पाठलाग भाग 4

Gosht Nyayachi

"कावेरी, काय झाले?" दिवाकर नुकताच शेतातून परतला होता. 

"दिवाकर, ते मामा, आत्ता येताना त्यांनी माझा हात पकडला आणि.." कावेरीने सगळी हकीकत दिवाकरच्या कानावर घातली.


"त्याची ही हिंमत? आई, मी तुला बोललो होतो, त्याच घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून. आज मात्र मी त्याला अजिबात सोडणार नाही." 


"नको. आता तुम्ही कुठेही जाऊ नका. खरंच मला खूप भीती वाटते." कावेरी दिवाकरला बिलगली.

एव्हाना म्हादू दोन-तीन माणसांना घेऊन विलास मामाच्या मागावर गेला होता.

दिवाकरने कावेरीला आपल्या जवळ घेतले. कावेरी भीतीने अजूनही थरथरत होती. 


नंदिनी बाई पुढे होत म्हणाल्या, "दिवाकर इथून पुढे सावध राहण्यासाठी कावेरीला आता सारे सांगितलेच पाहिजे."


"दिवाकर, आता तरी सांगा, यमुना कोण? आणि तिचा आपल्या घराशी काय संबंध आहे? बोला दिवाकर, मी आणखी वाट पाहू शकत नाही आता." कावेरीचे डोळे घळाघळा वाहत होते.


"कावेरी, मी जे सांगणार आहे ते मन घट्ट करून ऐक. यामागे तुला फसवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. खरंतर आपल्या लग्नाला मी तयार नव्हतो. पण माझ्या यमुनेची छबी तुझ्यात दिसली आणि मी या लग्नाला तयार झालो. कावेरी, यमुना माझी पहिली बायको. अगदी तुझ्यासारखीच होती. सालस, सोज्वळ, सुंदर! लग्नानंतर लवकरच ती या वाड्यात रुळली. सर्वांना तिने आपलेसे केले. तेव्हा विलास मामाचे आमच्याकडे सारखे येणे- जाणे असायचे. 'आमच्या सुनबाई' म्हणत म्हणत विलास मामा आणि यमुनाचे सूर कधी जुळले हे कोणाला कळलेच नाही. यमुनेच्या मनात वेगळे काही नव्हते. मात्र मामा तिला कोणता नजरेने पाहतो हे आम्हाला कधी कळलेच नाही. 

एक दिवस आम्ही दोघे शेतावर गेलो होतो. मामाही आमच्या सोबत होता. मी काम करत यमुनेपासून थोड्या दूर अंतरावर गेलो. इतक्यात मामाने डाव साधला, तिला आणखी दूर नेले आणि तिच्यावर हात टाकला. डाव साधून मामा पळून गेला. बरीच शोधाशोध केल्यानंतर यमुना आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडली. प्रसंग ओळखून आम्ही पोलीस कम्प्लेंट केली. ही घटना बाहेर कुठे उघडकीला येऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले.

पुढचे चार दिवस ती अगदी विचित्र अवस्थेतून गेली. काही बोलण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. चार दिवसानंतर यमुनाने विलास मामाचे नाव घेतले, तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून गुन्हा कबूलही करून घेतला. मात्र ओळखीने विलास मामाने स्वतःची सुटका करून घेतली आणि काही दिवसानंतर यमुनाने आपल्या शेतातल्या विहिरीत उडी मारून जीव दिला. अखेर यमुनाला न्याय मिळालाच नाही. मी एक नवरा म्हणून हरलो गं कावेरी..माझ्या बायकोची मी कसलीच मदत करू शकलो नाही. ही भावना माझे मन खात राहते. शिवाय यमुनेची अवस्था आठवली की जीव जातो माझा.

नंतर आमच्या जाचामुळे यमुनेने जीव दिला अशी बतावणी मामाने साऱ्या गावभर केली." इतके बोलून दिवाकर सुन्नपणे बसून राहिला.


कावेरी थक्क होऊन ऐकत होती.

"अहो, हे मला आधी का नाही सांगितलं?" 


"आम्हाला वाटलं, हे ऐकल्यावर दिवाकरला कोणी मुलगी द्यायला तयार होणार नाही." नंदिनी बाई मध्येच म्हणाल्या.

"पण तुम्ही विश्वासात घेऊन हे आधी सांगितलं असतं तर ,बरं झालं असतं. कदाचित आज ही वेळ आली नसती." कावेरी. "पण आता मामांना असं सोडायचं नाही. यमुना ताईंना न्याय मिळायला हवा. मी पोलीस कंप्लेंट करेन." कावेरी जिद्दीने म्हणाली. 

"त्याने काय होईल? मामाच्या खूप ओळखी आहेत." दिवाकर.

"काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण आई, तुमचा भाऊ आहे म्हणून पाठीशी नाही ना घालणार त्यांना? कावेरी नंदिनी बाईंना म्हणाली." पण ही अशी पाशवी वृत्ती ठेचून काढायला तर हवीच. या अशा वृत्तीच्या माणसांना नाती, गोती महत्वाची वाटत नसावीत म्हणूनच ही अशी कृत्य त्यांच्या हातून होतात." 

दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीने जाऊन पोलीस कम्प्लेंट केली. 

"काय हो बाई, तुम्हाला राहायचं आहे ना या गावात? नाही.. आपल्याच माणसाविरुद्ध तक्रार करताय म्हणून विचारलं." कंप्लेंट लिहून घेणारा पोलीस कावेरीला म्हणाला.


"सर, आज माझ्या जागी इथे तुमची बायको बसली असती तर? तिलाही हाच न्याय लावला असता की पोलीस असण्याचे कर्तव्य पार पाडले असते?" कावेरीच्या या प्रश्नाने क्षणात त्या पोलिसाची नजर खाली गेली. त्याने रीतसर कंप्लेंट नोंदवून घेतली.

कावेरीने तक्रार नोंदवल्यानंतर गावातल्या अजून तीन-चार बायकांनी विलास मामा विरुद्ध तशीच तक्रार नोंदवली.



पुढे विलास मामाला शिक्षा होईल की आणखी काही निराळेच घडेल? की पुन्हा तो मोकाट सुटेल? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.



क्रमशः 

🎭 Series Post

View all