भाग 9
नवीन नवरी असल्यामुळे कुणी तिने घेतलेल्या उखाण्यावर एवढे लक्ष दिले नाही....
“चल चल, आशू.. माप ओलांडून आत ये लवकर... सगळेच खोळंबलेत बघ...” सिदच्या आईने आशूच्या डोळ्यातले पाणीही पाहिले आणि तिलाही आशूचा उखाणा ऐकून जराशी तिची काळजी वाटली.., पण तिने ते दाखविले नाही...,
आशू भानावर आली आणि तिने सिदच्या आईकडे पाहून हलकेसे स्मित दिले आणि माप ओलांडून ती आत आली...
सिदच्या चेहऱ्यावर मात्र अजून प्रश्नच होता... तसेच संकेतचाही चेहरा ओशाळला होता.. तोही त्या ओळींचा अर्थ लावत होता... आणि त्याला सारखा तो हॉलमागे घडलेला प्रकार आठवत होता..
सगळेजणं आता घरात पांगले.. आपापल्या कामाला लागले..., सिद पण जरा मित्रांमध्ये मिसळला..., आशू तशीच उभी होती.. तिच्या सोबत आलेली पाठराखीण, तिची मावस बहिण तिच्या सोबत होती...,
“अगं आशू बाळा.. बस बस.... अशी उभी काय केव्हाची...” सिदचे बाबा म्हणाले...
आशूला खूप भावलं त्यांचं हे प्रेमळ बोलणं...,
तसे सगळेजण आशूभोवती येऊन घोळका करू लागले...
“वहीनी.. वेलकम टू अवर सिद्स होम...” रिया मोठ्याने ओरडत म्हणाली...
आशू फक्त हलकेसे हसली...,
“वहिनी बसा की तुम्ही, अशा उभ्या का... हे आपलंच घर आहे बरं का.. कुठं बसावं आणि कसं बसावं असा संकोच नाही करायचा...” अभि म्हणाला...
आशू आताही नुसतीच हसली..
सिद हे सगळं पाहून कोपऱ्यातूनच लाजत होता... तो एकटक आशूकडे पाहत होता... तिचे सौंदर्य सकाळीही तसेच होते आणि आता रात्र झाली होती तरीही तसेच होते..., सकाळसारखाचा तेज अजूनही तिच्या चेहऱ्यावर होता..,
सगळ्यांच्या घोळक्यात ती अगदी बावरून गेली होती... अर्धा एक तास सगळेजण फक्त तिच्याशी गप्पाच मारत बसले होते.. तिला आपापली ओळख सांगत होते....,
थोड्यावेळाने लग्नात आलेला सगळा आहेर घरात आणण्यात आला..., तो आहेर तर आता कुठे ठेवावा असा प्रश्न होता.. सिदचं घर लहान असलं तरी सामान भरपूरच होतं.. त्यात हे आणखी सामान...,
सिदच्या मित्रांनी सगळे सामान मागच्या दारातल्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन ठेवले..., पण ते ठेवता ठेवता अभिला प्रश्न पडला, “काय रे संक्या.. मला तर हा पलंग पाहून मोठा प्रश्नच पडलाय...” अभिने संकेतला विचारले.
“कसला रे...?”, संकेतने शांतपणेच विचारले...
“सिद्याचं लग्न झालं, घाई-घाईत झालं.. ठिक आहे..., पण आता सर्वात मोठा प्रश्न मला हा पलंग पाहून पडलाय...”, अभिने पलंगाकडे इशारा करत म्हटले..
संकेत आधीच वेगळ्या विचारात होता.. त्यामुळे त्याला काही समजले नाही...,
“अरे नक्की म्हणतोय काय तू.. नीट बोल की...” तेज्या म्हणाला...
“अरे.. वेड्या..” अभिने तेज्याच्या डोक्यात मारले आणि म्हणाला, “सिदच्या घरात तर एकच बेडरूम आहे..., मग वहीनी आणि सिध्द्या.....” पुढे तो काही बोलला नाही...
संकेतचं लक्ष नव्हतचं यांच्या बोलण्याकडे, पण तेज्या पण विचारात पडला....,
“किचनमध्ये....????????” अभिने प्रश्न विचारत भुँवया उंचावल्या.....
