पाठलाग भाग 3

Gosht Nyayachi

"आई, इथून पुढे कावेरी घराबाहेर जाईल ती फक्त माझ्यासोबत आणि शेतावर तिने मुळीच येता कामा नये. या मामाचा काही नेम नाही. मला त्या गोष्टीची पुनरावृत्ती अजिबात व्हायला नको आहे. आपण सगळे कोणत्या प्रसंगातून गेलो आहोत, हे केवळ आपल्याला ठाऊक आहे. बाहेरच्या लोकांना वाटते, यमुनेला आपणच मारले. पण ते साफ खोटं आहे आई, साफ खोटं.

यमुना माझा जीव की प्राण होती. तिच्याविना मी गेली दोन वर्षे कशी काढली असतील, हे माझे मलाच ठाऊक." दिवाकरने इतका वेळ थोपावून धरलेले अश्रू शेवटी ओघळलेच.


"यमुनेच्या जाण्याचे दुःख अजूनही ताजेच आहे. मोठी लाघवी आणि गोड पोर होती रे. अवघ्या सहा महिन्यांतच तिने या घराला आणि घरातील प्रत्येक माणसाला आपलेसे केले. 

पण आता नको त्या आठवणी दिवाकरा, तुझे दुःख मी समजू शकते." नंदिनी बाई आपल्या मुलाच्या डोक्यावरून बराच वेळ हात फिरवत राहिल्या. 


"आई, कावेरीला सगळं सांगून टाकू. आपण तिची फसवणूक केली असे व्हायला नको." दिवाकर जिद्दीने म्हणाला.


"सांगायचे तर आहेच. पण इतक्या लवकर नको. ती या वाड्यात थोडी रुळू दे. आपला स्वभाव तिला आणि तिचा स्वभाव आपल्याला उमगल्या नंतर सांग हवं तर." नंदिनी बाई थोडा विचार करून म्हणाल्या.


"काय सांगायचे आहे मला?" कावेरी आत येत म्हणाली.


"काही नाही गं. आपण नंतर बोलू या विषयावर. पण बरं झालं आलीस. तुझी नणंद सासरी जायचे म्हणते. तिची ओटी भरून घे, चल." नंदिनी बाई विषय बदलत म्हणाल्या.


"आई, मला सांगाल का काय झालंय ते?" कावेरी न राहवून बोलली.


"कावेरी, सगळे विषय आत्ताच कळायला हवेत का तुला? सवडीने सारं काही सांगेन तुला. पण आत्ता नको." नंदिनी बाईंनी ओटीचे सामान काढून कावेरीच्या हातावर ठेवले.


"वहिनी, मी येते गं. स्वतःला, दादाला सांभाळ. तो काही बोलला तर मनावर घेऊ नको. मन मोकळं करायला तुझी हक्काची नणंद आहे हे विसरू नकोस आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शेतावर अजिबात जाऊ नको." शारदा कावेरीच्या गळ्यात पडली. 


"वन्स, तुम्ही सांगितलेलं मी सारं काही लक्षात ठेवेन. पण शेतावर न जाण्याचं कारण काय? तेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं." कावेरीने शारदाचे हात आपल्या हातात घेतले.


"झाल्या की नाही नणंदा -भावजयीच्या गप्पा?" शारदे आवर लवकर. तुझा नवरा बाहेर वाट पाहतो आहे."नंदिनी बाई बैठकीच्या खोलीतून ओरडून म्हणाल्या.


"वहिनी, सांगेन मी तुला कधीतरी. चल येते मी." शारदा आपल्या नवऱ्यासह सासरी जायला निघाली. तिला पोहोचवण्यासाठी सारे जण बाहेर आले. गल्लीच्या टोकापर्यंत शारदा दिसेनाशी होईपर्यंत कावेरी हात हलवत राहिली.


"चला, देशमुखांच्या नव्या सुनेचे दर्शन झाले म्हणायचे. छान आहे रे नवं पाखरू, एकदम कडक! अगदी त्या यमुने सारखंच." 

गल्लीच्या टोकाला एका कोपऱ्यावर उभा राहून कावेरीला न्याहाळत असणारा विलास मामा कोणाच्या नजरेस पडला नाही. 

----------------------------------


दिवाकर आता शेतावर जाऊ लागला. गोविंदराव अधून मधून तालुक्याला कामासाठी जात असत. इथे वाड्यात नंदिनी बाई आणि कावेरीच्या सोबतीला म्हादू कायम असे. 


कावेरी हळूहळू घरात रुळली. 

मात्र दिवाकरचा स्वभाव तिला उमगत नव्हता. कुठले तरी रहस्य त्याच्या ओठात दडलेले आहे असे तिला कायम वाटे. तिने अडून अडून विचारण्याचा खूप प्रयत्न केला. पण दिवाकरने तिला काही कळू दिले नव्हते. कावेरी रुळली तशा तिच्या आसपास ओळखी झाल्या. तिला नावं ठेवणाऱ्या आजूबाजूच्या बायका तिच्याशी छान वागू लागल्या. पण यमुनेचं नाव कोणी कधीच काढलं नाही. 


एक दिवस कावेरीला कोणीतरी बोलवायला आले. "आई, मी जाऊन येते." असे म्हणत कावेरी पळाली देखील.

नंदिनी बाईंनी म्हादूला कावेरीच्या मागावर पाठवले. पण ती कुठे गेली हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे तो पुन्हा वाड्याबाहेर येऊन तिथेच फेऱ्या मारू लागला. इकडे नंदिनी बाई अस्वस्थ झाल्या आणि त्याही बाहेर येऊन थांबल्या.


अंधार पडू लागला, तशी कावेरी आपल्या मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडली. दोन पावले पुढे जाते न जाते तोच कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. तिने घाबरून मागे वळून पाहिले. मात्र गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आसपास कोणीच नव्हते. पुन्हा भास झाला असावा, या विचाराने कावेरी भराभरा चालू लागली. ती काही अंतरावर आली असता अचानक मजबूत हातांची पकड तिच्या हाता भोवती गुंफली गेली.

"कोण.." भीतीने पुढचे शब्द तिच्या तोंडून फुटेनात.


"सुनबाई, अंधाऱ्या रात्री बाहेर पडताना कोणाची तरी सोबत हवी म्हणून मी आलो." एक राकट आवाज तिच्या कानापाशी कुजबुजला. 


"कोणी आहे का? वाचवा.." कावेरी भीतीने ओरडली. इतक्यात तिचा हात सोडून त्या मजबूत हाताची पकड तिच्या तोंडावर गेली.


"अंहं.. ओरडण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाही."असे म्हणत विलास मामा कावेरीच्या समोर आला.

प्रसंगावधान राखून कावेरीने आपले हात सोडवून घेतले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण विलास मामाच्या ताकदीपुढे तिची ताकद काहीच नव्हती. तिने रस्त्यावरचा एक मोठा दगड उचलून मामाच्या दिशेने भिरकावला. अचानक झालेल्या हल्ल्याने मामा चांगलाच सटपटला आणि शक्य तितक्या वेगाने धावत कावेरीने घर गाठले. 

"दिवाकर, आई..कुठे आहात?" कावेरी साऱ्या वाड्यात दिवाकरला शोधत सैरभर होऊन पळू लागली.


पुढे काय घडेल? दिवाकर कावेरीला त्याचे गुपित सांगेल? विलास मामाला शिक्षा होईल की पुन्हा त्याची सुटका होईल? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.



क्रमशः


🎭 Series Post

View all