पाठीराखा

श्रावणी लोखंडे


इतकी वर्षे पाठीराखा म्हणून उभा राहिलास......आज का रे कोपलास तू???? इतक्या वर्षाचा संसार माझा.......एका क्षणात मोडलास तू. कोपण्याआधी थोडा वेळ तरी द्यायचा होतास रे......मी कणा मोडलेली म्हातारी नातवासाठी किरवं आणायला शेताकडे गेले म्हणून वाचले...... पण माझ्या नातवाला,सुनेला नी माझ्या कुकवाला घेतलंस की रे तुझ्या कुशीत. लेक माझा जवान हाय.......तो त्या पार..... देशाची रक्षा करतोय काय त्याला तोंड दाखवू....... पण तू रे पाठीराखा ना आमचा....... मग का केलास आमचा घात.


चार भिंती उभ्या करू रे आम्ही परत पण त्या घराला घरपण देणारी माणसं नाय रे आता........कोण किती खोल गेलंय ते पण माहीत नाही........ सोन्यासारख गाव माझं आता नुसताचं चिखल आहे. तरण्याताठ्या पोरी गेल्या आता कोणी नाही रे आम्हाला वाली.


शेजारच्या वाड्यातली सखू लसूण मिरची घेऊन यायची नि म्हणायची.... ओ आई.......वाईज पाट्यावर चटणी वाटून द्या ना.......तुमच्या हातची चव छान लागते. आमचे हे तर टिचभर चटणीसोबत तीन भाकऱ्या खातात. आता रे कोणाला देऊ चटणी वाटून. ज्या नवऱ्यासाठी चटणी वाटायला सांगायची, तो तर तिच्याच नावाचा टाहो फोडतोय. त्याची पण बायको नि वर्षभराची पोर गिळलीस रे तू.

भगवंतां अजून कितीतरी मृतदेह निघायची आहेत. किती शक्ती दिलीस तरी नजरेसमोरची माणसं डोळ्यांदेखत चिखल झालेली कशी रे बघायची.

भाऊ बहिणीला शोधायला येतो पण तिथं त्याला...... तीच नख बी सापडत नाही तो तिथंच हंबरडा फोडतो.अगं ताई.......येणार होतो गं....... या रखीपोर्णिमेला तुझ्या आवडत्या रंगाची साडी घेऊन.हिरवाकंच पदर आवडतो ना गं तुला......रुसलीस काय गं माझ्यावर.....भावाला भेटण्याआधीच गेलीस काय गं तू........


नवरा बायकोला पिऊन आल्यावर ओरडतो पण आता डोळे वटारायला पण कोणी नाही म्हणून तो ही आक्रोश करतो.
अगं राणी......रात्री ओरडलो म्हणून एवढी काय गं रुसतेस.तुझी शपथ पुन्हा दारू पिऊन नाही येणार. तू फक्त परत ये....... दारूला कधीच हात नाही लावणार.......अगं या आडग्याला टाकून जाऊ नको गं......काय करणार मी तुझ्या शिवाय.........आई......अगं तू तरी बोल.......तू तरी दिस गं....... दारू पिऊन आलो की झाडण्यानि झोडपून काढ......... पण परत ये गं......दोघी पण गेलात एकदम आता मी कोणासाठी जगू.........


इतकी वर्षे इमाने इतबारे संसार केलेली माय... तीला पण अश्रू अनावर होतात.
अरे........माझ्या धन्या.........कसा रे गेलास तू.........अरे तुझ्या साठी तर वटपोर्णिमा करत होते ना रे........आता वाणात जास्तीचे पैसे टाकायला कुणाशी रे भांडू.......रं माझ्या धन्या..........

सांग तरी परमेश्वरा कोणा कोणाला सावरू.........

एवढा कसा रे तू निर्दयी झालास..........एवढा कसा रे तू निर्दयी झालास.........

कुणाची माय गेली,कुणाचा बाप गेला,कुणाचा पोरगा गेला तर कुणाचा नवा संसार गेला.......आता आक्रोश फक्त आपल्या माणसांसाठीचा. ओरडून रडलो तरी कोणी नाही रे येणार आता. सगळे चिखलात कायमचे निवांत झोपलेत.

आता कोणाला चिखलात गुंडाळलेली बघायची ताकद नाही रे माझ्यात.......माझा लेक आला की त्याला बिलगून रडून घेईन. तो येईस्तोवर तरी माझं गेलेलं कुटुंब सापडू दे एवढीच परमेश्वराला विनंती........


डोळे मिटायच्या आधी माझी सगळी लेकरं नजरेस पडू दे.

रायगड जिल्हा महाड तालुक्यातील तळई गावी दरड कोसळून मृत्यू पावलेल्या नागरिकांना *भावपूर्ण श्रद्धांजली*