Jun 15, 2021
कविता

पावसाचे आगमन

Read Later
पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाचे
आले दुरुन इशारे
स्वागतासाठी त्याच्या
तनमन आसुसले

तप्त भेगाळल्या भुईस
गार वाऱ्याचा स्पर्श
थेंब टपोरे पर्जन्याचे
झेलण्या आतुर गात्रं

दूर डोंगरांवरुनी
मेघ सावळे येती
गडगडाट ऐकण्या
आतुर जीवस्रुष्टी

येता पावसाच्या सरी
श्वासांमधे म्रुद्गंध
पानापानांत साकारेल
थेंब मोत्यांचे न्रुत्य

माती होईल न्हातीधुती
राहिलं ग गर्भार
गर्भातून उमलेल गर्द
पाचूंची मोतीमाळ

कौलांवरुन बरसेल
पागोळ्यांतून ओझरेल
नदीनाल्यांना भरुन
जीर्ण डोळ्यांतून उमटेल

शालू हिरवा लेवूनी
नटेल वसुंधरा
पोटुशी लेकीला नभ
वाकून पाहेल कौतुका

-----सौ.गीता गजानन गरुड.