पत्र: एक भयाण वास्तव

एक त्याचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करणारा अन् त्याचा जाब विचारणारं, भयाण वास्तव मांडणारं एक तिचं पत्र!

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

विषय - काळ आला होता पण...

कथेचे शीर्षक - निर्णय

...................................................................................... 


प्रिय माझ्या शेतकरी राजा,


                    तर मग काय शेतकरी राजा, सुटलास ना एकदाचा! या सगळ्या पेचातून अन् मोहपाशातून? बरं, मग आता तरी खूश आहेस का? नाही म्हणजे कर्जाचा डोंगर माझ्या आणि आपल्या लेकरांच्या भाग्यात लिहून तू लगेच मोकळा झालास ना कायमचा! म्हणून वाटलं की, कदाचित आता तुझ्या आनंदाला तर सीमाच नसावी. तर याच निमित्ताने मला सांग, सध्या जिथे कुठे तू आहेस तिथे हा अभूतपूर्व आनंद साजरा करण्यासाठी नाचत वगैरे आहेस का? ह्म्म, असं असेल तर भारी आहे बरं! 


                   मस्त! थोडक्यात काय, तर तू आनंद मिळवण्यात यशस्वी झालाच म्हणायचा; पण मला ना सध्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. अरे, असा गोंधळतोस कशाला? मला तर फक्त हेच विचारायचंय की तू समाधानी आहेस ना? आत्महत्या करून! तुला तर माहिती आहे ना, हे विचारणं माझं कर्तव्य आहे म्हणूनच तर विचारतेय मी! 


                   काय झालं? या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे का रे? बरं, मग असू दे! तू मला माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे! मला जास्त काही नाही पण एवढंच सांग, एवढं कठीण होतं का रे आयुष्य जगणं? या प्रश्नाचं तरी उत्तर मला मिळायलाच हवं, नाही का? कारण तुझ्यासोबत मी देखील त्याच झोपडीत राहत होते, दिवसेंदिवस तुला खचताना मीही पाहत होते आणि त्या प्रत्येक क्षणाला मीही कोसळत होते; पण नव्याने उभी राहत होतेच ना! ते सुद्धा फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळेच! 


                   कसं आहे राजा, तुला कधी सांगितले नाही पण आज तू नसताना तुला सांगावेसे वाटतंय की, तुझ्यासोबत लग्न केलं आणि या झोपडीत पाय ठेवला, झोपडी तुझ्यासाठी असेलही पण माझ्यासाठी तर हा महालच आहे, बरं का! तुला सांगते, गृहप्रवेश करतानाच ठरवलं होतं आता पुढे जे येईल वाट्याला ते स्वेच्छेने स्वीकारणार, विना तक्रार जगणार तुझ्यासोबत, तुझ्या पाऊलखुणांवर पाय ठेवून चालणार, कधी तुला आधार देण्यासाठी, कधी तुझा आधार घेण्यासाठी तर कधी तुझ्या सोबतीने पायवाट चालण्यासाठी! 

                  पण कदाचित मीच आभासी विश्वात रमलेली होती कारण प्रत्यक्षात तुला तर माझा सहवासच एवढा बोचायला लागला होता; म्हणून तर एका क्षणात पळवाट काढून मोकळा झालास. हो ना? मला ना सध्या तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, तुझ्याशी ना मोठा वाद घालून भांडण करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुला जाब विचारायचा आहे की, का म्हणून तू तुझं आयुष्य संपवलंस आत्महत्येचा पर्याय निवडून? कुणी दिला तुला हा अधिकार तुझं आयुष्य संपविण्याचा? तू का म्हणून स्वतःचे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतलास कारण हे आयुष्य आताशा तुझं एकट्याचं नव्हतं. आता तू फक्त तू नव्हतास, तू माझा नवरा आणि आपल्या लेकरांचा बाप आहे, हे तू एवढ्या सहज कसे विसरलास? 


