पावनखिंड - चित्रपट. हा थरार एकदा अनुभवलाच पाहिजे.

पावनखिंड इतीहसाचा थरार भव्यदिव्य स्वरूपात चित्रपट गृहात.

"पावनखिंड" - चित्रपट अनुभव

        "पावनखिंड", फक्त नाव जरी ऐकलं तरी रक्त सळसळतं, अंगावर काटा उभा राहतो. शौर्याचं, पराक्रमाचं, स्वामीनिष्ठेचं, अभिमानाचं धगधगतं अग्निकुंडच जणू ! गजापूरच्या खिंडीत बाजी, फुलाजी, संभाजी, रायाजी आणि तीनशे मावळ्यांनी स्वराज्यासाठी पंचप्राण उधळले आणि घोडखिंड पावनखिंड नावाने इतिहासात सुवर्ण अक्षरं कोरून अजरामर झाली. पावनखिंडीत झालेल्या रणसंग्रमाबद्दल कितीही वाचलं, ऐकलं आणि पाहिलं तरी अंगावर शहारा आणि डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही. आपसूकच हाताच्या मुठी वळल्या नाही तर नवलच ! आणि नकळत तोंडातुन हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी असे शब्द बाहेर पडलेच म्हणून समजा !

        गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ठाण मांडून बसला आहे. दुसऱ्या लाटेतून कुठे आपण सावरतोय तोच ओमायक्रोनचं संकट येऊ घातलं. लोकडाऊनचे निर्बंध शिथिल झालेले असले तरीही चित्रपटगृहे, लग्नकार्ये, नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने उडण्यास परवानगी दिलेली नाहीये. पन्नास टक्के क्षमतेने त्यांना चालू करण्याची मुभा आहे. नुकताच सिनेमागृहामध्ये शिवकालातील रक्तरंजित पराक्रमाचा इतिहास सांगणारा म्हणण्यापेक्षा दाखवणारा चित्रपट "पावनखिंड" प्रदर्शित झाला. दिगपाल लांजेकर यांच्या टीमचा बहुप्रतीक्षित तिसरा चित्रपट "पावनखिंड".

        चित्रपटाच्या कामाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पावनखिंड हेच नाव योग्य आहे, असे सगळ्यांचे मत होते. पण हे नाव उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सुरुवातीला "जंगजोहर" हे नाव ठेवण्यात आले. पण काही दिवसांनी जेव्हा कळले कि, "पावनखिंड" जे नाव उपलब्ध होऊ शकते, तेव्हा लगेच "जंगजोहर" ऐवजी पूर्वीचेच नाव "पावनखिंड" देण्यात आले. असो! शेक्सपियर म्हणाला आहेच, कि नावात काय असतं? दर्जा महत्वाचा!

        स्वराज्याच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर मांडून डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या आधीच्या फर्जंद, फत्तेहशिकस्त सारखाच हा हि चित्रपट तेवढ्याच, किंबहुना त्याहीपेक्षा वरचढ झालेला आहे. अप्रतिम, अतुलनीय, आणि अविस्मरणीय असा हा चित्रपट. कितीही कौतुक करावं तेवढं कमीच!

       चित्रपटातील एक ना एक प्रसंग ठसठशीत आणि मनाचा ठाव घेणारे! कधी आपसूकच मुठी आवळल्या जातात, अंगावर रोमांचाने काटा उभा राहतो, हर हर महादेव आपसूकच तोंडातून बाहेर पडतं. तर कधी नकळत डोळे पाणावतात.

        राजांच्या वेशात सिद्दी जौहरच्या छावणीत निधड्या छातीने जायला तयार होणारा शिवा काशीद. राजांचा वेष घेणं सोपं होतं, पण शत्रूच्या गोटात गेल्यावर आपलं काय होणार? हे माहित असूनही पन्हाळगडावरून वेगवेगळ्या दिशांना जाताना राजांना "राजे तुम्ही जा. म्या येतो मागून." म्हणतानाचा प्रसंग तसेच जौहरच्या शामियान्यात राजांचा जिरेटोप उतरवून आसनावर ठेऊन, त्याला अखेरचा मुजरा करतानाचा प्रसंग डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत.

"लोकं म्हत्याल, जगला शिवा काशीद म्हणून पर मेला शिवाजी राजं म्हणून. मरुनशान बी हजारो वर्ष जगिन म्या राजं."

शिवा काशीद यांचं पात्र साकारणारे अजिंक्य ननावरे यांच्या तोंडून जेव्हा हे वाक्य बाहेर पडतात. तेव्हा आपसूकच डोळ्यांच्या कडा ओलावतात. त्यांच्या अभिनयाने ते कधी हसवतात तर रडवतातही.

