पासवर्ड

आयुष्याचं गुपित उलगडणारा पासवर्ड ?


" घेतलास परत तो मोबाईल! काय मेलं असतं एवढं त्यात कुणास ठाऊक? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सारखा जवळ असतो.. आणि पासवर्ड का टाकून ठेवलायस त्याला? एवढं काय असतं तुझं त्याच्यात? " आईने सकाळ सकाळीच ओरडायला सुरुवात केली. ती काहीच बोलली नाही. निमूट ऐकून घेत होती.


घरातली सगळी कामं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ येऊन उभी राहिली. मोबाईलवरून सकाळी पडलेला ओरडा आठवला आणि ती काहीशी अस्वस्थ झाली. "आई,तुझ्याशी सगळं बोलू शकत नाही. तू मला जज करशील आणि ओरडशील म्हणून मैत्रीणींशी बोलते आणि पासवर्ड का ठेवलायस असं म्हणालीस ना. माझ्या मनात काय चालू आहे, मला कोणत्या गोष्टींचं टेन्शन आहे, याबद्दल मैत्रिणींना केलेले मेसेज जर तू बघितलेस तर तुला काळजी वाटेल, त्रास होईल म्हणून पासवर्ड ठेवलाय गं. "

" थोडा विश्वास ठेवशील का गं माझ्यावर.. मी मोबाईल सतत वापरते म्हणजे मी वाया नाही गेली. मलाही परिस्थितीचं भान आहे. डोक्यात येणाऱ्या विचारांनी मन सुन्न होऊ नये म्हणून मोबाइलवर बोटं फिरवत बसते. हे सगळं तुला सांगण्याची हिंमत माझ्यात नाही पण थोडंसं समजून घेतलंस तर मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलता येईल."