                   आता या घडीला आपल्याच लेकरांना असे पोरके करून कसलं रे समाधान मिळतंय तुला? सांग ना! तुझ्या असण्याने माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा ना, आज त्याच चेहऱ्यावर ही उदासीनता पाहताना मिळतोय का रे तुला आनंद? सांग ना, आता का असा निरुत्तरीत झालास? हा निर्णय घेण्याआधी का तू एकदा विचारही नाही केलास? तुझ्यानंतर आमचं काय होईल, याची साधी कल्पना तरी केली होतीस का? कदाचित नसेलच केली म्हणून तर स्वार्थी झालास तू अन् स्वतःचाच स्वार्थ पाहून निसटलास यातून, बरोबर ना? 

                   तुला कसं वाटतंय रे आता, म्हणजे याक्षणी आपलीच बायको आपलीच लेकरे अशी रस्त्यावर आलेली पाहून? बरं वाटतंय का, अख्खं जग आम्हाला टोमणे मारत आहेत, आमच्याच डोळ्यादेखत तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि फक्त बघ्याची भूमिका घेऊन आहोत तर... बोल ना, आज तरी असा गप्प नको राहू! तू गप्प राहिलास ना तर माझ्या मनाचा तो बांध परत सैल होईल आणि माझे सारे एकवटलेले बळ गळून पडेल अन् मी आजही तुला जाब विचारू शकणार नाही म्हणून तू बोल आणि उत्तर दे माझ्या प्रश्नांचे! 


                   तुला माहीत आहे, मी का म्हणून तुझी निवड केली होती? का मी माझ्यासाठी आलेली कित्येक स्थळे नाकारून केवळ तुझ्यासोबत संसार थाटला? जाणून घ्यायचं होतं ना तुला! तू हयात असताना बरेचदा टाळले मी उत्तर पण आज सांगते म्हणून तू ऐक. मी तुला निवडलं कारण तू उच्चशिक्षित होतास खरं पण तरीही तू या मातीला धरून होतास. शहरातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून तू या गावातलं साधं राहणीमान स्वीकारलं आणि वडिलोपार्जित जमिनीवर सोन्यासारख्या पिकाची लागवड करू लागला, इथल्या मातीची निगा राखली. शेती हा व्यवसायच धोक्याचा, बिनभरवशाचा हे माहित असूनही तू सहजासहजी हार न मानता शेतीशीच नाळ जोडली. तुझा हाच निराळेपणा मला भावला; म्हणून धनाढ्य स्थळे नाकारून मी तुला माझा जोडीदार निवडले पण आता प्रश्न पडतो की, दिसलेली तुझी ती छबी भ्रामक होती का? म्हणजे जे गुण मला तुझ्यात दिसले होते ते प्रत्यक्षात तुझ्यात होते की तो माझा निव्वळ भास होता? 


                   नवल वाटतंय का तुला? मला असे तुझ्या कौशल्याबाबत साशंक असलेले बघून? पण तूच बघ ना, तू काय केलेस रे? माझा विश्वासघात केलास? मलाच खोटं ठरवलंस? माझ्याच निवडीबद्दल का मी साशंक न व्हावे आता? सांग ना, का माझा विश्वास खोटा केलास तू? याआधी संकटे आली नव्हती का? याआधी तू शेतीत येणाऱ्या अडचणी मुळासकट दूर केल्याच नाहीत का कधी? केल्या होत्या ना, मग यावेळी काय झालं? 


                   काय फरक पडला एवढा? काही का होईना पण तू समर्थ होतास प्रत्येक आव्हान पेलायला कारण राजा आपल्याहूनही या जगात त्रस्त लोक कमी नाहीत पण तू स्वतःच्याच दुःखाला डोंगराएवढं मानलंस. हो मान्य आहे, गेल्या काही वर्षांपासून पाऊस सारखा दगा देतोय पण मार्ग निघाला असता ना, तुला नाही का वाटले? सांग ना, तू का म्हणून सहज हार मानून घेतलीस? सांग ना! एक बोलू राजा, तुला जर स्वतःवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असता तर तू कधीच एवढे टोकाचे पाऊल उचलले नसते आणि कधीच असा बेफाम वागलाच नसतास तू! एवढा स्वार्थ साधलाच नसतास तू! 


