भाग 8
रात्री सिदला झोपच लागत नव्हती.., रात्री एक वाजेपर्यत सगळे झोपी गेले.., सिद मात्र इकडून तिकडे फिरत होता..., उद्या लग्न होणार या विचाराने तो आता अस्वस्थ होता..., त्याच्या रूममध्ये त्याचे बाबा, काका वगैरे असे काही पुरूष मंडळी होते.. ते केव्हाचेच झोपी गेले होते...,
आजच्या सर्व गडबडीत तो मित्रांशी नीट बोललाच नव्हता.., तो त्याचा मोबाईल शोधू लागला.., पण तोही कुठे आहे हे त्याला आठवत नव्हते..., तो तसाच बाहेर हॉलमध्ये आला.., हॉलची सजावट आणि त्यात स्टेजवर लावलेल्या रंगेबीरंगी लाईट्स पाहून तो स्वप्नातच गेला.. इथेच उद्या आशूचं आणि माझं लग्न होणार.., कसं होणार, काय होणार..., तो विचारांतच बुडाला होता..,
तेवढ्यात मागून संकेत आला.., त्याने सिदच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “काय रे सिध्ध्या.. झोपला नाही का...?”
“अरे संकेत तू..” सिद त्याच्याकडे वळला आणि म्हणाला..., “अरे कुठं आहेत कुठे सगळे मित्रमंडळी...?”,
“आहेत ना.. वरच्या रूममध्ये आहोत आम्ही...,.., तुझा मोबाईल टिनाकडे होता.. म्हणून घेऊन आलो...”
“अरे हो... तिच्याकडे दिलेला मी...” सिदने स्माईल दिली आणि त्याच्याकडून मोबाईल घेतला...
संकेत मनात विचार करत होता.., काय करू सांगू का ह्याला.. दुपारी आपण जे पाहिले ते..., का ह्याला त्याचे टेन्शन येईल... काय करू... तो तसाच अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पाहत होता..
“काय रे संक्या.. एवढा टेन्स का वाटतोय..?” सिदने हसत त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि दोघं तिथं शतपावली करू लागले...
“नाही रे.. असंच..”
“माझ्या लग्नाचं तुच टेन्शन घेतलेलं दिसतंय...” सिद हसत म्हणाला...
“सिद अस्वस्थ होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेजही होते.., तो खूप खूश होता हे संकेतला समजले आणि त्याने आज हॉलच्या मागे जे पाहिले ते त्याला न सांगण्याचे ठऱवले... पण तरी त्याच्या मनात प्रश्न होतेच.. कोण होती ती मुलगी जी कॉलेजमध्येही सिदशी महत्त्वाचं काहीतरी बोलायला आली होती..., जर त्याची कुणी चाहती असेल तर तिला मग आशू वहिनींचा भाऊ कसा ओळखत असेल..., आणि तो असा का वागला असेल तिच्याशी....
खूप विचार करून तो शेवटी मनाशीच म्हणाला, असेल काहीतरी तिच्या भावाचाच मॅटर..., शेवटी गुंडच दिसतो तो... असा विचार करून तो झोपायला गेला आणि सिदही त्याला बाय बोलून आपल्या खोलीत आला..,
दिवस उजाडला आणि पुन्हा काल सारखा सगळीकडे गोंगाट सुरू झाला.., आशूच्या तर मनात आधीपासूनच चल-बिचल सुरू होती..., कारण आता तिचं मन काही वेगळंच सांगत होतं आणि मेंदू काहीसं वेगळंच..
पण आज तिने जास्त विचार केला नाही, नाईलाजाने तिने तिच्या मनाचे ऐकले आणि दुपारी एक पर्यंत तिने थरथरत्या हाताने सिदच्या गळ्यात हार घातला..., सिदने तिच्या गळ्यात मंगळसुत्रं बांधलं आणि पाहता पाहता आशूच्या नावापुढं सिदचंही नाव लागलं गेलं..., आता तिला तिच्या आयुष्यात जे होणार ते फक्त पाहत बसणं आणि सहन करणं याखेरीज काहीच करता येणार नव्हतं.. याची तिला खात्री पटली... तिचे आई-बाबा, भाऊ, मोठी बहिण.. एकंदरीत घरचे सगळेच फार खूश होते..., त्यांच्या मते तिचं जरा उशिराच लग्न झालं होतं... पण झालं ह्यामध्ये सगळे खूश होते..
आता पुढे काहीही झाले तरी लग्न हे त्यांच्यासाठी एक मोठे कारण होते, त्याच कारणामुळे सिदला आता बांधून ठेवता येणार होते...