\"आगिन्या\" पात्र साकारणारा सचिन भिलारे, जेव्हा म्हणतो, \"राजांसाठी जीव द्यायला लागला तर देऊन टाकायचा, सोनं हुईल त्येचं.\", तेव्हा उर भरून येतो. शेवटच्या प्रसंगी ज्योतवंतीचं लाकूड तोंडात धरून खंजिराने आग लावण्याचा प्रसंग हृदय हेलावून सोडणारा आहे. प्रत्यक्ष पडद्यावरच त्याचा अनुभव घ्यावा.

        बहिर्जी नाईकांची भूमिका नेहमीप्रमाणे हरीश दुधाडे यांनी अप्रतिमरीत्या साकारलेली आहे. त्यांच्याशिवाय दुसरं कुणी त्या पात्राला न्याय देऊ शकणार नाही. एका प्रसंगात गडाच्या दरवाजावर द्वारपाल विचारतो, तुझ्या रक्ताचा रंग कोणता? त्यावेळी,

"आरं... राजांचं मावळं आम्ही. आमच्या रक्ताचा रंग एकच , भगवा ssss, हे वाक्य जेव्हा ते म्हणतात तेव्हा अभिमानाने छाती भरून येते. बहिर्जींचा सोबती हरप्या साकारणारा शिवराज वायचळ त्याच्या अभिनयाने निखळ हसवून जातो. तर आपल्या गोड बोलण्याने शत्रूच्या गोटात जाऊन थापा मारणाऱ्या गंगाधरपंतांच्या भूमिकेत वैभव मांगले भाव खाऊन जातो.

        भरदार छातीचा नि बळकट शरीरयष्टीचा अंकित मोहन या वेळी रायाजी बांदल यांच्या भूमिकेत दिसला आणि साजलाही. कोयाजी बांदल यांची भूमिका साकारणारे अक्षय वाघमारे मागच्यावेळी सारखेच जोशपूर्ण आणि निडर. फुलाजी प्रभू यांची भूमिका साकारणारे सुनील जाधव शेवटच्या लढाईच्या प्रसंगी शरीरात बाण घूसूनही हाती विटा घेऊन गर गर फिरवत शत्रूंना कापत सुटतात. तो प्रसंग तर अंगाचा थरकाप उडवणारा.

\"राजांच्या केसालाही धक्का लागला तरी आख्खा सह्याद्री उलथा पालथा करील हा बाजी.\" म्हणणारे अजय पुरकर बाजी प्रभूंची भूमिका अक्षरशः जगले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पावनखिंडीमध्ये मावळ्यांसमोर बोलताना बाजी म्हणतात,

‘हजारो वर्षं गुलामीत काढलीत ना! आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्य शिवाजीराजांच्या रूपातउगवू पाहतोय. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. तुम्ही सगळे दमलेले आहात; पण आज हे असंच सोडून चालायचं नाही. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच, तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी, तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनिम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण? तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोऊन उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत. मी तुम्हाला वचन देतो, आज राजांना वाचवलंत, तर या घोडखिंडीच्या दगडादगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क, हक्कानं मागता येईल... ज्याचं नाव आहे, स्वराज्य!’

हे जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपसूकच मुठी वळल्या जातात. उर अभिमानाने भरून येतो. शरीरावरची लव ना लव ताट उभी राहिल्याशिवाय राहत नाही.

शेवटच्या प्रसंगात गोळी लागलेली असूनही, \"विशाळगडावरून तोफांचे आवाज आले नाहीत.\", म्हणून दोन्ही हातात पट्टे चढवून जेव्हा म्हणतात,

\"बाजूला व्हा ssss\" आणि त्याचबरोबर मावळे बाजूला होताना पार्श्वसंगीत घुमू लागतं. \"श्वासात राजं नि ध्यासात राजं....\" अप्रतिम प्रसंग. त्याचं वर्णन न करता येण्या सारखं आहे. प्रत्यक्ष त्याचा अनुभव पडद्यावरच घ्यावा. पुरकरांनी बाजी प्रभूंची उभी केलेली व्यक्तिरेखा कायम आपल्या स्मरणात राहील. शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी नेहमीप्रमाणे उत्कृष्टरित्या साकारलेली आहे. त्यांची देहबोली, संवादफेक आणि नजरेतील करारी बाणा मनाचा ठाव घेणारं आहे.