                   म्हणून तर आता मला खूप राग येतोय तुझा म्हणून माझ्या मनात आक्रोश दाटला आहे आणि तोच असा व्यक्त करतेय या लेखणीवाटे, या पत्रावाटे! वाचशील हा पुढे, आणखी बरंच काही व्यक्त करायचंय पण नाही जमतंय सध्यातरी. कसं असतं, आक्रोश नाही ना प्रत्येक वेळी बांधता येत शब्दात ना तो सांडत कागदावर सहजच असा! तरीही लिहिलंय काहीतरी निदान तू वाचावे एवढीच काय ती अपेक्षा! बरं वाचतोय ना? 


काढतात कांकण 

आठवण निव्वळ तुझी.. 

न सांगता गेलास 

काय होती रे चूक माझी.. 


विश्वास तुझ्यावर

काल होता, आहे आजही.. 

पण का विश्वासाची

केली होळी कळले नाही.. 


असह्य जगण्याचा

मज आलाय आता वीट.. 

समजावून सांग 

अपराध माझा रे नीट.. 


ते कर्जाचे डोंगर

पेलण्या होते मी समर्थ.. 

तुझ्यामुळेच होता

माझ्या जगण्याला अर्थ.. 


गेलास तू तरीही

सोडून मज एकटीला.. 

हार मानून चक्क

जिंकविलेस नियतीला.. 


असो.. आता या हाती

आहे फक्त आठवणीच.. 

म्हणून तुलाच आठवून

जगणार आता अशीच.. 


                    हे सगळं वाचून अवाक् झालास का? नको वाटून घेऊ आश्चर्य. हो माहिती आहे, तू सध्या आत्महत्या केलेली नाहीस आणि म्हणूनच तर तू हे पत्र वाचतोय ना माझं! पण आता ऐक, मी तुला स्पष्ट चेतावणी देतेय की, तुझ्या मनात जो विचार येतोय ना आत्महत्या करण्याचा तो झटकून टाक आता आणि याच क्षणी! हे सांगण्यासाठीच मी हे पत्र लिहिलंय. 


                  अरे, ही छोटीमोठी संकटे तुला खाली पाडूच शकत नाही, हे तुला माहिती आहेच. म्हणून तुला साफ साफ सांगतेय, यापुढे कितीही मनात आलं, कितीही संकटे आली तरी तू आत्महत्येचा विचार करणार नाहीस. शपथ आहे तुला माझी आणि आपल्या लेकरांची! ही शपथ मोडण्याचा तू प्रयत्न करणार नाहीस जर या पत्रात व्यक्त केलेल्या आक्रोशाला तुला बळी पडायचे नसेल तर! 


                   आता हे अश्रू पुस आणि उद्यापासून नवी सुरूवात कर, नव्या उमेदीने! माझ्या शेतकरी राजा, मला विश्वास आहे तुझ्यावर म्हणून तू सुद्धा स्वतःवर विश्वास ठेव. कळलं ना! 


-  तुझीच बायको.  

        

                   त्याने हे पत्र वाचलं आणि तो काही क्षणांसाठी स्तब्धच झाला जणू अन् तेवढ्यात काही कळायच्या आत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्याने लगेच ते पत्र छातीशी कवटाळून घेतले. थोड्या वेळाने त्याने ते पत्र त्याच्या लेकीच्या वहीत जसेच्या तसे ठेवले आणि वही नीट ठेवली. नंतर एकदा लेकीकडे आणि एकदा स्वतःच्या बायकोकडे पाहिले.


तो लगेच त्याच्या लेकीजवळ गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून मनातच बोलू लागला, " माझी लेक एवढं भारी लिहिते मला हे आज कळलं. आज माझ्या लेकीमुळे मी एक चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वतःला परावृत्त केलं. प्रिया बाळा, तू कोणत्या हेतूने हे पत्र लिहिलंस मला नाही माहिती पण आज हे पत्र वाचताना हे पत्र लिहिणारी मला तुझी आईच वाटली आणि ते पत्र ज्या व्यक्तीसाठी लिहिलंय तो शेतकरी राजा मला माझ्यातच गवसला. 


