पाश.. नात्यांचा! भाग -३

कथा नात्याच्या गुंत्यात अडकलेल्या मधुची.

जलद कथामालिका लेखन स्पर्धा.

विषय - नातीगोती.


पाश.. नात्यांचा!

भाग -तीन.


"तुझी प्रेग्नन्सी पण पाच महिन्याची आहे. अशी गं कशी तू बेजबाबदार पणे वागलीस? काय करणार आहेस आता?" शलाका.



"मॅम, मला खूप भीती वाटतेय. मला काहीच कळत नाहीये." तिचा हुंदका सुरूच होता. आता चैताली देखील आत आली होती. तिलाही परिस्थिती काय आहे ते कळले.


"तुमचं खरंच प्रेम आहे ना एकमेकांवर?" शलाकाचा प्रश्न.


"हो." हुंदका देत मधू.


"मग लग्न करा." शलाका.


"घरचे तयार होतील? खरं तर मला ही नोकरी लागल्यानंतर मीच घरी आमच्याबद्दल सांगणार होते. पण आता खूप भीती वाटतेय मला. सुभाषच्या घरी काही अडचण नाहीये. पण माझे बाबा? ते मान्यता देतील का? गावात खूप मान आहे त्यांना. त्यांची ही नाचक्की ते नाही सहन करणार." माधुरीच्या डोळ्यातील पाणी सारखे वाहत होते.


"जी झाली ती तुमची चूक होती. मला सांग, आता तुला बाळ हवंय की नाही?"

शलाकाच्या थेट प्रश्नाने मधुचा हात झटकन पोटावर गेला. इतके दिवस मोठे वाटत असलेल्या पोटाबद्दल तिला काही कळत नव्हते पण आत्ता काही क्षणापूर्वी कळलेल्या बातमीने तिच्यातील मातृत्व जागे झाले होते.


"मला हवंय माझं बाळ. यात त्याचा काय दोष ना?" तिचा स्वर कातर झाला होता.


"ठीक आहे मग. तू आता घरी जा. तुझ्या प्रियकरालाही हे सांग. आणि मग निर्णय घ्या." शलाका.


"पण मॅम, घरचे? त्यांनी अबार्शन करायला लावले तर?" तिची गाडी परत तिथेच येऊन थांबली.


"हे बघ, घरी गेल्यावर तुला ओरडा पडेल, कदाचित मारही मिळेल. ज्या वातावरणातून तू आली आहेस तिथे तू केलेले हे काम काही भूषणावह नाहीये. तेव्हा तुला ते सहन करावेच लागेल. तुझं बाळ हे तुझे आहे. बाळाची वाढ चांगली झालीये. या दिवसात अबार्शन करणं सोप्पं नाहीय. उलटपक्षी ते रिस्की असेल. पण डॉक्टर म्हणून एक सांगते, तुझ्या बाळावर पहिला हक्क तुझा आहे. ते ठेवायचे की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तेव्हा तू योग्य निर्णय घ्यावास असं मला वाटतं."


डॉक्टर शलाकाचे ऐकून माधुरी चैतालीसह उठली. तिचे डोके सुन्न झाले होते. काय करावे ते कळत नव्हते. चैतालीने तिचा हात घट्ट पकडला.


"मधू, मी आहे तुझ्यासोबत. मी तुझ्या घरीही येईल. होईल सगळं नीट." तिला दिलासा देत चैताली म्हणाली.


"चैतू, हे वाटते तेवढं सोपं नाहीये गं. लग्नानंतरचे गरोदरपण किती आनंददायी असते आणि त्यापूर्वी असे झाले तर समाजाच्या नजरेत दोषी ठरतो गं आपण." तिला पुन्हा रडायला येत होते.


त्याच दिवशी चैतालीला सोबत घेऊन माधुरीने गाव गाठले.


"सपाकऽऽ" तिचे बोलणे ऐकून विलासरावांची पाचही बोटे तिच्या गालावर उमटली. "घराबाहेर हे धंदे करायला राहतेस होय?" रागाने त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता.


"आई, मला सुभाषशी लग्न करायचे आहे अगं." माधुरी रडतच बोलत होती.


"खबरदार, त्या मुलाचे नाव या घरात काढशील तर. हे कसले प्रेम गं?शारीरिक आकर्षण नुसतं. असा मुलगा मी खपवून घेणार नाही." गिरीजा कडाडली.


"काकू, अहो एकदा तिला समजून तर घ्या."


"आमच्या घरातील भानगडीत तू न पडलेलीच बरी. तू तुझ्या घरी गेलीस तरी चालेल." विलासरावांचा करारी आवाज कानावर पडला तशी चैताली खाली मान करून निघून गेली. मैत्रिणीसाठी तिच्या डोळ्यात पाणी होते.


"आजच्या आज दवाखान्यात जाऊन सगळं क्लिअर करून घ्यायचं." विलासरावांनी बायकोकडे नजर टाकली.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

काय करेल माधुरी? वाचा पुढील अंतिम भागात.


🎭 Series Post

View all