पत्र लिहिण्यास कारणे की

Love Is Reason to Connect


प्रिय नवरोबा,

अनोळखी तू कधी आयुष्याचा भाग झालास कळलंच नाही.मला प्रत्येक निर्णय घेताना आधी तुझा विचार येतो.विभिन्न स्वभाव आपले, तरी लग्नाच्या ह्या गोड बंधनाने सर्वच आपलंसं करायला लावले.एकाने सांडलं तर दुसऱ्याने त्याला सावरायचे.कप आणि बशी सारखं नातं एकमेकांशिवाय अपुर्णच..
कामावरून थकून भागून घरी आला ना की तुझा थकलेला चेहरा पाहते.घामाने भिजलेलं शर्ट .सकाळी ऑफिसला जाताना टापटीप गेलेला तू येताना ट्रेन, बस आणि पायी चालत रोज तीन तास प्रवास करतो खरंच कौतुकही वाटतं तुझं .आपल्या संसारासाठी झटणारे शरीर नेहमी सदृढ राहो हीच प्रार्थना देवाकडे मागते.

तुला माहितीये मला सर्वात जास्त तुझी कोणती गोष्ट आवडते ??तुझ्या नजरेत मी बायको नाहीच मी एक मैत्रीण आहे.ते बायकांनी फक्त चार भिंतीच्या आत राहावं अश्या विचाराचा नक्कीच नाही.तुला जे हवे ते कर हे वाक्य नेहमीच मला सुखावते आणि काहीतरी करण्याची प्रेरणा देते .लग्नाआधी भीती वाटायची की कसा असेल नवरा?कसा वागेल?अनेक प्रश्न डोक्यात होते.तू तर एकदम गोड निघाला रे.

नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा किती स्मार्ट राहायचा तू.एकदम हिरो. वेगवेगळे घड्याळ होते तुझे. किती तरी कपडे, शुज.बोलतात स्त्री थोड्या क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता. पण जेव्हा तू स्वतः वडील झाला तेव्हा मात्र तुझ्यामध्ये खरंच वडिलांनी जन्म घेतला. स्वतःच्या कोषात जगणारा तू बायको आणि मुल ह्यांना महत्व देऊ लागला. नवनवीन कपडे, घड्याळ घेण्याचा छंद कधी काळाच्या ओघात गडप झाला कळलंच नाही.
स्त्रियांना वय विचारत नाही कारण त्या दुसऱ्यांसाठी जगतात. तूसुद्धा तसाच की, स्वतःसाठी जगणं सोडून दिले आहेस.तू जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलास तेव्हा तुला पाहिले आणि दिल खल्लास झाला.पाच वर्ष कॉलेजमध्ये गेले.आजूबाजूला खुप लैला मजनू भटकत होते पण तुला पाहिले आणि मनाने ग्रीन सिग्नल दिला "हा यही प्यार है".चार वाजता तू येणार होतास आला पावणे चारला.त्यात मी कशीबशी आपली तयारी करत होती.तसा तू वेळेचा पक्का आहे माझ्या आधी तू बाहेर जायचे म्हंटले की तयार होऊन बसतोस. मी भाबडी आपली त्यात गोगलगाय हळूहळू माझी तयारी चालू असते.. तुला तर माहितीये ना मला थोडा मेकअप केल्याशिवाय बाहेर जायचा फिल येत नाही..तेव्हा किती चलबिचल चाललेली असते तुझी मनात, चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते .माझी कधी एकदाची तयारी होते ह्याची वाट बघत असतो .कितीतरी बारकावे मी टिपत चालली आहे..तू मला नेहमी विचारतो ना तुला लक्षात आहे का मी तुला बघायला कधी आलो होतो ..?आपली सुपारी कधी फुटली?लग्नाची वेळ??जेव्हा हे तू विचारतो ना तेव्हा तुझा चेहरा एकदम प्रसन्न असतो का माहितीये?? कारण तुला तारीख वेळ लक्षात राहत नाही आणि राहिली तरी मला सगळं आठवतं ह्याचे तुला कौतुक वाटते.तू कधी काय बोलशील ?काय विचार करशील ?आता सर्व ओळखायला लागली आहे .

तुला मान्य करावेच लागेल हा जितकं मी तुला ओळखते तितकं काय तू मला ओळखत नाही.मला कोणत्या गोष्टीचा राग येतो,मी कधी उदास असते अगदी मी कधी रुसण्याची नाटकं करते ह्यातलं तुला काहीच कळत नाही हो पण मला इतकं माहीत आहे की तू कधीकधी माहीत असून न माहीत असल्याची नाटकं करतो ते चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते.. सोनार जसा सोन्याची पारख करतो तसेच अगदी आम्हा बायकांचे असते नवऱ्याला बरोबर आम्ही ओळखतो.

तुला माहितीये जेव्हा आई तुझ्या डोक्याला तेल लावून मालिश कारायच्या तेव्हा ना मी तुला बघायची किती गोड दिसायचा तू ,एकदम गोंडस ..अगदी तुझं वागणं ना लहान मुलागत असायचे .आईसुद्धा खूप खुश व्हायचा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी डोळ्यात साठवायची..त्यांच ते मिश्किल हसणं, डोळ्यात वेगळी चमक यायची.. का माहीत आहे? कारण मुलगा स्वतः वडील झाला तरी मला किती लाडीगोडी लावतो ही भावना त्यांना खरंच सुखवायची.. एक गोष्ट मला तुझी मनापासून आवडली आणि आजही तितकीच मनापासून आवडते ती म्हणजे तू आईचा नेहमी आदर केला.कधी तिच्याशी मोठ्या आवाजात बोलला नाही..कधी तिला त्रास होईल वागला नाही.आईला नेहमी तुझं कौतुक वाटायचे का माहीत आहे ?कारण त्यांना माहीत होतं माझा मुलगा कधी मला दुखावणार नाही. तुझ्या आवडीनिवडी नेहमी त्या जपायच्या,तुला काय आवडते त्या नेहमी करायच्या.देवाघरी जाण्याच्या दोन महिन्याआधी त्या मला म्हणाल्या होत्या की "माझ्या नंतर तुलाच बघायचे आहे माझ्या मुलाला"कसं असतं ना आईचे काळीज सगळं समजतं तिला...तू आईचा नेहमीच नेहमीच आदर केला.आई जरी नसली ना तरी बघ ती तुझ्या पाठीशी नेहमी उभी आहे बघ...आई कधी मुलांना सोडून जाते का?शेवटी तिची प्रेमाची ,मायेची नाळ इतकी घट्ट आहे ना की मरणसुद्धा आई आणि मुलाला विभक्त करू शकत नाही.

जसं लोणचं जितकं मुरतं तितकं चविष्ट लागते अगदी तसेच ह्या नवऱ्या बायकोच्या नात्याचे असते वर्ष जसजशी पुढे जातात तसतसे तो आणि ती एकमेकांना इतके ओळखू लागतात मग भांडण, वादविवाद क्षणिक होऊन जातात.त्यांना काडीमात्र किंमत राहत नाही.एक अदृश्य शक्ती जी दोघांना बंधनात ठेवते कदाचीत ह्यालाच ओढ म्हणतात ही ओढ,प्रेम फक्त वाढत जाते वाढत जाते त्याला अंत नसतो.बरोबर ना नवरोबा?

कसे वाटले पत्र नवरोबा?
कळावे.

तुझी नेहमीच व्यक्त होणारी
बायको.