पसंत आहे मुलगी भाग १६

Siddharth a chocolate boy and a cool boy, who is don't tense about their future and he don't have any dreams.. and he don't want to marry anywhere. but when he meets ashwini, his thoughts changes strangely.. Ashwini, his bride to be.. he loved he

भाग १६

सिदच्या किंकाळीने बाहेर सगळेजण जागे झाले, तो ओरडलाच एवढ्या कर्कश्शपणे जसे काय त्याने काहीतरी विचित्र पाहिले आहे. टेरेसवरून दादा-वहिनी खाली आले, हॉलमध्ये आई-बाबा पण जागे झाले. सगळेजण एकमेकांकडे पाहून विचारू लागले काय झालं. आई लगेच बेडरूमच्या दारापाशी गेली आणि दारावर थाप मारली, “सिध्दू...?”,

सिदने दाराच्या दिशेने पाहिले आणि जरासा भानावर येत म्हणाला, “काही नाही गं आई.., पाल होती इथं”.

आई हसत म्हणाली, “अरे केवढ्याने ओरडला मग....?”,

हे ऐकून सगळेजण पूर्ववत झाले आणि त्यांच्या जीवात जीव आला.

“काय ही दोघं., काल ती आशू मोठ्याने ओरडली, आज हा मोठ्याने ओरडला..”, दादा हसत म्हणाला.

“तेच ना..”, वहिनी पण हसत म्हणाली.

“जाऊद्या., चला., आता या अशा आरडा ओरडी चालणारच.”, बाबा दादाला डोळा मारत म्हणाले.

सगळेजण हसले आणि परत झोपायला गेले.

*****

सकाळी सगळीकडे उजाडले, आशू अजून झोपलीच होती, रात्रभर ती जागी असल्याने पहाटे पहाटे तिला झोप लागली. आता नऊ वाजून गेले पण तिला काही जाग आली नाही. शेवटी सिदच्या आईने येऊन तिला उठवले.

तिला आधी खूप अपराध्यासारखे वाटले, आता सासूबाई ओरडणार अशा भितीने ती त्यांच्याकडे पाहू लागली.

पण का कोण जाणे आशूचा चेहरा त्यांना काही वेगळंच सांगत होता.

त्या तिच्या शेजारी बसल्या आणि आपुलकीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, “बरं वाटत नाही का?”,

आशू म्हणाली, “नाही नाही, ते काल रात्री, जरा... ते..” तिला काही बोलता येईना.

आई हसत म्हणाली, “बाई गं आता रात्री घडलेलं सांगतेस की काय मला..., होतं गं.., रात्रं जागून काढली असशील ना, मग उशीर होणारच.., काही हरकत नाही.., चल चल पटकन अंघोळ करून नाष्टा करून घे..., मला कामं आवरायचीत....”

आशूला हे ऐकून कालची विचित्रं रात्रं आठवली. ती डोळ्यात तरळणारं पाणी लपवत म्हणाली, “हो आलेच”

“बरं., चल उठ” असं म्हणत त्यांनी परत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

आई रूमच्या बाहेर जाताच आशू उशीवर डोकं ठेऊन रडू लागली.., तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटलेला होता, आता पुढे काय याची चिंता तिला सिदच्या कालच्या वागण्याने वाटू लागली.

***

सिद आज कॉलेजमध्ये आला होता.., सगळे कट्ट्यावरचे मित्रं मैत्रीणी त्याला बघून आनंदित झाले. संकेत पुढे येत म्हणाला, “काय भाय आज तुपण कॉलेजला आलास.., तू पण सुट्टी मारली काय जॉबला..?”

सिद नाराज चेहऱ्यानेच कठड्यावर बसत म्हणाला, “हा, सुट्टी मारली, मुड नव्हता आज”

लगेच रिया त्या दोघांच्या मध्ये येत म्हणाली, “बरं..., लवकर आठवण आली आपल्या कॉलेजची, मला तर वाटलं आता डायरेक्ट पेपरलाच दिसतोय सिध्द्या....” ती हसत म्हणाली.

लगेच एक एक करून सगळेजण सिदजवळ येऊन घोळका करून थांबले.

“काय सिध्दू, मग वहिनी काय म्हणतायत...”, अभिने हसत विचारले.

सिद शांतपणेच म्हणाला, “ती काय बोलणार...?”

तेज्या हसत म्हणाला, “म्हणजे त्यांच्यासमोर पण तूच बडबड करतो वाट्टं....”,

सिद फक्त हसला.., पण त्या हसण्यात आज काही एवढा उत्साह नव्हता.