“गप रे...,” तेज्या म्हणाला...., “अरे लग्न जरा घाईतच झालं..., काकांना वर एक मजला टाकायचा होता..., मग सिदचं लग्न करायचं होतं...”
“तेच ना..., खूपच घाई-घाईत लग्नं झालं.., असं कुठंच नसतं..., सात दिवसांपूर्वी मुलीला पाहायला गेले आणि आज लग्न पण झालं..., ते पण घाई-घाईतच.... काहीच एन्जॉय करता आला नाही...” अभि तोंड बारीक करत म्हणाला...,
“अरे उलट बरंय... ज्यांना लग्नाआधी एन्जॉय करता येत नाही ना, त्यांच्या आयुष्यात लग्नानंतर भरपूर एन्जॉयच एन्जॉयच असतो...,” तेज्या अभिला डोळे मारत म्हणाला...
तसा अभि मोठमोठ्याने हसत म्हणाला, “किचनमध्ये....?????” आणि हसतच तो घरात आला...
संकेत मनाशीच बोलला, नक्कीच काहीतरी झोल आहे..., खरंच एवढ्या लवकर लग्न का ठरवलं असेल मुलीकडच्यांना..., विचार करता करता त्याला सिमा आठवली... तिचा नंबर त्याच्याकडे होता.., हेही त्याला आठवले..., त्याने लगेच मोबाईल काढला...
शिट्ट.. या मुलीचा नंबर आपल्याकडे आहे आणि आपण सकाळपासून टेन्शनमध्ये आहे....
त्याने लगेच तिला कॉल लावला, पण तिचा नंबर स्विच ऑफ आला.. त्याने चार-पाच वेळा लावला पण तरी स्विच ऑफच आला...
तो सारखा तिला फोन ट्राय करतच होता, सारखा स्विच ऑफच येत होता..., तो आता तिच्याशी बोलण्यासाठी आतूर झाला होता.. नक्की तिला सिदशी काय बोलायचे असेल, त्यादिवशी तो डॅनी असं का तिच्याशी वागला, वगैरे वगैरे...असे खूप प्रश्न त्याला सतावू लागले..., त्याने तिला फेसबुकवर पण खूप मेसेज केले..,
***
रात्री जेऊन सगळे सिदचे मित्र आपापल्या घरी गेले.. काही पाहुणेही गेले आणि थोडेफार पाहुणे उद्या जाणार होते..., नवी नवरी आज सिदच्या वहिनीच्या रूममध्ये झोपणार होती.., सिद नेहमीप्रमाणे हॉलमध्येच आणि घरातले सगळे पाहुणे हे कुणी किचनमध्ये तर कुणी हॉलमध्ये असे झोपणार होते...,
सिदलाही या गोष्टीचे टेन्शन आले होते, लग्न तर झालं पण आता पाच दिवसांनी आम्ही दोघे झोपणार कुठे... आज तर तो घऱी आल्यापासून तिच्याशी बोलला पण नव्हता.. त्या दोघांचे फक्त नजरेने खेळ चालले होते..,
आशूने साडी बदलून तिचा रोजचाच सलवार कमिज घातला होता..., सिदच्या काकू, आज्या तिने साडी घालायला हवी होती अशी कारकूर करायला लागल्या.., पण सिदच्या आईने तर त्यांना ठणकावूनच सांगितले, माझी सून नाही ऐकणार कुणाचं.. तिला वाटेल ते ती घालणार..., आता सासूबाईंनीच सूनबाईची बाजू दाखवली म्हटल्यावर सगळ्याजणी गप बसल्या.. तसंही आता कोण रोज-रोज साड्या नेसतात, असं दोन तोंडांनी बोलत त्या गप बसल्या...
