Feb 24, 2024
वैचारिक

पाठीराखा (रक्षाबंधन विशेष)

Read Later
पाठीराखा (रक्षाबंधन विशेष)


" सौम्य, बाळा तुझ जॅकेट कुठे आहे बाबांनी आणलेलं? ", आईने विचारल..

" आहे आई, तुला हवं आहे का आत्ता? "

" नाही तू कॉलेज वरून आला तेंव्हा दिसल नाही म्हणून विचारल "

" ते मी काढून बॅगेत ठेवलं होत. ", सौम्य नजर चोरत म्हणाला.

" बर, ठीक आहे. "


काही वेळाने ऑफिस मधून बाबा घरी आले. जेवण झाली, गप्पा गोष्टी झाल्या आणि बोलत असतानाच बाबांचं लक्ष सौम्य च्या हाताकडे गेलं..

" सौम्य, इकडे ये जरा. "

" काय बाबा. "

" तुझा हात दाखव.. "

" का,काय झालं? ", त्याने गडबडून विचारल..

" दाखव म्हणतो आहे ना मी.. "

सौम्य हात दाखवायला टाळाटाळ करत होता म्हणून बाबांनी त्याचा हात पकडुन जवळ ओढला. एक हलकीशी कळ सौम्यच्या डोक्यात गेली. हातावर दंडापासून खांद्यापर्यंत ओरखडा उठला होता, आणि हात काळानिळा पडला होता.

" सौम्य काय रे हे? ", बाबांनी मोठ्याने विचारल.

" अहो काय झालं? ", आई बाहेर आली.

" हे बघ.. सौम्य, कुठे मारामारी केलीस? "

" कुठे नाही बाबा.. अहो बस मधून येत होतो तेंव्हा एक पत्रा निघाला होता. तो हाताला घासून गेला. म्हणून ओरखडा उठलाय. बाकी काही नाही. "

" अरे बाबा परीक्षा चालू आहेत तुझ्या सध्या. जरा जपून काम करायला काय होत? आणि किती धसमुसळपणा करावा माणसाने. डॉक्टर कडे जाऊन आलास का? ", आईने विचारल.

" नाही, जातो आता. डॉक्टर मुळे काकांची अपॉइंटमेंट घेतली होती मगाशी. आलोच जाऊन. "


सौम्य मुळे काकांकडे जाऊन इंजेक्शन घेऊन आला. पत्रा गंजलेला असेल तर रिस्क नको म्हणून काकांनी धनुर्वताच इंजेक्शन घ्यायला लावलं. डॉक्टर काकांकडून येऊन तो खाली मित्रमंडळींबरोबर गप्पा मारायला थांबला. १०-१५ मिनिटांनी घरी आला कारण उद्या परीक्षा होती.


सकाळी दहा वाजता सौम्य ची घरी गडबड चालू होती. १२:०० वाजता परीक्षा होती आणि त्याला त्याचा आयकार्ड सापडत नव्हत. कॉलेज चे नियम खूप कडक होते. आयकार्ड शिवाय परीक्षेला बसायची परवानगी नव्हती, अगदी तुम्ही त्या कॉलेज चे विद्यार्थी असाल तरीही.

आई आणि बाबा दोघेही आयकार्ड शोधायला मदत करत होते. पण त्यांना सुद्धा ते सापडत नव्हत.

" अरे सौम्य, बाळा तू कुठे ठेवलं होत रे आयकार्ड? असा कसा वेंधळा आहेस तू! ", बाबांनी विचारल.

" अहो बाबा, मला खरच आठवत नाहीये हो मी कुठे ठेवलं होत ते... अरे हा मी तर ते जॅकेट मध्ये ठेवलं होत.. ", अचानक सौम्य शांत झाला..

" जॅकेट मध्ये ना! मग इकडे काय शोधतोय? जॅकेट कुठे ठेवलं आहेस ते बघ. "

" अरे बाळा, तू काळ तर मला म्हणालास की तू जॅकेट तुझ्या बॅगेत ठेवलं होतं म्हणून. थांब मी तुझी बॅग आणते. ", अस म्हणून आई बॅग आणायला गेली.

" अरे बॅगमध्ये तर जॅकेट नाहीये. तू काढून ठेवलं आहेस का? अरे बोल काहीतरी सौम्य.. "

" सौम्य, जॅकेट कुठे आहे? ", बाबांनी त्याचा हात ओढून त्याचा चेहरा स्वतःसमोर केला..

" मी काय विचारतोय सौम्य, जॅकेट कुठे आहे? कुठे आहे जॅकेट? ", बाबांचा आवाज वाढला.

" अहो.. ", आईने मध्ये बोलायचा प्रयत्न केला

" तू गप्प बस. याच्या वाढदिवसाला एवढं खर्च करून ते जॅकेट आणून दिलं होत. आणि या माणसाने देव जाणे ते कुठे टाकलंय. तुला काही अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? मी काय तुला
अंबानींचा भाऊ वाटतोय, की तू एक जॅकेट हरवल आणि मी तुला असाच सोडून देऊ? ते काही नाही. आजपासून तुझी २ महिन्यांची पॉकेटमनी बंद. रात्री मित्रांबरोबर खाली राऊंड मारायला जाणं बंद, घरी.. " बाबा अजूनही बोलले असते तेवढ्यात घराची बेल वाजली.

बाहेर जाऊन बाबांनी दरवाजा उघडला. बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते.

" माफ करा, मी आपल्याला ओळखल नाही. आपल्याला कोणाला भेटायचं आहे? ", बाबांनी विचारल.

" मनोहर जोशी यांचं घर हेच ना? ", त्यांनी विचारल.

" हो, मीच मनोहर जोशी. मी अजूनही तुम्हाला ओळखलं नाही. "

" नाही, तुम्ही मला नाही ओळखत.. पण मी तुम्हाला ओळखतो. म्हणजे, तुमच्या मुलाला ओळखतो. "

" माझ्या मुलाला.. सौम्य, जरा इकडे ये.. ", बाबांनी बोलावलं.

" काय बाबा? "

" तू या काकांना ओळखतोस? "

" नाही बाबा. "

बाबांनी त्यांच्याकडे डोळे बारीक करून बघितलं.

" थांब, तुला एक गोष्ट दाखवतो. त्यावरून तू मला नक्की ओळखशील. " अस म्हणून त्यांनी त्यांच्या हातातल्या पिशवी मधून एक जॅकेट बाहेर काढलं.

" सौम्य, तुझा जॅकेट या काकांकडे काय करतय? "

" थांबा, मी सांगतो. काल तुमचा मुलगा जर नसता ना तर माझ्या मुली बरोबर काय झालं असतं देव जाणे .. ", ते काका म्हणाले.

" अहो काय बोलतायत तुम्ही? जरा समजेल अस बोला.. ", बाबा गोंधळून म्हणाले.

" म्हणजे, सौम्यने तुम्हाला काहीच सांगितलं नाही? "

" कशाबद्दल? "

" अहो काल माझी मुलगी तिच्या कॉलेज वरून घरी येत होती. तेंव्हा काही मुलांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिने विरोध करायचा प्रयत्न केला तर त्यांनी तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. त्यापैकी एका गुंडाची तिच्या कपड्यांना हात लवण्यापर्यंत मजल गेली. ", ते गृहस्थ सांगत होते.

" तेवढ्यात सौम्य ने ते बघितलं. तो स्वतःची पर्वा न करता माझ्या मुलीच्या रक्षणाकरिता धावून गेला. त्यापैकी एका गुंडाच्या हातातला चाकू त्याच्या हातातला लागून जखम सुद्धा झाली. बाकी माणसं तमाशा बघत असताना फक्त तुमच्या मुलामुळे काल तिच्या बरोबर काही चुकीचं घडल नाही. सौम्य, बाळा तुझी जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. ", ते काका म्हणाले.

" त्या गुंडांबरोबर झालेल्या झटापटीत माझ्या मुलीच्या अंगावरचे कपडे थोडे फाटले, म्हणून याने याचे जॅकेट तिला दिले. तिला रिक्षा शोधून दिली आणि तिला व्यवस्थित घरी पोहचवले. घरी आल्यावर तिने मला हे सगळे सांगितले. एवढे सगळे झाले पण तिला ह्याचे नाव माहीत नव्हते. त्यामुळे याचे आभार कसे मानायचे हे समजत नव्हत. पण त्याच्या जॅकेटच्या खिशात आम्हाला हे आयकार्ड सापडलं. त्यावरून मी तुमच्या घराचा पत्ता शोधत इथे आलो. तुमच्या मुलाचे मी जेवढे आभार मानले तेवढे कमी आहेत. ", ते म्हणाले.

बाबा अवाक होऊन सौम्य कडे बघत होते.

" सौम्य, बाळा तू आम्हाला काही सांगितले का नाहीस? "

" बाबा मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हत म्हणून मी काही बोललो नाही. पण काका, तुम्हाला घराचा पत्ता कसा काय मिळालं? आयकार्ड वर तर कॉलेजची माहिती असते फक्त.. ", सौम्य ने विचारल.

" अरे मी आधी तुझ्या कॉलेज मध्येच गेलो होतो. मी खर म्हणजे आज संध्याकाळी येणार होतो प्रिया सोबत.. प्रिया म्हणजे माझी मुलगी. तर हो, मी संध्याकाळी येणार होतो तिला घेऊन. पण मी कॉलेज मध्ये गेलो तर मला समजल की कॉलेज मध्ये तर परीक्षा चालू आहेत. आणि आयकार्ड शिवाय काही तुला परीक्षा देता येणार नाही. म्हणून मी कॉलेज मधून तुझ्या घराचा पत्ता घेतला आणि तुला आयकार्ड द्यायला इकडे आलो. ", ते काका म्हणाले.

" थँक्यू काका.. ", सौम्य म्हणाला.

" अरे तू जेवढी माझी मदत केली आहेस त्यासमोर तर मी जे केला आहे ते काहीच नाही. बर, तुला आता उशीर होत असेल परीक्षेला जायला. मी संध्याकाळी येतो. आज संध्याकाळी काय आहे ते आठवतंय का? "

" काय आहे आज ? "

" अहो आज रक्षाबंधन आहे ना.. प्रियाला याला राखी बांधायची इच्छा आहे. म्हणून मी म्हणतोय की तिला संध्याकाळी घेऊन येतो. चालेल ना? ", त्यांनी विचारल.

" अहो काका, चालेल काय पळेल. बर, मी निघू का आता, सेंटर वर अर्धा तास आधी जावं लागत. "

" हो, हो. तू निघालास तरी चालेल. "


संध्याकाळी सौम्य परीक्षा देऊन घरी आला. काही वेळाने घरी प्रिया आणि तिचे बाबा घरी आलेले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. प्रियाला ओवाळणी म्हणून सौम्यचे तेच जॅकेट हवे होते, ज्याने काल तिचे रक्षण केले होते. आणि सौम्याने सुद्धा ते हात हात तिला दिले. दोघेही एकुलते एक होते, पण आता तिला एक *पाठीराखा* भाऊ मिळाला होतं आणि त्याला एक बहिण.

•समाप्त•

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuj Chabukswar

Student

Story Writer

//