पाश.. नात्यांचा! भाग -१.

कथा नात्याच्या गुंत्यात अडकलेल्या मधुची.
जलद कथामालिका लेखन स्पर्धा.
विषय - नातीगोती.

पाश.. नात्यांचा!
भाग -एक.


"मधू, पोहचलीस की फोन कर गं बाई. आणि सांभाळून राहा. बाहेरचे जास्त खाऊ नकोस, कोणाशी भांडू
नकोस."

"हो गं आई, किती त्या सूचना? पहिल्यांदा बाहेर जातेय का?" आईच्या चेहऱ्यावर उमटलेल्या काळजीला टिपत मधू हसून म्हणाली.

"पहिल्यांदा अशी नाही गं. शिक्षणासाठी म्हणून बारावीनंतर बाहेरच आहेस की. पण आता हे नोकरीच्या ट्रेनिंगसाठी म्हणून पहिल्यांदाच बाहेर जात आहेस ना? म्हणून काळजी गं. रूम करून राहायचीस तेव्हा आमची एखादी चक्कर व्हायची. इथे तसे नाही ना? होस्टेलवर आम्ही येऊ शकत नाही. त्यात तिथे जवळपास सगळ्या सारख्याच वयाच्या मुली आहात. मोठं असं कोणी नाही." आई आपली काळजी बोलून दाखवत होती.

"उलट आम्ही ऑफिस ट्रेनिंग साठी असलेल्या इतक्या मुली सोबत असणार तेव्हा काळजीचे काही कारण नाहीये गं." आईच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत मधू म्हणाली.

"बाबा, येते हो मी. काळजी घ्या. आईला जपा." बाबाच्या पायांना स्पर्श करत ती बोलत होती.

"हम्म, आम्ही काळजी घेऊच. तू ही स्वतःला जप. बापाच्या नावाला कधी कलंक लागणार नाही अशी वाग. एकदा का नोकरी पक्की झाली की चांगले स्थळ आल्यावर तुझे लग्न करायचे आहे, हे ध्यानात ठेव."

तिच्या पाठीवरून हात फिरवत विलासराव म्हणाले. त्यांचा तो करारी आवाज आणि लग्नाचा विषय ऐकूनच मधुचा चेहरा पडला.

"हो बाबा. मी नीट राहीन." ओठावर स्मित आणण्याचा प्रयत्न करत ती उत्तरली.

"मन्या, येते रे मी. आईबाबांना त्रास देऊ नकोस." छोट्या भावाचा मुका घेत ती म्हणाली. त्याच्याशी बोलताना तिला दाटून येत होते पण डोळ्यातील पाण्याला बाहेर पडू द्यायचे नव्हते.

"बाय मन्या,येते मी." स्वतःला सावरत आपले सामान घेऊन ती निघाली.

******

"गिरीजा, डोळ्यात कशाला पाणी आणतेस? तुझीच इच्छा होती ना की पोरीनं काही बनावं? मग रडतेस कशाला?" बायकोकडे बघून विलासराव कडाडले.

"होय हो, इच्छा तर माझीच होती. पण काय करू? आईचं काळीज आहे, दुःख तर होणारच ना? त्यात आत्ताच काविळीतून बरी झालीये. सुकल्यासारखी झालीये पोर." डोळे पुसत गिरीजा म्हणाली.

"हम्म, ही नाती अशीच असतात. त्यात मुलीची जात. जीवाला घोर तो लागतोच. पण काळजी करू नको. आपली माधुरी समजदार आहे." गिरीजाला समजावत विलासराव बोलत होते. नेहमी करारी असणारा त्यांचा मृदू आवाज ऐकून लहानगा मनू देखील चकित झाला.

शेवटी मधू त्यांचीही लेक होतीच की. त्यांनाही त्यांच्या लेकीची काळजी होतीच.

"मी येतो चावडीवर जाऊन." डोळ्यात आलेले पाणी कोणाला दिसू नये म्हणून पटकन वळत ते घराबाहेर पडले.

विलासराव म्हणजे गावातील एक बडे प्रस्थ. गावात त्यांचे मोठे नाव. गिरीजा, त्यांची पत्नी सालस स्वभावाची. पदरी माधुरी आणि मनोहर हे दोन गोंडस मुलं.माधुरी नुकतीच सेकंड इयरला गेली होती. एका कंपनीत ऑफिस वर्कसाठी मुलींची आवश्यकता होती म्हणून तिने सहज फार्म भरला होता आणि तिचे सिलेक्शन झाले होते.

सहा महिने ट्रेनिंग आणि त्यानंतर हातात सात हजाराचा जॉब. खेड्यात राहणाऱ्या माधुरीला हा एवढ्या पगाराचा जॉबदेखील खूप काही मिळाल्यासारखा होता. स्वतःच्या कष्टाचा पैसा असणार होता तो. त्यामुळे ती खूष होती. आईच्या मागे लागून तिने इथे यायचा निर्णय घेतला होता. विलासरावाच्या मागे पुढारलेपणाचा बिरुद लागले होते म्हणून त्यांनीही लेकीला होकार दिला. आपल्या आईवडिलांच्या होकारामुळे मधू एकदम सातव्या आसमानात होती.

मिळेल का मधुला नोकरी? की तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळेच वाढून ठेवले असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all