        सिद्दी जौहरच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी जबरदस्त. सिद्दी मसूदयाचे पात्र साकारणारा खुनशी आस्ताद काळे, रुस्तमेजमाचे पात्र साकारणारा गोंधळलेला ऋषी सक्सेना. बडी बेगम बनलेली कट्टर क्षिती जोग. जिजाऊ साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी नेहमीप्रमाणे वंदनीय. तसेच रुची मोहन, उज्वला जोग, दीप्ती केतकर, माधवी निमकर, प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

बायोबाई देशपांडे झालेल्या उज्वला जोग जेव्हा हा संवाद म्हणतात,

"माझं नशीबच वाईट राजे. दोनच पोरं होती. अजून दोन मुलं असती ना तर आत्ता स्वराज्याच्या कामी आली असती."

तेव्हा राजांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत.

        बांदल सेनेने घोडखिंडीत गाजवलेला पराक्रम एखादी कादंबरी वाचताना एवढा हुरूप येत नाही, तेवढा प्रत्यक्ष पडद्यावर कलाकारांनी अभिनयाने साकारलेला पराक्रम पाहण्यात येतो. रक्ताचा चिखल होईपर्यंत, शरीरावर असंख्य वार होऊन लालेलाल होऊनही जीवाची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत सगळे लढत राहतात. जिथं स्वतः शत्रूही त्यांचे कौतुक करतात, तिथं आपण काय त्यांचं कौतुक करणार!

        चित्रपटातील प्रत्येक लढाईचा प्रसंग किंवा हृदयस्पर्शी प्रसंग म्हणा! प्रत्येकास योग्य तेवढा वेळ दिल्याने प्रसंग मनाला भिडतात. योग्य ठिकाणी वापरलेली गाणी, पार्श्वसंगीत चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. तसेच सर्वच कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या पात्राला योग्य तो न्याय दिल्याने, चित्रपट कुठेही फिल्मी होत नाही. तीन प्रहर चाललेली पावनखिंडीतली लढाई चित्रपटगृहात एक तासात दाखवण्याचं शिवधनुष्य लांजेकर आणि टीमने त्यांच्या सार्थ अभिनयाने आणि कामाने समर्थपणे पेललं आहे. थिएटरमध्ये जेव्हा सिनेमा संपला तेव्हा खुर्चीवरून उठू वाटत नव्हतं. सारं अंग थरारून उठलं होतं, डोळ्यांत आसवं दाटली होती. चित्रपट संपला तरी उठू वाटत नाही, एवढं आपण चित्रपटाशी एकरूप होऊन जातो. लढाईचा प्रसंग आपण प्रत्यक्ष जगतो आहोत कि काय असं वाटतं! चित्रपटातील \"राजं आलं, राजं आलं. जिंकूनिया जगभरी. शिवबा राजं नाव गाजं जी.\", हे गाणं ठेक्यावर डुलायला लावतं. शिवाय, \"युगात मांडली\" हे भारुडही मनात वाजत राहतं.

        सर्वच कलाकारांची मेहनत, संवादलेखन, चित्रण, युद्धप्रसंग, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, गीते, वेशभूषा सर्वच बाबींमध्ये चित्रपट उत्कृष्ट झालेला आहे. चित्रपटगृहामध्ये सहपरिवार जाऊन पावनखिंडीतील रणसंग्राम अनुभवलाच पाहिजे.

"स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि आपल्या भगव्या रक्तानं घोडखिंड पावन करणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाची, स्वामीनिष्टेची आणि त्यागाची गौरवगाथा म्हणजे \"पावनखिंड\"."

        आपण अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले असतील. हिंदी किंवा हॉलिवूडचे, पण त्या चित्रपटांमध्ये अनिमेशन, ग्राफिक्सचा भरपूर वापर केलेला असतो. पण या चित्रपट मात्र प्रत्यक्ष गडकोट आणि किल्ल्यांवर जाऊन हा चित्रपट बनवला आहे. कोणतेही ग्राफिक्स किंवा अनिमेशन नाही. समोर दिसतात ते ऐतिहासिक ठिकाणं. (बरेचसे प्रसंग पुण्याजवळील किल्ले मल्हारगड येथील आहेत. आता मी बऱ्याच वेळा इथं जाऊन आल्यामुळे ते चटकन लक्षात आलं.)

        सर्वांना एक नम्र विनंती, आपल्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या घोडखिंडीत नक्की काय? कसं? आणि का घडलं? हे भव्यदिव्य स्वरूपात पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. आपली मुलं घरात बसून मोबाईलवर गेम किंवा टीव्हीवर कार्टून बघत बसण्यापेक्षा एकवार \"पावनखिंड\" चित्रपट दाखवून आणा.

        पावनखिंड चित्रपटाच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप आभार. तुमच्यामुळे आम्हाला शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रम असा भव्यदिव्य स्वरूपात चित्रपट गृहामध्ये जाऊन अनुभवायला मिळतो आहे. आता प्रतीक्षा एप्रिल महिन्यात येऊ घातलेल्या "शेर शिवराज" चित्रपटाची!

~ धन्यवाद