पत्र -प्रिय सांतासाठी

पत्र - प्रिय सांतासाठी

विषय - प्रिय सांताक्लॉज

       प्रिय सांता,

                    सप्रेम नमस्कार.

तुला आज मी एक समवयस्क मित्र समजून पत्र लिहीत आहे. कारण तुझी व्यक्तिरेखा बुटकी, वृद्ध, पांढरी दाढी, लाल अंगरखा, डोळ्यावर चष्मा आणि खांद्याला अडकवलेली भरपूर भेटवस्तू, खेळणी असलेली पिशवी. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजे नाताळ/ख्रिसमस. या दिवशी रात्री तू येतोस आणि लहान लहान मुलांसाठी त्यांच्या उशाशी खेळणी व भेटवस्तू ठेवून जातोस.

                खरंच खेळणी, चॉकलेट हा लहान मुलांचा अगदी आवडता विषय. पण या वस्तू आताच्या मुलांसाठी काही नवीन नाहीत.  या  युगात मोबाईल जणू त्यांचं खेळणं झाला आहे. कदाचित ही मुलं तुला मोबाईल, आयपॅड ची मागणी तर करत नाही नां रे? पण या मोबाईलमुळे छोट्या बच्चे कंपनीचं निरागस बालपण हरवत चाललेलं आहे याची मनाला एक खंत वाटते.

               दुसरी एक गोष्ट मला तुझ्या पुढे व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे झोपडीतली मुलं. तू त्यांच्या झोपडीत जाऊन खेळणी, भेटवस्तू देतोस कां रे? नाताळच्या दिवशी मला गरिबाची काही मुलं सिग्नलवर प्रत्येक गाडी समोर येऊन खेळणी विकताना दिसली. ज्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही तर एक उदास भाव मला दिसला. इतकी कशी रे तफावत?

                त्यांना हक्क नाही का या खेळण्यांची खेळण्याचा? गोडधोड खाण्याचा? तेव्हा या मुलांचा सुद्धा तू थोडा विचार करशील ही माझी तुला एक विनंती आहे. आणखी एक भावना मी तुझ्याजवळ व्यक्त करते. म्हातारपण म्हणजे एक प्रकारचं बालपणचं असतं असं म्हणतात. तेव्हा अत्यंत गरिबीत जीवन जगणारे म्हातारे जीव त्यांनाही तू या नाताळच्या सणाच्या दिवशी काही खाण्याचे पदार्थ रात्रीला त्यांच्या उशाशी नेऊन ठेवले तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा लहान बालकांप्रमाणेच हास्य उमटेल.

               बघ, या सर्व गोष्टींचा तू विचार कर. माझ्या मनातील भावना मी तुझ्या समोर व्यक्त केल्या. नवीन वर्षातील येणाऱ्या नाताळच्या सणात असे काही बदल दिसतील ना रे सांता? आशा करते, की तुला माझ्या भावना कळल्या असतीलचं. बाकी जास्त काय लिहू? तसा तू समजदार आहेसचं. घरातील ज्येष्ठ मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. लहानास सस्नेह आशीर्वाद.

           कळावे, लोभ आहेच, तो आणखी वाढावा हीच अपेक्षा.

                                             तुझीच एक बाल मैत्रीण

                                                    X.Y. z.

सौ.रेखा देशमुख