लग्नाचे सगळे विधी उरकले, नवरा- नवरीने एकमेकांना घास भरवले.. सर्वांच्या पाया पडून, सर्वांसोबत फोटो वगैरे काढून झाले..,वगैरे वगैरे.... हे सगळं जरा घाईतच झाले... लग्न कधी लागलं आणि आशूच्या पाठवणीची वेळ कधी आली हेही कुणाला समजले नाही...,
एकंदरित आशू आणि सिदचं लग्न संपन्न झालं..., आता इथून पुढं खरा आशूच्या आयुष्यात संघर्ष होता.. तिची आई आता काळजीत पडली होती..., जशी तिला निरोप द्यायची वेळ आली, तिची आई तिच्या भविष्याचाच विचार करून जोरजोरात रडू लागली... बाबा आणि डॅनीच्या डोळ्यातही पाणी आले.. शेवटी जिला एवढा त्रास दिला, एवढ्या धाकात ठेवले, तिने कधी चुकीचे पाऊल न उचलता आपले ऐकून आपण सांगितले त्याच मुलाशी लग्न केले, याबद्दल त्यांना समाधान वाटत होते...
आता लग्न झाल्यावर जे होईल ते होईल.. याची त्यांना फिकीर नव्हती.. पण आई आणि आशू मात्र गळ्यात पडून खूप वेळ रडत होत्या.. आशूची अवस्था पाहून सिदच्या आईच्याही डोळ्यात पाणी आले.. त्या पुढे आल्या आणि आशूला म्हणाल्या... “हे शेवटचं रडणं हा तुझं... आता इथून पुढं कधी तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही ही आमची जबाबदारी असेल...”
तसेच सिदचे बाबाही “हो हो.. मग अर्थात... आमच्या घरातला कुणीच रडत नाही.. कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आलेच, तर ते हसून हसून आलेले किंवा आनंदाश्रूच असतात......” बाबा मश्करीच्या सूरात म्हणाले....
संदिप आणि वहिनीही तिला आधार देऊ लागल्या..
“मग काका विषये का.. आपल्या सिदची बायको म्हणजे ती कधी रडूच शकणार नाही....,” रिया पण आशूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली..
तसा अभि पुढे म्हणाला, “बरोबरे... जोकर जो आहे आपला सिद..., लोकांच्या मिमिक्री करून आपल्याला हसवत असतो....,
तसे सगळेजण हसायला लागले...,
मुलीकडचे तर आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत होते... पाठवणीच्या वेळेस मुलाकडचे असले जोक करत आहे हे पाहून त्यांनाही गंमत वाटली, पण एकंदरित मुलाकडचे फारच फ्रँकली आहे हे त्यांना समजले...
सिद रियावर खोटा-खोटा रागवत बोलला.. “आणि तुमच्या सगळ्यांसारखे नमुने मित्रं... जे चोवीस तास माझ्या आस-पास असतात....,”
“हो मग... असणारच आम्ही.. तुझ्या मागे-पुढे.. यु डोन्ट वरी भाई... तुझ्या हनीमूनच्या स्पॉटवरपण आम्ही पिकनिकही एरेंज करू...” तेज्या म्हणाला....
पाठवणीच्यावेळेसच हनीमूनचा विषय... मुलाकडचे जरा चावटच आहेत सगळे..., असं म्हणत काही बायका गालातल्या गालात हसू लागल्या....
सिद एवढ्या लोकांमध्ये लाजत होता..., हे चित्र जरा वेगळंच होतं.. आशूही जरा टेन्शनमधून बाहेर आली..., तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कुठल्या कुठे पळून गेलं... सिदसारखेच त्याच्या घरातलेही फारच मनमोकळ्या स्वभावाचे आहेत असं ती मनाशीच बोलली आणि हसत हसत सर्वांच्या पाया पडून, सर्वांना भेटून आपल्या सासरी निघाली...
संध्याकाळपर्यंत लग्नाची वरात सिदच्या घराजवळ आली.. तसे त्याचे मित्र- मैत्रीणी बेभान होऊन वरातीत नाचू लागले..., सिदला पण खाली बोलवू लागले.. पण हा पठ्ठ्या आता तर आणखीनच लाजू लागला..., कारण रथात बसल्यावर सारखा त्याचा स्पर्श आशूला होत होता.., सारखे दोघांचे एकमेकांवर तोल जात होते.. तो एका वेगळ्याच विश्वात होता... तिथे फक्त तो आणि ती होती..., ती त्याच्या स्वप्नांतली परीच होती..
