Login

पाऊस असा

Memories of rain and rainy season


पाऊस असा...
 

पाऊस....सगळ्यांचाच लाडका विषय. प्रेमात आकंठ बुडालेले लोक असोत किंवा एकला जीव सदाशिव असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा हा पाऊस. पाऊस पडायला सुरुवात झाली की तिला त्याची आणि त्याला तिची आठवण येणार, मग प्रेमाच्या, विरहाच्या, ती पावसासारखी, तो पावसासारखा, त्यांचं येणं-जाणं पावसासारखं, तिच्या डोळ्यात पाऊस, त्याच्या मनात पाऊस अशा कितीतरी कविता, चारोळ्या पावसासारख्या मुक्त बागडनार.
    मला मात्र पाऊस बालपणासारखा वाटतो. बेफिकीर, स्वच्छंदी, निरागस, अल्लड. कधी नुसताच रिमझिम रिमझिम, तर कधी वेडा वाकडा वाऱ्यासोबत, विजांसोबत धिंगाणा घालत, कधी धो-धो कोसळणारा, कधी नुसतीच पावसाच्या ढगांची गर्दी, वाट पाहायला लावणारा. कधी न सांगताच अचानक येऊन धडकणारा.

    शाळेत शेवटचा तास सुरू असला अन पाऊस आला की आनंदाला पारावर उरायचा नाही. शाळा सुटली अन् घरी जाताना पाऊस असला की दप्तरात सोबत असलेला रेनकोट चुकूनही बाहेर निघायचा नाही. मस्त पावसात चिंब भिजत, सायकल हातात धरून, रस्त्यावरच्या पाण्यात खेळत-बागडत घरी जायचं. घरी गेल्या गेल्या लगेच आईचा मस्त गरम गरम शब्दरूपी मार खायला मिळणार हे माहिती असायचं. "पण पाऊस काय वर्षभर पडतो का, अन् नेमकं शाळा सुटताना असा परत कधी पडणार. मग लाडक्या पावसासोबत खेळायला नको का?' आईला पण कारणं पाठ असायची.

    आईने हळद- आलं घालून दिलेलं दूध घेत घेत दप्तरातले अर्धवट भिजलेले वह्या-पुस्तकं व्यवस्थित मांडून पंख्याखाली सुकवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मांडलेली वह्या पुस्तकं एखाद्या छोट्या दुकानाप्रमाणे वाटायची. मोठं झालो की आपणही असच पुस्तकांचं दुकान काढू ही कल्पना दर पावसाळ्यात सुचायची. अर्धवट भिजलेल्या वहीवर लिहिण्याची पण एक वेगळीच मजा वाटायची. पानावर ओल्या जागी लिहिले की ते सुकल्यावर तिथली शाई पसरलेली दिसायची, अक्षरांचा वेगळाच फॉन्ट तयार व्हायचा.
   गणवेशाच्या खिशात खाऊसाठी दिलेली एका रुपयाची, दोन रुपयांची नोट ओली झाली की तिला इस्त्री करून सुकवलं आणि ती पुन्हा कडक झाली की हजार रुपयांच्या नोटेपेक्षा जास्तच भाव खाऊन जायची. विज्ञानातला पाऊस कसा मोजायचा हा प्रयोग दरवर्षी दर पावसाळ्यात गच्चीवर व्हायचा. पण एखाद्या वर्षी तरी तो प्रयोग यशस्वी झाला असता तर शप्पथ.
   सकाळी सकाळी शाळेत जाताना पाऊस आला की शाळेला दांडी ठरलेली असायची. मग पूर्ण दिवस रस्त्यावर साठलेल्या पाण्यात होड्या सोडण्यात जायचा. कुठे एखादा छोटुसा झरा वाहताना दिसला की उगीच तिथे दगड गोटे लावून पाणी अडवायच, एखादा बांध बांधल्याच फीलिंग यायचं. इंद्रधनुष्याची कमान  दिसली की तिला पकडण्याचा मोह आवरायचा नाही. पाऊस पडून गेला की झाडाच्या फांद्या जोरा जोरात हलवून त्यावरच पाणी पाडून  पुन्हा आम्ही पाऊस पाऊस खेळायचो. ऊन असताना पडलेला पाऊस अजूनच सुंदर वाटायचा.
   दर पावसाळ्यात झाडं लावण्याचा कार्यक्रम व्हायचा. घरासमोर, अंगणात, कुंडीत, आजूबाजूच्या परिसरात रोपवाटिकेतून आणलेली, मैत्रिणींच्या घरून आणलेली कलमं लावली जायची. अंगणात वाफे करून आई वेगवेगळ्या भाज्या लावायची. कधी कधी आमचे प्रयोग फसायचे तर कधी कधी चांदीच चांदी व्हायची. श्रावणातला ऊन- सावली पावसाचा लपंडाव, पंचमीला झोक्यांच्या लयीत पावसाची सर पण साथ द्यायला,  गणपती बसवताना, विसर्जनाच्या मिरवणुकीत, पोळ्याला बैलांच्या मिरवणुकीत, तान्ह्या पोळ्याला बच्चेकंपनी सोबत बैल घेऊन फिरायला सगळीकडे हा पाऊस सोबत असला की आमची मजा असायची.
    पाऊस असा....असाच आवडायचा.....आणि थंडीची शाल अलगद पांघरूण हळूच पाऊस निघून जायचा, पुन्हा पुढच्यावर्षी येण्यासाठी. 

                                  © डॉ किमया मुळावकर

फोटो- गुगलवरून साभार