आशूच्या हातात डझनभर बांगड्या तशाच होत्या, मेहंदी आज जरा जास्तच रंगली होती..., चेहऱ्यावर कालच्या हळदीचा पिवळटपणा अजून होता..., ती आज खूपच सुंदर दिसत होती...,
सिद मात्र येता जाता चोरून चोरून आशूला पाहत होता..., त्याचं तर असं झालं होतं की लग्न होऊनही तिच्याशी त्याला बोलता येत नव्हतं.. सगळ्या बायका तिच्याभोवती गोळा होऊन बसल्या होत्या... सगळेजण त्याच्याकडे तर जाणून बुजून दुर्लक्ष करत होते..., बिचारा उगाच मित्रांमध्ये मिसळून तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत बसला होता.., आपलं लग्न झालंय आणि हीच ती आपली बायको आहे..त्याचा या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.., कदाचित हे स्वप्नं तर नाही ना त्याला प्रश्न पडत होता...,
***
रात्री सगळे जेवून झोपी गेले.., सिदला आज तर रात्रभर झोप येणार नाही हे नक्की होते..., त्याची मनाची अवस्था काहीशी वेगळीच झाली होती...,
उद्याची एक दिवस सुट्टी संपली तर त्याला जॉबवर जॉईन व्हायचे होते.., कॉलेजचे टेन्शन तो घेतच नव्हता..., पण आता पुढे काय, कसे त्याला काहीच समजत नव्हते...,
रात्री तीन-चार वाजता त्याचा डोळा लागला... आणि सकाळी सहालाच तो जागा झाला..., आई आणि वहिनी फक्त उठलीय.. बाकी सगळे झोपलेत वाटतं असा विचार करून तो किचनमध्ये आला तर त्याला समोर आशू दिसली...
त्याच्या ह्रदयात जोराने धस्सं झालं..., त्याला समजले नाही.. काय बोलावं आता.., तिने केसांना टॉवेल गुंडाळला होता.. आज तिने साडीच नेसली होती.., तिचे गोरेपान अंग, अंगावरचे नाजूक दागिणे, हातातला हिरवा चुडा, चेहऱ्यावर गोड स्माईल... ...,
सिदच्या तोंडून फक्त वाह असा शब्द येणं बाकी होतं...
तिचे लक्ष नव्हते.. ती आईंशी बोलत होती.., आई तिला स्वयंपाक घरातलं सांगत होत्या..
सिद तसाच किचनमधून बाहेर आला, आणि आशूने त्याला जाताना पाहिले...,
त्याने मागच्या दारातल्या मोरीत जाऊन अंघोळ आटोपली...,
आत आला तर सगळेजण उठले होते.., आशू किचनमध्येच होती.. तिने आजपासूनच किचनवर ताबा मिळवला होता.., त्याला आत जाऊ की नको असं होत होतं..., रोज उठल्या उठला किचनमध्ये जाऊन आईला कामात व्यत्यय आणणार सिद आज नुसता आत-बाहेर करत होता...,
“अगं आशू.. तुझ्या नवऱ्याला चहा आण गं.. बघ सारखा आत बाहेर करतोयय....” बाबा बाहेरून ओरडले..
तसा सिद बाबांकडे गेला, “श्यामराव काय तुम्ही पण...” तो सोफ्यावर बसला...,
“अरे गाढवा, बायकोसमोर तरी बाबा बोल मला.. नाहीतर ती म्हणेल, याच्या बापाने काही संस्कार केले की नाही ह्याच्यावर...”,
“ते सोडा हो..., मी वेगळ्या टेन्शनमध्ये आहे आणि तुमचं काय...?” तो हळूच बोलला..
“आता तुला कसलं रे टेन्शन...?”
तेवढ्यात आशू चहा घेऊन बाहेर आली...
तसा सिद शांतच झाला, तो चाचरू लागला...
बाबांनी त्याच्याकडे पाहिले आणि गालातल्या गालात हसू लागले...
“सिध्धू.. चहा घे.. नुसता बघत नको बसू..” आईपण तिच्या मागे आली..,
तसा सिदने चहा घेतला, कप घेताना तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याला झाला आणि तो एकदम शहारलाच... आता पर्यंत बऱ्याच मुलींचा त्याला असा स्पर्श झाला होता.., पण ह्या स्पर्शात काहीतरी खासच होतं...,
त्याने चहा घेतला आणि ती त्याला स्माईल देऊन आत निघाली..
“ए पोरी.. आत कुठे चालली?” आई म्हणाली.. “तुला पण चहा आणलाय मी..., चल बस सगळे बसून चहा घेऊ...”
तसे उरले सुरलेले पाहुणे पण बसले, चहा घेऊन ते निघणार होते...
आशूला सगळ्या अनोळखी माणसांसमोर लाजल्या सारखे होत होते..
“बस चल... ते स्त्रियांनी नंतर जेवायचं किंवा पुरूषांचं झाल्यावर नाष्टा वगैरे करण्याचा नियम नाही आमच्या घरात... स्त्री पुरूष समानता आहे इथं.. हो की नाही सिध्दू...?” आईने हसत म्हणाली.
