पस्तिशी ! पार्ट 5 ( अंतिम भाग )

.

नितीश ऑफिस सोडून गेला. ऑफिसमधल्या लोकांनी मला नवीन नाव दिले होते. " लेडी पोपटलाल " म्हणून. रडू आले खूप. मी हळूहळू नैराश्यात गेले. नव्हे मी खूप आधीच तिथे होते. एकदा बागेत आजी भेटल्या. माझे तोंड पाहून त्यांना समजायचे ते समजले. त्यांनी खूप चौकशी केली. शेवटी सत्य सांगावे लागले.


" आजी , माझ्या भाग्यात प्रेम नाही का ?" हा प्रश्न विचारून मी आजीच्या मांडीवर डोके टेकवून रडू लागले. आजी मायेने माझ्या केसांवरून हात फिरवत होती. नातवंडे आईवडिलांचा मार खाऊन जस आजीआजोबांकडे तक्रार घेऊन जातात ना तसच वाटत होते मला. यावेळी मला नियतीचा मार बसला होता.

" रडू नको बाळा. तू आजची स्त्री आहेस. एखादा राजकुमार येऊन तुझ्याशी लग्न करून तुला राणी बनवेल , त्यापेक्षा तू स्वतःच रझिया सुल्तान सारखं बनून राज्य का नाही करत ? स्वतःसाठी जग. सोलो ट्रिपवर जा. लग्न करून आणि संसार थाटूनच स्त्री सुखी होते असे नाही. लता मंगेशकरचे लग्न झाले होते का ? पण आपल्या कलेने त्या अजरामर ठरल्या. अश्या सर्वांचा आदर्श घे. स्त्री इतरांना पूर्ण करते. पण ती स्वतःतच पूर्ण असते. म्हणूनच नवसृजन म्हणजेच मातृत्वाचे वरदान तिलाच प्राप्त आहे. एखादा राजकुमार येऊन तुला गुलाब देण्यापेक्षा तू स्वतःच स्वतःची बाग फुलव. जेव्हा ईश्वराच्या मनात असेल तेव्हा तुझ्या जीवनात खरे प्रेम येईल. पण तोपर्यंत रडत बसू नको. तुला सुखी राहण्यासाठी कुणाची गरज नाही. तू स्वतः सुखी राहू शकते. आयुष्य एकदाच भेटते. ते मनभरून जगावं. लोक काय म्हणतात यांचा विचार करायचा नाही. आपण आपलं सुखी राहायचं. " आजी म्हणाली.

आजीचे बोलणे ऐकून मला स्फूरण चढले. मी आसवे पुसली. एका नवीन प्रवासाला निघाले. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात. मी लेखन सुरू केले. व्लॉग सुरू केला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरू लागले. स्वतःचा आनंद आता गवसू लागला होता. आता लोकांचे जीवन बघून ईर्ष्या वाटत नव्हती. एका जुन्या मैत्रिणीने मेसेज केला , " खरच तू तुझे आयुष्य किती सुंदरपणे जगत आहेस. "

माझा वाढदिवस मी अनाथाश्रमात , वृद्धाश्रमात जाऊन साजरा करते. लवकरच मी एक मूल दत्तक घेईल. त्या मुलाला मी माझे नाव देईल. अजून एक गोड बातमी देऊ ? अहो , तशी गोड बातमी नाही. मी लवकरच माझा स्टार्टअप सुरू करत आहे. " शार्क टॅंक " बघून नाद लागला असे नाही. तर खूप दिवसापासून मनात कल्पना होती पण धाडस होत नव्हते. पण आता वाटतय आयुष्य एकदाच भेटते तर इतका विचार का करायचा ? हल्ली खूप व्यस्त राहत आहे. लोकांच्या टोमण्याचा विचार करत नाही. स्वतःचे स्वप्न पूर्ण करत आहे. राजकुमार जेव्हा येईल तेव्हा येईल पण मला माझ्या जीवनात राणी बनायचे आहे. माझे साम्राज्य आणि त्या साम्राज्याची मी राणी.

समाप्त

🎭 Series Post

View all