                   खरंच, आज जर हार पत्करून मी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असता तर पत्रात व्यक्त केलेला आक्रोश मला सहन नसताच झाला. खरंच, मला नाही हक्क प्रिया तुला पोरके करण्याचा वा तुझ्या आईचे कुंकू पुसण्याचा! मला माफ कर बाळा, मी आज अपराध करणार होतो पण आज फक्त तुझ्यामुळे मला माझी चूक कळली आणि म्हणून मी आज तुला वचन देतो की, मी आता कधीच कितीही संकट आले तरी हार मानून घेणार नाही. आत्महत्या करून पळवाट काढणार नाही बाळा, वचन आहे माझे तुला! " मनोमन बोलून त्याने त्याच्या लेकीच्या कपाळावर ओठ टेकवले. 


                  नंतर त्याने लेकीच्या अंगावर अंथरून नीट पांघरले व तो सुद्धा लेकीशेजारीच पहुडला आणि झोपी गेला. 


                   तो अर्थात रमेश खोत, उच्चशिक्षित शेतकरी! तो त्या रात्री आत्महत्या करणार होता कारण त्यादिवशी त्याच्या शेतात शिरून रानडुक्करांनी पिकांची अमाप नासधूस केली होती. यंदा त्याने मर्यादेपेक्षा जास्त कर्ज काढून पीक लागवड केली होती; पण रानडुक्करांनी पिकांची केलेली अशी नासधूस बघून तो अक्षरशः खचून गेला होता. 


                     'विनाश काले विपरित बुध्दी' म्हणतात ते काही वावगे नाहीच, रमेश देखील याला अपवाद नव्हता. तो नैराश्याच्या नौकेत स्वार होऊन आत्महत्या करायला निघाला होता पण योगायोगाने त्याची नजर माठाशेजारी असलेल्या एका वहीवर पडली. कळत नकळत त्याने ती वही हातात घेतली आणि प्रियाने अर्थात अकरावीत शिकणाऱ्या त्याच्या लेकीने महाविद्यालयातील एका उपक्रमात लिहिलेलं पत्र वाचायला सुरुवात केली. 


                    ते पत्र वाचून त्याचे डोळे उघडले. नैराश्याचा सागर रमेशला अयोग्य निर्णय घेण्याला प्रवृत्त करत होता म्हणूनच तो चुकीच्या मार्गावर पाऊल टाकणार होता. कदाचित त्या एका टोकाच्या निर्णयाने परत एकदा एक शेतकरी कुटुंब बळी जाणार होते; परंतु, अजाणतेपणी असे काही घडून आले की, जरी त्याचा काळ आला होता पण त्याचा अंत झाला नव्हता. थोडक्यात, कळत नकळत त्याच्या लेकीने त्याची अशी कान उघाडणी केली की, आता तो स्वप्नातही आत्महत्येचा विचार करणार नव्हता. त्याने त्या नकारात्मक विचारांची कायमची हकालपट्टी केली होती. 


                    दुसऱ्या दिवशी रमेशला पहाटेच जाग आली. लगेच आवराआवर करून तो गेला त्याच्या शेतात, नव्या उमेदीने, नव्या जोमाने! त्याला रानात गेलेले पाहून त्याच्या बायकोलाही समाधान वाटले. तिलाही माजघरात आवराआवर करताना तिच्या लेकीची वही दिसली अन् तिचीही दृष्टी त्याच पत्रावर पडली. 


                  तिने ते पत्र वाचताच रमेश परत नव्या उमेदीने लढायला कसा तयार झाला, तिच्या या प्रश्नाचे उत्तर तिला त्या पत्रातून सहज मिळाले अन् लगेच तिचे डोळे पाणावले. तिने आपल्या लेकीकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. रविवार असल्याने आवराआवर करून ती सुद्धा लेकीला घेऊन रानात गेली.


                  रानात पोहोचल्यावर रमेशला उत्साहाने काम करताना पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, प्रियाला देखील तिच्या वडिलांचा अभिमान वाटला. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे चैतन्य पसरले. दोघी मायलेकींनी एकमेकींचा हात घट्ट पकडला व दोघीही एकमेकींकडे पाहून मंद हसल्या. त्या दोघींना रानात आलेले पाहून त्यांच्याजवळ रमेशही आला व त्याने हसून दोघींकडे पाहिले अन् क्षणाचा विलंब न करता घट्ट आलिंगन दिले. 


समाप्त.


©®

सेजल पुंजे

०४/०८/२०२२.

टीम नागपूर.