पाश.. नात्यांचा! भाग -४(अंतिम भाग )

कथा नात्यांच्या गुंत्यात अडकलेल्या मधुची.

जलद कथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - नातीगोती.


पाश.. नात्यांचा!

भाग - चार. (अंतिम)


"आजच्या आज दवाखान्यात जाऊन सगळं क्लिअर करून घ्यायचं." विलासरावांनी बायकोकडे नजर टाकली.


"बाबा, मला माझं बाळ हवं आहे. सुभाषशी लग्न करायचे आहे. तो येईलच थोडया वेळात. मग आपण बोलूया ना." माधुरी काकूळतीला आली होती.


"मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाहीये. आणि त्या पोराला या घराची पायरी देखील चढू देणार नाही मी. त्याची लायकी तरी आहे का या विलासरावाच्या पोरीशी नातं जोडायची?"


"बाबा.. आई तू तरी समजाव ना गं." तिने आशेने गिरीजाकडे पाहिले.


"मधू, तुला शेवटचं सांगतोय. हे असलं काही मी खपवून घेणार नाही. माझ्या नावाला जो कलंक लावलाहेस ना तो कधीच धुवून निघणार नाही आहे. आणि काय गं? रक्ताचे नाते आहे ना आपले? तरी तुला कळू नये?"


"बाबा, या बाळाशीही माझे रक्ताचेच नाते आहे हो." तिचा हुंदका अनावर झाला.


"बस काही ऐकायचे नाहीये मला. बाळ वाढवायचा निर्णय घेतलास तर तुझे आईवडील कायमचे मेले असे समज. आता तू ठरव, तुला कोण हवे? तुझे आईवडील की जन्माला न आलेले हे बाळ?" तिला यक्षप्रश्नात टाकून विलासराव आतल्या खोलीत गेले.


माधुरी सुन्न नजरेने मटकन खाली बसली. निर्णय घ्यायची क्षमताच ती हरवून बसली होती. नाईलाजाने तिने आईवडिलांसोबत एका मोठ्या दवाखान्याचा रस्ता धरला जिथे कोणी त्यांना ओळखू शकणार नव्हते.


******

दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा जड आलेले डोळे तिने मोठ्या मुश्किलीने उघडले. आजूबाजूला बघितल्यावर तिला लक्षात आले की दवाखान्याच्या एका प्रायवेट रूममध्ये ती आहे. बेडवर ती निजली होती. हाताला सलाईन लावले होते. खोलीत ती एकटीच होती. बाबा बाळाची विल्हेवाट लावायला गेले होते आणि आई खोलीच्या बाहेर शून्यात बघत बसली होती.


तिने पोटाला हात लावून बघितले. कालपर्यंत मोठे वाटणारे पोट आज परत नॉर्मल झाले होते. काय झाले असावे याची कल्पना तिला आली आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.


'बाळा मला माफ कर. मी तुला नाही रे वाचवू शकले. माझ्या रक्ताच्या नात्यापुढे आपल्यातील रक्ताचे नाते हरले रे. सगळी नातीगोती हरलेय मी.' तिचा उमाळा दाटून येत होता.


कालच डॉक्टर शलाकाने तिला सांगितले होते की तिच्या बाळावर केवळ तिचाच हक्क आहे. त्याला वाढवायचे की नाही हा तिचा निर्णय असणार आहे. पण घरच्यांच्या पुढे तिला असा निर्णय घेताच आला नाही. सुभाषला तिच्या वडिलांनी धमकी देऊन घराबाहेर हाकलले होते. आज ती सर्व नाती हरली होती.


तिने एकवार खोलीभर नजर फिरवली आणि नंतर आयवी स्टँडला जोडलेल्या सलाईनकडे पाहिले. सलाईन अगदी काही वेळापूर्वीच लावली असावी कारण ती संपायला बराच वेळ दिसत होता. तिने मनात काहीतरी विचार केला आणि हाताला जोडलेले सलाईन जोरात ओढून वेगळे केले. जराशी वेदना झाली पण मनातील वेदनेपुढे हे काहीच नव्हते.


'बाळा तुला जन्माला घालायचा निर्णय घेण्यास मी असमर्थ ठरले. पण आता पुढची साथ देण्याचा निर्णय ठाम आहे. आईवडिलांशी नाते तोडू शकले नाही पण तुझ्याशी असलेले नाते तरी कसे तोडू? मीही तुझ्या पाठोपाठ येतेय. माझी वाट बघ.' ती मनात बोलत होती.


हळूहळू तिचा श्वास मंद होत गेला. बाटलीतील सलाईन खाली सांडले होते आणि बेडशीट नसेतून वाहणाऱ्या रक्ताने माखली होती. तिच्या ओठावर मात्र हलके हसू पसरले होते.

***समाप्त ***

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


नात्याच्या गुंत्यात अडकलेल्या मधुची ही कथा. एका सत्यकथेला काल्पनिक रीतीने समोर मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न. मधुच्या वागण्याचे समर्थन नाहीच. पण कोण चूक कोण बरोबर या वादात देखील पडायचे नाही. कथेला केवळ कथा समजून वाचावी हीच अपेक्षा.

धन्यवाद!


🎭 Series Post

View all