तेवढ्यात समोरून डॉली आली..., सिदला बघून ती जरा नाराज चेहऱ्यानेच त्यांच्या घोळक्यात येऊन थांबली..

तिला बघताच तेज्याला आणि अभ्याला तिची मज्जा घ्यायचा मूड झाला..

“काय मग सिध्दू, सुहागरात वगैरे झाली असेल मग जोरात...”, दोघंही मश्किरीच्या सुरात बोलले.

तशी डॉली इकडे तिकडे पाहू लागली.., तिला समजलं हे तिला चिडवत आहे..., कारण डॉलीला सिद आवडतो हे आख्ख्या कॉलेजला माहित होतं...,

सगळेजण हसू लागले...,

सिद मात्रं शांतच होता.., तो आपला मोबाईल चाळत बसला...,

व्हॉट्सएप वर आशू च्या चॅट बॉक्सवर येऊन तिचा डिपी पाहत बसला, तिचे ते निरागस हसू, काळेभोर डोळे, गुलाबाच्या पाकळीवानी लाल ओठ आणि लांबसडक केसं...., तिचं ते रूप पाहून त्याला मोहरायला होत होतं.., आणि कालची रात्रं आठवून लगेच तो भानावर आला...,

त्याला आशू ऑनलाईन दिसली तो लगेच व्हॉट्सअप मधून बाहेर आला..

इकडे सगळ्या मित्रं मैत्रीणींची त्याच्यावरून मश्करी चालू होती, सगळे डॉलीला चिडविण्यामध्ये मग्न होते.., पण सिद मात्रं वेगळ्याच विचारात होता.

*****

आशूचा नाष्टा झाला.., तिला सिदला फोन लावूशी वाटत होता., रात्री तो घरातून बाहेर पडला, नक्की कुठे गेला हे तिला विचारायचे होते.., पण तिचं धाडस होत नव्हतं..

तिने आईंनाच विचारले, “आई, सिध्दार्थ कुठे...?”

आई हसत म्हणाली, “अगं सकाळी सकाळीच तो कामावर गेला.., आज काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं ऑफीसमध्ये, म्हणून तो लवकरच गेला...”,

आशूने पुढे विचारले, “तरी कधी...?”,

“सकाळी सातलाच गेला अगं...”,

आता रात्रीचं आईंना कसं विचारायचं म्हणून ती पुढे गप बसली....,

दुपारपर्यंत सगळं काम आवरून ती रूममध्ये येऊन बसली...,    

परिक्षा तोंडावर आलेली पण तिचं कशात लक्षं लागत नव्हतं.., तिला आज सीमाची खूप आठवण येत होती, तीने सीमाला खूप फोन लावले पण तिचा फोन स्विचऑफ येत होता..,

ती पूर्णपणे हताश होऊन बेडवर पडली.., ते रात्रीचं सिदचं किंचाळणं तिच्या डोक्यात बसलं होतं.., आज पर्यंत ती स्वतःला आरशात बघून खूपदा किंचाळलेली होती.., सिदने तर तिला पहिल्यांदा पाहिले होते..., पण तिला वाटत होतं की तो तिची विचारपूस करेल तिच्या काळजीने तो कासावीस होईल, हे कसं झालं, का झालं, कधी झालं हे विचारेल..., पण हा..., हा तर किंचाळला, त्याने जो तिच्याकडून चेहरा फिरवला तो परत समोर आलाच नाही, रात्रीच रूममधून बाहेर पडला...,

हे सगळं आठवून ती खूप रडत होती, तळमळत होती.., तिला सिदशी बोलायचं होतं.., पण त्याच्याशी बोलायची तिची हिम्मत होत नव्हती.

****

आज दिवसभर सिद कॉलेजमध्ये होता.., शेवटी एक एक करून सगळेजण घरी गेली.., शेवटी सिद आणि संकेत उरला...,


काय सिध्द्या घरी जायचं नाही का..?”, संकेत ने विचारले..

“हो जायचं ना..”, सिद अजूनही त्याच कठड्यावर शून्यात नजर घालून बसला होता.

संकेतला समजलं, काहीतरी याचं बिनसलं आहे.

तो त्याच्या मांडीवर फटका मारत म्हणाला, “सिध्द्या.., मॅटर काये....?”,

सिदने त्याच्याकडे पाहिले... परत तो खाली नजर घालून बसला..

आता संकेत त्याच्या शेजारी बसला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलला., “काल जाम भांडणं झाली की काय तुमची, कुठे गेलेल्या वहिनी, काही मॅटर आहे का, सांग ना भावा..”

सिद हसत म्हणाला, “काही नाही रे.., तिचं काम होतं काहीतरी म्हणून गेलेली ती.., आणि भांडण वगैरे काही झाली नाही आमची..”,

“बरं मग काय झालं..,सांगशील का..?” संकेतने काळजीने विचारले..

सिद लगेच खाली उतरला..., “काही नाही रे भावा, सांगितलं ना..”.,

संकेतला आता कळालं, तो पण खाली उतरला.., “सिध्द्या यार माझ्यापासून तू काही लपवायचा प्रयत्नच करू नको, आपल्याला तुझ्या डोळ्यात दिसतंय.., काही तरी लोचा नक्कीच आहे, सांग पटकन काय झालंय ते...”,

सिद अजूनही हसतच म्हणाला, “काही नाही रे..”, पण हे बोलताना तो नजर चुकवत होता..

“सिध्द्या सांग रे भावा काय झालंय.., काही प्रॉब्लेम आहे का, बोल तू.., आज दिवसभर तू गप आहेस.., कधी न शांत बसणारा माझा दोस्त असा तोंड पाडून बसलाय म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार..”,

संकेतने असे म्हटले आणि सिदला त्याचे रडू आवरता आले नाही.., तो त्याच्या गळ्यात पडला..

“अरे रडतोय की काय..?”, संकेत त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला...

सिद लगेच स्वतःचे डोळे पुसत म्हणाला, “नाय रे..”

संकेतला आता चांगलंच कळलं, काहीतरी खूपच मोठा प्रॉब्लेम आहे..

****

संध्याकाळ उलटून गेली होती, आशू सिदचीच वाट बघत होती.., आईंने आणि वहिनीने मिळून स्वयंपाक बनवला. आशू आज दिवसभर रूममध्येच होती, तिला कशातच आज मूड नव्हता, म्हणून आईंने पण तिला आराम करायला सांगितला.

पाहता पाहता रात्रही झाली, जेवणाची वेळ उलटून चालली होती, पण सिद अजून घरी आला नव्हता. सिदच्या आईने रूममध्ये जाऊन तिला विचारले, तर तिलाही काही माहित नव्हते.

आईंच्या सांगण्यावरून तिने सिदला फोन केला...

सिद आणि संकेत बारमध्ये होते, आज सिध्दार्थ खूप प्यायला होता त्याला टेन्शन आले होते, स्वतःच्या नशिबावर तो रडत होता, म्हणून त्याच्याकडून आज कंट्रोल झालं नाही. संकेतला घडलेली सगळी हकीकत सांगत तो दारू रचवत होता.

आशूचा फोन पाहूनच तो संकेतला म्हणाला, “का फोन करतीय ही मला, का...?, सांग हिला जरा समजावून...”, असं तो अडखळत बोलला आणि संकेतकडे फोन फेकला.

संकेत शुध्दीत होता, तो त्याला समजावत बोलला, “सिध्द्या वहिनांचा फोन आहे अरे घे उचल..”

सिद हात झटकत म्हणाला, “नायय.., मी नाय घेणार.., मला त्या पोरीशी काही बोलायचं नाहीय.., फसवलंय तिने मला, तिच्या घराने फसवलंय मला, येड्यात काढलंय मला.., मला त्या पोरीशी बोलायचं नाहीय संक्या.., मला बोलायचं नाहीय”

सिद हे बोलला आणि कसाबसा टेबलवर डोकं ठेवून बसला..

संकेतला काही कळत नव्हतं, आशूचे फोनवर फोन येत होते.., पण तो उचलू शकत नव्हता.

शेवटी तिचे सारखेच फोन येत असल्याने सिदने एकदाचा फोन उचलला..,

आशू कोमल आवाजात म्हणाली, “हॅलो...,सिध्दार्थ..”

तसा सिध्दार्थ शांत झाला.., तिच्या आवाजातली कोमलत्या त्याच्या ह्रदयापर्यंत पोहचली..., त्याला बोलता येत नव्हते, खूपच दारू प्यायल्याने शब्द फुटत नव्हते तोंडातून...

“हॅलो सिध्दार्थ, कुठंय तू.., किती वाजलेत, घरी कधी येणार आहेस..”, आशूने एका दमात विचारले..

तसं सिदला रात्रीचा प्रकार आठवला, तिचा तो मनाला वेड लावणारा सुंदर चेहरा, गोड आवाज, कमनीय बांधा आणि......, आणि तिच्या मांड्यांच्या खालून पूर्ण जळून काळा निळे झालेले भाजलेले अंग, अर्ध अंग गोरं तर अर्ध जळून गेलेलं, त्यातली कोमलता, त्यातली सुंदरता जळून खाक झालेली..., असे तिचे विद्रुप शरीर आठवून तो जोरात ओरडला..., “गप... ,गप..., कोणेस तू... ,तू कोण मला घरी बोलवणारी, आणि घरी येऊन काय करू...?, तुंझं ते..., ते जळलेलं अंग बघू, विद्रुप, विचित्र, घान.... ,शी......” तो खूप मोठ्याने ओरडला...., तो ओरडता होता, शी..., शी...., त्याच्या डोळ्यासमोर तिचा सुंदर चेहरा आणि च्या जळून काळ्या झालेल्या, काही ठिकाणी काळे काळे प्रचंड ठिपके पडलेले, काही ठिकाणी अंगावरची त्वचा निघाली होती, पांढरी फकट झाली होती, तर काही ठिकाणी तो तिचा पाय आहे हेच ओळखू येत नव्हते... ,इतका प्रचंड भाजलेला तिचा पाय.....,

सिदने फोन दूर फेकून दिला....,

बारमधले सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले..,, तो टेबलावर डोकं ठेवत म्हणाला, “फसवलं मला तिने, तिच्या बापानं, तिच्या भावानं, मुलगी खूप सुंदर आहे, खूप हुशार, खूप सोज्वळ आहे सांगितलं..., पण ..., पण ती अर्धी भाजली आहे, तिचं अंग काळं निळं झालं आहे हे सांगितलं नाही..., हे नाय सांगितलं संक्या मला त्यांनी, नाय सांगितलं..., फसवलं मला त्यांनी..., मी ज्या मुलीला पसंत केली ती ही नाय संक्या..., ही नाय संक्या...., ही विद्रुप बायको माझ्या गळ्यात घातली संक्या त्यांनी..., विद्रुप बायको...., मला नाय पसंत ही मुलगी...., नाय...., मला नाय राहायचं तिच्यासोबत संक्या..., ती घान दिसते, मला किळस येतीय.. मला किळस येतीय....”

तो असं बोलत होता आणि संकेत त्याला शांत करत होता...,

आशू इथं अर्धी संपलेली होती.., तिचे अंग गार पडलं होतं..., सिदच्या शब्दा नी शब्दाने तिच्या मनावर घाव घातला होता..., तिला नव्याने सांगितले होते की तू सुंदर नाही, तू कुरूप आहेस, विद्रुप आहेस, कुणी मुलगा तुला पसंत करेल त्या पात्रतेची तू नाहीस....

आई बाहेरून तिला आवाज देत होत्या पण ती मात्रं सून्नं बेडवर बसली.., तिच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती.., तन मन सून्नं झालं होतं...,

क्रमशः

मी दोन तीन दिवस झाले कथा पोस्ट करायचा प्रयत्न करतीये पण एक दिवस माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम होता तर पुढचे दोन-तीन दिवस ईराची साईट स्लो चालत होती.., त्यामुळे हा भाग अपलोड होऊ शकला नाही...,

आता या पुढचा भाग मी दोन दिवसांनी टाकेल कारण माझ्या कामाचा जरासा लोड माझा कमी झालेला आहे.., एक आठवडा जरा ब्रेक आहे मला कामातून..., सो मी पुढचे भाग लवकर लवकर टाकेल...,

आणखी एक, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मला एक दोन दिवस दिसतात पण त्यानंतर मलाच माझी कथा पेजवर सापडत नाही.., त्यामुळे तुम्हा सर्वांच्या कमेंटला उत्तरच देता येत नाही..,

तुम्ही सर्वजण माझ्या कथेला इतका छान प्रतिसाद देत आहात हे पाहून मला खूप आनंद होत आहे. आता कुठे कथेचा सस्पेन्स मी उघडला आहे पण आता पुढे काय होणार, आशूची परिस्थिती सिद समजून घेणार का, चेहऱ्यावरचे सौंदर्य पाहून पसंत केलेली मुलगी आता त्याला नापसंत आहे, तिची त्याला किळस येत आहे, तिने त्याला फसवलं आहे असं तो मानत आहे.

पाहुया आता पुढे काय होते ते, सिदला अखेर आशू पसंत पडते का आणि ती कशी?

©Bhartie “शमिका”

🎭 Series Post

View all