#पत्रलेखन

पत्र नवऱ्याला..!

प्रिय,
खडूस..!


तू आहेसच माझा प्रिय. आपलं भांडण नेहमीच होतं, पण अगदी कमी वेळात म्हणजे अगदी एक दोन तासात राग मावळून तू मला मिठीत घेतोस... सॉरी ची देवाण घेवाण होऊन आपण परत एकदा आपल्या हसत्या खेळत्या जगात परत येतो...
पण यावेळी मात्र तू जरा जास्तच वेळ घेतलास. मी माझ्या बाजूने पुढाकार घेतला आणि तुझ्या जवळ येण्यासाठी प्रयत्न देखील केला. पण तू मात्र.. मला अजून वेळ हवा म्हणून तिथेच उभा आहेस. काय झालं रे असं...? 

तुम्ही बायका रडून सगळं खरं करून घेता, आम्हाला मात्र आमच्या भावना व्यक्त करता येत नाही. ह्याचा तुम्ही फायदा घेता.. बोलता बोलता तू बोलून गेलास. पण मी ह्याचा विचार केला. हो, खरंच आम्ही बायका ना भावनिक असतोच. तुमच्या सारखं आम्हाला सगळं मनातच साठवण जमत नाही. आम्हाला आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोष्टी ठेवून फार काळ राहता येत नाही. चूक काय त्यात...छोट्या छोट्या शब्दात नातं दृढ ठेवण्याची क्षमता असते...!


बोलून ,सांगून मोकळं झालं तर प्रत्येक नात्यात एक जीवंतपणा असतो...हसत खेळत वातावरण असतं. आणि हीच सध्या काळाची गरज सुद्धा आहे. 


मी चुकत असेलच,आणि ते मी नेहमीच मला मान्य करते. कधी केलं नसेल तर सांग. तू सांगितलेली कुठलीही गोष्ट मी केली नाही, असं झालेलं मला तरी आठवत नाही. तुला आवडेल तशी राहते, तुला आवडेल तशी बोलते, ती सांगते त्या पद्धतीने जगाच्या पाठीवर आपलं अस्तित्व खुलवून दाखवते.. सगळं करायचा प्रयत्न करते.. अजून काही असेल तर सांग, माझी ते सुद्धा करायची तयारी आहे...



कुठे गफलत होते रे माझ्याकडून... माझ्याकडून मी आपलं नातं नेहमीच सुदृढ ठेवण्यासाठी खटाटोप करीत असते... नात्यात जर संवाद हरवला तर ते नातं नुसते दिखाव्यासाठी होऊन राहतं, असं मला वाटतं.. मी काय बोलू ..तूच बोल..मी ऐकतो.. अशी अपेक्षा एकानेच केली तर समजून घ्यायला हवे, नात्यातील ओढ कमी झाली आहे... त्याला खत-पाणी घालण्याची आवश्यकता आहे... नातं सांभाळून ठेवायचे असेल तर चूक सांभाळून घेण्याची मानसिकता हवी...नात्यात वाद नाही तर सुसंवाद हवा रे...अर्थात एकाने नाही तर दोघांनीही...त्याला बरोबरीने साथ द्यावी..!


तुझ माझ्यावर प्रेम आहे, माहिती आहे मला पण ते व्यक्त केले तर अजून छान आपलं नातं बहरेल. एकमेकांना काही सांगतांना किंवा एकमेकांचे ऐकून घेतांना कटकटीचे रूप न देता तेच प्रियकर प्रेयसी म्हणून कायम बघितले तर आपल्या नात्यातील गोडवा हरवणार नाही... बघ तुला पटत असेल तर...!

शक्य झाले तर लग्नाआधीचे आणि नवीन नवीन लग्नानंतरचे  ते दिलखुलास मंतरलेले दिवस नक्की आठव... एकमेकांच्या विचारांमध्ये भिन्नता असूनही आपण एकमेकांना कसे समजून घेत आलोत. राग आला तरी, तो काही क्षणातच कसा निवळता घेत होतो. कधी तू कधी मी एकमेकांचा रुसवा पण काढत होतो. डोक्यावर आठ्या न आणता त्याला प्रेमाने सावरत होतो...शेवटी संसार आपलाच ,तेव्हा आपणच त्याला सावरायला हवे...


मी माझ्या मनातले सगळे इथे व्यक्त केले.. तू सुद्धा असंच काहीसं व्यक्त व्हावं अशी माझी जराही अपेक्षा नाही..तुला हवं त्या भाषेत तू मला सांगू शकतोस.मी  इथेच आहे..तू फक्त बोल...कारण, मला छळतो हा असा नात्यातील  दुरावा...! हा अबोला..!


तुझीच...!
मी..!