तशी सिदने फक्त मान डोलावली...,
आशूला बरे वाटले, ती पण त्यांच्यासोबत चहा घ्यायला बसली...,
सिद चोरून-चोरून तिच्याकडे पाहत होता, तिच्या सगळ्या हालचाली तो डोळ्यात कैद करत होता.. आणि आशू मात्र खाली नजर घालून बसली होती..,
आजचा पूर्ण दिवस तिला पाहण्यातच गेला..., दोघेही नुसते एकमेकांकडे पाहत होते.., सिद तर तिच्याशी लग्नात थोडंफार बोलला होता.. पण आशूने मात्र अजून त्याच्याशी एक अक्षरही नीट बोलले नव्हते.., सिदच्याच कानावर पडले नव्हते....
संध्याकाळपर्यंत घरातले सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले.. आता घरात उरले होते ते सिदचे आई-बाबा, दादा-वहिनी आणि सिद- आशू....,आणि आशूसोबत आलेली तिची मावस बहिण...
सिदच्या आईने दोघांनाही उद्या देवदर्शनाला घेऊन जायचे ठरविले.., खरेतर आशूला हे असले काही पटत नव्हते.. पण तिला बाहेर जायला मिळणार या विचारानेच फार आनंद झाला... झाले किती वर्षं ती फक्त कॉलेज ते घर करत होती.. आता कुठे तिला खरे स्वातंत्र्य मिळणार होते..., ती फार सुखावली...., हसत तिने त्या गोष्टीला होकार दिला...,
झालं.. सिदने खूप काम करायचं ठरवलं होतं खरं., पण सगळ्यांनी त्याला पाच दिवसांनी जॉईन हो म्हणून सांगितलं..., आशूला मात्र ह्या गोष्टीचे वाईट वाटत होते की तो अजून जॉबला लागायचा आहे..., मनाने कितीही तो आवडला असला तरी मेंदूने तिला हे सगळं कठिण वाटत होतं..
पण म्हणतात ना कधी-कधी मेंदूचं नाही तर मनाचंच ऐकून घेणं योग्य असतं...,
रात्र होत आली.., उद्या आशूसोबत देवदर्शनाला जायचं या विचाराने सिद फारच आनंदी झाला होता..., तो बाहेर अंगणात फेऱ्या मारत होता.. आशू तर लगेच आईला कामात मदतही करायला लागली होती.. वहिनी,आई आणि आशू या तिघींची तर चांगलीच गट्टी जमली होती.. अगदी हसत खेळत त्या सगळ्या गोष्टी करत होत्या...
सिद मात्र बाहेर फेऱ्या मारत होता.. तसेही आज सगळे पाहुणे गेलेच आहेत.., तर आशूशी बोलण्याचं धाडस करावंच.. नाहीतर पाच दिवसांनी जेव्हा समोरा-समोर येऊ तेव्हा आपलीच धांदल उडेल... उद्या देव-दर्शनाला काय सगळेचजण सोबत असणार.., काही बोलता येणार नाही.., तसा सिद लाजरा नव्हता पण आशूचा विचार केला की त्याला लाजल्यासारखेच होत...
या तिघींचे घरातले काम वगैरे झाले आणि आता सगळेजण झोपायच्या तयारीत होते.., आज आशू आणि वहिनी एका रूममध्ये झोपणार होत्या आणि बाकी सगळेजण हॉलमध्येच...,
बाबा रात्रीचे शतपावली करण्यासाठी बाहेर गेले होते.., वहिनीही आपल्या खोलीत गेल्या.., संदिप दादाही बाहेरच होता...,
आता हॉलमध्ये काय नुसती आई आणि आशू होती...., आईसमोर काय लाजायचं म्हणून सिद बाहेरूनच सोफ्यावर आईंशी गप्पा मारत बसलेल्या आशूला खाणा-खूणा करू लागला...,
आशूचे लक्ष गेले.., तशी तिच्या काळजात कळ निघाली..., सिद तिला बाहेर बोलवत होता.., त्याच्या इशारांवरून तिला समजले होते की याला आपल्याशी बोलायचे आहे..., दोन दिवस फक्त डोळ्यांनीच ते दोघं एकमेकांशी संवाद साधत होते.. आता सिद्धार्थ बाहेर अंगणात बोलवून काहीतरी बोलणार.. या विचाराने आशूला घाम फुटला..., सिद तर तिला इशारा करतच होता, बाहेर ये म्हणून... पण ही काय जागची हालत नव्हती...,
“काय गं आशू.. अशी घाबरलीयस काय...?” सिदच्या आईने एकदम विचारले आणि ती पाहतेय त्या दिशेने बाहेर पाहिले तर सिद दिसला...
