मोराची माहिती (Peacock Information In Marathi)

Information About Peacock In Marathi
"नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच" हे गाणं तर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच माहीत असतं आणि सगळेच हे गाणं म्हणतात. नुसतं मोराचं नाव काढलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो पिसारा फुलवून नृत्य करणारा तो मनमोहक मोर. मोर हा पक्षी दिसायला एवढा आकर्षक आहे की बघणारा बघतच राहतो. मोर! एक असा पक्षी ज्याने महाराष्ट्राची शान असणाऱ्या, महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या पैठणीवर स्थान मिळवले आहे. मोर! एक असा पक्षी ज्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून स्थान आहे. रंगीबेरंगी पिसारा असणाऱ्या, डौलदार चाल असणाऱ्या आणि नृत्यात एक लकब असणाऱ्या मोराला पाहायला सगळेच उत्सुक असतात. मोराला इंग्लिशमध्ये peacock तसेच संस्कृतमध्ये मयूर म्हणतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता मोराची माहिती बघूया.

भारतात सहज दिसणारा हा मोर सगळ्यांचाच अगदी आवडता पक्षी असतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा बघितला की डोळ्यांचे पारणे फिटते. या मोराचे तीन गटात विभाजन होते. त्यातल्या दोन आशियायी प्रजाती आहेत तर तिसरी प्रजाती ही आफ्रिकेच्या काँगो भागात आढळते.
१. भारतीय मोर
२. हिरवा मोर
३. आफ्रिकन मोर

भारतीय मोराचे वैज्ञानिक नाव पावो क्रिक्टॅकस आहे तर हिरव्या मोराला वैज्ञानिक भाषेत पावो म्युटिकस म्हणतात. आफ्रिकन मोर हा वैज्ञानिक भाषेत आफ्रोपावो काँग्रेंसिस म्हणून ओळखला जातो. मोर हा पक्षी कुक्कुट वर्गीय पक्षी आहे. मोर साधारण पावसाळ्याच्या नंतर साधारण ऑगस्ट महिन्यात स्वतःची पिसे टाकायला सुरुवात करतो. जंगलात वावरणाऱ्यांना ती सापडतात. उन्हाळा सुरू होण्याआधी त्याला पुन्हा पिसे येऊ लागतात.

१. भारतीय मोर (Indian Peafowl Peacock):-
हे मोर भारतात सर्वत्र आढळतात. भारता शिवाय श्रीलंका, दक्षिण आशिया आणि पाकिस्तानात देखील हे मोर आढळतात. या मोरांना निळे मोर किंवा सामान्य मोर असे म्हणतात. हाच मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा मोर निळ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. याचे अर्धे शरीर पिसांनी झाकलेले असते. नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असल्याने ओळखता येतात.

२. हिरवा मोर (Green Peafowl Peacock):-
हे मोर उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतात. दक्षिण आशिया मध्ये हे मोर जास्त प्रमाणात आढळतात. या मोरांची संख्या खूप कमी झाली आहे आणि ते दुर्मिळ होत चालले आहेत. हे मोर दिसायला भारतीय मोरासारखेच असतात फक्त यांचा रंग हिरवा असतो. या प्रकारात नर आणि मादी सारखेच दिसतात.

३. आफ्रिकन मोर (African Peafowl Peacock):-
हे मोर आफ्रिकेत आढळतात आणि यांचा आकार मोठा असतो. या मोराची मान लाल रंगाची असते. याचे पाय राखाडी असतात तर पिसे हिरवी आणि व्हॉयलेट असतात. या मोराला चौदा पिसांची शेपटी असते. काळया रंगाचे उदर, तपकिरी छाती आणि हिरवी पाठ असे या मोराचे वर्णन आहे.

मोराचे निवासस्थान मुख्यतः पानझडी जंगलात आणि अरण्यात असते. जंगला जवळ असणाऱ्या गावात देखील मोरांचा वावर आढळतो. मोराची चिंचोली हे पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोरांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असणारे नायगाव मयूर अभयारण्य हे भारतातील/ महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मोरांचा मुक्त संचार आहे. रात्रीच्यावेळी मोर झाडावर आश्रय घेतात. कधीकधी ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात. इतर पक्ष्यांसारखे मोर घरटे बांधत नाहीत. मोर बिबट्या, वाघ यांसारख्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उडून झाडावर जातात आणि झाडात लपून बसतात. असे शिकारी प्राणी दिसल्यावर मोर जोरात आवाज करून इतर पक्ष्यांना सावध करतात. जेव्हा हे प्राणी मोराच्या मागे लागतात तेव्हा मोर अतिशय वेगात पळतात.

मोराचे खाद्य म्हणजे साप, उंदीर, काही फळे, किडे, अळ्या असतात. याशिवाय मोर धान्य, टोमॅटो, लाल मिरच्या, मोठे सरडे, पेरू, गवत, केळी देखील खातात. मोर हा शाकाहारी तसेच मांसाहारी देखील आहे. मोर हा माणसाचा मित्र आहे कारण तो शेतातील पिकांवरचे किडे खातो तसेच उंदीर देखील खातो परंतु कधीकधी मोरांमुळे शेतातील पिकांचे नुकसान देखील होते. मोराच्या ओरडण्याला केकारव म्हणतात.

