पस्तिशी ! पार्ट 2

.

मी बाबांची खूप लाडकी होते. लहान बहीणभाऊ माझी ईर्ष्या करत. दिसायला सुंदर होते. माझाही एक बॉयफ्रेंड होता. " यश " नाव होते त्याचे. तो दिसायला राजस राजबिंडा होता. राजकुमारच होता माझ्यासाठी. स्वर्गातील इंद्र भूतलावर अवतरला आहे असे वाटायचे. आमची लग्न करण्याची खूप इच्छा होती. पण त्याच्या घरी आंतरजातीय विवाहाला खूप विरोध होता. त्याला पळून जाऊन लग्न करायचे नव्हते. मग आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोपे नव्हते ब्रेकअप करणे. मोबाईलवर ब्लॉक करू शकतो पण आठवणींना ब्लॉक करता येत नाही. यश गेला आणि सुखही गेले आयुष्यातले. वडिलांचा भीषण अपघात झाला. त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले. नोकरी सोडून ते घरीच बसू लागले. घराची सर्व जबाबदारी माझ्यावर पडली. मी नोकरी शोधली. मन लावून नोकरी केली. शिवाय एमबीएही पूर्ण केले. माझ्या प्रामाणिकपणामुळे आणि कष्टामुळे माझी पगार वाढतच गेली. यादरम्यान माझ्यासाठी सोयरीक येत होत्या. पण मी स्पष्टपणे नकार दिला. मला माझ्या भावाबहिणींची चिंता होती. मी सासरी गेले तर त्यांना कोण सांभाळणार ? आई सतत आजारी राहत होती आणि वडील अपंग झाले होते. मी माझ्या भावंडांना शिकवले. मोठे केले. त्यांची लग्ने लावून दिली. घराची जबाबदारी पार पाडताना ते तारुण्याचे कोवळे वय कधी निघून गेले कळलंच नाही. वैयक्तिक आयुष्यात मी अपयशी ठरले असले तरी माझे व्यवसायिक आयुष्य यशस्वी ठरले. मी स्वतःच्या बळावर कार घेतली. कॉलनीत तेवढी महागडी कार फक्त माझ्याकडेच होती. मला वाटलं की लोकांना माझे कौतुक वाटेल. पण कौतुकाऐवजी टोमणेच बसले. " लग्न करून संसार थाटायचा सोडून घोडी कार घेत आहे. " असे काही नातेवाईक टोचून बोलले. पण एक गोष्ट आजही लक्षात आहे. बागेत राहणाऱ्या आजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं. सकाळी सकाळी मी रोज बागेत फिरायला जाते. तेव्हा मला त्या आजी भेटतात. आजी एकट्याच राहतात. त्यांची मुले त्यांना एकटे सोडून विदेशात निघून गेली. आधी ते आजीला फोन करत होते पण आता खूप महिने झाले साधा फोनही नाही केला. एकटेपणामुळे खचून न जाता आजी दिलखुलासपणे जगतात.

" तू लोकांचा विचार नको करू. लतादीदी मंगेशकर यांनी लग्न केले नाही. पण त्या कमी यशस्वी आहेत का ? उलट मी तर म्हणेल लग्न न केलेली व्यक्तीच जास्त यशस्वी होते. आमच्या काळात नवऱ्याला " हो ला हो " म्हणण्याची पद्धत होती पण तू चक्क नवीन कार घेतली. खूप कौतुक वाटते तुझे. " आजीने असे बोलून माझ्या पाठीवरून हात फिरवला. कधी कधी आपल्या घरच्यांपेक्षा बाहेरचेच जास्त समजून घेतात ना.

क्रमश...

🎭 Series Post

View all