Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

पत्र जिव्हाळ्याचं

Read Later
पत्र जिव्हाळ्याचं

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : टपाल
                            पत्र जिव्हाळ्याचं


तंत्रज्ञानात रमलेल्या आजच्या पिढीला पत्रांची गंमत समजेलच असं नाही. आजही पत्र आवडतील अशा व्यक्ती भेटतातच, परंतु खऱ्या अर्थाने त्या पत्रांत रमणारे, त्यांना अनुभवणारे, त्यांना जगणारे मात्र तुरळकच! मेसेज करणं इतकं सोपं झालं आहे की पत्रात रमणं आजच्या भाषेत 'आऊटडेटेड' वाटतं. चूक पूर्णतः या पिढीची आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ज्यांची जन्मापासूनच तंत्रज्ञानासोबत गट्टी जमलेली असते,‌त्यांना या वेळखाऊ गोष्टी कश्या बरं भावतील? तंत्रज्ञानासोबतच जर जुन्या गोष्टींची ओळख करून दिली तर हा सुंदरसा वारसा पुढे नक्कीच सुरु राहील. 
पत्र म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांनी ते लिहिलंय किंवा मिळालेलं पत्र वाचलंय त्यांना त्याची गोडी चांगलीच समजली असावी. कसं असतं ना, अनुभव घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल तो जिव्हाळा निर्माण होत नाही. असंच काहीसं पत्रांच्या बाबतीतही असावं. जो त्यांत रमला तो सुखावलाच म्हणायचा. 
पत्र औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारची असतात. औपचारिक पत्र तसं औपचारिकता पूर्ण करणारचं, पण तरीही बरेचदा चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या गोष्टी कळवणारंही ठरतं. तर अनौपचारिक पत्र हे एक असं माध्यम आहे ज्यात तुम्ही हवं तसं व्यक्त होऊ शकता. 
ज्या गोष्टी प्रत्यक्षात समोरासमोर सहजपणे बोलता येत नाही, त्या पत्रांत लेखणीद्वारे व्यक्त करणं कदाचित सोपं वाटतं नाही का? कारण बरेचदा असं होतं की मनात तर खूप काही असतं पण ते व्यक्त करणं प्रत्येकालाच जमत नाही. पण पत्रांच्या स्वरूपात जेव्हा भावना व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा भावनांचा निचरा अगदी मनासारखा होतो. 
तो पत्रांचा काळ आठवणं फार आल्हाददायक असतं. आनंद, दुःख, प्रेम, राग, रुसवा, ख्यालीखुशाली, काळजी, आणि न जाणो कितीतरी भावना पत्रांच्या स्वरूपात व्यक्त केल्या जात असत. ऐकलेल्या बऱ्याच गोष्टींमुळे समजतं की या भावना व्यक्त होण्यात पत्रांची खूप महत्त्वाची भूमिका असायची. जरी ते पत्र समोरच्याला अगदी लगेचच नसेल मिळत, तरी ते मिळाल्यानंतर भावना तसूभरही कमी व्हायची नाही. अजूनही जे पत्रांचा वापर करतात त्यांना हे चांगलंच ठाऊक असणार. कारण त्या अक्षरांआड दडलेला भावनिक ओलावा त्यात तसाच टिकून असतो. आजच्या मेसेजेस मध्ये तो भावनांचा ओलावा प्रत्येकवेळी पहायला मिळतोच असं नाही. कारण बरेचदा आभासी जगाच्या भावनाही कुठेतरी आभासात रमलेल्याच असतात. 
पूर्वी संदेशवहनाचं हे माध्यम कितीतरी बातम्यांचं साक्षीदार व्हायचं. त्या काळात बरेचसे निकाल असो किंवा नोकरी पक्की होण्याची बातमी असो, टपालाची खूप महत्त्वाची भूमिका असायची. दुःखद बातमी पोहोचवायचं काम पण याच्यामार्फतच आणि कोणतीही आनंदाची बातमी देण्याचं कामही याचंच. प्रेमाच्या विश्वात तर हा एक दुवाच! न जाणो कित्येक प्रेमकथांना पूर्णत्वास नेण्यासाठी, परिपूर्ण होण्यासाठी याने मदत केली असेल. जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला तर यांचा मोठा आधार!  आजही यापैकी बऱ्याच बाबतीत पत्रं आपलं काम चोख पार पाडत आहेत. अगदी फोनच्या माध्यमातून व्यक्त होणं आवडणारेही काहीवेळा 'प्रेमपत्रा'मार्फत स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणायचं का मग त्यांना आऊटडेटेड? 

आजच्या घडीला पत्र समोरच्यापर्यंत पोहचेल की नाही हा भाग निराळा, पण त्या भावना निदान व्यक्त करुन ठेवायला हव्यात.‌ कधीतरी सहजच एखाद्याला बोलावयाच्या गोष्टी कागदावर उतरवून घ्याव्या. काय सांगावं कधी अचानक त्या व्यक्तीने ते वाचण्याचा योग जुळून येईन. जमलंच तर ते पत्र पाठवूनही पहावं. इतकंच काय तर एखाद्या गोष्टीबद्दलही आपल्या मनातील भावना पत्रातून व्यक्त केल्या तरी एक वेगळंच समाधान मिळतं. पत्र शेवटी पत्र असतं अन् त्याला अनुभवणाऱ्यालाच त्याचं योग्य ते मोल असतं! 
वेळ, तंत्रज्ञान, व्यक्तींच्या आवडीनिवडी बदलणाऱ्या क्षणांसमवेत बदलतीलही. परंतु पत्रांची जागा कदाचित कधीच कोणी घेऊ शकत नाही. सरणाऱ्या वेळेसोबत माणसाचं पत्रांसोबतचं सख्यही हळूहळू विरत चाललं आहे. ते धागे पूर्णपणे विरण्याआधी किंवा कमकुवत  होण्याआधी त्यांना जपण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा नाही का? जिव्हाळा टिकवून ठेवणारं हे माध्यम प्रत्येकाला आपलसं वाटावं हीच सदिच्छा. 
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//