मोर हा सरस्वती देवीचे आणि कार्तिकेयचे वाहन आहे. आपल्या पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी मोराच्या संवर्धनाच्या दृष्टीने निसर्ग आणि पशू पक्ष्यांना देव देवतांसोबत जोडले असावे. यामुळे काही लोक मोराची पूजा करतात आणि त्यांना अन्न, पाणी ठेवतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्या पालनासाठी खास परवानगी घ्यावी लागते कारण त्याची देखभाल करणे हे कठीण काम आहे. घरात मोराला पाळले तर त्यांचे आयुर्मान ४५ वर्षे असू शकते.

मोरामध्ये मादी पक्ष्याला लांडोर म्हणतात तर नर पक्षी म्हणजे मोर असतो. मोराचे आकारमान साधारण ९२ ते १२२ सेमी असते तर लांडोर साधारण ८६ सेमी असते. नराचे वजन म्हणजेच मोराचे वजन साधारण ४ ते ६ किलो असते. मादीचे वजन अर्थात लांडोराचे वजन २.७ ते ४ किलो असते. मोराचे आयुष्य साधारण १० ते २५ वर्षे असते. मोराच्या पिसाऱ्याच्या लांबी सकट मोराची लांबी पाच फूट असते. मोराला सगळ्यात मोठा उडणारा पक्षी म्हणून ओळखले जाते. मोर फक्त २५ फूट उंचीपर्यंतच उडू शकतो. मोर आणि लांडोर ओळखणे खूप सोपे आहे. मोराला पिसारा असतो परंतु लांडोरीला पिसारा नसतो. मोराच्या पिसाऱ्यात निळा, हिरवा असे रंग असतात. त्याच्या डोक्यावर असणारा तुरा एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसतो म्हणूनच त्याला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते. त्याचा तुरा हा उभा पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यावर रंगीत पुंजके असतात.

लांडोर वर्षातून दोन वेळा अंडी घालते. एकावेळी ती चार ते आठ अंडी घालू शकते. एक खट्टा खणून त्यात ती अंडी घालते. पिल्लांना या अंड्यातून बाहेर येण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस दिवसांचा अवधी लागतो. मोराची पिल्ले दोन ते तीन वर्षांनी मोठी होतात. याकाळात फार कमी पिल्ले जगतात कारण ती मोठी व्हायच्या आतच कुत्री आणि इतर प्राणी त्यांना आपले भक्ष्य बनवतात.

मोराच्या इतिहासाबद्दल पाहायला गेले तर मौर्य साम्राज्याचे चिन्ह हे मोर होते हे लक्षात येईल. एवढेच नव्हे तर मौर्य साम्राज्यात नाण्याच्या एका बाजूला मोराचे चित्र होते. मुघल साम्राज्यात शहाजानचे मयुरासन खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या सिंहासनावर मोराचे चित्र आहे जे पूर्णपणे रत्नजडित आहे. याशिवाय त्या सिंहासनाची निर्मिती पूर्णपणे सोन्याने केलेली आहे. हिंदू धर्मात तर मोराला विशेष महत्त्व आहे. श्री कृष्णाच्या मुकुटात असणारे मोरपीस मोराचे महत्त्व दर्शवते. याशिवाय सरस्वती देवीचे आणि कार्तिकेयचे वाहन देखील मयुरच आहे. पूर्वी लिखाणासाठी मोरपिसाचा वापर लेखणी म्हणजेच पेन म्हणून व्हायचा.

मोराचे सौंदर्य पाहता २६ जानेवारी १९६३ रोजी भारताने मोराला राष्ट्रीय पक्ष्याचे स्थान दिले. भारताच्या शेजारील देश म्यानमारने राखाडी मोराला आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचे स्थान दिले आहे. भारता शिवाय श्रीलंकेने देखील मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. मोराला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे की, पैठणी सोबतच त्याने रांगोळ्या, मेहंदी, गीते, योग आणि बऱ्याच कला क्षेत्रात स्थान मिळवले आहे. आजच्या नवीन फॅशनेबल जगात सोन्याच्या तसेच हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये देखील आपल्याला मोर पाहायला मिळतो. मयूर कलेक्शन, पिहू कलेक्शन अश्या नावांनी हे दागिने आपल्या परिचयाचे झाले आहेत. एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपीस ठेवल्याने घरात पाली येत नाहीत. मोर पालींना खातात त्यामुळे त्या घरापासून दूर राहतात. घराच्या उत्तरेकडे मोरपीस ठेवणे हे शुभ मानले जाते.

भारतात आढळणारा पांढरा मोर हा अतिशय दुर्मिळ आहे. तोही इतर मोरांसारखा पिसारा फुलवून नृत्य करतो. या मोराचे मुख्य खाद्य म्हणजे बेरी आणि कीटक आहेत. असं म्हणतात पाऊस सुरू होण्याआधी मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करू लागतो यामुळे पाऊस येणार असेल तर ते लगेच समजते. अर्थात याला वैज्ञानिक आधार नाही.

मोराच्या पिसांसाठी तसेच त्याच्या मांसासाठी त्यांची शिकार केली जाते. कधीकधी शेतातील नासधूस टाळण्यासाठी देखील मोराला मारले जाते. मोराच्या शिकारीवर बंदी आहे. मोराची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यामुळे काही वर्षांचा कारावास होऊ शकतो.