पाठलाग भाग 2

Gosht Nyayachi

पहाटे दार ठोठावण्याचा आवाज आला, तशी कावेरी दचकून उठली. 
तिने घड्याळात पाहिले. "इतक्या पहाटे कोण असेल?" कावेरीने हळूच दार उघडून पाहिले. मात्र समोर कोणीच नव्हते. तिने बाहेर येऊन संपूर्ण वाड्यात एक चक्कर टाकली. "अजूनही सगळे साखर झोपेत आहेत. मग दार वाजवले तरी कोणी? कदाचित मला भास झाला असावा की आणखी काही?" कावेरीच्या मनात क्षणभर भीती चमकून गेली. 
"छे, काहीतरीच काय विचार करतेस? रात्री दिवाकर रावांच्या वागण्याचा अर्थ उलगडण्यात कधी झोप लागली हे कळलेच नाही. नक्कीच मला भास झाला असावा ." कावेरी स्वतःशीच म्हणाली.
इतक्यात आपल्या मागे तिला काहीतरी हालचाल जाणवली. 
"क..कोण आहे तिकडे?" अंधारातून एक सावली आपल्याजवळ येत असल्याचे तिला जाणवले. तशी ती मागे मागे जाऊ लागली.

इतक्यात बैठकीच्या खोलीतला दिवा लागला.
"अगं, मीच आहे. इतकी काय घाबरतेस? लवकर जाग आली तुला? बरं, आवरून घे जा. नंतर स्वयंपाक घरात ये. मग पुढे काय करायचं हे तुला सांगेन." नंदिनी बाई कावेरीच्या जवळ येत म्हणाल्या. 
-----------------------

चहा -पाणी झालं आणि नंदिनी बाई कावेरीला म्हणाल्या, "आज तुझ्या हातच्या गोड पदार्थाने स्वयंपाकाची सुरुवात करू. जे तुला येत ते कर. बाकी पुढचा स्वयंपाक आम्ही करू."

थोड्या वेळाने गोड खिरीचा वास साऱ्या घरभर पसरला. त्या वासाने शारदा आत आली. 
"आई, वहिनीनेही शेवयाची खीर बनवली आहे. अगदी यमुना बनवायची तशीच." 

हे ऐकून नंदिनी बाई झटकन् उठल्या. "अरे देवा, तिला सांगायची विसरले मी. खीर बनवू नको म्हणून. पण का बनवायची नाही याचे कारण काय सांगणार होते मी? असो, आता काही बोलायला नको." नंदिनी बाईंनी काही न बोलता पुढचा स्वयंपाक आटोपला. 

जेवताना ताटात खिरीची वाटी पाहून दिवाकर जाम चिडला. "ही खीर कोणी बनवली?" त्याने खिरीची वाटी बाजूला काढून ठेवली.

"दादा अरे, खाऊन तर बघ. खीर छान झाली आहे." शारदा मध्येच म्हणाली.

"तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? यमुना गेल्यापासून मी खीर खात नाही, हे माहिती नाही का कोणाला?" दिवाकर ताटावरून उठत म्हणाला.

"अहो, उठू नका. मी बनवली खीर. मला माहित नव्हतं, तुम्हाला आवडत नाही ते. इथून पुढे नाही बनवणार. नीट लक्षात ठेवेन." कावेरी बाहेर येत म्हणाली. 
तिच्या बोलण्याने दिवाकरचा चढलेला पारा थोडा खाली आला आणि निमूटपणे तो पुन्हा जेवायला बसला. 

\"या यमुना कोण? आता विचारायचे तरी कोणाला? प्रत्येक बाबतीत त्यांचे नाव का निघते?\" कावेरी आपल्याच विचारात जेवू लागली.

"वहिनी, खीर छान झाली आहे. अगदी यमुनेच्या हातची चव उतरली आहे यात." शारदा म्हणाली.

"तू निमूटपणे जेव पाहू. बाकी गप्पा नंतर होऊ देत." नंदिनी बाई दटावत शारदाला म्हणाल्या. "कुठे काय बोलायला हवं हे कळत नाही या मुलीला. सासरी कसे वागते देव जाणे!"

"सासुबाई, एक विचारू? यमुना नक्की कोण? कालपासून पाहते, सगळ्यांच्या तोंडी त्यांचेच नाव आहे!" कावेरी जरा बिचकतच म्हणाली.

पण कावेरीच्या प्रश्नाला कोणीच उत्तर दिले नाही.

इतक्यात बाहेर गडबड ऐकू आली. जेवण आटोपल्याने कावेरीचे सासरेबुवा, गोविंदराव बाहेर आले. "कोण आहे रे? काय गडबड सुरू आहे?"
इतक्यात म्हादू गडी धावत आला. "मालक, ते विलास मामा.." 

"तो इथे काय करतोय? झाली शिक्षा कमी पडली की काय त्याला?" गोविंदराव रागारागाने अंगणात आले.

"ते काय आहे ना, गुन्हा मीच केला हे अजून सिद्ध नाही झालेले आणि हे माझ्या सख्ख्या बहिणीचे घर आहे. मला इथे येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही, अगदी तुम्हीही." बोलता बोलता विलास मामा आत येऊन बसला. "कोण आहे रे तिकडे? पाणी आणा." 

"विलास, तू इथे काय करतो आहेस? या वाड्यात यायला तुला बंदी केली आहे, हे विसरलास की काय? नंदिनी बाई बाहेर येत म्हणाल्या.

"म्हटलं, नवीन सुनबाई आल्या आहेत वाड्यात! पाहून यावं त्यांना. तुम्ही आम्हाला आमच्या भाच्याच्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून काय झालं? आम्ही आत्ता स्वखुशीनं, जातीनं इथं हजर आहोत." विलास मामा हात -पाय पसरून खुर्चीवर बसला.

"विलास, तुझ्या जिभेला काही हाड? चल, चालता हो या घरातून आणि पुन्हा तुझे पाय इकडे फिरकले तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव." नंदिनी बाई चिडून म्हणाल्या.

"ताई, अशी चिडू नकोस. मला फक्त तुझ्या नव्या सुनेचे दर्शन घ्यायचे आहे." विलास मामा गालातल्या गालात हसत म्हणाला.

"मामा...तू का आलास इथे?" दिवाकरने आपल्या मामाच्या दोन कानाखाली लगावल्या आणि धक्के मारत त्याला घरातून बाहेर काढले.

कावेरीला हे आहे काय चाललंय काहीच कळत नव्हतं. \"दिवाकर रावांचे मामा नवी सून पाहायला का आले असतील? त्यांना आमच्या लग्नाला का बोलावले नसेल? आणि कहर म्हणजे दिवाकर रावांनी त्यांच्यावर हात उचलण्याइतपत त्यांची काय चूक होती?\" असे बरेच प्रश्न कावेरीला सतावू लागले. 

क्रमशः

🎭 Series Post

View all