पेरावे ते उगवते

---------

पेरावे ते उगवते

" आई किती नाटकं करतेयस? एवढंस लागलंय आणि तू पाय धरून बसलीयस. " ८ वर्षाचा रोहन पटकन आईला बोलून गेला. सायली आणि मोहित दोघेही आपल्या मुलाकडे बघतच राहीले.

काल सायली पोटमाळ्यावरचा डब्बा काढायला स्टूलवर चढली आणि तोल जावून खाली पडली. मोहित आणि रोहन आवाज ऐकून धावत किचन मध्ये आले. सायलीच्या पायाला बराच मुका मार लागला होता. त्यामुळे तिला उठतानाही त्रास होतं होता आणि ती कण्हत होती. मोहितने तिला उचलून बेडवर ठेवलं आणि पायाला आयोडेक्स लावला. गरम पाण्याची बॅग दिली शेकायला. रात्री तिला उठून किचन मध्ये जावून जेवण बनवण्याऐवढीही शक्ती नव्हती. उठायला गेली की कळ यायची पायात. त्यामुळे मोहितनेच खिचडीभात केला आणि सर्वांनी तोच खाल्ला. आज मात्र सकाळीसुद्धा सायलीला उठता येतं नव्हतं. मोहितने कसा बसा चहा बनवला आणि ब्रेडला जाम लावून रोहनला दिला. रोहनला ते नको होतं. त्यामुळे त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली.

सायलीने रोहनला आवाज देऊन बेडरूम मध्ये बोलवलं आणि त्याला समजावू लागली, " बाळा मला लागलं आहे ना म्हणून ना बनवू शकले जेवण. आता पप्पा देतायेत ते खा. मला बरं वाटलं की लगेच तुझ्या साठी छान जेवायला बनवते. आता माझा पाय दुखतोय ना." आईचं बोलणं ऐकून ," आई किती नाटकं करतेयस? एवढंस लागलंय आणि तू पाय धरून बसलीयस. "  रोहन पटकन आईला बोलून गेला. सायली आणि मोहित दोघेही आपल्या मुलाकडे बघतच राहीले. त्यांना हे कळत नव्हतं की आपला मुलगा आपल्याला असं कसं बोलू शकतो? कुठे शिकतो हे सर्व तो?

मोहित रोहनवर ओरडला, " ही काय पद्धत आहे रोहन आईशी बोलायची? आणि ती तुझी आई आहे ती खोटं कशाला बोलेल? " मोहित रोहन वर खूप चिडला होता. त्यावर रोहन म्हणाला," आईच्या पायातून रक्त पण नाही आला, तरी आई पाय धरून बसली आहे. वर्षभरापूर्वी आजी बाथरूम मध्ये पडली होती. ती म्हणाली तिचा हात दुखतोय. आजीला त्यादिवशी जेवण बनवायला उशिर झाला तेव्हा तुम्ही पण आजीला असंच बोलला होतात ना पप्पा. म्हणजे आजी खोटी बोलत होती ना? तिच्या हातातून पण रक्त नव्हतं आला ना पप्पा आणि आता आईच्या पायातून पण रक्त नाही आला. "

मोहित आणि सायलीच्या कोणी तरी कानाखाली वाजली असे त्या दोघांना वाटले. वर्षभरापूर्वी रोहनची आजी बाथरूम मध्ये पडली तेव्हा हाताला मुका मार लागला होता. सायली आणि मोहित दोघे जॉब करणारे. त्यामुळे आजी जेवण बनवत होती. त्यादिवशी हाताची सूज खूप वाढली होती म्हणून आजीला जेवण बनवताना, हाताची हालचाल करताना त्रास होतं होता. त्यामुळे जेवण बनवायला उशिर झाला. मोहित कामावरून आला आणि जेवण तयार नाही हे पाहून तिच्यावर ओरडू लागला, " तुला दिवसभर घरात बसूनच राहायचं असतं. फक्त जेवण बनवते तेही वेळेवर नाही. हात दुखतोय अशी नाटकं का करते?" त्यादिवशी आजीच्या डोळ्यात पाणी होतं. काही दिवसांनी आजीने सांगितलं की "मला गावाची आठवण येते. मला गावाला जायचं आहे. " जास्त काही विचार न करता मोहित आईला गावी पाठवतो. त्यानंतर आई कधीही परत येण्याविषयीं बोलली नव्हती.

रोहन लहान आहे. लहान मुले सांगून नाही तर आपल्या आजूबाजूचे लोक कसे वागतात ते शिकतात. त्यांना चूक बरोबर माहित नसतं. आज मोहितची मान खाली होती. कारण तो जे त्याच्या आईशी वागला होता, तेच आज त्याचा मुलगा त्याच्या आईशी वागत होता.

पेरावे ते उगवते.

समाप्त...