तो नेहमी स्वप्न पाहायचा, माझी बायको ही जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असणार... तिचे रूप पाहूनच त्याला जगण्याची नवी उमेद मिळणार, सुंदर आणि त्याचसोबत अगदी नाजूक स्वभावाची, स्वच्छ मनाची आणि सिदला प्रत्येक सुख-दुखःत साथ देणारी..., आशू ही तशीच होती, असा त्याचा समज झाला..., त्याचे सगळे ऐकणारी, त्याला मान देणारी पण काही चुकले की खडसावून कान पकडणारी... अगदी त्याच्या आईसारखीच... घरातलेही नीट करणारी आणि बाहेरचे व्यवहारही योग्यप्रकारे पाहणारी... आजच्या काळातली मॉडर्न सूनही आणि जुन्या काळातली खाली मान घालून सगळं ऐकणारीही.. अशी समिश्र प्रकारची बायको त्याला हवी होती.. आणि तिच आज त्याच्या शेजारी त्याची बायको म्हणून बसली होता...
सिद आता हवेत होता....,
अभिने सिदला खाली ओढले .. आणि नाचायचा आग्रह केला...
तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू दे
माझं काळीज लागलाय नाचू न गाण वाजू द्या..
हळदीने माखली सुरी नी इथं घोड्यावर चढलो मी..
हातात कट्यार नि बाशिंग मधाच्या पेवात पडलो मी....
माझ्या मनाच्या, माझ्या मनाच्या मातीत थिजत बियान रूजू द्या..
माझं काळीज लागलाय नाचु न गाणं वाजू द्या...
हे गाण जोरजोरात डिजेवर चालू होतं.. आणि सिदही त्या गाण्याच्या तालावर थिरकू लागला....., हे पाहून आशू तिचे दुःख विसरून गेली होती.. आता सिद हाच माझा जीवनसाथी, तोच माझे सर्वस्व.. त्याला आयुष्यभर मी साथ देणार..., कितीही अडचणी आल्या तरी त्याला कधी सोडणार नाही... बारावीच शिकला असला तर काय झाले.. त्याला पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी आग्रह करेल, मी मदत करेल...., रथात बसून ती आता तिच्या सुखी संसाराचे स्वप्न पाहत होती....
सिदचे आई-बाबाही हे पाहून सुखावले होते, कमी शिक्षण, त्यात उडाणटप्पू असलेल्या आपल्या मुलाचे लग्न होईल की नाही, त्याला कधी कोणती मुलगी आवडेल की नाही आणि कोणती मुलगी त्याला होकार देईल की नाही, अशा भितीत जगलेले हे दोघं आज फारच खुश होते...,
रात्री आठपर्यंत वरात घराजवळ आली.. घरासमोर मोठी फटाक्यांची आताशबाजी झाली आणि सिद व आशू रथातून खाली उतरले...,
सगळेजण त्या दोघांजवळ घोळका करू लागले..., झालं बाई एकदाच गल्लीतल्या हॅंडसम बॉयचं लग्न झालं, असं म्हणत सगळ्या बायका सिद-आशूच्या जोडीकडं पाहत होत्या.. कित्येक मुलींना तर धक्काच बसला होता.. सिद आज न उद्या आपल्या प्रपोजलला हो म्हणेल अशा आशेवर असलेल्या त्या मुलींना आज प्रेमभंग झाल्यासाखा त्रास होत होता...,
आशू तांदळाने भरलेले माप ओलंडणार इतक्यात वहिनीने तिला नाव घेण्याचा आग्रह केला,,
आता आशूला टेन्शन आलं... तिला तिचं लग्न होणार की नाही याचीच शाश्वती नव्हती तर ती नाव कुठून पाठ करणार..., आणि तिला लग्न ह्या गोष्टीवरच आधीपासून विश्वास नव्हता..
आता सगळेचजण नव्या नवरीला नाव घे म्हणून आग्रह करू लागले...
तिला तर टेन्शन आलंच पण सिदच्या पण चेहऱ्यावर बारा वाजले होते.. कारण आशूनंतर सिदचाच नंबर होता...,
आशू इकडे तिकडे पाहू लागली, सगळेजण गालातल्या गालात हसत होते.. पण त्यांना तिला नाव घेतल्याशिवाय सोडायचे नव्हते...
ती बारीक तोंड करून सिदकडे पाहू लागली, सिदने तिला डोळ्यानेच इशारा केला, मलाही येत नाहीये....
सगळेजण त्या दोघांची ही अवस्था पाहून हसत होते...,
“अगं आशू घे नाव..., सिद बघ खूप आतुर झालाय तुझ्या तोंडून त्याचं नाव ऐकायला....” सिदची एक बहिण म्हणाली..