तशी सिदची आई मोठमोठ्याने हसू लागली... “अगं भूत दिसल्यासारखं काय पाहतेस.. नवराच आहे तुझा...,”
हे ऐकून सिद उगाच लक्ष नसल्यासारखं करायला लागला...
आशू काहीच बोलली नाही, सिदची आई हसत हसत उठली आणि उगाच किचनमध्ये काहीतरी काम करायला म्हणून गेली...
तसा सिदचा चेहरा फुलला..., “आशू बाहेर ये ना बोलायचं आहे...,” तो हळूच तिला म्हणाला...
आशूच्या चेहऱ्यावर भितीचे भाव उमटले......, ती उठली आणि म्हणाली.., “ते काल खूप जागरण झालं ना.., आज जरा लवकरच झोप आलीये...,” ती चाचरत बोलली...
“अगं थोडंसच बोलायचं आहे... तू बाहेर तर चल...” तो आत आला आणि बोलला...
आता तर आशू फारच घाबरली..., ती त्याची नजर चुकवून बोलली, “नाही, नको.. उद्या बोलूयात ना आपण...”
आशू अशी टाळाटाळ का करत आहे सिदला समजत नव्हते, त्याची आईपण हे सगळं किचनमधून ऐकत होती.., पण ती बाहेर आली नाही...,
तसा सिद हळूच बोलला, “बरं ठिक आहे.., तुझा नंबर तर दे....,” तो एकदम उतावळा होऊन बोलला.. कॉलेजमध्ये जसं आपल्या क्रशला मोबाईल नंबर मागतात तसं हा त्याच्याच बायकोला तिचा मोबाईल नंबर मागत होता...
आईला तर किचनमधून हसू आवरत नव्हतं...,
“ते.. ते...” आशू चाचरू लागली... “माझा मोबाईल घरीच राहिला.. मिन्स लग्नाच्या गोंधळात...” ती एवढच बोलली आणि खाली नजर घालून उगाच पदर हातात गुंडाळू लागली...
मोबाईल सारखी गोष्टं ही घरीच विसरून आली.. कमाल आहे.. सिदपण विचारात पडला..., त्याला जरा आशूचे वागणे विचित्र वाटले, ती त्याच्याशी असं वागत होती जसं काय तो तिच्या मागेच लागला आहे.. अरे यार मी नवरा आहे तुझा.... तो मनातल्या मनातच बोलत होता..,
काहीवेळ तो नुसता तिच्याकडे पाहत उभा होता आणि तिची नजर मात्र खाली होती...
“चल मग जरा बाहेर गप्पा मारूया.. तू तर सगळ्यांशी बोललीस, माझ्याशी काही बोललीच नाहीस अजून....” सिद पण आता जरा चाचरत बोलला...
तशी आशू म्हणाली, “प्लीज उद्या बोलू...” असं म्हणून ती सरळ वहिनीच्या बेडरूममध्ये निघून गेली...
सिद मात्र तसाच विचार करत बसला.. क्षणापुरती त्याच्या डोक्यात रागाची तिडीक गेली... ही अशी का वागत आहे त्याला समजेना....,
एवढे दिवस लाजून हलकेसे हसणारी, प्रत्यक्ष नाही पण डोळ्यानेच खूप काही बोलणारी ही, आता समोरा-समोर आलो तर का अशी परक्यासारखं करत आहे....,
तो तसाच काही वेळ बेडरूमच्या दारावर नजर खिळवून उभा राहिला....
क्रमशः
सध्या कॉलेज, जॉब.. या दोन्ही कारणांमुळे लिहायला जास्त वेळच मिळत नाहीये.... त्यामुळे पुढील भाग काहीसे उशिरा येतील.. जास्त उशीर होणार नाही याची मी काळजी घेईल....
तुम्ही सर्वजण माझ्या कथेवर करत असलेल्या प्रेमासाठी खरेच मनापासून आभार...!!!
-Bhartie “शमिका”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा