पाठलाग भाग अंतिम

Gosht Nyayachi
"कावेरी माझ्या नवऱ्याविरुद्ध तक्रार करून तू हे चांगले नाही केलेस. याची किंमत तुला मोजावी लागेल हे चांगलेच लक्षात ठेव." विलास मामाची बायको, वंदना मामी कावेरीला धमकी देऊन निघून गेली.
"आपल्या नवऱ्याला आजवर हिने पाठीशी घातलं नसतं तर ही वेळच आली नसती." नंदिनी बाईंनी आपल्या डोळ्याला पदर लावला.
पोलिसांनी विलास मामाला पुन्हा ताब्यात घेतले. मात्र ओळखीचा धाकटपशा दाखवून तो पुन्हा सुटला. पोलीसही म्हणाले, 'आम्हाला पुरावा हवा त्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही.'

"आज ना उद्या तुझी गत त्या यमुनेसारखी होईल," अशी धमकी मामा कावेरीला देऊन गेला.

"कावेरी, काहीही झालं तरी मला, तुला आणि ज्या बायकांनी तक्रार केली त्यांनी न्याय मिळायला हवा. आता तू माघार घेऊ नकोस. मी सतत तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस." पहाटे पडलेल्या स्वप्नाने कावेरी खडबडून जागी झाली. 
'आता काहीही झाले तरी यमुना ताईंना मी न्याय मिळवून देईनच,' असे म्हणत कावेरीने सर्वांना विश्वासात घेऊन, प्रयत्न म्हणून एक योजना आखली. त्यानुसार विलास मामाला तिने आपल्या शेतावर बोलावले.
"मामा, काय असेल ते आपसांत मिटवून टाकू." असे म्हणत कावेरीने पोलिसांनाही आपल्या मदतीला घेतले.
ठरल्यावेळी विलास मामा शेतावर पोहोचला. कावेरी तिथे आधीपासूनच हजर होती. 
"मामा, साऱ्या गावभर वार्ता होते. नसत्या चर्चांना उधाण येत म्हणून गोष्टी जिथल्या तिथे मिटलेल्या बऱ्या." कावेरीने मनात नसतानाही विलास मामा समोर हात जोडले.

"ते सारं जाऊ दे. पण देशमुखांच्या सुना जास्तच सुंदर आणि बुद्धिमान असतात हे मात्र खरं. हे बघ कावेरी, हे झालं गेलं सगळं विसरून जा आणि माझ्याशी एकनिष्ठ राहा. त्या देशमुखांच्या घरातून तुला बाहेर कसे काढायचे हे मी पाहतो." विलास मामा पुढे येत म्हणाला.

तशी कावेरी मागे जात विहिरीजवळ आली. 

"अगं, याच विहिरीत जीव देऊन तुझी सवत गेली..तेही माझ्यामुळे." विलास मामाने विचित्रपणे हसत कावेरीचा हात पकडला.
इतक्यात दबा धरून बसलेले पोलीस, दिवाकर, नंदिनी बाई, गोविंदराव, अनेक गावकरी सारेच बाहेर आले. हे पाहून मामा चपापला.
"आम्हाला केवळ पुरावा होता विलास. तो आज मिळाला. आता तुला योग्य ती शिक्षा कशी होईल याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करू."इन्स्पेक्टर पुढे येत म्हणाले.

"ही.. ही सगळी तुमची चाल होती तर? मला फसवलसं तू कावेरी." आता मामाला काय करावे हे सुचत नव्हते.

"अहो, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला आणि तुम्ही असे वागलात? खरंच मला लाज वाटते तुम्हाला नवरा म्हणवून घ्यायची." वंदना मामी जोरजोरात रडू लागली.

"मी काहीच केले नाही वंदना. हे सारे मिळून मला फसवत आहेत. कावेरी मला माफ कर गं. ही अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही." आता विलास मामा कावेरी समोर हात जोडून उभा होता. 

कावेरी काही बोलणार इतक्यात तो कुणीतरी खेचल्यासारखा विहिरीपाशी जाऊ लागला आणि काही कळायच्या आतच विलास मामाने विहिरीत उडी मारली.
"दिवाकर, त्याला पोहता येत नाही रे..वाचव त्याला." नंदिनी बाई कितीतरी मोठयाने ओरडल्या.
सारेच धावत विहिरीजवळ गेले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. सारे काही संपले होते. 

"मामाला कायद्याने शिक्षा झाली असती, तर तेच बरे झाले असते." दिवाकर आपल्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला. 

"देवाने ही संधी याआधी तीन -चार वेळा दिली होती दिवाकर. पण मामाने ती नाकारली. अखेर यमुनाताईंना न्याय मिळाला. हेही तितकेच महत्त्वाचे नाही का?" कावेरी.

"आपण केलेले कर्म पाठलाग करत शेवटी आपल्यापाशीच येते. या नराधमाला योग्य ती शिक्षा मिळाली." गर्दीत कुणीतरी म्हणाले आणि कावेरीला मात्र यमुना आठवत राहिली 'मी सतत तुझ्या पाठीशी आहे.' हे विसरू नको म्हणणारी.

समाप्त.
©️®️सायली जोशी.
 

🎭 Series Post

View all