तसं सिदने तिच्याकडे रागाने पाहिलं... ऐ मी कधी.. असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते...
“ते.. मला नाही येत नाव घ्यायला...” आशू मोठे धाडस करून चाचरत बोलली..
“तसा सिदपण म्हणाला, करेक्ट.. मलाही येत नाही नाव घ्यायला..., एक काम करतो, मी तिचं नाव घेतो ती माझं नाव घेईल... झालं...” सिद बालिशपणे म्हणाला...
“ए वेड्या.. नाव नुसतं घ्यायचं नसतं.. उखाण्यातून घ्यायचं असतं...” रिया म्हणाली..
“म्हणजे नेमकं कसं गं रिया.. जरा दाखव आम्हाला घेऊन...” सिद तिची खेचत म्हणाला..
“ते.. ते.. दोन तीन ओळी बोलायच्या.. मेथीत भाजी, किंवा परात वगैरे.. असंच काही...” रिया गडबडली... तसे सगळे सिदचे मित्र तिला चिडवू लागले...
आशू हे पाहून फार हसू लागली... याचे मित्र मैत्रीणीपण त्याच्यासारखेच दिसत आहे... तिने तोंडावर हात ठेवला आणि हसू लागली....
“ये तुम्ही काय मस्ती करताय इथं...? नाव आशूला घ्यायचंय रियाला नाही... रिया तुझ्या लग्नाच्यावेळीस तू घे, आता हो जरा बाजूला...” वहिनी पुढे आली..,
“आशू घे गं लवकर नाव.. काही पण घे... तोडकं मोडकं... चालेल....”
आशू शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करतच होती.. तितक्यात सिद म्हणाला, “सुचलं....”
सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले...
“ये, मला सुचलंय.. मी घेतो आधी....” असं म्हणतो तो बोलू लागला....
ती सुंदरी, मृगनयनी... स्वच्छंदी मनाची...
कोमल आवाजाची जणू स्वररागिणी...
रात्री नभी दिसणारी चांदणी,
तिच्या सुवासाने सर्वांना सुगंधित करणारी रातराणी....
तिचे रूप भावले डोळा, जीव भुलला तिच्यावर हा भोळा..
आशूच माझ्या स्वप्नातली परी...
जिला बनवून माझी नवरी
घेऊन आलोय मी माझ्या घरी....
त्याचे मित्र मध्ये-मध्ये वा.. वा... असं म्हणत हसत होते...
तसे आशूच्या ह्रदयात नाजूकशी कळ निघाली..... त्याने केलेले तिचे वर्णन ऐकून तिला एकाएकी खूप भारी वाटले...., आपण कुणीतरी खास आहोत, हे सिदने तिला जाणवून दिले...., तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना आता ती थांबवू शकली नाही.....
त्याचे सगळे मित्र इव्यु.. इव्यु करून ओरडू लागले...
पण बाबा पुढे म्हणाले, “सिध्द्या.. तुला उखाणा घ्यायचा होता.. तू तर कविताच केली आशूवर...”
बाबा असं म्हटल्यावर सगळेजण मोठ्याने हसू लागले...
“ठिके.. कविता तर कविता... उलट आशूला फारच आवडली असणार आमच्या ह्या कवीची ही कविता... पहिली कविता असेल ना सिद आशूवर केलेली...?” संदीपने डोळा मारत विचारले.
तसा सिद लाजला....
“ओह माय गॉड.. सात दिवसातच ह्या मुलाने डायरी भरून कविता केलेल्या दिसताते आपल्या बायकोवर....”असं म्हणत संदिप पण हसू लागला...
सिद चोरून चोरून आशूकडे पाहत होता.. तिच्या डोळ्यात त्याला एक वेगळीच चमक दिसली....
आता आशूवर उखाणा घ्यायची वेळ होती...
सगळेजण तिला आता आग्रह करू लागले...
आणि सिदच्या चार ओळी ऐकून तिला सुचलेले शब्द तिने ऐकवले....
होती वाट माझी वेगळी, दिवसही होता अंधारलेला....
सिद्धार्थच्या येण्याने आयुष्याला माझ्या अर्थ आला....
आशूचा उखाणा ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले...
सिदने तिच्याकडे पाहिले तसे तिच्या डोळ्यांच्या कडांवरून अश्रूचा एक थेंब खाली पडला...,
सिदलाही तिच्या अश्रूंचे कारण समजले नाही..., तो काही सेकंद तिच्या उखाण्याचा आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा अर्थ लावत बसला....
क्रमशः
Bhartie "शमिका"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा