपी गेली. इथे सिद्धांत रात्रभर तळमळत होता. निशा उद्या येईल का नाही ह्याचाच मनाशी विचार करत होता.
      संध्याकाळी शिवाजीपार्कला जाण्यासाठी सिद्धांत छान तयार होत होता. Navy blue रंगाचं T shirt आणि jeans घालून दहा वेळा तरी आरशात पहात होता. त्याचा धाकटा भाऊ सलील त्याचं निरीक्षण करत होता. न राहवून शेवटी तो बोललाच  " दादा एकदम चिकना दिसतो आहेस पण एक सांग नक्की कुठे चालला आहेस रे ? इतकं आरशात बघताना मी तुला कधीच पाहिलं नाही."
       " कामासाठी जातो आहे रे. क्लाएंटला भेटायचंय."
       " क्लाएंट एखादी मुलगी आहे का ?" सलील मस्करीच्या सुरात बोलत होता.
       " गप रे, खूप आगाऊ झाला आहेस हल्ली." सलीलला गप्प तर केलं पण निशा येईल की नाही ही चिंता तर भेडसावत होती. शूज घालताना आई किचनमधून बाहेर आली. " अरे वाह सिद्धू ! एकदम छान दिसतोस."
        " आई, दहा वेळा आरशात बघितलं तर कोणीही छानच दिसतं ग. तो आरसा पण फुटला बघ दादामुळे." सलील सॉलिड फिरकी घेत होता.
        " थांब आता तू मारच खाणार माझ्या हातचा." खोटं खोटं रागावून सिद्धांतने सलीलबरोबर लुटूपुटूची मारामारी केली.
        " काय चाललं आहे तुम्हा भावंडांच माहीत नाही. सिद्धू मला तरी कळूदे."
         " आई मला उशीर होतोय. मी सांगतो आल्यावर सगळं."  गाडी स्टार्ट करून सिद्धांत निघाला देखील.
         बरोबर पावणेसहा वाजता शिवाजीपार्कला सिद्धांत पोहचला. निशा आधी आली तर उगीच तिला वाट बघत उभं राहायला नको. जाताना आठवणीने एक सुंदरसा फुलांचा बुके आणि कॅडबरी निशासाठी घेतले.
         निशा बरोबर सहा वाजता पोहचली. तिला बघून सिद्धांतला खूप आनंद झाला. " काय रे, छान मुलगी दिसली की लगेच शायनिंग मारता रे तुम्ही मुलं. मुलींना समजता काय तुम्ही लोकं ? आईवडिलांच्या जीवावर मज्जा मारायला येते तुम्हा लोकांना. मी तुला भेटायला अजिबात आलेले नाही. उगीच गैरसमज करून घेऊ नकोस." निशाने आल्याआल्या खरडपट्टीला सुरुवात केली.
         " अग अग थांब. पहिलं तर Belated Happy Birthday." सिद्धांतने निशाच्या हातात बुके आणि कॅडबरी दिली. " आणि दुसरं म्हणजे Friends असं म्हणून मैत्रिकरता सिद्धांतने हात पुढे केला. त्याच्या रुबाबशील बोलण्याने निशा थोडी इंप्रेस झाली. पण तसं न दाखवता तिनेही Friends म्हणून शेकहँड केला.
        " एक गोष्ट लक्षात ठेव निशा सगळीच मुलं तशी नसतात. तू माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहे की, मला तुझ्याशी मैत्री करावीशी वाटली. मी अजिबात आईवडिलांच्या पैशावर मज्जा मारत नाही. माझे वडील चार वर्षांपूर्वी वारले. त्यांनी आणि माझ्या आईने मिळून मसाल्याचा व्यवसाय सुरू केलेला तो आता मी बघतो. मला माझा व्यवसाय खूप पुढे न्यायचा आहे. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचंय. राहिला प्रश्न आपल्या मैत्रीचा. तुला माझ्याशी नसेल मैत्री करायची तर माझी काहीच जबरदस्ती नाही. चल बाय." असं म्हणून सिद्धांत तिथून जायला निघाला.
       आपण खूप वाईटरीत्या सिद्धांतला बोललो ह्याची जाणीव निशाला झाली. " अरे थांब. I am very sorry. मला माफ कर प्लिज. नॉर्मली मुलं अशी असतात म्हणून तुला वाटेल तसं बोलले मी. Friends." असं म्हणून निशाने सिद्धांतला हात पुढे केला. Friends असं म्हणत सिद्धांतने निशाला हात मिळवला. कॉफीशॉप मध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेत एकमेकांची जुजबी माहिती विचारून घेतली. महत्वाकांक्षी सिद्धांत निशाला साहजिकच खूप आवडला.
        सिद्धांत होताच ना तसाच कोणालाही आवडण्यासारखा. महत्वाकांक्षी, नम्र, लाघवी. त्याची आई सुनंदा चव्हाण अतिशय सुगरण. तिने तयार केलेल्या मसाल्यांची अनेक बायका तारीफ करत. त्यांच्याकडून मसाले विकतही घेत असत. म्हणून त्याचे वडिल श्रीकांत चव्हाण यांनी बायकोच्या साथीने मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात जम बसू लागल्यावर हाताखाली दहा - बारा माणसे गोळा करून त्यांनी छोटा कारखानाही उभारला. चाळीवजा घरातून बाहेर पडून तीन खोल्यांचा फ्लॅट घेतला. सगळं चांगलं घडत होतं आणि अचानक अटॅक येऊन सिद्धांतचे वडील वारले. घराचा जणू कणाचं मोडला. दोन मुलांसाठी सिद्धांतची आई जिद्दीने उभी राहिली. आता सिद्धांतने आईच्या देखरेखीखाली व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. त्याला आपले मसाले परदेशातही निर्यात करायचे होते. त्यानुसार त्याची वाटचाल सुरू होती.
         सिद्धांत आणि निशाचं प्रेम हळूहळू फुलू लागले होते. सिद्धांत निशाला आईची भेट करण्याकरिता घरी घेऊन गेला. आईला निशा खूप आवडली. आणि निशाला आई. आईने सौभाग्यलेणं उतरवलं नव्हतं. त्यांचा टापटीपपणा, राहणीमान, उच्चविचार निशाला खूप भावलं. सिद्धांताच्या घराशी अगदी समरसून गेली ती. सलील तर भयंकर खुश होता. वहिनी म्हणून निशा त्याला खूप आवडलेली आणि अजून एका गोष्टीवर तो खुश होता ती म्हणजे दादाचं गुपित पहिलं त्यानेच ओळ्खलेलं. निशाला सख्ख भावंड नसल्याने सलीलशी चांगलीच गट्टी जमलेली. निशा घरी आली की, घराला नुसतं उधाण यायचं. एकमेकांची मस्करी, हास्यविनोद याने घर नुसतं दणाणून जायचं.
        निशाच्या घरीही आईवडिलांना सिद्धांत जावई म्हणून खूप आवडला. एकुलत्या एक मुलीसाठी त्यांना अजून काय हवे होते. मोठ्या माणसांनी एकमेकांची भेट घेऊन निशाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांचे लग्न लावून देण्याची बोलणी केली. निशानेही सिद्धांतला सांगितले मी नोकरी करणार नाही. तुझ्याबरोबर व्यवसाय सांभाळेन.
         निशाला वेळेचं खूप अप्रूप होतं. कोणी सांगितलेल्या वेळेत ती बरोबर पोहचायची आणि बोलायची मी perfect time ला आले ना ? सलील तिला मस्करीत perfect time वहिनी बोलायचा. सिद्धांत कधी कधी कामामुळे उशिरा पोहचायचा पण निशा तिथे बरोबर वेळेत पोहचलेली असायची. एकदा पासवर्ड काय ठेऊ असा निशा विचार करत असताना सलील बोलला वहिनी Perfect Time पासवर्ड ठेव ग. सगळे पोट धरून हसले.
       " सिद्धू , अरे जेवायला येतो आहेस ना ?" आईच्या आवाजाने सिद्धांतची तंद्री भंग पावली. तितक्यात मोबाईलवर निशाचा फोन आला. " सिद् मी पोहचले रश्मीकडे. इथून निघाले की करते पुन्हा फोन तुला. तू पण ये वेळेत. रात्री बाहेरच जेऊन येऊ. आईंना सांग तसं."
      " येस माय डिअर, मी मस्त लोळत पडलेलो आणि तुझाच विचार करत होतो. भेटूया संध्याकाळी. Love You."
       " Love You Too. चल फोन ठेवते. ये लौकर."
     सिद्धांत संध्याकाळी मस्त तयार झाला. निशाने त्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून T-Shirt आणि परफ्युम दिले होते तेच घालून अंगावर परफ्युम फवारला. Cab बुक केली. कॅबमध्ये बसल्यावर ड्रायव्हरला गाणी लावायची विनंती केली. नेमकं निशाच्या आवडीचं गाणं लागलं. \" कहते है खुदा ने इस जहाँ में सभी के लिये, किसीं ना किसीं को है बनाया हर किसीं के लिये ।
        पुन्हा निशाचा फोन आला " मी निघाले आहे रश्मीकडून. तू पण निघालास का ? "
        " हो मी पण आताच निघालो. बघ तुझं आवडीचं गाणं लागलं आहे. तुला आठवून आठवून गाणं ऐकतोय."
       " So sweet, मी नेहमीप्रमाणे perfect time ला पोहचेन. ये लगेच."
        मरीनड्राईव्ह यायच्या आधी रस्त्यात अपघात झालेला. खूप गर्दी जमा झालेली. " देखो यहां accident हुआ है । इतनी भीड करते है लोग । मदत तो कोई नहीं करता । ड्रायव्हर पोटतिडकीने बोलत होता. सिद्धांतने काचेबाहेर पाहिलं. खूप मोठा accident झालेला दिसतोय. " भाईसहाब, Ambulance बुलाई क्या ?" त्या गर्दीतल्या एका माणसाला सिद्धांतने विचारलं. " हा बुलाई है, अभी आ जायेगी ।" त्या माणसाने उत्तर दिले.
        मरीनड्राईव्हच्या कठड्यावर पाठमोरी निशा बसलेली दिसली. " अग आता येताना रस्त्यात खूप मोठा accident झालेला. Ambulance बोलावली आहे कळलं म्हणून उतरलो नाही खाली. नाहीतर काहीतरी मदत केली असती." बोलता बोलता सिद्धांतने निशाचा हात हातात घेतला. " अग तुझे हात इतके थंड कसे पडले ?"
      तितक्यात सिद्धांतच्या मोबाईलवर फोन आला. अनोळखी नंबर होता. " Mr. सिद्धांत ? "
     " हा बोलतोय."
     " मी इन्स्पेक्टर अरुण शिंदे बोलतोय. मिस निशा देशमुख तुमच्या कोण आहेत ?"
       " काय झालं इन्स्पेक्टर ? माझी होणारी बायको आहे ती.
       " तुम्हाला सांगायला अतिशय दुःख वाटतंय. आता मरीनड्राईव्हच्या अलीकडे अपघात झाला आहे. आणि त्यात मिस निशा मृत पावल्या आहेत. भरधाव गाडीने त्यांच्या बाईकला उडवले. त्यांच्या मोबाइलवर तुम्हालाचं जास्त कॉल केले गेले आहेत म्हणून तुम्हाला फोन लावला."
        " अहो काय वाटेल ते काय बोलताय ? निशा माझ्या बाजूला बसली आहे." सिद्धांतने निशाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होते. सिद्धांतच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला आणि निशाची अस्पष्ट आकृती त्याला वरवर जाताना दिसली. दुसरीकडे सूर्य अस्ताला जात होता.
      नियतीने वेळेचं काटेकोरपणे बंधन पाळणाऱ्या निशासाठी Perfect Time साधला नव्हता.